Newsworldmarathi Pune : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे देशभर सुरू करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ या राष्ट्रव्यापी विद्यार्थी अभियानाचा महाराष्ट्रातील शुभारंभ आज पुण्यात काँग्रेस कार्यसमिती (CWC) सदस्य कन्हैया कुमार आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी, कॉंग्रेस गटनेते चंदूशेठ कदम यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठ देत शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, पेपरफुटी, भरतीतील विलंब आणि एनटीएच्या अपयशाविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
*पत्रकार परिषदेत बोलताना कन्हैया कुमार* यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, देशातील लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत असताना पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे, निकालातील विलंब आणि भरती प्रक्रिया रखडल्यामुळे त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. विद्यार्थी कोणतीही विशेष सवलत मागत नाहीत; त्यांना केवळ निष्पक्ष परीक्षा आणि वेळेत नोकरी हवी आहे.
ते पुढे म्हणाले की, NEET-UG 2026 पेपरफुटी हा एक अपवाद नसून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या अपयशाचे प्रतीक आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात ८९ हून अधिक पेपरफुटी आणि परीक्षा घोटाळे उघडकीस आले असून कोट्यवधी विद्यार्थी त्याचा फटका बसले आहेत. तरीही मोठे सूत्रधार आणि त्यांना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
कन्हैया कुमार यांनी असा आरोप केला की, शिक्षण व्यवस्था आज विद्यार्थ्यांना संधी देणारी नसून “रिजेक्शन सिस्टीम” बनली आहे. महागडी कोचिंग व्यवस्था, रिक्त पदे, सतत पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षा आणि वाढती बेरोजगारी यामुळे तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास ढासळला आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, पेपरफुटी आणि भरतीतील अन्याय या विषयांवर केंद्र सरकार आणि पंतप्रधानांचे मौन अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी कोटा येथून सुरू केलेल्या ‘छात्रों की गूंज’ अभियानाचा उल्लेख करत, हे केवळ विद्यार्थ्यांचे आंदोलन नसून युवा भारताचे भविष्य वाचविण्याची लढाई असल्याचे सांगण्यात आले. *देशातील २८ प्रमुख शहरांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक, महाविद्यालये, वाचनालये आणि कोचिंग केंद्रांमध्ये व्यापक जनसंपर्क केला जाणार आहे.*
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
पेपरफुटी माफिया, संबंधित एजन्सी, अधिकारी आणि राजकीय संरक्षण यांची निष्पक्ष चौकशी करावी.
एनटीएसह(NTA) संपूर्ण परीक्षा व्यवस्थेचे पुनर्गठन करून पेपर सेटिंग, प्रिंटिंग, वाहतूक, परीक्षा केंद्रे आणि डिजिटल प्रणाली सुरक्षित करावी.
सर्व स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेसाठी निश्चित वार्षिक कॅलेंडर जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.
अभियानाचा पुढील आराखडा
३० जूनपासून देशातील २८ शहरांत पत्रक वाटप, विद्यार्थी संपर्क आणि नुक्कड सभा.
जुलै महिन्यात कॅम्पस संपर्क आणि ‘आंबेडकर संवाद’ कार्यक्रम.
१ ऑगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे.
९ ऑगस्ट रोजी ‘दिल्ली चलो’ आंदोलनाद्वारे पहिल्या टप्प्याचा समारोप.


Recent Comments