देशातील सर्वोत्कृष्ट 30 हेअरस्टायलिस्टमध्ये पुण्याचे हेअरस्टायलिस्ट

0
Newsworldmarathi Pune : गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइट या राष्ट्रीय पातळीवरील हेअरस्टायलिस्ट स्पर्धेत रिच बिट सलून (वाकड) येथील रोहित सुरवरसे आणि अमो युनिसेक्स सलून (खराडी) येथील श्वेता आचार्य हे टॉप तीस फायनलिस्टमध्ये निवडले गेले आहेत. ही पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. केसांचा रंग तसेच केसांची निगा राखणारा गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (GCPL) चा प्रमुख व्यावसायिक हेअर ब्रँड गोदरेज प्रोफेशनलने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हेअरस्टायलिस्टची हटके प्रतिभा ओळखणे तसेच त्यांच्या व्यावसायिक वाढीस समर्थन देणे हे गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइटचा हेतू आहे. मुंबईत झालेल्या या महाअंतिम फेरीत देशभरातून निवडलेले 30 प्रतिभावान सहभागी झाले होते. प्रत्येक फायनलिस्टने रॅम्पवर गोदरेज प्रोफेशनलच्या क्युरेटेड हेअर कलर कलेक्शनचे अत्यंत देखणे सादरीकरण केले. इतर 28 फायनलिस्टसह ग्रँड फिनाले इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या रोहित आणि श्वेता यांनी हेअरकलर्सचे उत्तम प्रदर्शन केले. 30 कुशल व्यावसायिकांच्या या पहिल्या तुकडीला यियान्नी त्सपाटोरी, गोदरेज प्रोफेशनलचे हेअरचे क्रिएटिव्ह डायरेक्टर, आदरणीय मार्गदर्शक शैलेश मूल्या, नॅशनल टेक्निकल हेड आणि नजीब-उर-रेहमान, गोदरेज प्रोफेशनलचे टेक्निकल अँबेसेडर यांच्या नेतृत्वाखाली मास्टरक्लासमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी मिळाली. अभिनव ग्रांधी, महाव्यवस्थापक, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL), म्हणाले, “गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइटला मिळालेल्या उदंड प्रतिसादासाठी आम्ही आनंदी आहोत. आम्हाला याचा अभिमान वाटतो. हे व्यासपीठ प्रतिभावान केशरचनाकारांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्याची केवळ संधी देत नाही तर या क्षेत्रातील शिक्षण तसेच प्रशिक्षणाप्रती आमची बांधिलकी देखील दर्शवते. या उपक्रमाद्वारे, वाढत्या स्पर्धात्मक बाजारपेठेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि संधीसह हेअर स्टायलिस्टला सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे. भारतातील सलून व्यावसायिकांना संधी आणि त्यांची प्रगती करण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेच्या दिशेने हे आमचे एक पाऊल आहे.”

देशांतर्गत वैविध्यपूर्ण पर्यटनाला चालना मिळतेय : आपटे

0
Newsworldmarathi Pune : “भारताला निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे. निसर्गनिर्मित अद्भुत अशी अनेक ठिकाणे भारतामध्ये आहेत. पर्यटकांनी देशांतर्गत असलेल्या वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांचा अनुभव घ्यायला हवा. पर्यटन मंत्रालयाकडून यासाठी प्रोत्साहन दिले जात असून, नाविन्यपूर्ण पर्यटनस्थळांचा विकास व प्रसार केला जात आहे,” असे मत केंद्रीय पर्यटन मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी गौरी आपटे यांनी व्यक्त केले. कोकणातील कातळशिल्पे पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हायला हवीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने कॅप्टन निलेश जर्नी विथ विंग्जच्या सहकार्याने आयोजित तीन दिवसीय पाचव्या पुणे पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी पर्यटन मंत्रालयातील अधिकारी स्वाती बारसोडे, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार, कॅप्टन निलेश गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण घोरपडे, सचिव प्रथमेश कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी निलेश गायकवाड लिखित ‘माझी मुशाफिरी’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राच्या व देशाच्या समृद्ध पर्यटन वारशाचे दर्शन घडवणाऱ्या या फेस्टिवलमध्ये विविध गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आणि दुर्लक्षित ठिकाणांबाबत माहिती दिली जात आहे. देशांतर्गत व विदेशातील पर्यटनाचे अनेक पर्याय असलेल्या जवळपास ५० टुरिस्ट कंपन्यांचे स्टॉल्स येथे आहेत. पर्यटनप्रेमींना प्रेरणा आणि महाराष्ट्र पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने हा फेस्टिव्हल पुणेकरांसाठी रविवारपर्यंत (दि. १९) विनामूल्य खुला असणार आहे. तीनही दिवस दर तासाला लकी ड्रॉ, तसेच दिवसांतून तीनवेळा ग्रँड लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. शमा पवार म्हणाल्या, “आपण जगभर प्रवास करतो, पण जर आपल्याला आपल्याच महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती नसेल, तर हे अयोग्य आहे. महाराष्ट्राला पर्यटनाचा संपन्न वारसा लाभलेला आहे. परंतु अजूनही अनेक ठिकाणांची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही किंवा तिथे प्रवासाच्या सोयी उपलब्ध नाहीत. अशा ठिकाणांना लोकप्रिय करण्यासह तिथे पायाभूत सुविधांची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनही पुढाकार घेत आहे.” प्रवीण घोरपडे यांनी स्वागत केले. प्रथमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सारंग भिडे यांनी सूत्रसंचालन केले. चंदन पठारे यांनी आभार मानले.

‘संविधान सन्मान दौड २०२५’ मध्ये सुमारे १० हजार नागरिक धावणार

0
Newsworldmarathi Pune : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘अमृत महोत्सवी संविधान सन्मान दौड २०२५ ‘ चे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, बार्टी यांच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या २५ जानेवारी २०२५ रोजी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची नाव नोंदणी सुरू झाली असून त्याला पुणेकरांसह देश , विदेशातील धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत विविध अंतरासाठी, विविध वयोगटातील सुमारे १० हजार नागरिक धावतील अशी माहिती ‘संविधान सन्मान दौड’ चे मुख्य आयोजक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी  सांस्कृतीक महोत्सव समितीचे सचिव दीपक  म्हस्के उपस्थीत होते. अमृत महोत्सवी संविधान सन्मान दौड २०२५ ची माहिती देताना परशुराम वाडेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (BARTI), संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीाईं फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशनच्या वतीने या ‘संविधान सन्मान दौड २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्षे असून मागील वर्षी या स्पर्धेत तब्बल ५० देशांचे ५ हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. तर यावर्षी सुमारे १० हजार स्पर्धक सहभागी होतील असा अंदाज आहे. यंदाची स्पर्धा २५ जानेवारी रोजी पहाटे ५.३० वाजता खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथून सुरू होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. तर पारितोषीक वितरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सामजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टी चे महासंचालक डॉ. सुनिल वारे,, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी,  पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा,  प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, रजिस्ट्रार ज्योती भाकरे, डॉ. विजय खरे ( विभाग प्रमुख संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील आमदार, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत.  या स्पर्धेला आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार अण्णा बनसोडे यांचे विशेष सहकार्य लाभाल्याचे वाडेकर यांनी सांगितले.  दीपक म्हस्के म्हणाले, अमृत महोत्सवी संविधान सन्मान दौड २०२५ ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून सुरू होईल; त्यानंतर आयूका गेट, डॉ. आंबेडकर चौक, औंध रोड बोपोडी, भाऊ पाटील रोड, शाहू चौक येथून यु टर्न पुढे आई आप्पा मंदिर, विद्यापीठ मेन गेट, विद्यापीठ मेन बिल्डिंग आणि समारोप खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे होणार आहे. ही स्पर्धा 16 वर्षांखालील, 18 वर्षांखालील आणि खुल्या वयोगटात अशा तीन विभागात घेतली जाणार आहे. ती प्रामुख्याने 3 किलो मीटर, 5 किलो मीटर आणि 10 किलो मीटर अंतराची असणार आहे. याप्रमाणेच दिव्यांगांसाठीही दिव्यांग व्हीलचेयर रेस (अॅटोमॅटीक) आणि दिव्यांग व्हीलचेयर रेस (मॅन्यूअल) अशा दोन प्रकारात ही स्पर्धा घेतली जाणार असून ही दौड 2 किलो मीटर अंतराची असणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. २१ जानेवारी २०२५ ही नाव नोंदणीची शेवटची तारीख आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकास एक टी-शर्ट ,सर्टिफिकेट, मेडल, संविधानाची प्रत, नाष्ट्याचे किट, मेडिकल सुविधा देण्यात येणार आहेत, तसेच सर्व वयोगटातील पुरुष आणि महिला गटात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृती चिन्ह दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९८५०१११७१०, ९८२२४८३७१४, ९६५७०७५१२३, ९०२१८०८८९७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पुण्यातील ट्रान्सजेंडर कार्यकर्ते सारंग पुणेकर यांचे निधन

0
Newsworldmarathi Pune : पुण्यातील ट्रान्सजेंडर कार्यकर्ते सारंग पुणेकर यांचे बुधवारी निधन झाले. सारंग यांनी पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. त्या पुण्याच्या कवयित्री होत्या आणि त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात तिने पुण्यातील वंचितांसाठी महत्त्वपूर्ण काम केले. ती ट्रान्सजेंडर समुदायातून विद्यापीठाची पहिली विद्यार्थिनी होती. “अज्ञान आणि बहिष्काराच्या संस्कृतींविरुद्ध सर्वसमावेशकतेसाठी लढा देणारा एक ट्रान्सजेंडर कार्यकर्ता – सारंग पुणेकर यांच्या दुःखद आणि अकाली निधनाची बातमी मला अत्यंत धक्कादायक आहे. मी सारंग पुणेकर यांच्या शोकाकुल कुटुंबियांना आणि मित्रांप्रती हार्दिक संवेदना व्यक्त करतो. ” – प्रकाश आंबेडकर

पुणे- नाशिक महामार्गवरील अपघातात 9 जण जागीच ठार

Newsworldmarathi Pune : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ घडलेला हा भीषण अपघात अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा आहे. या घटनेत चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे, ज्यामुळे जखमींना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करता आले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. यामुळे मॅक्स ऑटो ही चेंडूप्रमाणे हवेत फेकली गेली आणि पुढे एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्या एसटीवर जाऊन मॅक्स ऑटो आदळली. या अपघातात आयशर आणि मॅक्स ऑटोचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या घटनेचे कारण नेमके काय होते याबाबत अद्याप स्पष्टता नाही, पण महामार्गावरील वाहतुकीची नियमबाह्य पद्धत आणि अतिवेग यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशा दुर्दैवी घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना आणि वाहनचालकांकडून सावधगिरीची गरज आहे. मयत नावे पुढील प्रमाणे 1) देबुबाई दामू टाकळकर वय 65 वर्ष रा. वैशखखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे 2)विनोद केरूभाऊ रोकडे 50 वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे 3)युवराज महादेव वाव्हळ वय 23 वर्ष रा 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे 4)चंद्रकांत कारभारी गुंजाळ वय 57 वर्ष राहणार कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे 5)गीता बाबुराव गवारे वय 45 वर्षे 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे 6)भाऊ रभाजी बडे वय 65 वर्ष रा नगदवाडी कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे 7)नजमा अहमद हनीफ शेख वय- 35 वर्ष रा.गडही मैदान खेड राजगुरुनगर 8)वशिफा वशिम इनामदार वय 5 वर्ष 9)मनीषा नानासाहेब पाचरणे वय 56 वर्षे रा.14 नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे

अबब…अकरा कोटीचा घोडा!

Newsworldmarathi Baramati : बारामतीत सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये हैदराबादच्या नवाबांनी तब्बल 11 कोटी रुपये किमतीचा सोनेरी रंगाचा घोडा आणल्याने प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली आहे. या घोड्याचे वैशिष्ट्य त्याचा चमकदार सोनेरी रंग, त्याची अभिजात रचना आणि अप्रतिम देखावा आहे. हैदराबाद येथील नवाबाने बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये तब्बल 11 कोटीचा घोडा आणला आहे. या घोड्याचा रंग सोनेरी असून या घोड्याला पाहण्यासाठी कृषी प्रदूषणामध्ये एकच गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हा घोडा विशेष प्रजातीचा असून, त्याला देशभरात उत्कृष्ट घोड्यांपैकी एक मानले जाते. प्रदर्शनात या घोड्याचे दर्शन घेण्यासाठी प्रेक्षकांची रीघ लागलेली आहे. कृषी प्रदर्शनातील हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, या घोड्याने संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. सर्वसामान्य लोकांसाठी असा दुर्मिळ अनुभव असतो, ज्यामुळे हा घोडा चर्चेचा विषय बनला आहे. मालेगावच्या घोडेबाजारामध्ये या घोड्याची किंमत तब्बल 11 कोटी ठरविण्यात आल्याचे बोलले जाते. देशातील हा एकमेव घोडा असल्याचेही सांगण्यात आले आहे.मारवाडी जातीचा हा घोडा असल्याचे सांगण्यात आले आहे याचबरोबर अशा प्रकारचे घोडे भारतामध्ये फार पाहायला मिळत नाहीत

26 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार हप्ता

0
Newsworldmarathi Mumbai : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थींना दिल्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप वाटप झालेला नाही. तथापि, मंत्रिमंडळाने जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी ₹3690 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा हप्ता येत्या २६ जानेवारीपूर्वी लाभार्थींच्या खात्यात जमा केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाभार्थींना दिलासा मिळेल आणि योजनेंतर्गत आर्थिक सहाय्याचा नियमित पुरवठा सुनिश्चित होईल. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक स्थैर्य आणि सक्षमता प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. जुलै 2023 मध्ये महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दिला जातो. आतापर्यंत 2 कोटी 46 लाख महिलांना दरमहा ₹1500 प्रमाणे मदत देण्यात येत आहे. डिसेंबर महिन्याचे हप्ते 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. योजनेच्या निधीची उपलब्धता कायम असून, महिलांविषयी सकारात्मक दृष्टिकोनातून सरकार हे प्रयत्न करत असल्याचे महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी आणि मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. जानेवारी महिन्यासाठी आवश्यक असलेल्या ₹2690 कोटींच्या निधीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, हा हप्ता येत्या 26 जानेवारीपूर्वी लाभार्थींच्या खात्यावर जमा केला जाईल. या निर्णयामुळे महिलांना योजनेचा लाभ वेळेत मिळण्याची अपेक्षा आहे.

आध्यत्मिक गुरू सरश्री यांना प्रत्यक्ष पाहण्याची व ऐकण्याची सुवर्णसंधी

0
Newsworldmarathi Pune : तुमचा मूड वारंवार खराब होतो का? मूड गेल्याने तुम्हाला निरुत्साह किंवा चिडचिड जाणवते का? नवीन वर्षात तुम्हाला आपल्या मूडवर, भावनांवर ताबा मिळवून मूड मास्टर बनायचे असेल, जाणून बुजून मूड चांगला करायला शिकायचं असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तेजज्ञान फाउंडेशनतर्फे 26 जानेवारी 2025 रोजी, दुपारी 1 ते 4 या वेळात मनन आश्रम, सिंहगड रोड, पुणे येथे तेजगुरू सरश्री यांचे ‘जानबूझकर मूड अच्छा कैसे करे?, Mood Mastery in 2025 हे मार्गदर्शक प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संपूर्णपणे निःशुल्क असून सर्वांसाठी खुला आहे. याचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब, फेसबुक आणि झूमच्या माध्यमातूनही केले जाणार असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेऊन आपल्या आयुष्यात सकारात्मक आणि कायमस्वरूपी बदल घडवावा असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. तेजज्ञान फाउंडेशनची वेबसाईटवर https://happythoughts.global/26jan_live येथे रजिस्टर करून तुम्ही या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी 9921008060 या नंबरवर कॉल करा

इनोव्हेट यु टेकाथॉन’ या राष्ट्रीय हॅकाथॉन स्पर्धेच्या नोंदणीला सुरूवात

0
Newsworldmarathi Pune : इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे पुण्यातील AISSMS येथे ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ या राष्ट्रीय पातळीवरील हॅकाथॉन स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे अयोजन येत्या 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी कऱण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात करण्यात आली असून राज्यभरातील सर्व विद्यापीठातील तसेच सर्व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात.स्पर्धक विद्यार्थ्यांना सात विषय संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी दिले आहेत. या स्पर्धेत विजयी व सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण 7.5 लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.त्यातील पहिले बक्षीस 2 लाख रुपयांचे, दुसरे बक्षीस 1 लाख रुपयांचे तर तिसरे बक्षीस 75 हजार रुपयांचे असणार आहे, इनोवेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली. इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ या राष्ट्रीय पातळीवरील हॅकाथॉन स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कल्पेश यादव बोलत होते. याप्रसंगी इतर पदाधिकारी उपस्थित होते. कल्पेश यादव म्हणाले, ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ या स्पर्धेसाठी एआयएसएसएमएस- इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एआयसीटीई, राज्याचा तंत्रशिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रतन टाटा महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयडीटीआरएस यांचे सहकार्य लाभले आहे. शिक्षण आणि संशोधन हा देशाच्या विकासाचा पाया आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. इनोवेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेमधून समाजोपयोगी संशोधन निर्माण व्हावे. उद्योजकांना पूरक असणाऱ्या संशोधनाची निर्मिती व्हावी. समाजाचे जीवनमान उंचविण्यासाठी आवश्यक संशोधन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बाहेर यावे, विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिसर्च कल्चर निर्माण व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ या राष्ट्रीय पातळीवरील हॅकाथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी innovateyou.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क 999 रुपये तर महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क 1,999 रुपये आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधित स्पर्धक गटाने गूगल फॉर्म च्या माध्यमातून प्रॉब्लेम स्टेटमेंट सबमिट करावयाचे आहे. मागील वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत 39 शहरांमधील आणि 9 राज्यांमधील 600 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मागील वर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर पुन्हा एकदा संशोधनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली जात आहे, असेही कल्पेश यादव यांनी सांगितले. *इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ स्पर्धेचे विषय* 1) एज्यूटेक २) ट्राफिक मॅनेजमेंट 3) स्टुडन्ट इनोवेशन 4) एन्व्हायरमेंट 5) डिझास्टर मॅनेजमेंट 6) हेल्थ केअर 7) ॲग्रीकल्चर स्पर्धेची सविस्तर माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात नमूद केलेली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रतन टाटा यांच्या स्मरणार्थ रतन टाटा इनोव्हेटिव्ह माईंड अवॉर्ड आणि बेस्ट इनोवेशन युजिंग अवॉर्ड दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे दहा हजार रुपये रक्कमेची 35 स्वतंत्र बक्षिसे दिली जाणार आहेत. नोंदणी केल्यानंतर स्पर्धकांना रजिष्ट्रेशन किट त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना innovateyou.in/hackathon या लिंकचा वापर करता येईल. नोंदणी करताना तांत्रिक अडचण निर्माण आल्यास विद्यार्थी 9689742929, 9623337777 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठिंबा देण्यासाठी ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. त्यासाठी प्राचार्य आणि पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रदीप माने आणि संजय ससाणे यांनी केले आहे.

अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट

राजकारणात वैचारिक मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप हे जरी सामान्य असले, तरी वैयक्तिक नातेसंबंध वेगळ्या स्तरावर टिकवून ठेवणे हे काही नेत्यांसाठी महत्वाचे असते. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांचे उदाहरण हेच दाखवते की राजकीय मतभेद असूनही व्यक्तिशः सौहार्दपूर्ण संबंध राखता येतात. पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी अजितदादा व्यासपीठावर असताना एकमेकींना मिठी मारली. बारामतीतील या प्रसंगातून असे स्पष्ट होते की राजकीय व्यासपीठावरील संघर्ष हा फक्त त्यांच्या भूमिकांचा भाग आहे आणि तो वैयक्तिक जीवनात प्रतिबिंबित होत नाही. अशा घटना केवळ राजकारणातील मानवतावादी बाजू दाखवत नाहीत तर समाजातही एक सकारात्मक संदेश देतात की मतभेद असले तरी परस्पर आदर कायम ठेवावा. यासारख्या घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरतात आणि लोकांना राजकारणाच्या पलीकडील नातेसंबंधांची झलक दाखवतात. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार पंकजा मुंडे, क्रीडा-युवक-कल्याण-अल्पसंख्याक विका व औफाक मंत्री दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते. बारामतीतील या प्रसंगाने राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगवली. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यातील दिलखुलास भेट, हस्तांदोलन आणि मिठी या गोष्टींनी राजकीय मैत्रीचा एक वेगळा अध्याय उलगडला. विशेष म्हणजे, याच व्यासपीठावर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती, ज्यामुळे या प्रसंगाला आणखी रंगत आली. सुनेत्रा पवार यांनी पंकजा मुंडे यांना हास्याने प्रतिसाद दिला, परंतु सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात संवाद न झाल्यामुळे विविध तर्क-वितर्क मांडले गेले. मात्र, पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्या या उघडपणे दिलखुलास भेटीमुळे राजकारणातील वैयक्तिक सौहार्दाची एक झलक समोर आली. हा प्रसंग केवळ राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन मानवी नातेसंबंधांचे महत्त्व अधोरेखित करतो, हे नक्की. यामुळे कार्यक्रमस्थळी आणि माध्यमांमध्ये विविध चर्चांना उधाण आले, आणि हा प्रसंग अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.