Newsworldmarathi pune: कै. सौ. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्त मंडळाची निवड जाहीर करण्यात आली असून ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुनीत बालन यांची निवड करण्यात आली आहे. राजू बलकवडे यांची कार्यकारी विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ॲड. विवेक भरगुडे आणि वर्षा थोरवे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
तसेच सुरज थोरात यांच्याकडे खजिनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून नितीन पंडित यांची उत्सव प्रमुख तर मनीषाताई खेडेकर यांची उपउत्सव प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाढवे यांची विश्वस्त म्हणून निवड झाली आहे.
दरम्यान, ट्रस्टच्या विश्वस्त निवड प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप काही व्यक्तींनी केला होता. मात्र, या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर निवड प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार नव्या विश्वस्त मंडळाची निवड निश्चित करण्यात आली.
नवीन विश्वस्त मंडळाच्या निवडीमुळे मंदिराच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना अधिक बळ मिळणार असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.
“धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निकालाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. ‘भगवान के दरबार में देर है, अंधेर नहीं’ या उक्तीचा प्रत्यय देणारा हा निर्णय असून न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. दत्तमंदिर ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून मंदिराची परंपरा, श्रद्धा आणि संस्कृती यांना कोणताही धक्का लागू न देता भाविकांसाठी अधिकाधिक समाजोपयोगी आणि लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यावर आमचा भर राहील. भक्तांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
– पुनीत बालन, अध्यक्ष, कै. सौ. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट.


Recent Comments