पायलट चेश्ताने उभारला आदर्श
Newsworldmarathi Pune : दि. ९ डिसेंबर रोजी बारामती आणि इंदापूरच्या वेशीवर घडलेल्या भीषण अपघाताने दोन तरुणांचे जीवन हिरावले, तर आणखी दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात राजस्थानच्या चेश्ता बिष्णोई यांनी १० दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी (दि. १७) अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूनंतर केलेल्या अवयवदानामुळे आठ जणांना नवी आशा मिळाली.
चेश्ता, कृष्णाशू सिंग, दक्षू शर्मा, आणि आदित्य कणसे हे चार जण उजनी धरणाकडे जात होते. टाटा हॅरीहर गाडीचा वेग अतिवाढल्याने (१९० किमी/तास) चालकाचे नियंत्रण सुटले. गाडी झाडाला धडकल्यानंतर लोखंडी पाइपलाइनवर पलटी झाली आणि तब्बल १५० फूट लांब घसरत गेली. यात आदित्य कणसे आणि दक्षू शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. चेश्ता आणि कृष्णाशू गंभीर जखमी झाले होते.
चेश्ता गंभीर जखमी होती. तिला पुण्यात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिने जगण्याची लढाई गमावली. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. तिच्या हृदय, किडनी, डोळे, आणि आतड्यांचे दान केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.
चेश्ताच्या मृत्यूनंतर मंगळवारी तिला पुण्यात साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. तिच्या कुटुंबीयांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय आदर्श ठरला आहे, आणि तो अनेकांसाठी प्रेरणादायक आहे.
‘ती’ने बांधकाम व्यवसायात आले पाहिजे : हिरानंदानी
Newsworldmarathi Pune : देशातील अन्य उद्योग, व्यवसायापेक्षा बांधकाम व्यवसायात वाढीचा वेग अधिक आहे. भारतात आज साधारणात 20 टक्के व्यवसायवृद्धीचा दर बांधकाम क्षेत्रात आहे, भविष्यात यात अधिक वाढ होईल. यामुळे पुरुष प्रधान समजल्या जाणाऱ्या बांधकाम व्यवसायात अधिकाधिक महिलांनी आले पाहिजे असे मत नॅशनल रिअल स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO/ नरडेको) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांनी केले.
नॅशनल रिअल स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO/ नरडेको) माहीची स्थापना केली आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, सर्व क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील महिला उद्योजकांना त्यांच्या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी ‘माही’ व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे. हॉटेल शेरटॉन ग्रॅण्ड येथे ‘नरडेको माही’ आयोजित ‘अध्यक्ष पदभार स्विकारण्याचा सोहळा’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानवरून हिरानंदानी बोलत होते. यावेळी शेखर सिंह (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका), नेरडेको चे जी. हरिबाबू, राजन बांदेलकर, अपेक्षिता तिपसे (महाव्यवस्थापक, कॉसमॉस बँक) डॉ. विद्या येरवडेकर (प्र. कुलगुरू, सिम्बायोसिस विद्यापीठ), देव गिल (प्रसिद्ध अभिनेते ), नवनिर्वाचित अध्यक्ष स्मिता पाटील, मावळत्या अध्यक्षा अनंता रघुवंशी, नरडेको पुणेचे अध्यक्ष भरत अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना निरंजन पुढे बोलताना निरंजन हिरानंदानी म्हणाले, रोटी कपडा और मकान या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, मात्र आजही अनेकांचे हक्काचे घर झालेली नाही यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली परवडणाऱ्या दरात घर देण्यासाठी नरडेको वचनबद्ध आहे. आज मुंबई सारख्या शहरात जबाळपास पन्नास टक्के नागरिक झोपडपट्टी भागात राहतात, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी येत्या 10 वर्षांचा प्लॅन आम्ही सरकारला देणार आहोत, जेणेकरून मुंबई झोपडपट्टी मुक्त होईल आणि सर्वांना परवडणारी घरे मिळतील. माही च्या माध्यमातून बांधकाम व्यवसायत अधिकाधिक महिलांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणार, त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार असल्याचेही हिरानंदानी यांनी नमूद केले.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, बांधकाम व्यवसायातील राष्ट्रीय पातळीवरील सनआस्थेने महिलांसाठी केवळ स्वतंत्र विंग सुरू करून थांबू नये, बांधकाम क्षेत्रातील महिला मंजुरांची संख्या लक्षणीय आहे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना यथायोग्य मंजूरी देण्यासाठी प्रयत्न करावेत. आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, आपल्या महाराष्ट्रात मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुख्य वनसंरक्षक अशा तीनही महत्वाच्या पदावर महिला आहेत यामुळे केवळ माही नाही तर नरडेको च्या अध्यक्षपदी महिला बांधकाम व्यावसायिक आल्या पाहिजे असे मत व्यक्त केले.
माहीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा स्मिता पाटील म्हणाल्या, बांधकाम व्यवसायात महिलांचा सहभाग वाढविणे, मजूर महिलांचे प्रश्न सोडवणे या गोष्टी तर आम्ही करणार आहोतच, मात्र पर्यावरण पूरक घरांच्या निर्मितीसाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.
राजन बांदेलकर म्हणाले, बांधकाम क्षेत्र पुरुष प्रधान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव, बेटी पढाव असा नारा दिलेला आहे. मेडिकल, फायनान्स सह अन्य क्षेत्रात महिलांची संख्या मोठी आहे, मात्र बांधकाम व्यवसायात ती तुलनेने फार कमी आहे. महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी चार वर्षांपूर्वी माहीची स्थापना झाली आहे, आज एक मराठी महिला माहीची राष्ट्रीय अध्यक्ष होतेय याचा आनंद वाटतो.
याप्रसंगी नेरडेको चे जी. हरिबाबू, अपेक्षिता तिपसे, डॉ. विद्या येरवडेकर, देव गिल, अनंता रघुवंशी, भरत अग्रवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त करत नरडेको माहीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासातूनच भारत होईल महाशक्ती
Newsworldmarathi Pune : ‘भारतीय ज्ञान परंपरा हा विज्ञान, तत्वज्ञान आणि अध्यात्मज्ञानाचा संगम असून, ब्रिटिश सत्तेने भारतीयांना या ज्ञान परंपरेपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. आता नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश करण्यात आला असून, त्यातून भावी पिढी विचार प्रवर्तक होऊन भारत महाशक्ती होण्यास मदत मिळेल,’ असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी गुरुवारी व्यक्त केला.
निमित्त होते, भूषण पटवर्धन व इंदू रामचंदानी लिखित ‘जिनोम टू ओम’ या पुस्तकावरील परिसंवादाचे. ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त ‘लिटररी कॉर्नर’ येथे आयोजित या परिसंवादात ज्येष्ठ तत्वज्ञ शरद देशपांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, लेखक भूषण पटवर्धन यांनी सहभाग घेत आपली भूमिका मांडली.
‘युरोपात प्रबोधनयुगात विज्ञान-अध्यात्म हा भेद निर्माण झाला. ब्रिटिशांची सत्ता आल्यावर भारतीय विज्ञानाकडे झुकले आणि अध्यात्माची परंपरा विसरले. आधुनिक काळात या दोन्हीचे महत्त्व अधोरेखित झाल्याने हा भेद मिटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ‘जिनोम टू ओम’ हे पुस्तक म्हणजे ‘मल्टिव्हिटॅमिन’ची गोळी असून, विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही बाजूंकडे पाहायला शिकविते,’ असे शरद देशपांडे म्हणाले.
‘या पुस्तकामध्ये विज्ञान, तत्वज्ञान, मनोविज्ञान, अध्यात्म यांची चांगली सांगड घालण्यात आली असून, स्वत:च्या समस्यांकडे वैज्ञानिक व अध्यात्मिक दृष्टीने कसे पाहायचे, याची माहिती दिली आहे, तसेच शारीरिक, मानसिक, सामाजिक व अध्यात्मिक आरोग्याचा उहापोह करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे,’ असे डॉ. सुरेश गोसावी म्हणाले.
‘वेद-उपनिषदांमध्ये व्यष्टी, सृष्टी, समष्टी आणि परमेष्टी या सूत्रांचा उल्लेख असून, त्याचा संबंध मानवी उत्क्रांतीशी आहे. या भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश आता नवीन शैक्षणिक धोरणात करण्यात आला असून, त्याला राजाश्रय लाभलेला आहे. भारतीय ज्ञान परंपरेत विज्ञान व जीवनपद्धतीची सांगड घालण्यात आली असून, त्याचे सार या पुस्तकात मांडण्यात आले आहे, असे डॉ. करमळकर म्हणाले.
‘विज्ञानातून तत्वज्ञानाकडे प्रवास मांडणारे हे पुस्तक सर्व वयोगटातील वाचकांनी वाचले पाहिजे. त्यातून विचारप्रवर्तक व्यक्ती घडून, भारत महाशक्ती होण्यास मदत मिळेल,’ असा विश्वास डॉ. विद्या येरवडेकर यांनी व्यक्त केला. भूषण पटवर्धन यांनी लेखनामागची प्रेरणा उलगडली. ‘विज्ञान हे विशेष ज्ञान असून, त्याहून व्यापक असलेल्या प्रज्ञानाकडे जाण्याची गरज आहे. आतापर्यंत मानवाने स्वत:चा फायदा, लालसेपोटी विज्ञानाचा उपयोग केला. त्याचा चराचरासाठी व्यापक उपयोग करण्यास प्रज्ञान शिकवते. या संदर्भातील उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे,’ असे पटवर्धन यांनी सांगितले.
प्रेमीयुगलांसाठी ‘सेफ हाऊस’
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र शासनाने समाजातील समता, सहिष्णुता, आणि प्रेमाला प्रोत्साहन देण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गेस्ट हाऊसना “सेफ होम (Safe Home)” म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा निर्णय आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्यासाठी क्रांतिकारी ठरणार आहे.
निर्णयाचे उद्दिष्ट:
•समाजात समता व सहिष्णुतेचा प्रसार: या निर्णयामुळे सामाजिक एकतेला चालना मिळेल.
•प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण: अशा जोडप्यांना त्यांच्या सुरक्षेबाबतची भीती दूर करून सुरक्षित जीवन जगता येईल.
•शांततामय निवास: जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात विश्वासाने आणि आनंदाने करता येईल.
महत्त्वाचे मुद्दे:
1.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गेस्ट हाऊस “सेफ होम” म्हणून घोषित करण्यात आले आहे.
2.विशेष कक्ष (Special Cell) स्थापन करून या जोडप्यांना मदत व मार्गदर्शन केले जाणार आहे.
3.विशेष कक्षामार्फत या सेफ होमच्या सुविधेबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.
अनहद सोशल फाउंडेशनच्या “राईट टू लव्ह” उपक्रमाच्या वतीने, आम्ही महाराष्ट्र शासनाच्या या स्वागतार्ह निर्णयाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. फाउंडेशनचे मत आहे की, “हा निर्णय समाजातील समता व सहिष्णुतेचा पाया अधिक मजबूत करेल. अनेक जोडप्यांना त्यांच्या प्रेमाचा अधिकार निर्भयपणे बजावता येईल. शासनाच्या या पुढाकारामुळे प्रगत समाजाची उभारणी शक्य होईल.”
सर्व जोडप्यांना आवाहन:
जर तुम्ही आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केला आहे आणि तुम्हाला सुरक्षित निवासाची गरज आहे, तर या सेफ होम सुविधेचा लाभ घ्या.अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील विशेष कक्ष (Special Cell) किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.
दिल्लीतील संमेलन अभूतपूर्व ठरेल : प्रतिभाताई पाटील
Newsworldmarathi Pune सरहद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या https://abmssdelhi.org या संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आज (दि. 19) करण्यात आले. दिल्लीत सुमारे 70 वर्षांनंतर होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देऊन हे संमेलन अभूतपूर्व ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रतिभाताई पाटील यांच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘रायगड’ या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सतिश देसाई, ॲड. प्रताप परदेशी, शैलेश वाडेकर, अनुज नहार, संतोष देशपांडे, पाटील यांच्या कन्या ज्योती राठोड आदी उपस्थित होते.
दिल्लीत होत असलेल्या संमेलनाविषयी माहिती देताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, सुमारे 70 वर्षांपूर्वी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते तर स्वागताध्यक्ष बॅरिस्टर काकासाहेब गाडगीळ होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील संमेलन झाले होते. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा योग परत जुळून आला असून या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वीकारले आहे.
ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली 98वे संमेलन होत आहे. प्रतिभाताई पाटील यांच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा. मिलिंद जोशी यांनी मसापने प्रकाशित केलेला अक्षरधन हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान केला. तर सरहदच्या वतीने काश्मीरी गब्बा देऊन शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांनी त्यांचा सन्मान केला. प्रतिभाताई पाटील यांच्या कुटुंबियांच्यावतीने पाटील यांच्यावरील गौरव ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सरहद संस्थेला भेट देण्यात आला.
संकेतस्थळाची निर्मिती करताना त्याची रचना साधी-सोपी आणि आकर्षक करण्यात आली आहे. संमेलनाविषयी अद्ययावत माहिती, प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथ दालनाची नोंदणी या संकेतस्थळाद्वारे करता येणार आहे. तसेच मराठी भाषा, महाराष्ट्र आणि दिल्लीचे संबंध यावर प्रकाशझोत टाकणारी छायाचित्रे, व्हिडिओ क्लिप्स, पॉडकास्ट, न्यूज क्लिप्स पाहण्याची सोय आहे.
विश्वकोश या विशेष विभागातून मराठी साहित्य आणि साहित्यिकांविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी मराठी लोकांपर्यंत या संमेलनाविषयीची माहिती पोहोचेल.
संकेतस्थळाची निर्मिती संतोष देशपांडे यांच्या मीडियाक्युरा या संस्थेने केली असून मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे विशेष सहकार्य लाभले आहे.
महिलांसाठी विमा उद्योगाचे पहिले उत्पादन लॉन्च
Newsworldmarathi Mumbai : ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आज ‘ICICI प्रू विश’ हे जीवन विमा उद्योगातील पहिल्याच प्रकारचे आरोग्य उत्पादन लाँच केले आहे, जे खास करून महिलांचे विशिष्ट गंभीर आजार आणि शस्त्रक्रियांसाठी सेवा पुरवते. हे उत्पादन ICICI प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सने एक अग्रगण्य जागतिक जीवन आणि आरोग्य पुनर्विमा कंपनी, रिइन्शुरन्स ग्रुप ऑफ अमेरिका, इनकॉर्पोरेटेड (RGA) च्या सहकार्याने विकसित केले आहे.
स्तन, गर्भाशय, गर्भाशयाचा कर्करोग आणि हृदयाचे आजार यासारख्या गंभीर आजारांच्या निदानावर ICICI प्रू विश आरोग्य कव्हरच्या रकमेच्या 100% पर्यंत त्वरित पेआउट ऑफर करते. मानक योजनांच्या विपरित, जेथे पेआउट परतफेड स्वरूपात असतात, हे उत्पादन ग्राहकांना लवचिकता प्रदान करून निदानावर निश्चित एकरकमी देते.
या संदर्भात केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षानुसार, ग्राहकांच्या चिंतेचे एक कारण म्हणजे दर काही वर्षांनी प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता. ICICI प्रू विश, 30 वर्षांच्या प्रीमियम गॅरंटी कालावधीसह, ग्राहकांना त्यांच्या प्रीमियम पेमेंटसाठी अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यास सक्षम करू शकते आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना मानसिक शांतता देते. हे उत्पादन ग्राहकांना प्रीमियम पेमेंट टर्म दरम्यान कधीही 12 महिन्यांसाठी प्रीमियम सॅबॅटिकल प्रदान करते. हे वैशिष्ट्य ग्राहकांना आर्थिक लवचिकता देते, तसेच त्यांना त्यांच्या आरोग्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सज्ज करते.
याशिवाय, हे उत्पादन ग्राहकांना बाळंतपणातील गुंतागुंत आणि नवजात बाळाचे जन्मजात आजार कव्हर करण्याचा पर्याय देखील देते. ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य उत्पादन आणि वितरण अधिकारी अमित पल्टा म्हणाले, “आयसीआयसीआय प्रू विश हे जीवन विमा उद्योगाचे पहिले आरोग्य उत्पादन महिलांच्या विशिष्ट आरोग्यविषयक आजारांसाठी देताना आम्हाला आनंद होत आहे. हे उत्पादन त्यांना त्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी एकरकमी पेआउट ऑफर करून आर्थिकदृष्ट्या तयार होण्यास सक्षम करते.
भारतीय महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक आव्हानांबाबत आमचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि त्यासंदर्भात RGA इंडियाचे सखोल ज्ञान यांचा मिलाफ करून ICICI प्रू विश विकसित करण्यात आले आहे. महिला ग्राहक वर्ग मोठ्या बाजारपेठेची संधी देतो आणि हे उत्पादन विशेषतः या विभागाच्या विमा गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. महिलांना होणाऱ्या आरोग्य जोखमींमुळे होणाऱ्या आर्थिक संकटातून हे उत्पादन मुक्ती देईल.
ICICI प्रू विश ग्राहकांना 30 वर्षांसाठी प्रीमियम गॅरंटी देऊन त्यांना काही वैद्यकीय घटनांसाठी एकाधिक दावे करण्याची लवचिकता देऊन आकर्षक प्रस्ताव देते. महत्त्वाचे म्हणजे, हे अतिरिक्त पेआउट करते ज्यामुळे आजारातून बाहेर पडण्याचा खर्च कव्हर होण्यास मदत होते.”
सुनील शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, रिइन्शुरन्स ग्रुप ऑफ अमेरिका, इंडिया म्हणाले, “ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स सोबत ‘ICICI Pru Wish’ सोबत आमच्या सहकार्याची घोषणा करताना आनंदी आहोत. आजच्या जगातील भारतीयांच्या विशेषत: महिलांच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले हे एक अग्रगण्य आरोग्य उत्पादन आहे. ही भागीदारी बाजारातील बदलत्या मागणीनुसार नावीन्यपूर्ण, ग्राहक-केंद्रित उपाय ऑफर करण्याच्या आमच्या परस्पर समर्पणावर प्रकाश टाकते.”
आरोग्याची काळजी घेणारे ते देवदूतच : संदीप खर्डेकर
Newsworldmarathi Pune : मशाल संस्थेच्या माध्यमातून वस्ती विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे देवदूतच आहेत असे गौरवोदगार क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी काढले.आज मशाल संस्थेच्या आरती भोर आणि कविता तडवी यांना ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणी साठी सात (7) रक्तदाब तपासणी यंत्र भेट देताना कर्तव्यपूर्तीचे समाधान आहेच पण भविष्यात देखील त्यांना अधिकाधिक सहाय्य करणार असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
यावेळी ट्रस्ट चे सदस्य सारंग राडकर, सोशल वर्कर आणि मशाल च्या कम्युनिटी ऑफिसर आरती भोर, कविता तडवी, वंशिका ट्रस्ट चे विशाल सातपुते इ मान्यवर उपस्थित होते.
मशाल संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करणाऱ्या व त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देणाऱ्या आरती भोर व कविता तडवी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्यात हाडांचा ठिसूळपणा, रक्तदाब, मधुमेह इ आरोग्याच्या समस्या वाढल्या असून परिस्थिती मुळे ते दुखणं अंगावर काढतात असे सांगितले.
त्यावर संदीप खर्डेकर यांनी “ग्लोबल ग्रूप, वेस्टर्न इंडिया फोर्जिंग, नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट” या सह अनेक दानशूर अश्या कार्याला मदत करत असतात त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला जी मदत लागेल ती उपलब्ध करेन असे वचन दिले.
पराभूत उमेदवारात सापडला भाजपला ‘राम’
Newsworldmarathi Nagpur : कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना निवडणुकीत दमछाक करायला लावणाऱ्या राम शिंदेना पराभूत होऊन देखील भाजपकडून विधानपरिषदेचे सभापती म्हणून संधी देण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड ही भारतीय जनता पक्षासाठी आणि महायुतीसाठी महत्त्वाची राजकीय कामगिरी मानली जाते. महाविकास आघाडीने उमेदवार न उभा केल्याने ही निवड बिनविरोध झाली.
राम शिंदे यांची निवड युतीतील एकत्रित संख्याबळाचे प्रदर्शन ठरले आहे, ज्यामुळे विधानपरिषदेतही युतीचा प्रभाव अधिक बळकट होईल. राम शिंदे हे भाजपमधील वरिष्ठ नेते असून, त्यांचा अनुभव आणि नेतृत्व क्षमता लक्षात घेता त्यांना सभापतीपदासाठी निवडण्यात आले आहे. ही निवड महायुतीच्या राजकीय धोरणांमध्ये स्थिरता आणि गती आणण्यास महत्त्वपूर्ण ठरेल.
राम शिंदे यांनी केली एक्सवर पोस्ट :
आमदार राम शिंदे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये जे आभार व्यक्त केले आहेत, त्यात त्यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत महायुतीच्या सर्व नेत्यांचे विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा, जे पी नड्डा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. हे आभार राम शिंदे यांच्या विधानपरिषद सभापतीपदी उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचे आहेत, आणि या नेत्यांच्या समर्थनामुळे त्यांना या पदासाठी अधिक मजबुती मिळाली आहे.
हे आभार व्यक्त करत असताना, राम शिंदे यांनी महायुतीच्या एकजुटीचा उल्लेख केला आहे, जो त्यांच्या निवडीसाठी महत्त्वपूर्ण ठरला. त्यांच्या या पोस्टमध्ये एकजुटीचा आणि भाजप-महायुतीच्या समर्पणाचा संदेश आहे.
कोण आहेत राम शिंदे?
राम शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू सहयोगी मानले जाते. 2014 मध्ये विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. 2019 मध्ये कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्याकडून पराभव झाल्यानंतर भाजपने त्यांना विधानपरिषद सदस्यपदी निवडले.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांना रोहित पवार यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला, पण या पराभवाचे कारण फडणवीस आणि शिंदे यांची रणनीती त्याच्याकडे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, विधानपरिषद सभापती म्हणून त्यांच्या निवडीमुळे राम शिंदे यांची राजकीय उंची आणि प्रभाव अधिक वाढला आहे.राम शिंदे आता या विधान परिषदेचे सभापती म्हणून कसे काम करणार विरोधकांना पण न्याय देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे
प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पाटणा पायरेट्स संघाची बंगाल वॉरियर्सवर मात
Newsworldmarathi Pune : पाटणा पायरेट्स संघाने बंगाल वॉरियर्सवर ४१-३७ अशी मात केली आणि प्रो कबड्डी स्पर्धेत प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला.मध्यंतराला पाटणा संघाने १९-१८ अशी आघाडी घेतली होती
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन स्पर्धेत पाटणा संघाने यंदाच्या मोसमात झालेल्या वीस सामन्यांपैकी आठ सामने जिंकले होते तर तेलुगु टायटन्स संघाने आतापर्यंत २० सामन्यांमध्ये अकरा विजय मिळवले होते. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी हे दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करीत असल्यामुळेच आजचा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा होता. दोन्ही संघांनी सुरुवातीपासून आघाडी घेण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न केले मात्र पाटणा संघाच्या खेळाडूंनी केलेल्या चुकांमुळे तेलुगु संघाने त्यांच्यावर पहिला लोण चढविला.
हा लोण स्वीकारल्यानंतरही पाटणा संघाची जिद्द कायम होती. त्यामुळेच त्यांनी पिछाडी भरून काढीत मध्यंतराला एक गुणाची नाममात्र आघाडी मिळवली होती.
उत्तरार्धात सुरुवातीलाच त्यांनी लोण चढविला आणि सामन्यातील रंगत वाढवली. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना त्यांच्याकडे तीन गुणांची आघाडी होती. त्यांचा भरवशाचा खेळाडू देवांक याने खोलवर चढाया करीत आपल्या संघास अधिकाधिक गुण मिळवून दिले. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना पाटणा संघाने ३८-३१ अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी कमी करण्यासाठी बंगालच्या संघाने केलेले प्रयत्न अपुरे ठरले
आयटी कर्मचाऱ्यांसाठी मेट्रोची खास भेट: नेहा पंडित यांची घोषणा
Newsworldmarathi Pune : हिंजवडी आणि खराडी या दोन प्रमुख आयटी पार्कांना जोडण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या प्रस्तावित मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दळणवळण अधिक सोयीस्कर होण्याची शक्यता आहे. असे पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल) च्या संचालक नेहा पंडित यांनी सांगितले. पुण्याच्या श्रमिक पत्रकार संघाच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
वाहतूक समस्या कमी होणार:
हिंजवडी आणि खराडी या दोन्ही आयटी हबमधील दळणवळण सुधारण्यासाठी प्रस्तावित मेट्रो लाईन महत्त्वपूर्ण ठरेल. सध्या या दोन भागांदरम्यान प्रवासासाठी खासगी वाहने किंवा बसेसवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे वाहतुकीचा ताण आणि ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणावर होतो. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. जिथे सध्या 1-2 तास लागतात, तिथे मेट्रोमुळे 30-40 मिनिटांत पोहोचणे शक्य होईल. हिंजवडी ते खराडी मेट्रो जोडल्याने आयटी तील तरुण तरुणीना मोठा फायदा होणार आहे. वाहतूक कोडी कमी होण्याचीही शक्यता आहे.
नवीन रोजगार संधी:
हिंजवडी आणि खराडी या दोन प्रमुख आयटी पार्कांना मेट्रोद्वारे जोडल्यामुळे या क्षेत्रांतील व्यवसाय वाढीस चालना मिळेल. दोन्ही आयटी हबमध्ये कार्यक्षम आणि सोयीस्कर दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाल्याने अधिक कंपन्या या भागात गुंतवणूक करतील, ज्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल. आयटी हबशी संबंधित सेवा जसे की, हॉटेल्स, कॅफे, वाहतूक सेवा, प्रशिक्षण केंद्रे, आणि इतर सहयोगी उद्योगांना मागणी वाढेल, ज्यामुळे रोजगार वाढ होईल. हा उपक्रम पुण्यातील आयटी क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देईल. हिंजवडी-खराडी मेट्रो कनेक्टिव्हिटी लवकरात लवकर प्रत्यक्षात येईल, अशी आयटी कर्मचाऱ्यांची आणि पुणेकरांची अपेक्षा आहे.
मेट्रोने प्रवास करण्यास नागरिकांनी प्राधान्य द्यावे :
पुणे मेट्रोसाठी दोन वेगवेगळ्या कंपनी काम करत असून त्यांच्यात समन्वय आहे. मेट्रो कामात तंत्रज्ञान महत्वाचे असते. परदेशाप्रमाणे रिमोटवर चालणाऱ्या आमच्याकडे स्वयंचलित ट्रेन आहे. थर्ड रेल तंत्रज्ञानद्वारे ओव्हर हेड वायर मेट्रोला न देता करंटवर ट्रेन चालेल, त्यामुळे वायर जंजाळ दिसणार नाही. तसेच मेट्रो दरवाजा यांना केवळ अर्धी काच बाहेर पाहण्यासाठी न ठेवता, संपूर्ण काचेचे दरवाजा करण्यात येणार आहे. मेट्रो प्रवास करण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे, असे मत पुणे आयटी सीटी मेट्रो रेल लिमिटेडचे संचालक नेहा पंडित यांनी व्यक्त केले.

