Homeपुणेमहाज्योती व वनार्टीतील कोट्यवधींच्या निविदांची चौकशीची मागणी; प्रशांत वावगे व चंदनसिंग यांना...

महाज्योती व वनार्टीतील कोट्यवधींच्या निविदांची चौकशीची मागणी; प्रशांत वावगे व चंदनसिंग यांना पदावरून हटविण्याची मागणी

Newsworldmarathi Pune: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) तसेच वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) येथील कथित आर्थिक गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेते रोहन सुरवसे पाटील यांनी महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisements

निवेदनात महाज्योतीचे वित्त व लेखा अधिकारी तथा वनार्टीचे प्रभारी संचालक प्रशांत वावगे आणि महाज्योतीचे टेंडर सल्लागार चंदनसिंग यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या निविदांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र उच्चस्तरीय समिती किंवा सक्षम तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, प्रशांत वावगे हे महाज्योतीमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांच्या बदलीनंतर प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या निविदा मंजूर झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व निविदांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वनार्टीच्या प्रभारी संचालकपदाची जबाबदारी सांभाळत असतानाही त्यांच्या कार्यकाळात काही निविदा विशिष्ट संस्थांना देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून या व्यवहारांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टेंडर सल्लागार चंदनसिंग यांच्याविरोधातही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अनेक वर्षे टेंडर सल्लागार म्हणून कार्यरत राहून त्यांनी स्वतःच्या किंवा संबंधित संस्थांना तसेच परिचित संस्थांना कोट्यवधी रुपयांच्या निविदा मिळवून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विविध व्यक्तींच्या नावाने संस्था किंवा कंपन्या स्थापन करून निविदा वळविण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच प्रशांत वावगे आणि चंदनसिंग यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त करून त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रोहन सुरवसे पाटील यांनी प्रशांत वावगे यांना महाज्योती व वनार्टीतील सर्व पदांवरून तात्काळ दूर करणे, चंदनसिंग यांची टेंडर सल्लागार म्हणून नियुक्ती रद्द करणे, त्यांच्या कार्यकाळातील सर्व निविदांची चौकशी करणे, दोषी आढळल्यास फौजदारी व विभागीय कारवाई करणे, शासनाच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे तसेच चंदनसिंग यांच्याशी संबंधित संस्थांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकून सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेतून वगळण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार
रोहन सुरवसे पाटील यांनी इशारा दिला की, महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली नाही, तर या संपूर्ण प्रकरणाची तक्रार थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात येईल. तसेच या कथित आर्थिक गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री स्तरावर लावून धरली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments