Newsworldmarathi Mumbai: मुंबईतील पायधुनी परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री १०.३० च्या सुमारास अब्दुल्ला डोकाडिया (४०), त्यांच्या पत्नी नसरीन (३५), मुलगी आयशा (१६) आणि जैनब (१३) यांनी आपल्या नातेवाईकांसोबत रात्रीचे जेवण केले होते. या जेवणात बिर्याणीचा बेत होता. हे जेवण आटोपून त्यांचे नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर रात्री १ ते १.३० च्या सुमारास कुटुंबातील या चारही सदस्यांनी कलिंगड खाल्ले. त्यानंतर काही तासांनी या चौघांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली.
यानंतर २६ एप्रिल रोजी पहाटे ५.३० ते ६ च्या दरम्यान कुटुंबातील सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली. यावेळी सर्वात आधी जैनब (१३) यांचा सकाळी १०.१५ वाजता मृत्यू झाला. त्यानंतर दिवसभरात पत्नी आणि मोठी मुलगी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास कुटुंबप्रमुख अब्दुल्ला यांनीही प्राण सोडले.



Recent Comments