Newaworldmarathi Pune: “आम्हाला वडील नाहीत, तरी आम्ही खूप अभ्यास करू आणि सैन्यात भरती होऊन तुमच्यासारखीच देशसेवा करू,” असे अभिवचन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथील अधिकाऱ्यांना दिले. या शब्दांनी उपस्थित अधिकारीही भावुक झाले. भोई प्रतिष्ठान आणि अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघ, नांदेड यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘पुण्यजागर’ प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांच्या एनडीए भेटीदरम्यान हा हृदयस्पर्शी प्रसंग घडला.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण भोई प्रतिष्ठान आणि अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघ गेली बारा वर्षे सांभाळत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी या विद्यार्थ्यांसाठी जगप्रसिद्ध लष्करी प्रशिक्षण संस्था एनडीए, पुणे येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती.
सुमारे सात हजार एकर परिसरात विस्तारलेल्या एनडीएमध्ये भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांचे प्रशिक्षण दिले जाते. येथे विद्यार्थ्यांनी विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन, जहाजे, अश्वदळ तसेच विविध लष्करी साधने प्रत्यक्ष पाहिली. देशसेवेसाठी सैनिकांना दिल्या जाणाऱ्या कठोर शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रशिक्षणाची माहिती देणारी चित्रफीतही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.
एनडीएच्या प्रशस्त आणि अत्याधुनिक मेसमध्ये एका टेबलावर ठेवलेले जेवणाचे ताट आणि समोरची रिकामी खुर्ची पाहून विद्यार्थ्यांनी चौकशी केली. त्यावेळी युद्धात बेपत्ता झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ रोज हे ताट ठेवले जाते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे ऐकून सर्वजण भावनाविवश झाले.
उपक्रमाचे संयोजक, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता देशप्रेम, देशसेवा आणि सैन्याविषयी आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले. “सेवा परमो धर्मः (Service Above Self)” हा सैन्याचा मंत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हाच या उपक्रमामागील हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले या विद्यार्थिनींनी एनडीए परिसरातील पवित्र माती सोबत घेत देशसेवेची शपथ घेतली. “एक दिवस आम्हीही एनडीएमध्ये प्रवेश मिळवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, एअर कमांडर आर. एम. श्रीधरन, ब्रिगेडियर विनोद कुमार, लेफ्टनंट कर्नल दलजीत सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले.


Recent Comments