जागतिक उद्योजकता परिषदेत डॉ. पी. डी. पाटील यांचा विशेष सन्मान

0
Newsworldmartahi Pune : येथे नुकत्याच झालेल्या ‘ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना लिव्हींग लिजंड ऑनर ने सन्मानाने गौरवण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ विचारवंत संदीप वासलेकर, ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व परिषदेचे मुख्य संयोजक सचिन ईटकर यांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. परिषदेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती. डॉ. डी. वाय. पाटील संस्थेने पिंपरी-चिंचवडमध्ये १९८४ साली पहिले इंजिनिअरींग महाविद्यालय सुरू केले. त्याची जबाबदारी डॉ. पी. डी. पाटील यांच्यावर होती. पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नगरी म्हणून उभारणीच्या काळात डॉ. पाटील यांच्या शिक्षणसंस्थांनी उच्चशिक्षित मनुषबळाचा पुरवठा केला त्यामुळे या शहराचा लौकिक जागतिक स्तरावर वाढला. त्याचे श्रेय गेली ४० वर्षे अविरत कष्ट करणाऱ्या डॉ. पाटील यांना अधिक आहे, अशा शब्दांत संयोजकांनी डॉ. पाटील यांचा गौरव केला. पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, गर्जे मराठी ग्लोबल आणि महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (MEDC) यांनी संयुक्तपणे पुण्यात आयोजित केलेली दोन दिवसांची ‘ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ कमालीची यशस्वी ठरली. जगभरातून आलेल्या तसेच देशातील १३०हून अधिक श्रेष्ठतम तज्ज्ञ पॅनलिस्ट वक्त्यांनी उपस्थित असलेल्या दीड हजारांहून अधिक उद्योजक-व्यावसायिक प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.

पुणे महापालिकेचे सर्वोच्च सभागृह आता सावित्रीच्या लेकीच्या हाती

0
Newsworldmarathi pune : महापालिकेच्या नगरसचिवपदी योगिता भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या प्रभारी नगरसचिव म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांना नगर सचिवपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे भोसले यांच्या रूपाने पुणे महापालिकेला पहिल्या महिला नगरसचिव मिळाल्या आहेत. पुणे महापालिकेच्या नगरसचिवपदावरून सुनील पारखी हे २०२० साली निवृत्त झाले होते. त्यानंतर या पदावर प्रभारी नगरसचिव म्हणून शिवाजी दौंडकर यांची नियुक्ती केली होती. दौंडकर हे २०२३ साली निवृत्त झाले. त्यानंतर महापालिकेच्या राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे प्रभारी नगरसचिवपदाचा पदभार देण्यात आला होता. सुनील पारखी हे पालिकेतून निवृत्त झाल्यानंतर नगरसचिवपद रिक्त होते. योगिता भोसले यांची नियुक्ती झाल्यामुळे तब्बल 4 वर्षांनी पुणे महापालिकेला नगरसचिव पद मिळाले. माजी महापौर संघटनेने केले अभिनंदन योगिता भोसले यांची झालेली निवड अतिशय योग्य आहे. पहिल्या महिला नगरसचिव होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. नगरसचिव कार्यालयात गेली अनेक वर्षे त्या काम करीत आहेत. कुठल्याही राजकारणाला बळी न पडता नियमाप्रमाणे त्या काम करीत आहेत, अशा शब्दांत माजी महापौर संघटनेच्या अध्यक्ष राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे आणि निमंत्रक अंकुश काकडे यांनी अभिनंदन केले.

जाती-धर्मावर विखुरलेला माणूस साहित्य संमेलनामुळे जोडला जाईल : शिंदे

0
Newsworldmarathi Pune : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, काकासाहेब गाडगीळ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वैचारिक भूमिकेतून साकारलेले ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ हे पुस्तक सखोल चिंतन करून लिहिलेले आहे, असे जाणवते. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी या वैचारिक भूमिकेतून 1954 साली दिल्लीत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आज महाराष्ट्रासह देशात जाती-धर्मावर माणूस विखुरला गेला आहे, अशा परिस्थितीत दिल्लीत होत असलेल्या साहित्य संमेलनाद्वारे माणूस माणसाला जोडला जाईल अशी आशा वाटते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 70 वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनातील भाषणांचे ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांनी संपादित केलेल्या ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 17) सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. माजी आमदार अनंत गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, डॉ. शैलेश पगारिया मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम झाला. ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ या साहित्यकृतीतून आजच्या लेखकांना नवीन विचारधारा दिली जाईल तसेच नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करून सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, समाज सुधारावा, समाजाला चांगले देता यावे, या विचाराने संजय नहार सतत कार्यरत असतात. चिंतनातून त्यांचे समाज घडविण्याचे कार्य सुरू आहे. साहित्य परिषदेद्वारे नहार यांच्या कार्याला साथ देत असल्याबद्दल प्रा. मिलिंद जोशी यांचेही त्यांनी कौतुक केले. श्रीराम पवार हे इतिहास, साहित्य, चिंतन आहेत आणि या चिंतनातून त्यांनी नवी भूमिका मांडली आहे, असेही ते म्हणाले. अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, महाराष्ट्राला व्रतस्थ ज्ञानोपासकांची मोठी परंपरा आहे. त्या परंपरेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अग्रस्थानी आहेत. जे लिहितात ते बोलत नाहीत आणि जे बोलतात ते लिहीत नाहीत. दोघे मिळून काहीही करत नाहीत असा प्रवाद महाराष्ट्रात आहे, त्याला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे अपवाद होते. ताठ कण्याची मराठी माणसे दिल्लीत गेली की वाकतात पण महाराष्ट्राच्या हितासाठी आपला बाणा सोडायचा नाही हा महाराष्ट्र धर्म तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि काकासाहेब गाडगीळ या दोघांच्याही विचारात दिसतो. सांस्कृतिक सहिष्णुतेची पंडित नेहरूंनी अधोरेखित केलेली गरज वर्तमानात खूप महत्त्वाची आहे. शांती हेच धर्माचे उद्दिष्ट आहे. युद्धाची सुरुवात प्रथम मनात होते नंतर शस्त्रे हातात येतात. नव्या युगात विश्वमैत्रीची भावना रुजली नाही तर मानव समाजाचे अस्तित्व धोक्यात येईल‌’ या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचाराची आजच्या समाजाला गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मराठी समाजाचे वैचारिक नेतृत्व करतात असा विश्वास दृढ करणारे लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे अध्यक्षीय भाषण आहे. प्रास्ताविकात संजय नहार यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी भूमिका विशद करून मराठी भाषेचा, मराठी माणसांच्या अस्मितेचा गौरव करणारे संमेलन आयोजित करायचे आहे, असे नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. शैलेश पगारिया यांनी मानले.

4000 लाडक्या बहिणींनी घेतला माघारी अर्ज

Newsworldmarathi Mumbai : लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. मात्र, या योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून पुढे येऊन योजनेचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतल्याची घटना स्तुत्य आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योजनेतील पात्रतेच्या निकषांचे काटेकोर पालन करण्यासाठी सरकार भविष्यात आणखी कठोर उपाययोजना करणार आहे. योजनेचा अपव्यय टाळण्यासाठी आणि खऱ्या गरजू महिलांना लाभ मिळावा यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरते. या प्रकरणावरून सरकारच्या पारदर्शक कारभाराची एक झलक दिसते, परंतु यामुळे लाभार्थ्यांच्या निवडीच्या प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे परत घेण्याची कोणतीही सक्ती नसून हा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज केला आहे, अशी माहिती समोर आली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीतील सुरुवातीच्या टप्प्यात, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सरकारने मोठ्या प्रमाणावर अर्ज स्वीकारले आणि लाभ दिला. मात्र, नंतरच्या तपासणीत निकष न पाळणाऱ्या अनेक अर्जदार महिलांची संख्या समोर आली आहे. सध्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुमारे तीन ते चार लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. यातून योजना राबविण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी स्पष्ट होत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दबावामुळे पडताळणी न करता लाभ देण्यात आल्याचेही सूचित होते. यामुळे योजना राबवताना पारदर्शकता आणि अचूकता राखण्याचे महत्त्व अधोरेखित होते. आता सरकारने योजनेच्या निकषांमध्ये कठोरता आणण्याची आणि अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. तसेच भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी निकष तपासणीसाठी अधिक चोख आणि डिजिटल प्रणाली विकसित करणे गरजेचे आहे.

‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

Newsworldmarathi टीम : आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटातून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आवर्जून उपस्थित होते. येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. लहान मुलांच्या भावविश्वात खूप काही सुरू असतं. मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं मुलं आपल्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न करतात. “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय ? आणि ते कुठे असतं? याचा शोध सुरू होतो. त्याबरोबरच तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे भावनिकतेची किनार असलेल्या या कथानकाची मांडणी अतिशय हलक्याफुलक्या, रंजक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरमधून समजतं आहे. श्रवणीय संगीताचीही जोड या कथानकाला असून “सुंदर परिवानी” ह्या गोड़ गीताला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. एखादी चांगली कलाकृती तुम्ही केल्यावर नक्कीच त्यामागे अनेकजण पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्याचप्रमाणेच मंगेश ही या कलाकृतीच्या मागे प्रस्तुतकर्ता म्हणून उभा राहिला.चित्रपटाचा ट्रेलर मला खुप आवडला. दिग्दर्शक संकेतने या चित्रपटाची मांडणी उत्तम केली असल्याचे ट्रेलर मधून दिसून येते आहे. मायराने या चित्रपटात साकारलेली प्रमुख भूमिका उल्लेखनीय असल्याचे ट्रेलर मधून जाणवते आहे. तिने यात सातत्य ठेऊन अनेक उत्तम भूमिका साकारुन मनोरंजन विश्वात अजुन नाव कामवावे यासाठी माझे तिला अनेक आशीर्वाद असल्याचे सचिन पिळगांवकर यांनी सांगितले मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. कीमाया प्रॉडक्शनचे महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते असून त्यांची ही पहिलीच निर्मिति आहे तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन केले आहे. या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, स्पृहा परब, रुक्मिणी सुतार यांच्या मध्यवर्ती भूमिका चित्रपटात पहायला मिळणार असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहूण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे.चित्रपटाचे छायाचित्रण रोहन मडकईकर यांनी केले असून गीतकार मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीताना चिनार महेश यांचे श्रवणीय संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर याचे असून कार्यकारी निर्माता म्हणून अतुल साळवे यांनी काम पाहिले आहे. तर असा हा सहकुटुंब पाहता येणारा चित्रपट येत्या ३१ जानेवारीला चित्रपटगृहात जाऊन नक्कीच पाहावा लागेल यात शंका नाही.

नव्या वर्षांत लाखो पुणेकरांनी केला मेट्रोने प्रवास! पिंपरी ते स्वारगेट मार्गावर

0
Newsworldmarathi Pune : प्रवासाला मेट्रो सोयीची आणि सुखकर होत असल्‍याने अनेक जण त्‍याला पसंती देत आहेत. त्‍यामुळे दरदिवशी मेट्रोच्‍या प्रवासी संख्येत मोठी वाढ होत आहे.नववर्षाच्‍या सुरुवातीच्‍या सात दिवसांत पुणे मेट्रोच्या (Pune Metro) प्रवाशांची संख्या पाच लाखांवर गेली आहे. मेट्रो प्रवासाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्‍यामधून या सात दिवसांत ८५ लाखांवर मेट्रोचे उत्‍पन्न झाले आहे. स्‍वारगेटपर्यंत मेट्रो झाल्‍याने नागरिकांना प्रवास करणे सोपे झाले आहे. अनेकजण नववर्षाची सुरूवात देवदर्शनाने करतात. पुणे शहरात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांनीही बुधवारी पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखोंचा जनसमुदाय पुण्यात आला होता. प्रवासाला मेट्रो सोयीची आणि सुखकर होत असल्‍याने अनेक जण त्‍याला पसंती देत आहेत. त्‍यामुळे दरदिवशी मेट्रोच्‍या प्रवासी संख्येत मोठी वाढ होत आहे. स्‍वारगेटपर्यंत मेट्रोची व्‍यवस्‍था झाल्‍याने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पुण्यात कमी वेळेत जाताना अधिक सोयीचे होत आहे. पुणे मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट Swargate To Pimpri मेट्रो या मार्गावर वर्षाच्या पहिल्याच आठवड्यातील सात दिवसांत पाच लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर या मार्गिकेवर ८४ लाख ९० हजार ४३४ प्रवाशांनी प्रवास केला असल्‍याची नोंद आहे.

पर्पल जल्लोष महाउत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

0
Newsworldmarathi Pune : ‘दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक असून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल. त्यासाठी विविध घटकांच्या सहकार्याने प्रभावी उपायोजना करण्यात येतील.’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणून त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ ते १९ जानेवारी, २०२५ या कालावधीत मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर मैदानावर ‘पर्पल जल्‍लोष’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. उमा खापरे, आ. अण्णा बनसोडे, आ. अमित गोरखे, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते.‌ उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, राज्याच्या लोकसंख्येच्या साधारणपणे पाच टक्के लोकसंख्या दिव्यांग बांधवांची आहे. दिव्यांग बांधवांसाठीच्या योजना राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ठराविक निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करण्याबाबतचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात येईल. यासंबंधीचे आदेश देखील आदेश लवकर काढले जातील. राज्याचा अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी तरतूद केली जाईल. दिव्यांग व्यक्तींची संख्या किती आहे, यासाठी जिल्हानुसार दिव्यांगांचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशी माहिती श्री. पवार यांनी दिली. महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांना मिळकत करात सवलत द्यावी आणि अतिक्रमणविरोधी कारवाई करताना दिव्यांगाना मानवतेच्या दृष्टिकोनातून सहकार्य करण्याची सूचना श्री.पवार यांनी केली. दिव्यांग भवनच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेने दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम सुरू केले आहे. दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, रोजगार कार्यक्रम घेणे, आरोग्य उपाययोजना करणे यावर भर देण्यात येईल आणि दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांतील पदे लवकरच भरण्यात येतील. दिव्यांगांना योग्य मार्गदर्शन केले तर ते कर्तृत्वाचे शिखर गाठू शकतात, हे पर्पल जल्लोष सारख्या कार्यक्रमातून दिसून येते. दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचे, त्यांना प्रेरणा देण्याचे काम समाज म्हणून आपल्या सर्वांचे आहे असे श्री. पवार म्हणाले. पर्पल जल्लोष कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा मला आनंद झाला आहे असून पर्पल जल्लोष कार्यक्रम समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांनी पाहावा असा उत्सव आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री. पवार यांनी केले. *ससून रुग्णालयात दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळणार* पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दिव्यागांना प्रमाणपत्र दिले जात आहे त्याच धर्तीवर ससून रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात देखील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येतील, यासाठी आवश्यक ते निर्देश देण्यात येतील अशी घोषणा श्री. पवार यांनी यावेळी केली. *प्रदर्शनातील स्टॉलला उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट* उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनातील दिव्यांगांच्या उपयोगाच्या स्वयंसेवी संस्थांच्या स्टॉलला भेट दिली. प्रदर्शनात ४० पेक्षा जास्त स्टार्टअप्स,कार्पोरेट कंपन्यानी दिव्यांगांसाठीच्या निर्मिती केलेल्या नवनवीन वस्तू पाहण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनास सर्वांनी भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्पल जल्लोष कार्यक्रमास दिल्या शुभेच्छा* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी पर्पल जल्लोष – दिव्यांगांचा महाउत्सव या अभिनव उपक्रमाद्वारे दिव्यांगांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी आवश्यक असणारी माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना, कायदे, अधिनियम आणि हक्क याबाबत माहिती मिळेल. यामुळे दिव्यांगांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल. महाउत्सवात साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामुळे दिव्यांगाना आपल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यासाठी महाउत्सव एक आदर्श ठरेल, असा मला विश्वास आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमात शुभेच्छा दिल्या. सचिव राजेश अग्रवाल यांनी केंद्र सरकारकडून दिव्यांगांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. परांजपे स्किमचे व्यवस्थापकीय संचालक शंशाक परांजपे, युनिसेफचे संजय सिंह, अभिनेते दर्शिल सफारी यांचा दिव्यांगांसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी करताना दिव्यांगांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची तसेच दिव्यांग भवनाची माहिती दिली. दिव्यांगांचे प्रतिनिधी म्हणून मानव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, दिव्यांग बांधव, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

0
Newsworldmarathi Pune : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला. राज्य शासनाच्या सर्व योजना गतीने राबवाव्यात, प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधान मंत्री जन मन योजनेंतर्गत घरकुलांचा पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नसल्याने लाभ देण्यास अडचण असल्याच्या बाबतीत शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी महसूल अधिकाऱ्यांशी समन्वयाने काम करावे. उपलब्ध शासकीय जागांचे प्रस्ताव उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावेत. अग्रीस्टॅक पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नोंदणी करणे, त्यांची माहिती भरण्याचे काम प्राधान्याने करावे जेणेकरून शेतकऱ्यांना भविष्यात गतीने कृषीच्या योजनांचा लाभ देता देता येईल. शेतकरी नोंदणीसाठी सामान्य सुविधा केंद्राचाही उपयोग करा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीबाबत आलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने तालुकानिहाय किती ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या. उपलब्ध जागेवर प्रकल्प उभारण्याची व्यवहार्य तपासणी करून तात्काळ कामे सुरू होतील, असे पाहावे, असेही ते म्हणाले. अनोंदणीकृत फेरफार नोंदीसाठी ई-हक्क प्रणालीचा वापर तात्काळ सुरू करावा. ई-पीक पाहणीचे १०० टक्के काम गतीने होईल हे पाहावे. जमीन महसूल कर वसुलीच्या अनुषंगाने ई- चावडी प्रणालीचा प्रभावी उपयोग करावा, डिजिटल पंचनामा प्रणालीद्वारे पंचनामे करावेत. सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी डॅशबोर्डचा वापर करावा. राज्य शासनाने दिलेल्या सात सूत्री कार्यक्रमाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील म्हणाले, घरकुलांसाठी जागा उपलब्धता तसेच निधी उपलब्ध असलेल्या परंतु जागेअभावी काम सुरू न झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना जागा उपलब्ध करण्याबाबत महसूल आणि गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. जल जीवन मिशनच्या कामांसाठी जागेबाबत प्रश्न त्वरित सोडवावेत, असेही ते म्हणाले. यावेळी ई मोजणी, विविध प्रकल्पांसाठी भूमी संपादन, स्वामित्व योजना, ई क्यूजे कोर्ट, सेवा हक्क अधिनियमानुसार उपलब्ध करून देण्याच्या योजना आदीबाबत आढावा घेण्यात आला.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे

0
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. विभागासाठी सध्याची आर्थिक तरतूद पाहता प्रस्तावित नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यास 20 ते 25 वर्षे लागू शकतील असे प्रकल्प पाच वर्षात पूर्ण होण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांद्वारे निधी उभारण्याचा विचार आहे; निधीची कोणत्याही प्रकारे कमतरता भासणार नाही, असेही ते म्हणाले. यशदा येथे आयोजित कोकण ते इतर नदी खोऱ्यात पाणी वळविण्यासाठीच्या नदीजोड प्रकल्पांबाबत कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिकचे महासंचालक प्रमोद मांदाडे, यशदा चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, उप महासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून आणि समर्पण भावनेतून बाळासाहेब विखे- पाटील आणि स्व. गणपतराव देशमुख यांनी 25 वर्षांपूर्वी पाणी परिषदेची स्थापना केली, असे सांगून मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले, ही समर्पण भावना ठेवली तर आपण राज्य दुष्काळमुक्त करू शकतो. उपलब्ध साधनांमध्ये राज्याचे अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली कसे आणता येईल, अधिकाधिक साधनांचा वापर करुन राज्य दुष्काळमुक्तीकडे कशी वाटचाल करील याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज आहे. हाच विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत, असेही ते म्हणाले. श्री. विखे- पाटील पुढे म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना भरीव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता चौकटीबाहेर जाऊन तसेच व्यापक दृष्टिकोन ठेऊन विचार करण्याची गरज आहे. वरिष्ठांनी केवळ व्यवस्थापनाचे काम न करता नियमितपणे आपल्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन क्षेत्रपातळीवर येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांचे प्रस्ताव मंत्रालयात सादर करावेत, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांची शेतीच्या उपलब्धतेवर आणि अडविलेल्या पाण्यावर त्यांची शेती फुलवू शकलो तर त्यांच्या जीवनामध्ये नवा आशय निर्माण करू शकतो. पाणी वितरणाच्या यंत्रणा सक्षम करुन उपलब्ध पाण्याचा वापर शेतीसाठी कसा करता येईल, यादृष्टीने व्यापक दृष्टीकोनातून विचार करावा, अशाही सूचना श्री. विखे- पाटील यांनी दिल्या. *जुन्या नियमांचा विचार करण्यासाठी समिती स्थापन करणार* पाटबंधारे विभागातील कालबाह्य झालेल्या कायदे व नियमांचा विचार करुन त्याबाबत शिफारस करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येईल, असेही जलसंपदामंत्री म्हणाले. तसेच कृष्णा खोरे आणि गोदावरी खोऱ्याच्या स्तरावर पाणी क्षेत्रात काम केलेले वरीष्ठ अनुभवी व्यक्तींचे सल्लागार मंडळ स्थापन करण्याचीही गरज आहे, असेही ते म्हणाले. प्रत्येक महानगरपालिकेने, अ वर्ग नगरपालिका आदींना किमान त्यांचे 30 ते 40 टक्के वापर झालेल्या पाण्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापर करणे गरजेचे राहील, असे धोरण आणावे लागेल. शहरांनी नद्यांमध्ये थेट मलनिस्सारणाचे पाणी न सोडता त्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक करावे लागेल. पाटबंधारे खात्याचे काम केवळ पाणी पुरविण्याचे नसून ते सुव्यवस्थित राखण्याचे दायित्वदेखील संबंधित संस्थांवर सोपवावे लागेल. पाटबंधारे विभागाच्या आहेत त्या यंत्रणा कशा प्रकारे सक्षम करता येतील यासाठी संबंधित मंडळांच्या अधीक्षक अभियंता अधिनस्त कार्यकारी अभियंता यांनी बैठका घेऊन आराखडा तयार करावा. त्याबाबत विभागनिहाय आढावा घेण्यात येईल, अपर मुख्य सचिव श्री. कपूर म्हणाले, महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांमुळे राज्याचे परिवर्तन होऊ शकेल. याकडे केवळ किती सिंचन क्षमता वाढेल या एकाच दृष्टीकोनातून पाहता येणार नाही, येणाऱ्या पाण्यामुळे जमीन सुजलाम् सुफलाम् झाल्यामुळे आर्थिक परिवर्तन होऊन शेतकरी आत्महत्यासारखा प्रश्नावर मात होऊ शकते. समृद्धता आल्यामुळे सामाजिक व्यवस्थांवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्रात वैनगंगा- नळगंगा- पैनगंगा नदी जोड प्रकल्पाचे पुढील सहा महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करुन काम सुरू करण्यावर भर दिला जाईल. मराठवाड्यामध्ये नदी जोड प्रकल्पातून सुमारे 55 टीएमसी पाणी उपलब्ध करुन द्यायचे आहे. त्याचेही लवकर कार्यादेश देण्याबाबतचे काम, उल्हास आणि वैतरणामधून पाणी उपसा करुन 67.5 टीएमसीची मोठी योजना करण्यात येणार असून अंतिम विस्तृत प्रकल्प अहवाल प्रगतीपथावर आहे. तसेच दमनगंगा वैतरणा, दमनगंगा एकदरे या योजना अंतिम टप्प्यात आहेत, असेही यावेळी श्री. कपूर यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री श्री. म्हस्के पाटील, महाराष्ट्र पाणी परिषदेचे सदस्य या. रा. जाधव, डॉ. दी. मा. मोरे, सेवानिवृत्त पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक डॉ. एस. ए. नागरे यांनी मनोगत केले. प्रास्ताविक श्री. कपोले यांनी केले. पाणी परिषदेच्यावतीने नदीजोड प्रकल्पाबाबत तयार करण्यात आलेली चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांनी प्रकल्पाबाबतचे सविस्तर सादरीकरण केले. कार्यशाळेस जलसंपदा विभागाचे कृष्णा व गोदावरी खोऱ्यांचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र पाणी परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

महाबँकेचे सरव्यवस्थापक अतुल जोशी यांचे निधन

0
Newsworldmarathi pune :बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक अतुल चिंतामण जोशी (वय ५८) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ ते महाबॅंकेच्या सेवेत होते. या कालावधीत पुण्या-मुंबईसह गोवा आणि कोकणातील भिरा या ठिकाणी जोशी यांनी विविध अधिकारपदे भूषवली. सर्वांच्या मदतीसाठी धावून जाणारे हरहुन्नरी अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. महाबँकेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडाविषयक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. बँकेच्या फुटबॉल संघातून ते अनेक वर्षे फुटबॉल देखील खेळले. नूतन मराठी विद्यालयाच्या नूमवीय या माजी विद्यार्थी संघटनेसमवेत त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.