Newsworldmarathi Pune: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी कल्याण संघटनेच्या वतीने राज्यभर निदर्शने करण्यात आली. काळ्या फिती बांधून नियमित कामकाज करत अधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला असून, प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या विरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
दिनांक ९ जून २०२६ रोजी मध्यरात्री रहिमतपूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, मो. फरीद सिद्दीकी व नमुना सहायक अमोल कांबळे हे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीविरुद्ध कारवाई करत असताना काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. संबंधितांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अश्लील शिवीगाळ करत धमक्या दिल्या तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून अधिकाऱ्यांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला.
संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध करत सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. गुन्ह्यात वापरलेली वाहने, पिस्तुल व इतर साहित्य जप्त करून भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांतील कठोर कलमांनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील अन्न सुरक्षा अधिकारी अत्यल्प सुविधा व मनुष्यबळात जीवाची पर्वा न करता प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधात कारवाया करीत आहेत. अशा परिस्थितीत शासकीय अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले अत्यंत गंभीर असून त्यांच्याविरुद्ध उदाहरणात्मक कारवाई होणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
दरम्यान, विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ आणि आयुक्त तुकाराम मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विचारपूस करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचा पुनरुच्चार संघटनेने केला आहे.



Recent Comments