Pune Passport Office : पुणे पासपोर्ट ऑफिस बाहेर रांगाच रांगा
Newsworldmarathi Pune: सध्या शहराच्या तापमाणात वाढ होत आहे. पुणे शहराचे तापमान 41 अंशावर पोहचले आहे. अशा उन्हात पुणे पासपोर्ट ऑफिसच्या बाहेर पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. पासपोर्ट ऑफिसच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना भर उन्हात थांबावे लागत आहे.
पुणे पासपोर्ट ऑफिसला अनेक भागातून नागरिक पासपोर्ट काढण्यासाठी येत असतात. या ठिकाणी नागरिकांना बसण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर रांगेत उभे राहावे लागत आहे. पासपोर्ट ऑफिस च्या कारभारामुळे नागरिकांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. पासपोर्ट ऑफिस चा कारभार सुधारण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
भारतात नोकरीच्या कमी संधी उपलब्ध आहेत. बाहेर देशात तरुणांना अनेक चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. यासाठी पासपोर्ट काढावा लागतो. पण पासपोर्ट ऑफिसच्या कामकाजामुळे आम्हाला उन्हात थांबावे लागत आहे. शिवाय वेळा ही खूप जात आहे. मनस्थाप सहन करावा लागत आहे. पासपोर्ट ऑफिसची कामकाज प्रणाली सुधारण्यात यावी..
– किशोर साबळे
केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरीसह तेलबियावर्गीय पिकांचे लागवड क्षेत्र वाढवणार : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
Newsworldmarathi Pune : केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी आणि तेलबीयावर्गीय सूर्यफूल व करडई या पिकांचे लागवडीखालील क्षेत्र वाढविणे, निर्यातक्षम उत्पादन घेणे, उत्पादन वाढविणे तसेच मूल्यवर्धन तथा खाद्य प्रक्रियेची व्यवस्था करुन निर्यातीच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी विभागाने सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. या सर्व सुविधांसाठी विविध योजनांचे एकत्रिकरण करून तसेच जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जिल्ह्याचा समग्र कृषी विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने कृषी महाविद्यालय शिवाजीनगर येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. महानंद माने, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्रा. दिगंबर दुर्गाडे, कृषी उपसंचालक एस. एस. विश्वासराव आदींसह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बारामती व नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रांचे अधिकारी, शेतकरी उत्पादन कंपन्या, कृषी निर्यातदार कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, केळी पिकाचे जिल्ह्यात १ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून ते आगामी वर्षात ३ हजार हेक्टरपर्यंत नेण्याचे तसेच प्रति हेक्टरी उत्पादनातही वाढ होण्याच्या दृष्टीने लक्ष्य ठेवावे. त्यासाठी केळी लागवडीसाठी इच्छुक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे, त्यांचे प्रशिक्षण आयोजित करणे, दर्जेदार रोपे पुरविणे, पाण्याची व्यवस्था, मातीचे आरोग्य, जैविक आधारित खते, औषधे आदी निविष्ठा, कृषी यांत्रिकीकरण तसेच पीकनिहाय उत्कृष्ट उत्पादन पद्धती, लागवडीपूर्वीची, पिकाच्या काढणीपूर्वीची आणि काढणीपश्चात प्रक्रिया आदींबाबतच्या तंत्र, योजनांची माहिती व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याबाबतचा लाभ कसा मिळेल आदींचा समावेश प्रशिक्षण सत्रामध्ये करण्यात यावा, असेही ते म्हणाले. याच पद्धतीने अंजीर, आंबा आदींवरही लक्ष केंद्रीत करण्यात यावे.
शेतकरी उत्पादक कंपन्यांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाची व्यवस्था आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्रांनी समन्वयाने करावी. शेतकऱ्यांचे या पिकांच्या अनुषंगाने पीकनिहाय दोन दिवशीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रांच्या ठिकाणी ७ एप्रिलपासून आयोजित करावे, असेही त्यांनी सांगितले. यामध्ये प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांना मास्टर ट्रेनर म्हणून तयार करुन त्यांच्याद्वारे इतर शेतकऱ्यांना त्या पिकाच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे. पिकांची लागवडीचे क्षेत्र वाढावे यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना निवडण्यासाठी व त्यांना सहभागी करुन घेण्यासाठी कृषी सहायकांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मदतीने व सध्याचे उत्पादक शेतकरी यांच्या सहाय्याने काम करावे.
केळीसह अन्य पिकांची दर्जेदार रोपे, शेततळ्यांसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. परदेशी बाजारपेठेत निर्यातीसाठी तेथील मागणी, कृषीमालाचा दर्जा, गुणवत्ता यावर विशेष भर द्यायचा असून त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना निर्यात सुविधा केंद्रांसाठी आवश्यक शीतकरण, पॅक हाऊस, निर्यातीसाठी प्रक्रिया केलेला कृषीमाल वाहतूक आदींच्या सुविधा निर्मितीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प तथा स्मार्ट, केंद्र शासनाचा कृषी पायाभूत सुविधा निधी, खाद्य प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रसंस्करण उद्यम औपचारिकीकरण योजना अशा विविध योजनांतून लाभ देण्यात येईल. यासह या बाबींसाठी जेथे अधिकच्या निधीची आवश्यकता असेल तेथे जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही ते म्हणाले.
उत्पादित झालेला कृषीमाल निर्यात होईल याचे नियोजन आधीच करायचे आहे. तसेच निर्यात होऊन राहणारा माल स्थानिक बाजारपेठेत, मॉल, कंपन्या आदी ठिकाणी विक्रीची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आपण जे पीक घेणार आहोत त्याला हमखास बाजारभाव मिळेल तसेच त्याची बाजारात विक्री होईल अशी खात्री देऊन त्यांच्यात विश्वास निर्माण केल्यास निश्चितच या पिकांच्या लागवडीकडे शेतकरी वळतील, असेही ते म्हणाले.
यावेळी डूडी यांनी उपस्थित शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, निर्यातदार, प्रगतीशील शेतकरी, कृषी विज्ञान केंद्रांचे अधिकारी आदींना यावेळी विविध सूचना केल्या. या सूचना व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांना आवश्यक सुविधांचे प्रस्ताव कृषी विभागाकडे देण्याच्या सूचनाही डूडी यांनी यावेळी दिल्या.
पुण्यातील भाजपने गाजावाजा केला पण ढिसाळ कारभार ; काँग्रेस नेत्यांची टीका…
Newsworldmarathi Pune : पुण्यातील भाजपच्या ढिसाळ कारभारावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने खरमरीत टीका केली आहे. भाजप मंत्र्यांचे सत्कार झाले, आश्वासने झाली, 9 वर्षे उलटूनही जायका प्रकल्प अजून अपुराच आहे. प्रकल्पाबाबत भाजपकडून मोठा गाजावाजा करण्यात आला. निवडणूक प्रचारात अनेक मोठं मोठी आश्वासने भाजपच्या नेत्यांनी दिली. मात्र, आता हे सर्व नेते निवांत आहेत. अशी टीका माजी आमदार, प्रदशे काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
शहरातील सांडपाणी व मैलापाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडण्यासाठी सुरु असलेल्या ‘जायका’ प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून महापािलकेला शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प पुर्ण होण्याची मुदत संपत असुन, ती एक वर्षाने वाढवावी अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. दरम्यान भाजपच्या या आश्वासनाचा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांन खरपूस समचार घेतला आहे.
मुळा आणि मुठा नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी जायका प्रकल्प हाती घेऊन नऊ वर्ष झाली तरी अजूनही निम्मेही काम पूर्ण झाले नाहीत. जायका प्रकल्पाच्या कामाची प्रगती ५० टक्क्यापेक्षा अधिक नाही, असे महापालिका प्रशासनच्या निवेदनातून स्पष्ट होत आहे. स्मार्ट सिटी, नदी सुधार योजना, रिंगरोड, मेट्रोचे शहरभर जाळे अशा मोठमोठया घोषणा भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केल्या. त्यापैकी जायका प्रकल्प ही सुद्धा त्यातीलच एक घोषणा आहे. या सर्वच घोषणा अर्धवट अवस्थेत असून निवडणुका झालेल्या असल्याने भाजपचे मंत्री, खासदार, आमदार असे सर्वच जण या बाबत सोयीस्कर मौन पाळून आहेत. असा आरोप मोहन जोशी भाजप नेत्यांवर केला आहे.
मुठा आणि मुळा नद्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा फेर वापर शेतीसाठी करावयाचा असा हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत राबविला जात आहे. केंद्र सरकारमध्ये प्रकाश जावडेकर पर्यावरण राज्यमंत्री असताना तो प्रकल्प मंजूर झाला. या निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिरात जावडेकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या प्रकल्पादरम्यान, भाजपने गाजावाजा, प्रसिद्धी खूप केली. निवडणूक प्रचारात आश्वासने दिली. २०१६ साली कामाला सुरुवात झाली. ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. काम सुरू होऊन ९ वर्षे लोटली. मुदतीत ५० टक्क्यांहूनही अधिक काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पालिका प्रशासन मुदतवाढ मागत आहे. तसेच मध्यंतरी जादा पाणी वापराबद्दल राज्य सरकारने महापालिकेला भुर्दंड ठोठावला. त्याही वेळी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास महापालिका अपयशी होत असल्याचा ठपका महायुतीच्या सरकारने ठेवला होता. याप्रकरणी एकंदरच टोलवाटोलवी आणि भाजपचा नाकर्तेपणा दिसून येतो, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया पुणे, महाराष्ट्र येथे रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान
Newsworldmarathi Pune: होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (HMSI) ने पुणे, महाराष्ट्र येथे रस्ते सुरक्षा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून रस्ते सुरक्षेवर आपला भर पुन्हा अधोरेखित केला. या उपक्रमात रेडियंट इंटरनॅशनल स्कूल, श्री जे. आर. गुंजाळ इंग्रजी माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च आणि ग्रामोन्नती मंडळ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज या संस्थांमधील २२०० हून अधिक विद्यार्थी आणि कर्मचारी सहभागी झाले आणि जबाबदार रस्ते वर्तनाविषयी मूलभूत ज्ञान प्राप्त केले.
लहान वयातच रस्ते सुरक्षा शिक्षणाची सवय लागावी या उद्देशाने HMSI ने हा उपक्रम राबवला. केवळ जनजागृती करून थांबण्यापेक्षा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये दीर्घकालीन सकारात्मक वर्तनशील बदल घडवण्यावर केंद्रित आहे. लहानपणीच योग्य रस्ते वर्तनाची सवय लावल्याने ते जबाबदार रस्ते वापरकर्ते होऊ शकतात आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवरही चांगला प्रभाव टाकू शकतात. शाळा, महाविद्यालये आणि शासकीय व अशासकीय संस्थांबरोबर सहकार्य करत HMSI रस्ते सुरक्षेला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवत आहे.
या अभियानामध्ये सुरक्षित वाहन चालवण्याचे धडे, धोका ओळखण्याचे प्रशिक्षण, खेळ, प्रश्नमंजुषा, हेल्मेट जनजागृती आणि राइडिंग ट्रेनर मॉड्यूल्स यांचा समावेश करण्यात आला. हे सर्व इंटरॅक्टिव्ह आणि व्यावहारिक उपक्रम असल्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ रस्ते सुरक्षा नियम शिकण्यास मदत झाली नाही, तर रस्त्यावर असताना जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली.
HMSI ने रेडियंट इंटरनॅशनल स्कूल, श्री जे. आर. गुंजाळ इंग्रजी माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च आणि ग्रामोन्नती मंडळ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज यांचे या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग जबाबदार रस्ते वर्तनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास आणि सुरक्षित रस्त्यांसाठी कार्य करण्यास उपयुक्त ठरला.
HMSI ने आपल्या सातत्यपूर्ण रस्ते सुरक्षा मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्रातील सुमारे ३ लाख नागरिक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना रस्ते सुरक्षा विषयक व्यावहारिक ज्ञान प्रदान केले आहे. अशा उपक्रमांच्या मदतीने HMSI रस्ते सुरक्षा जनजागृती निर्माण करत राहील आणि सर्वांसाठी जबाबदार वाहन चालवण्याच्या सवयी प्रोत्साहित करत राहील.
बारामती नगरपालिकेतील आका कोण?
Newsworldmarathi Baramati : राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या तालुक्यातील नगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळाला भ्रष्टाचाराची कीड लागले असल्याचे वास्तव समोर आले आहे कालच एका बड्या अधिकाऱ्याला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. प्रशासकीय वर्तुळात लुडबुड करणारा आका तयार झाला आहे. प्रशासकीय वर्तुळाला लागलेली कीड संपवण्याची धमक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडे एक आशेचा ‘किरण’ म्हणून पाहिले जात आहे.
बारामती नगरपरिषदेत नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे (वय ५०) यांना लाच प्रकरणी अटक करण्यात आली. शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानिमित्ताने या विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याचे समोर आले असून अनेक सुरस कथा आता बाहेर येवू लागल्या आहेत.
शहरातील बांधकाम व्यावसायिक भगवान चौधर यांच्या गृह प्रकल्पाचा प्रस्ताव नगरपरिषदेच्या नगररचना विभागात दाखल होता,तो प्रस्ताव मंजूर होण्यासाठी ढेकळे यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १ लाख ७५ हजार रुपये द्या अशी मागणी ढेकळे यांनी केली. त्यातील १ लाख रुपयांचा पहिला हप्ता लाच स्वरुपात घेताना त्यांना बुधवारी (दि. १९) रात्री ताब्यात घेत अटक करण्यात आली.
या विभागात अगदी शिपायापासून ते ऑनलाईन काम करणाऱ्या एजन्सीचे ऑपरेटर, ते थेट नगररचनाकार अशी भ्रष्टाचाराची मोठी साखळीच कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त रात्री हाॅटेलात अनेकदा व्यवहार ठरवले जातात. गृह प्रकल्प असो कि व्यावसायिक प्रकल्प त्याच्या मंजूरीसाठी लाच दिल्याशिवाय सहीच होत नसल्याचे चित्र बारामतीत आहे. एजंटांचा विळखा या विभागाला पडला आहे.
बारामती नगरपरिषदेच्या कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. पवार यांच्यामुळे कोट्यवधींचा निधी पालिकेला विकासकामांसाठी मिळतो. पवार यांनी वारंवार सूचना केल्यानंतरही अधिकारी स्तरावर अडवाअडवीची कामे चालतात. पैसे दिल्याशिवाय कामेच होत नसल्याचा अनुभव नागरिकांना येतो आहे. काही वर्षांपूर्वी एका जाहीर कार्य़क्रमात पालखी महामार्ग भूसंपादन मोबदल्यापोटी प्रांताधिकारी पैसे मागत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने पवार यांच्याकडे केली होती. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पंचायत समितीचा एक अधिकारी पैसे घेतल्याशिवाय विहिरींच्या कामांना परवानगी देत नाही, अशी तक्रार पवार यांच्याकडे केली होती. त्यावर पवार यांनी आमची भावकीच पैसे घेतेय. त्यांनी चुकीचे काम केले असल्यास गैर नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतरही बारामतीत विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वागण्यात तसूभरही बदल झालेला नाही.
बारामती नगरपरिषदेला मिळणाऱ्या महसूलापैकी मोठा वाटा हा बांधकाम परवानगीच्या माध्यमातून जमा होत असतो. बारामती शहराच्या विकासामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा आहे. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा प्रचंड त्रास बारामतीमधील सर्व बांधकाम व्यावसायिकांना मागील काही वर्षांपासून होत आहे. ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर ‘क्रेडाई’ने वेळोवेळी घातली आहे.विकास ढेकळे यांच्यावरील कारवाईचे बारामती ‘क्रेडाई’ने स्वागत केले असून आता तरी या विभागातील कार्यतत्परता व कार्यक्षमता वाढवावी अशी मागणी ‘क्रेडाई’ने केली आहे.
मोठी बातमी: राज्यातील शाळांना CBSC अभ्यासक्रम लागू होणार…शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
Newsworldmarathi Mumbai: यंदाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील (School) विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न (CBSC) लागू करण्यात येणार आहे. याबाबत च्या सूचना राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी शैक्षणिक वर्ष 2025-2026 या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्रीदादा भुसे (Dada bhuse) यांनी यासंदर्भात आज सभागृहात माहिती देत घोषणा केली. विशेष म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतरही त्यांनी राज्यात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचे म्हटले होते.
विधान परिषदेतील प्रश्नावर लेखी उत्तर देताना
राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिली असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली.
भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर दिले. राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का? असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता. त्यावर, सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करुन दिली जाणार असून 1 एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले.
Ajit pawar : अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्याला मिळेना उपायुक्त
Newsworldmarathi Pune :अजित पवार पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात प्रशासनाचा कारभार पाहण्यासाठी उपायुक्तांची वानवा असल्याचे वास्तव समोर आले आहे. पुणे विभागीय कार्यालयातील सहा उपायुक्तपदांवर केवळ एकच उपायुक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाचा ताण अन्य अधिकाऱ्यांवर वाढत चालला आहे.
पुणे विभागाच्या अंतर्गत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर असे जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यांचा महसुली कारभार पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातूनच चालतो. मात्र, मागील काही महिन्यांपासून पुणे विभागीय कार्यालयात उपायुक्तांच्या जागा रिकाम्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
रोजगार हमी योजना उपायुक्त, पुनर्वसन उपायुक्त, नगरपालिका प्रशासन, सामान्य प्रशासन, अप्पर आयुक्त सामान्य प्रशासन, अप्पर आयुक्त महसूल यांच्या जागी अद्याप अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली नाही. आता केवळ करमणूक कर / भूसंपादन उपायुक्तपदी अरुण आनंदकर यांची नियुक्ती केली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाची भूमिका ही त्या विभागात असलेल्या सर्व राज्य सरकारी कार्यालयांचे प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करण्याची असते. विभागीय आयुक्तांना विभागातील जमीन महसूल संकलन, कालवा महसूल संकलन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची थेट जबाबदारी दिली जाते. विभागीय आयुक्त विभागातील स्थानिक सरकारी संस्थांचे अध्यक्षपद देखील भूषवतात.
विभागीय आयुक्त हे विभागाचे सामान्य प्रशासन आणि त्यांच्या नियंत्रणाखालील जिल्ह्यांचा नियोजित विकास करण्यासाठी जबाबदार असतात आणि महसूल प्रकरणांसाठी अपील न्यायालय म्हणून देखील काम करतात. त्यांच्या अन्य कामांची जबाबदारी उपआयुक्तांवर असते. त्यामुळे ही पदे अतिशय महत्त्वाची मानली जातात.
Devendr fadanvis: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं वर्णन कसे कराल? जयंत पाटील यांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले.. “भरवसा नाही”..
Newsworldmarathi Mumbai : गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण वेगवेगळ्या विषयांवरून चांगलंच ढवळून निघालं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. यावरून उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील विविध विषयांच्या संदर्भात प्रश्न विचारले. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलखुलास उत्तरे दिली. लोकमत वृत्तसंस्थेच्या एका पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी ही मुलाखत दिली. यावेळी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक प्रश्न विचारला. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील एका वाक्यात उत्तर दिलं.
जयंत पाटलांनी काय प्रश्न विचारला?
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं दोन-दोन वाक्यात तुम्ही कसं वर्णन कराल? असा प्रश्न जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी दोन वाक्याऐवजी एका वाक्यात उत्तर दिलं. फडणवीसांनी म्हटलं की, “एका वाक्यात उत्तर देतो. वाईट वाटून घेऊ नका. काही भरवसा नाही. या वाक्यात दोघांची देखील वागण्याची पद्धत आली. काही भरवसा नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
मंत्र्यांच्या बेजबाबदार विधानांबाबत फडणवीस काय म्हणाले?
नागपूरमध्ये दंगल उसळल्यानंतर सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याबाबतचा आरोप विरोधकांनी केला. मंत्र्यांच्या या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे आपले विचार, आपल्या आवडी-निवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. संविधानाने आपल्याला कुणाहीबरोबर अन्याय न करता वागण्याची जबाबदारी टाकली आहे. मंत्र्यांनी बोलत असताना संयम बाळगला पाहिजे. आपल्या बोलण्याने कुठेही तेढ निर्माण होणार नाही, हा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी तरूण मंत्री बोलून जातात. अशावेळी मी त्यांच्याशी संवाद साधतो त्यांना समजावून सांगतो. मंत्री असल्यामुळे संयम बाळगूनच बोलले पाहिजे”,असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुणे जिल्हा परिषदेचा २९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
पुणे जिल्हा परिषदेने २०२५-२६ या वर्षाचा २९२ कोटी ७५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी मांडला. मुद्रांक शुल्क, तसेच जलसंपदा विभागाकडे थकीत पाणीपट्टीपोटी मिळणाºया रकमेमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात ५८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
शाळा सुधारणा, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण, अंगणवाड्यांसाठी सोलर पॅनेल, लघू पाटबंधारे,फेलोशिप योजना आदींचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेने मुख्य वित्त लेखा अधिकारी विशाल पवार यांनी २०२५- २६ या वर्षाचा अर्थसंकल्प हा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक गजानन पाटील यांच्याकडे सादर केला.
त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सल्लागार समितीकडे प्रशासक पाटील यांनी हा अर्थसंकल्प समितीपुढे मांडला आणि त्याला मंजुरी
देण्यात आली.या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, वित्त लेखा अधिकारी विशाल पवार, उपमुख्य वित्त लेखा अधिकारी अभिजित पाटील, सहायक लेखाअधिकारी जितेंद्र चासकर, याशिवाय विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील अनेक समाज मंदिरे ओस पडली आहेत. त्याठिकाणी चुकीचे कृत्य सुरू असतात. त्यामुळे त्या ठिकाणी आता ग्रंथालये करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी २२३ समाजमंदिरांचे ज्ञानमंदिरात अर्थात ग्रंथालयात रूपांतर झाले. आता पुन्हा ४५० समाजमंदिरांचे ज्ञानमंदिरात रूपांतर करण्याचे
नियोजन आहे. जिल्ह्यातील ३०३ शाळांचे मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील १०८ प्राथमिक आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.
खासगी आरोग्य सेवेच्या धर्तीवर आरोग्य केंद्रावर रुग्णसेवा देण्यावर भर देण्यात येणार आहे.अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार, सुमारे ४५ हजार लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ योजनेच्या (डीबीटी) माध्यमातून लाभ मिळणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा तसेच अंगणवाड्यांसाठी आवश्यक वीजपुरवठा उपलब्ध करण्यासाठी सोलर योजना राबविली जाणार आहे. जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांचे ज्ञान असलेल्या शिक्षकांमार्फत सध्या धडे दिले जात आहेत. त्यामुळे आता जास्त विद्यार्थी
पटसंख्या असणाºया शाळांमध्ये या भाषेच्या खासगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद फेलोशिप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यांना दरमहा २५ हजार रुपयांचे मानधन दिले जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामाचा अनुभव घेता
येणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि शिस्तीसाठी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. शाळेच्या सक्षमीकरणांतर्गत शिक्षकांसाठी बायोमेट्रिक फिंगरप्रिंट किंवा फेसरीडिंग हजेरी प्रणाली सुरू करण्याचा मानस आहे.
Shivjayanti: सम्राट ग्रुपतर्फे आयोजित शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
Newsworldmarathi Pune : पारंपरिक वेशभूषेत नटलेले आबालवृद्ध… ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष… अग्रभागी असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा… अशा स्फूर्तिदायी अन् ‘शिवमय’ वातावरणात शिवछत्रपतींना मानवंदना देण्यात आली. निमित्त होते विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुप आयोजित शिवाजयंती सोहळ्याचे..
सोमवार पेठेत सम्राट ग्रुपच्या वतीने भव्यदिव्य अशा शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि नागरी विमान वाहतूक खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य सांगली पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैहाकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास माधुरी मिसळ, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने, तसेच भाजप चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राजमुद्रा ग्रुप आणि पुणे स्पोर्ट्स अकॅडमी च्या वतीने मर्दानी खेळ सादर करण्यात आले.
यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपली सर्वोत्कृष्ठ कामगिरी करण्याचे ध्येय बाळगावे असे आवाहन केले.
आमच्या पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांचे विचार पोहचविण्यासाठी गेली अनेक वर्ष पूर्व भगत शिवजयंती आम्ही साजरा करतो.या शिवजयंती मुळे आम्हा सर्वांना समाजासाठी काम करण्याची एक प्रेरणा मिळते. या शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम रबविले जातात असे, आयोजक माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक पिढीला प्रेरणा आणि संदेश देण्याचे काम केले आहे. त्यामुळे मी आणि आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या मार्गावर काम करित राहिले पाहिजे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील जो महाराष्ट्र होता.जे स्वराज्य होत,ते सर्वांनी मिळून आणण्याचा प्रयत्न करावा,तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारच्या माध्यमातून तो प्रयत्न करीत असून या कामासाठी चळवळ उभारली गेली पाहिजे”,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
या शिवजयंती उत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी आयोजक गणेश बिडकर, अध्यक्ष शुभम पवार, मार्गदर्शन विशाल दरेकर, तसेच विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.

