महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या नियुक्त्या अवघ्या 8 तासात रद्द ; युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण?
Newsworldmarathi Mumbai : युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. प्रदेश शाखेच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसने अवघ्या ८ तासांमध्ये रद्द केल्या. राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी रात्री १२ वाजता नवीन नियुक्त्यांची यादी अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर जाहीर केली. मात्र, भारतीय युवक काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयाने सकाळीच या नियुक्त्या रद्द केल्याचे पत्र प्रसिद्ध केले. या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले की, नियुक्त्या कोणत्याही अधिकृत मंजुरीशिवाय केल्या गेल्याने त्या अवैध ठरविण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला.
या मध्ये २० प्रदेश उपाध्यक्ष, ८ कार्याध्यक्ष व अन्य अनेक नियुक्त्या होत्या. या घटनेनंतर प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कोणामागे रहायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व अखिल भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यातील मतभेद यातून उघड झाले.
केंद्रीय समितीच्या नियमांप्रमाणे प्रदेशाध्यक्षांसह कोणालाही कसलीही नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी केंद्रीय समितीची मान्यता लागते. राऊत यांनी अशी कोणताही मान्यता घेतली नव्हती. त्यामुळे केंद्रीय समितीने तातडीने दिल्लीहून पत्रक प्रसिद्ध करून फक्त ८ तासांमध्ये या सर्व नियुक्त्या रद्द करून टाकल्या. केंद्रीय समितीमध्ये राष्ट्रीय सचिव असलेल्या अजय चिंकारा,एहसान खान, कुमार रोहित यांच्या या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत. याच पत्रकात त्यांनी कोणत्याही मान्यतेशिवाय कोणाचीही नियुक्ती करणे ही गंभीर व शिस्तभंग करणारी गोष्ट आहे असे म्हटले आहे. तसेच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या, त्याचा शोध घेऊन संबधितांवर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.
फसवणूक करून 5 कोटीचे कर्ज काढणाऱ्या हॉटेल वैशालीच्या मालकाचा जावयाला अटक
Newsworldmarathi Pune : पत्नीच्या नावावर असलेला फ्लॅट गहाण ठेवून त्याद्वारे ५ कोटी रुपयांचे कर्ज काढणारा हॉटेल वैशालीच्या (Hotel Vaishali) मालकाच्या जावयास आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
विश्वजीत विनायकराव जाधव Vishwajit Vinayakrao Jadhav (वय ४१, रा. आरंभ अपार्टमेंट, घोले रोड, शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत निकीता जगन्नाथ शेट्टी (वय ३४, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ डिसेंबर २०२२ ते ३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला होता. (Cheating Fraud Case) (Pune Crime)
विश्वजीत जाधव याने आर आर फायनान्सचे रवी परदेशी तसेच कोटक महिंद्रा बँक येरवडा शाखेचे मॅनेजर राजेश चौधरी यांच्याबरोबर संगनमत करुन निकिता हॉस्पिटॅलिटी एल एल पीच्या कार्यालयात बैठका घेतल्या. फिर्यादी यांच्या संमतीविना कोटक महिंद्रा बँकेतून कर्ज काढण्याकरीता कर्ज फॉर्म व इतर कागदपत्रांवर फिर्यादी यांच्या खोट्या सह्या करुन या सह्या खऱ्या असल्याचे भासवले. तसेच बनावट शिक्क्यांचा वापर करुन त्यांच्या आधारे बनावट दस्त तयार करुन फिर्यादीच्या नावावर असलेला फ्लॅट कोटक महिंद्रा बँकेकडे तारण ठेवला. बँकेकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन स्वतःचे अॅक्सीस बँकेत ४ कोटी ९३ लाख रुपये वळते करुन फिर्यादीच फसवणूक केली. विश्वजीत जाधव, रवी परदेशी आणि राजेश चौधरी यांचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला असून तेव्हापासून ते फरार होते. त्या तिघांपैकी विश्वजीत जाधव याला आज दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
विश्वजीत जाधव याने बोगस कर्ज मंजूर करुन घेऊन ४ कोटी ९३ लाख रुपयांचा काय विनियोग केला, याबाबत आरोपीकडे पोलीस कोठडीमध्ये घेऊन सखोल चौकशी आवश्यक आहे. या गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करणे बाकी आहे. या कटामध्ये अन्य कोणी मदत केली आहे का याचा तपास करायचा आहे. या गुन्ह्यात वापरलेला बनावट शिक्का हस्तगत करायचा आहे.
विश्वजीत जाधव याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुक तसेच कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल आहे यावरुन आरोपी हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचे दिसून येत आहे. आरोपीने अशाच प्रकारे अन्य गुन्हे केले आहेत किंवा कसे याबाबत पोलीस कोठडीमध्ये चौकशी करणे आवश्यक असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ए. बी. गायकवाड यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमचा अनोखा उपक्रम
Newsworldmarathi Pune: माणुसकीचे अखंड दर्शन इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमच्या कार्यातून सातत्याने होत असते. असाच एक उपक्रम मंगळवार दिनांक १८ मार्च रोजी घेण्यात आला.जन्मताच डायबेटीस असणाऱ्या, साने गुरुजी प्राथमिक शाळेतील गौरांश कांबळे ह्या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या मुलाला एक महिन्याची सर्व औषधे इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमच्या माध्यमातून देण्यात आली.
ह्यासाठी क्लबच्या अध्यक्षा मा प्रिती शिरुडकर, क्लबच्या सदस्या स्वाती हिरवे, वैशाली वडनेरे, कविता शिवरीकर ह्यांनी ह्या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य केले. तसेच क्लबच्या सदस्या संगिता गोवळकर ह्यांच्या माध्यमातून त्यांच्या शाळेतील ह्या विद्यार्थ्याला मदत देण्याचा हा उपक्रम घेण्यात आला.
असाच मदतीचा हात अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवू शकतो. इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमचे हे प्रभावी कार्य असेच अविरत चालू राहणार आहे.
Pune News : लोहगडावरून बेपत्ता झालेल्या तरुणीविषयी धकादायक माहिती आली समोर…
Newsworldmarathi Pune: पुण्यातील विद्यार्थिनीची धकादायक माहिती समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाडीत या तरुणीचा मृतदेह आढळला आहे. ही तरुणी पिंपरी-चिंचवड सांगवी येथील रहिवाशी असून मानसी प्रशांत गोविंदपुरकर असे तीचे नाव आहे. (Pune News) 18 मार्च 2025 रोजी सकाळी ती पिंपरीवरून लोहगडला गेली होती. ती सकाळी 8.56 वाजता लोहगडच्या तिकीट केंद्राच्या सीसीटीव्ही मध्ये दिसली तिथून ती बेपत्ता झाली. याबाबत पोलीस यंत्रणा कामाला लागली. मात्र लोहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेला तरुणीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. या घटनेमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
मानसी प्रशांत गोविंदपुरकर (वय २१ वर्षे, रा. लातूर) असं तिचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, गेल्या वर्षी तिचं अपेन्डीक्सचं ऑपरेशन झालं होतं. आजारपणामुळे एल. एल. बी. मधील तिसऱ्या वर्षाची परीक्षा देखील देता आली नव्हती, यामुळे ती नाराज असल्याचे सांगितले जात आहे.(Crime News)
यातूनच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आले आहे. १८ मार्च रोजी मानसी ही घरातून कॉलेजला जाते असे सांगून निघून गेली होती. मात्र, दिवस मावळला तरी ती घरी आली नाही. काळजी पोटी तिच्या घराच्यांनी तिला फोन केला मात्र तिचा फोन बंद येत होता. त्यानंतर नातेवाईकांनी मानसी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली.
यानंतर तपास सुरु झाला होता. पोलिसांनी तिच्या मैत्रिणींकडे देखील विचारना केली. मात्र, तिच्याबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी अखेर मोबाईलचे तांत्रिक लोकेशन काढले. त्यावरून तिचे शेवटीचे लोकेशन हे लोहगडावर होते. पोलिसांनी तिथेल सिसिटीव्ही चेक केल्यानंतर ती लोहगडावर दिसून आली.
यामध्ये ती जाताना तर दिसली, मात्र परत येताना काही दिसली नाही. त्यानंतर लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कु टीमने पोलिसांच्या मदतीने तिचा शोध सुरू केला. काही तास शोधल्यानंतर मानसीचा मृतदेह लोहगाडाच्या पायाथ्याशी असलेल्या एका झाडीत आढळून आला. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला.
मागील वर्षी तीचे अपेन्डीक्सचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे तिला एल एल बीच्या तिसऱ्या वर्षाची परिक्षा देता आली नव्हती. याच नैराश्यतून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत तपास सांगवी पोलीस तपास करत आहेत.
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? : हर्षवर्धन सपकाळ
Newsworldmarathi Mumbai : परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झाला असताना त्याची आकस्कित मृत्यू अशी नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हा मृत्यू कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा शवविच्छेदन अहवाल असतानाही सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही. आता न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालातही सोमनाथ सुर्यंवंशी यांचा मृत्यू मारहणीमुळेच झाल्याचे उघड झाले आहे. आता तरी फडणवीस सरकार जागे होऊन संबंधित पोलिसांवर हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करणार आहे? का असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, परभणीची घटना अत्यंत गंभीर व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचे प्रकरण पोलीसांना व्यवस्थित हाताळता आले नाही. शहरात शांततेने आंदोलन सुरु असताना पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला, त्यात अनेकांना जबर मारहाण झाली, अनेकांना जेलमध्ये टाकले. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांनाही अटक करुन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला पण सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशानात सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाल्याची चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली.
परभणीमध्ये कोंबिंग ऑपरेशन व लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला. मंत्रालयातून दिला, का पोलीस महासंचालक कार्यालयातून दिला याची चौकशी झाली पाहिजे. गृहमंत्री व मुख्यमंत्री नात्याने फडणवीस हे परभणीचे प्रकरण हाताळण्यात सपशेल फेल झाले आहेत. एका दलित तरुणाचा पोलिस मारहाणीत मृत्यू होतो पण सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही यातून भाजपा युतीचे सरकार दलित विरोधी आहे हे स्पष्ट दिसते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परभणीला येऊन सुर्यवंशी यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस पक्ष सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करेल, असेही सपकाळ म्हणाले.
Pune News : कसब्यातील भुयारी मार्गाच्या डीपीआर निर्मितीला हिरवा कंदील; आमदार हेमंत रासने यांच्या पाठपुराव्याला यश
Newsworldmarathi Pune : पुणे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गांच्या प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी दिल्या.
कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकारातून या भुयारी मार्गासाठी मंत्री भोसले यांच्या विधानभवनातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, सदाशिव साळुंखे, उपसचिव प्रज्ञा वाळके, बी. एस. तेलंग, अव्वर सचिव प्रभाकर लहाने, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, खासगी सचिव सुधाकर भोसले आदी उपस्थित होते. भोसले यांनी या प्रकल्पाबाबत माहिती घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकल्पांचा ‘डीपीआर’ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तयार
शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या कसबा मतदारसंघात प्रमुख बाजारपेठा; तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू असल्याने दररोज हजारो नागरिक येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र कायम पाहायला मिळते. या भुयारी मार्गाच्या माध्यमातून वाहतुकीला गती मिळाल्याने वेळ आणि इंधनाची बचत होईल, असा दावा रासने यांनी या वेळी केला.
रासने म्हणाले, ‘दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्त्यांमुळे या भागात उड्डाणपुलाचा पर्याय शक्य नसल्याने आम्ही भुयारी मार्गांची संकल्पना पुढे आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याबद्दलचे सविस्तर निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दालनात बैठक पार पडली असून, त्यांनी या दोन्ही मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची सूचना प्रशासनास केली आहे. या निर्णयामुळे भुयारी मार्ग निर्मितीस गती मिळणार आहे.’
शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा असा भुयारी मार्ग झाल्यास अनुक्रमे छत्रपती शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. परिणामी टिळक रस्त्यावरील वाहतुकीसही त्याचा फायदा होणार आहे. याच परिसरातून भुयारी मेट्रो गेली असल्याने नवीन भुयारी मार्ग साकारणे शक्य आहे. त्यासाठी येणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असल्याने धोरणात्मक निर्णयाची आवश्यकता आहे. राज्य सरकारने हा खर्च करण्याची तयारी दर्शवली किंवा या मार्गांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास, मध्यवर्ती पुण्यातील कोंडी फोडण्यासाठीचे क्रांतिकारी पाऊल ठरेल, अशी प्रतिक्रिया उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली.
औरंगजेबाने जेवढे लोक मारले, त्यापेक्षा अधिक लोक आज राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने मरताहेत: बच्चू कडू
Newsworldmarathi Raigad : प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून (२१ मार्च) दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तीन दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी सुरू करण्यात आले आहे. यावेळी आंदोलनाचे संयोजक व प्रहार जनशक्ती पार्टीचे सचिन साळुंखे, ओंकार साळुंखे, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ, राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील गणबोडे, महाराष्ट्र संपर्कप्रमुख रामदास खोत, अभियान प्रमुख महेश बडे आदी उपस्थित होते. राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.
यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आज देशात आणि राज्यात धर्म आणि जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना पोट असते आणि त्याकरिता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. औरंगजेबाने त्याच्या काळात जेवढे लोक मारले नसतील, त्यापेक्षा अधिक लाखो शेतकऱ्यांनी राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केल्या आहेत. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. औरंगजेबाने तलवारीच्या टोकावर लोकांना मारले. मात्र, सध्याचे राज्यकर्ते हे त्यांच्या विविध धोरण, कलमाने मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने धर्म, जात यावर राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.”
कडू पुढे म्हणाले, “सर्वत्र महागाई वाढलेली असून दिव्यांगांना मागील चार महिन्यापासून कोणतेही मानधन मिळत नाही. त्यांचे जीवन असह्य झाले आहे. याबाबत सरकार कोणतीही दखल घेताना दिसत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा शेतीच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे. लाडकी बहीण नाममात्र असून, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर, दिव्यांग, कामगार यांच्यासाठी कोणतीही विशेष तरतूद न करता केवळ अनुदान कपातीचे धोरण आखले जात आहे. दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यात येऊन १४०० कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र, त्यापैकी १२०० कोटी रुपये केवळ पगारावर खर्च केले जात आहे. मुबलक निधी नसेल, तर दिव्यांग मंत्रालय कशाप्रकारे काम करणार हे सरकारने स्पष्ट करावे. श्रम, मूल्य आधारित मोबदला लोकांना मिळत नसून, केवळ राजकीय लाभासाठीच्या योजना सध्या सुरू आहे. औरंगजेबाची कबर, दिशा सॅलियन प्रकरणातून नेमका कोणाचा फायदा होणार आहे. त्यामुळे निरर्थक गोष्टी दाखवण्यापेक्षा योग्य गोष्टी दाखवल्या तर लोकांना समाधान मिळेल. औरंगजेबाच्या कबरीबाबत राजकारण प्रसारमाध्यमातून दाखवले जाते, पण सामन्यांचे हाल कोणाला दिसत नाही. याचे प्रसारमाध्यमांनीदेखील भान ठेवावे. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दंगल होते. याबाबत त्यांना खरेतर शरम वाटली पाहिजे. परंतु त्याबाबत कोणतीही खंत व्यक्त न करता ते याबाबतचेच राजकारण करत असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे किमान थोडी लाज वाटून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.”
सचिन साळुंखे म्हणाले, “स्वराज्याच्या राजधानीवरून राज्याच्या राजधानीला इशारा देण्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन आहे. दिव्यांगांना, कर्जमाफी, त्यांना दरमहा ६००० रुपये मानधन, स्वतःचे घर व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी, स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल, दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी, दिव्यांग उद्योजकांसाठी धोरण, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन, अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. तसेच २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे.”
Devendr Fadanvis : महानगरपालिका निवडणुका एकत्र लढणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Newsworldmarathi Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. मुंबई वगळता इतर ठिकाणी त्या ठिकाणची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितलं.
येत्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. महाराष्ट्रात सध्या भाजप शिंदे आणि अजित पवार गट यांचं सरकार आहे. यामुळे आता हे सरकार पुन्हा एकत्रित येत महानगरपालिका निवडणूक लढणार का असा प्रश्न केला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबई महानगरपालिका आम्ही एकत्रच लढणार इतर ठिकाणची परिस्थिती बघून तिथले निर्णय घेतले जातील.
महाराष्ट्रातील सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत. मात्र कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता की निवडणुका एकत्रच लढल्या तर काय होणार. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की फक्त मुंबई महानगरपालिका एकत्रित लढली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर ठिकाणची परिस्थिती बघून तिथले निर्णय तिथल्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांना विचारात घेऊन घेतले जाणार असल्यास देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Hinjewadi bus fire incident| चालकच ठरला खुनी.. हिंजवाडीतील त्या चार कामगारांच्या मृत्यूचे कारण आले समोर…
Newsworldmarathi Pune : हिंजवडीमध्ये बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली होती. कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. बसमध्ये एकूण 12 कामगार होते.
दरम्यान, याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंजवडी मधील ती घटना अपघात नसल्याचे समोर आले आहे. या घटनेत स्वत: चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला. फेज १ मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता, अशी माहिती समोर आली आहे.
चालकानं असे कृत्य का केले…?
चालकाचा दिवाळीत पगार कापला होता तसेच गाडीतील सह कर्मचारी यांनी त्रास दिला होता म्हणून त्याने हे सर्व घडवून आणल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे. तिघांशी वाद होता त्यांना मारायचं म्हणून त्याने हा प्रकार केला. पण या घटनेत चौघांचा निष्पाप बळी गेला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.
Nana Patole : भाजपा युती सरकार लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या आश्वासनांची पूर्तता कधी करणार? : नाना पटोले
Newsworldmarathi Mumbai: गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निधीपैकी ४० टक्के निधी सुद्धा वापरला गेला नाही. सरकारने मते मिळवण्यासाठी अनेक घोषणा केल्या. लाडक्या बहिणींना भाजपा युती सरकार २१०० रुपये देणार होते पण आज सरकारला १०० दिवस उलटून अद्यापही ते पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. उलट भाजपा युती सरकार लाभार्थी बहिणींची संख्या कमी करत आहे असा हल्लाबोल ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे.
विधिमंडळ अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर वित्त, उद्योग, ऊर्जा, कामगार व खणीकरण, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि नियोजन विभागांवर विस्तृत चर्चा केली. या चर्चेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, आज राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सरकारने दावोस मधून लाखो कोटींची इन्व्हेस्टमेंट राज्यात आणली पण हे उद्योग गेले कुठे? यातून नेमके किती रोजगार निर्माण झाले याची श्वेतपत्रिका आपण जाहीर करणार का? याबद्दलची भूमिका सरकारने स्पष्ट करावी.
शेतकरी नवीन पिके काढून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करत आहे पण सरकार त्यांना मुबलक वीज देत नाही. लोड वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळतात आणि शेतकऱ्यांचे पंप बिघडतात. एक पंप दुरुस्त करायला सहा ते सात हजार रुपये लागतात आणि दुरुस्त होण्यासाठी देखील किमान ४-५ दिवस लागतात. आर्थिक अहवालानुसार राज्याचा जीडीपी शेतीमुळे वाढला पण उन पावसाची तमा न बाळगता काबाडकष्ट करून शेतकऱ्यांनी राज्याचा जीडीपी वाढवला त्याच शेतकऱ्यांची परीक्षा हे सरकार अजून किती दिवस घेणार आहे. निवडणुकीत १२ तास वीज देण्याचे आश्वासन दिले पण आठ तासही शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. ऊर्जा विभागाचे अधिकारी सांगतात सौर ऊर्जा लावा पण पाच सहा महिने अर्ज करून, पैसे भरून सुद्धा कंत्राटदार सौर ऊर्जेचे पंप लावून देत नाहीत आणि आणि कर्मचारी, अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. मग शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागायची? यावेळीच्या हवामानानुसार यंदा कडक उन्हाळा असणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि मग शेतीचं काय होणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे, ऊर्जा विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती पंपासाठी सरकार काय योजना देणार आणि शेतकऱ्यांचं पीक वाचवण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार याकडे तमाम शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. देशात सगळ्यात महाग वीज महाराष्ट्रात आहे. हे विजेचे दर कसे कमी होणार, या विभागात लागणाऱ्या खर्चात जो भ्रष्टाचार होत आहे तो कसा कमी करणार या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील.
राज्यातील करात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. वाढलेल्या करामुळे अनेक उद्योगपती महाराष्ट्र सोडून दुसरीकडे चालले आहेत. त्यामुळे चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी तसेच उद्योगवाढीस चालना देण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.
कामगार विभागाचे काम नेमके कामगारांसाठी चालते कि ठेकेदारांसाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांसाठी पेट्या वाटल्या जातात पण त्या कुठे वाटल्या जातात, कोणत्या कामगारांना वाटल्या जातात, आज एक मोठा भ्रष्टाचार या कामगारांच्या नावाने प्रशासनातील काही लोक करत आहेत. प्रशासनातील लोक कामगारांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे पाप करत आहेत. त्याबद्दल कामगार खात्याच्या मागण्यांमध्ये उत्तर आले पाहिजे. राज्यात खणीकरणाच्या माध्यमातून विशेषतः गडचिरोली जिल्ह्यात पर्यावरणाचा ऱ्हास करून आदिवासी जनतेचे जीवनमान उध्वस्त केले जात आहे. पाणंद रस्त्यांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सरकारने जाहीरनाम्यातून दिले होते, त्यावर अजून काहीच हालचाल झालेली नाही. पाणंद रस्ते किती दिवसांत पूर्ण करणार हे सरकाने सांगितले पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

