Newsworldmarathi Pune: केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी (दि. १८ जून २०२६) रात्री दुःखद निधन झाले. निधनसमयी ते ८६ वर्षांचे होते. रात्री १०.२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मोहोळ कुटुंबीयांवर तसेच सामाजिक, सहकारी आणि क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
किसनराव मोहोळ यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल ४० वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. आपल्या कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे आणि सहकाऱ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे त्यांनी सहकारी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. बँकेतील दीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.
सहकारी क्षेत्राबरोबरच किसनराव मोहोळ हे नामवंत पैलवान म्हणूनही ओळखले जात होते. कुस्ती क्षेत्रात त्यांनी आपल्या ताकदीचा आणि कौशल्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त, मेहनत आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम दिसून येत होता. त्यामुळे विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्तींनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
किसनराव मोहोळ यांचे अंत्यदर्शन शुक्रवारी (दि. १९ जून २०२६) सकाळी ७ ते ९ या वेळेत कोथरूड येथील ‘वेणूकृष्णा’ निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, किसनराव मोहोळ यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, सहकारी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत असून मोहोळ कुटुंबीयांच्या दुःखात अनेकजण सहभागी झाले आहेत.


Recent Comments