Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकक्षेत्रात येणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या काही डेपोचे संपूर्णतः खासगीकरण करण्याच्या संदर्भातील प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला असून, ‘पीएमपीएमएल’चे होणारे खासगीकरण तात्काळ थांबवण्यासंदर्भातील पत्र ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तसेच पुणे पालिका व पिंपरी पालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहे.
तसेच येत्या आठ दिवसांत प्रस्ताव रद्द न केल्यास शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिला आहे.
या संदर्भात पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना मानगिरे म्हणाले की, “पीएमपीएमएल’ कर्मचारी हे संपूर्ण प्रशासनाच्या वेतनश्रेणीनुसार कार्यरत असून, नियमानुसार ‘पीएमपीएमएल’चे स्वतः च्या मालकीच्या ६० टक्के बसेस संख्या असून ४० टक्के खासगी ठेकेदारांना निविदा पद्धतीने बसेस संख्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, खासगी ठेकेदारांच्या दबावामुळे काही डेपोच्या संपूर्ण बसेसची संख्या ही खासगी ठेकेदारांच्या अखत्यारित देण्यासंदर्भातील प्रस्ताव ‘पीएमपीएमएल’ विचाराधीन आहे.”
पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या खासगीकरणाच्या संदर्भात कोणताही प्रस्ताव असल्यास तो तातडीने रद्द करण्यात यावा, यासंदर्भात येत्या आठ दिवसांत तातडीने महानगरपालिका प्रशासन तसेच ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने निर्णय घ्यावा.
– प्रमोद भानगिरे, शहर अध्यक्ष शिवसेना