Homeपुणेअतिक्रमण कारवाईत दुकानांचे नामफलक काढू नयेत; महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश : सभागृह नेते...

अतिक्रमण कारवाईत दुकानांचे नामफलक काढू नयेत; महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश : सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या मागणीला यश

Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान दुकानांवरचे अधिकृत नामफलक काढण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. रस्त्यावरील आणि फुटपाथवरील अतिक्रमणांसह फ्रंट मार्जिन व साईड मार्जिनमधील अनधिकृत अतिक्रमणांवरच नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून काढण्यात आले आहेत.

Advertisements

सभागृह नेते गणेश बिडकर यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे दुकानदारांचे नामफलक काढू नयेत, अशी मागणी केली होती. अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईत दुकानांचे अधिकृत नामफलक काढले जात असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती. बिडकर यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. व्यापाऱ्यांच्या हितासाठी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

Advertisements

शहरात मोठ्या प्रमाणावर संयुक्त अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान काही ठिकाणी प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याऐवजी दुकानांचे नामफलक काढण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत आता अतिक्रमण कारवाई करताना दुकानांचे नामफलक काढण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित दुकानांच्या फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमध्ये असलेले अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी. तसेच दुकानांच्या भिंतीवरील नामफलक काढण्याची कारवाई करू नये, असे निर्देश सर्व संबंधित सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण निरीक्षक, आकाशचिन्ह निरीक्षक आणि कारवाई पथकातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

फुटपाथवरील किंवा फुटपाथलगत असलेले अनधिकृत साईनबोर्ड आणि इतर अतिक्रमणांवर मात्र नियमानुसार कारवाई करावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यास संबंधितांना सांगण्यात आले आहे.

महापालिकेच्या या निर्णयामुळे अतिक्रमण कारवाईदरम्यान दुकानदारांचे नामफलक काढले जाणार नसल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments