Homeपुणेअनुराधा ओक, प्रियांका इंगळे यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार’

अनुराधा ओक, प्रियांका इंगळे यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार’

Newsworldmarathi pune: महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या २८ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी, अभिनेत्री व दिग्दर्शिका नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते सोमवारी (ता. १२) शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात झाले. यावेळी बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक आणि भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘तेजस्विनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Advertisements

महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर युवा कलाकारांनी ‘आई गिरीनंदिनी’ या देवीगीतावर नृत्य सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. हा महोत्सव १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

Advertisements

यंदा बालभारती संस्थेच्या स्थापनेचे ६० वे वर्ष सुरू असून, संस्थेच्या संचालिका अनुराधा ओक यांनी शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार स्वीकारला. तसेच पहिल्या महिला खो-खो विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाची कर्णधार प्रियांका इंगळे हिचाही गौरव करण्यात आला. पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, देवीची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याशिवाय १५० हून अधिक गुरुजनांचा स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.

महिलांनी स्वतःसाठी वेळ काढावा
नीलम शिर्के-सामंत यांनी मिश्किल शैलीत संवाद साधत महिलांना स्वतःच्या क्षमतांची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “प्रत्येक महिलेच्या अंगात नवदुर्गा असतात. त्यांची जाणीव होणे आणि गरजेनुसार त्या शक्तीचे योग्य रूप दाखवणे आवश्यक आहे. महिलांवर अनेक ताण असतात; मात्र हसतमुख राहून जीवनातील आनंद शोधला पाहिजे. हसण्याची एकही संधी सोडू नका. महिलांनी दिवसातून किमान १५ मिनिटे स्वतःसाठी द्यावीत. आपल्याला करावेसे वाटते, पण आजवर करता आले नाही, अशी एखादी गोष्ट करण्यासाठी हा वेळ वापरावा.”

महिलांनी महिलांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण करणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून त्यांनी रंगभूमीच्या माध्यमातून राज्यातील अडीच ते तीन लाख मुलांसाठी काम करत असल्याचे नमूद केले. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राज्यभर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘महिलांची आंतरिक प्रेरणा ऊर्जा देते’
अनुराधा ओक म्हणाल्या, “नवरात्र म्हटले की महिलांमधील एक वेगळी ऊर्जा जागृत होते. आजचा सन्मान म्हणजे आपल्या कुटुंबाचाच सन्मान झाल्यासारखे वाटते.” बालभारतीच्या कार्याविषयी बोलताना त्यांनी दहा भाषांमधून पाठ्यपुस्तकांची निर्मिती आणि वितरण करण्याची जबाबदारी संस्था पार पाडत असल्याचे सांगितले. नवीन पाठ्यपुस्तके तयार करताना अनेक अडचणी आल्या; मात्र अथक परिश्रमांतून हे आव्हान पेलता आले. महिलांमधील आंतरिक प्रेरणा त्यांना ऊर्जा देते. मुलांना चांगले शिक्षण दिल्यास ते उद्याचे जबाबदार नागरिक बनतील, असेही त्यांनी नमूद केले.

प्रियांका इंगळे म्हणाली, “आज पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे. माझ्या प्रवासात अनेक चढ-उतार आले; मात्र खेळामुळे आज मान-सन्मान मिळाला. खेळाडू मैदानावर अधिक वेळ घालवत असल्याने अशा कार्यक्रमांत व्यक्त होण्याची संधी कमी मिळते.” महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढून दररोज सकाळी व्यायाम करावा, असे आवाहनही तिने केले.

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आई – वडील आणि गुरुजणांचा सत्कार केला पाहिजे. गुरुमुळे आपण घडलो ही जाणीव प्रत्येकाने मनात बाळगली पाहिजे असे सांगून आयोजक अध्यक्ष आंबा बागूल यांनी तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनुराधा ओक आणि प्रियंका इंगळे यांचे अभिनंदन केले.
प्रारंभी महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागूल यांनी सर्वांचे स्वागत केले.

यावेळी महोत्सवाचे आयोजक आबा बागुल, अध्यक्षा जयश्री बागुल, उपाध्यक्षा निर्मला जगताप, संगीता बागुल आणि प्रांजली गांधी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता जगताप यांनी तर आभार प्रदर्शन निर्मला जगताप यांनी केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments