चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांना तेजस्विनी पुरस्कार

0
Newsworldmarathi Pune : प्रशासकीय सेवेत प्रदीर्घकाळ प्रामाणिकपणाने दिलेल्या योगदानाबद्दल चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने पुणे महापालिकेच्या उपायुक्त आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्कार देऊन आज विशेष सन्मान करण्यात आला. गणेश कला क्रीडा मंदिरात रंगलेल्या सोहळ्यामध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यात आला. माजी आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते शाल, मोत्याची माळ, ज्ञानेश्वरी, श्रीफळ आणि जिजाऊ-शिवबा यांचे शिल्प असलेले विशेष स्मृतीचिन्ह देऊन आशा राऊत यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार मा. अश्विनीताई जगताप, ऐश्वर्या रेणुसे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलासराव मडगिरी, उद्योजक नवीनशेठ लायगुडे, नगरसेवक राजेंद्रजी जगताप, वरिष्ठ पत्रकार व लेखक पराग पोतदार, विलासराव भणगे, भास्कर शेटे, सचिनजी डिंबळे, मुख्याध्यापिका शर्मिला पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यानी मल्लखांब प्रात्यक्षिकासह विविध नृत्यांतून कलागुण सादर केले. उपस्थितांना संबोधित करताना अश्विनीताई जगताप म्हणाल्या, तेजस्विनी पुरस्काराने आज ज्यांना सन्मान केल्या त्या आशाताई राऊत यांचे काम खरोखरीच उल्लेखनीय आहे. अत्यंत प्रामाणिकपणे आणि जिद्दीने त्यांनी आजवरची वाटचाल केलेली आहे. तेजस्विनी पुरस्काराच्या निमित्ताने मुलांचा उत्साह पाहताना जाणवते की हा आनंदाचा महोत्सव आहे. मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहताना थक्क व्हायला होत होते. मुलांना माझे हेच सांगणे आहे, की खूप मोठे व्हा पण आपल्या आई वडिलांना आणि गुरुजनांना कधीही विसरू नका. आपल्या घडवणारे आणि आपल्यावर प्रेम करणारे तेच असतात. त्यांना मान द्यायला शिका आणि आपल्या देशाचे नाव मोठे करा. सत्काराला उत्तर देताना आशाताई राऊत म्हणाल्या, १९९८ पासून मी प्राथमिक शिक्षिका म्हणून काम केले आहे. २००८ पासून मी प्रशासनात विविध जबाबदाऱ्यांवर काम करते आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. तो पुरस्कार मला मिळाला याचा आनंद आहे. अशा पुरस्कारांतून प्रेणा मिळते. अधिक जोमाने काम करण्याचे बळ मिळते आणि जबाबदारीचे भानही येते. त्याच भावनेतून मी या पुरस्काराचा स्वीकार करते आहे. एक आगळावेगळा आनंद देणारा आजचा कार्यक्रम होता.

परदेशी मालमत्ता व उत्पन्न स्वयंघोषित करावे : सतीश शर्मा

0
Newsworldmarathi pune : “केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना जागरूक करण्यासाठी, तसेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुधारीत प्राप्तिकर विवरण परतावा (आयटीआर) भरून परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता स्वयंघोषित करण्यासाठी जागरूकता कार्यक्रम हाती घेतला आहे. काळा पैसा कायदा (ब्लॅकमनी ऍक्ट) परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न भारतात परत आणण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे काळा पैसा कायद्यातील कठोर तरतुदी समजून घ्यायला हव्यात. जागरूकतेच्या अभावामुळे अनेक करदात्यांना परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न न घोषित केल्यामुळे दंड आणि कारवाईला सामोरे जावे लागते,” असे प्रतिपादन प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त व महासंचालक (अन्वेषण) सतीश शर्मा यांनी केले. आर्थिक पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि काळा पैसा कायद्याच्या पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण संचालनालय व दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने ‘परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाची घोषणा’ यावर आयोजित आउटरीच प्रोग्रॅमच्या उद्घाटनावेळी सतीश शर्मा बोलत होते. ही मोहिम सरकारच्या पारदर्शक आणि जबाबदार कर प्रणालीच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, करदात्यांनी स्वेच्छेने आपल्या मालमत्तेची घोषणा करून दंडात्मक कारवाई टाळावी व आपल्या देशाच्या आर्थिक अखंडतेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही सतीश शर्मा यांनी केले. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी प्राप्तिकर (अन्वेषण) विभागाचे प्रधान संचालक मोहित जैन, ‘आयसीएआय’च्या विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए ऋषिकेश बडवे, कार्यकारिणी सदस्य सीए प्रितेश मुनोत, सीए प्रणव आपटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला २५० पेक्षा अधिक सनदी लेखापाल, प्रमुख व्यापारी, करतज्ञ, करदाते उपस्थित होते. प्राप्तिकर (अन्वेषण) विभागाचे अतिरिक्त संचालक सुधांशु शेखर, प्राप्तिकर (अन्वेषण) विभाग-१चे उपसंचालक महादेव धारूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काळा पैसा कायद्यासंबंधी सखोल माहिती दिली. दोन्ही वक्त्यांनी कायद्यातील तरतुदी, त्याची व्याप्ती आणि लागू होणारे नियम यावर सुस्पष्ट माहिती दिली. परदेशी मालमत्तेतून पैसा निर्माण करण्याची, तसेच तो भारतात आणण्याची प्रक्रिया, बँकांची कार्यप्रणाली, कोणत्या बँकेत खाते असावे, याविषयी महादेव धारूरकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. सीए ऋता चितळे यांनी या कार्यक्रमातून आपल्याला परदेशी मालमत्ता कशी तयार केली जाते व त्याचा आपल्या देशाला कसा फायदा होतो याबद्दल जाणून घेता आल्याचे नमूद केले. कार्यक्रमात उपस्थितांना परदेशी मालमत्तेतील विविध घटकांची माहिती देण्यात आली. ज्यात परदेशी बँक खाते, समभाग व कर्ज, व्याज, इतर व्यवसाय/संस्था मध्ये वित्तीय व्याज, चल-अचल मालमत्ता आणि परदेशी मालमत्तेत लाभकारक हक्क यांचा समावेश आहे. तसेच, परदेशी उत्पन्नामध्ये व्याज, लाभांश, एकूण प्राप्ती, आणि विमोचन यांचा समावेश केला आहे. या सर्व गोष्टींच्या घोषित न करण्याचे गंभीर परिणाम, जसे की काळा पैसा कायदा २०१५ अंतर्गत मूल्यांकन, दंड, व्याज आणि कारवाई यावर चर्चा करण्यात आली. कायदेशीर कामांबद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्यासह त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही एक उत्तम संधी असल्याचे सीए सचिन मिणियार यांनी स्वागत-प्रास्ताविकात सांगितले. सीए प्रितेश मुनोत यांनी सूत्रसंचालन केले. सीए ऋषिकेश बडवे यांनी आभार मानले.

कै. अरविंद देशपांडे स्मृतिप्रित्यर्थ मंगळवारी ‌‘स्वरगंध‌’ मैफलीचे आयोजन

0
Newsworldmarathi Pune : कै. अरविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मंगळवारी ‌‘स्वरगंध‌’ या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मैफल मंगळवार, दि. 24 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता एमईएसचे बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी येथे होणार आहे. सुरुवातीस इटावा घराण्यातील आठव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शाकिर खान यांचे सतार वादन होणार असून त्यांना अमित कवठेकर तबला साथ करणार आहेत. मैफलीच्या उत्तरार्धात पंडित कुमार गंधर्व यांचे नातू आणि मुकुल शिवपुत्र यांचे चिरंजीव भुवनेश कोमकली यांचे गायन होणार असून त्यांना संजय देशपांडे तबला तर सुयोग कुंडलकर संवादिनी साथ करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

भाजपा हीच माझी ओळख : रवींद्र चव्हाण

0
Newsworldmarathi Pune : यावेळी मंत्रिमंडळात अनेक नविन प्रॉमिसिंग चेहऱ्यांना संधी देताना काही अनुभवी, मातब्बर नेत्यांना मात्र वगळण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या २-३ दिवसांपासून नाराजीनाट्य सुरु आहे. याला भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कुठलाही पक्ष याला अपवाद नाही. उदाहरणच सांगायचं झालं तर सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे, छगन भुजबळ, तानाजी सावंत, नरेंद्र भोंडेकर अशी अनेक नावं सांगता येतील. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी एकसंध असणाऱ्या महायुतीमध्ये आता मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावरून भूकंप होतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु या नाराजीनाट्याला अपवाद ठरले आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचे राइट हँड म्हणून ओळखले जाणारे रविंद्र चव्हाण ! सरकारमधील असो किंवा पक्ष संघटनेच्या दृष्टीने, गेल्या काही वर्षांतील रविंद्र चव्हाण यांची कामगिरी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा जो ऐतिहासिक विजय झाला, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या खालोखाल रविंद्र चव्हाण यांचं योगदान आहे, अशी चर्चा झाली. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतीनेच भाजपमधील जी नावं चर्चेत होती, त्या नावांमध्ये रविंद्र चव्हाण यांचं नाव आघाडीवर होतं. मुख्यमंत्रीपदी फडणवीसच हे निश्चित झालं, तेव्हा फडणवीस यांच्या ‘सुपर कॅबिनेट’ मधील एक निश्चित नाव म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण त्यांना मंत्रिमंडळात कोणतंही स्थान देण्यात आलेलं नाही आणि तरीही रविंद्र चव्हाण यांच्याकडून कुठल्याही प्रकारे नाराजीचा सूर उमटला नाही. नागपूर येथील विधान भवन परिसर, भाजपा विधीमंडळ कार्यालय येथे अनेक मंत्री, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत रविंद्र चव्हाण अतिशय खेळीमेळीने वागत आहेत. विशेष म्हणजे एरवी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी सतत संपर्कात असणाऱ्या रविंद्र चव्हाण यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील कोणतीही नाराजी दिसून आली नाही. अतिशय शांततेत आधीचा बायो बदलून त्याजागी ‘MLA (आमदार), डोंबिवली शहर’ इतकंच बायो ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेच त्यांची ही शांत, संयत भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. छगन भुजबळ यांनी “मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” असं म्हणत मनातील खदखद उघडपणे बोलून दाखवली. सुधीर मुनगंटीवार “मी नाराज नाही” असं म्हणत असले तरीही नितीन गडकरी यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. डॉ. संजय कुटे यांनी सोशल मिडियावर भावनिक पोस्ट टाकत अपमान झाल्याची भावना अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. शिवसेना नेते विजयबापू शिवतारे यांनी “अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरी ते घेणार नाही” अशी टोकाची भूमिका घेतली. नरेंद्र भोंडेकर यांनी तर शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तानाजी सावंत यांनी आपल्या फेसबुकच्या डीपिमधून धनुष्यबाण हे चिन्ह काढून टाकलं आहे. मात्र या सगळ्यात रविंद्र चव्हाण समर्थकांनी मात्र कोणतीही भूमिका न घेता शांत राहण्याची भूमिका उठून दिसते आहे. नेत्यांसोबतच त्यांचे समर्थक देखील आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. ठिकठिकाणी आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, निषेध आंदोलने केली जात आहेत. छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारत जोडे मारो आंदोलन केल्याचं देखील पाहायला मिळालं. कुटे यांच्या समर्थकांनी जाब विचारण्यासाठी फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी धडकण्याचा निर्धार केला. याउलट रवींद्र चव्हाण समर्थकांच्या मनात काहीशी नाराजी असली तरीही कुठलीही आक्रमक प्रतिक्रिया दिसली नाही. त्यामुळे स्वतःसोबतच समर्थकांची समजूत काढण्यात देखील रविंद्र चव्हाण यशस्वी झाल्याचं दिसतं. सध्याच्या काळात पक्षनिष्ठा, तत्त्वनिष्ठा, समाजकारणाचं व्रत या गोष्टी दुर्मिळ होत असल्या तरीही आपल्या या भूमिकेतून चव्हाण यांनी आपण अपवाद असल्याचं दाखवून दिलं आहे. “भाजपा ही माझी ओळख आहे” हे चव्हाण यांचं विधान निवडणुकीच्या काळात चर्चेत आलं होतं, आता या भूमिकेतून हेच वाक्य अधोरेखित झालं आहे. “राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” असं भाजपची विचारधारा सांगते. सध्याच्या काळात संयम बाळगत रविंद्र चव्हाण यांनी आपण या विचारधारेचे बिनचूक पालन करत असल्याचे दाखवून दिले आहे.

अजित पवार माझे मंत्रीपद कट करतील एवढी त्यांची पोच नाही : शिवतारे

0
मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील नाराजी वाढताना दिसत आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार विजय शिवतारे यांनी नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशन सोडून आपल्या मतदारसंघात परतल्याने या नाराजीला आणखी धार मिळाली होती. “आम्ही नेत्यांचे गुलाम नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या रोषाची उघडपणे अभिव्यक्ती केली होती. मात्र, मतदारसंघातील कार्यक्रमांदरम्यान आणि त्यानंतरच्या वक्तव्यात त्यांनी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याविषयी सकारात्मक सूर लावला आहे, ज्यामुळे त्यांचा राग काहीसा शांत झाल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु, विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत आपला रोष दाखवला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा समोर आला आहे. विशेषतः मंत्रिमंडळ विस्तारात अपेक्षाभंग झालेल्या नेत्यांमधील नाराजीचा परिणाम सत्ताधाऱ्यांवर कसा होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विजय शिवतारे यांनी आपल्या मंत्रिपद न मिळाल्याबद्दलची खंत व्यक्त करतानाच त्यांच्या भावनांचा सुस्पष्टपणे उल्लेख केला आहे. त्यांना मंत्रिपद वैयक्तिक स्वार्थासाठी नको होतं, तर राज्याच्या विकासात योगदान देण्यासाठी ते महत्त्वाचं होतं, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांनी सांगितलं की, जर दोन दिवस आधीच त्यांना मंत्रिपद न मिळणार असल्याची कल्पना दिली असती, तर त्यांना एवढा धक्का बसला नसता. परंतु त्यांच्या कुटुंबीयांसह मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने नागपूरला येऊन अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, आणि त्या पूर्ण न झाल्याने त्यांना अस्वस्थता जाणवली. तथापि, त्यांनी आपले कार्यकर्ते आणि समर्थकांना समजावून सांगितलं असून, एकनाथ शिंदे यांच्याविषयी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “शिवसेना माझं कुटुंब आहे,” असे म्हणत त्यांनी पक्षाविषयीची आपली निष्ठाही जाहीर केली आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णयांमुळे निर्माण झालेली नाराजी आणि तणाव महायुती सरकारसाठी आव्हानात्मक ठरू शकते. विजय शिवतारे यांनी अजित पवारांविषयी थेट टिप्पणी करत त्यांच्यावर टोलाही लगावला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट करण्यात अजित पवारांचा हात आहे का, यावर त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की, “अजित पवार यांची एवढी ताकद नाही. एकनाथ शिंदे असे कोणाचे ऐकून निर्णय घेत नाहीत.” त्याचबरोबर, त्यांनी आपल्या राजकीय ताकदीचा उल्लेख करत सांगितलं की, “अनेक जण वाईटावर असताना आम्ही २७ हजारांचे मताधिक्य मिळवले.” यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना त्यांच्यापेक्षा कमी ताकदवान नेते म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या विधानांमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव आणि आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाल्याचं दिसतं. शिवतारे यांनी एकनाथ शिंदेंविषयी निष्ठा व्यक्त केली असली, तरी अजित पवारांवरील त्यांच्या टीकेमुळे महायुतीतील संबंध अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्याचा आराखडा संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल : संतोष पाटील

0
Newsworldmarathi Pune : पुणे जिल्ह्याचे भौगोलिक व औद्योगिक क्षेत्र, वाढते नागरीकीकरण तसेच आपत्तीच्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी त्यानुसार असणारा जलद प्रतिसाद याकरीता लागणारी साधने याबाबींचा सर्वांगिण विचार करता सर्व विभागाचा सहभाग घेत राज्याकरीता दिशादर्शक ठरेल, यास्वरुपाचा आदर्श आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करावा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्मितीबाबत कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक संजय गिरी, सिड्स टेक्निकल सर्व्हिसेसचे अभिजित घोरपडे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतूदीनुसार जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करणे आवश्यक आहे, याकरीता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्ह्यातील सर्वसंबंधित विभाग, विविध सामाजिक संस्था यांना सहभागी करुन घ्यावे. जिल्ह्यात औद्योगिक सुरक्षा, आरोग्य विभागाचे आराखडेही यामध्ये समावेश करण्यात यावे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यामदतीने सर्व संबंधित विभागानी आपल्या विभागाचे आराखडे तात्काळ तयार करावे, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या. घोरपडे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि युएनडीपी यांच्या संयुक्त विद्यमाने सिड्स टेक्निकल सर्व्हिसेस यासंस्थेच्या मदतीने जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्मितीचे काम सुरु आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने विभागाने सूचना कराव्यात, असे आवाहन घोरपडे यांनी केले. या कार्यशाळेत सर्व विभागातील अधिकारी व विभाग प्रमुखांनी सहभाग नोंदवला तसेच संभाव्य आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने गटकार्याच्या माध्यमातून आरखडे तयार करून सादरीकरण करण्यात आले.

परभणी व बीड प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक करा: रमेश बागवे

0
Newsworldmarathi Pune परभणी येथील दलित तरुण सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी करा तसेच यामागील मुख्य सूत्रधारास अटक करा अशी आग्रही मागणी मातंग एकता आंदोलनाचे नेते व माजी मंत्री रमेश बागवे यांनी केली आहे. Bआज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग एकता आंदोलनाच्या वतीने तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसात शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा मातंग समाज राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करेल असा इशारा बागवे यांनी दिला. या दोन्ही घटनेचा राज्यशासनाच्या वतीने गांभीर्याने विचार करून यातील संबंधित आरोपीवर जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी असे यावेळी मातंग समाजाच्या विविध कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली . मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घेण्यात यावे. संबंधित परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक व पोलिस अधिकारी यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पाठीमागे जे मुख्य सूत्रधार आहेत ते बीड जिल्ह्यातील एक गुंड व राजकीय पाठबळ असलेल्या व्यक्तीवर दबावापोटी गुन्हा दाखल होत नाही तरी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या आंदोलनाचे आयोजन कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी केले होते. यावेळी अंकल सोनवणे,अरुण गायकवाड, रमेश सकट, विठ्ठल थोरात,मिलिंद अहिरे, दयानंद अडागळे,राजश्री अडसूळ,रवी पाटोळे, सुरेखा खंडाळे व पुणे शहरातील व जिल्ह्यातील मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते .

गदिमांच्या ‌‘संगीत युद्धाच्या सावल्या‌’ नाटकाचे प्रभावी अभिवाचन

0
Newsworldmarathi Pune : आधुनिक वाल्मिकी, शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर लिखित ‌‘संगीत युद्धाच्या सावल्या‌’ या नाटकातील ग्रामीण भाषेचे सौंदर्य दाखवत त्यातील गोडवा अन्‌‍ डौल, वेगवेगळ्या पदांमधून आणि अभिवाचनातून पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाला. ‌‘संगीत युद्धाच्या सावल्या‌’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला 80 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्टतर्फे सांगीतिक नाट्यवाचनाचे श्रीराम लागू रंगअवकाश येथे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील संगीत नाटकांच्या दरबारामध्ये ग. दि. माडगूळकर यांनी साकारलेल्या या नाटकाने स्वत:चे वेगळेपण जपले आहे. यातील नाट्यपदे, संवाद वेगळ्या धाटणीचे असून त्या काळातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण युद्धभूमीवर मर्दुमकी गाजविण्यासाठी आतूर झालेला असून त्याच्या परिवाराचे तसेच गावातील इतर वातावरणाचे वर्णन गदिमांनी अतिशय चपखलपणे दर्शविलेले जाणवते. सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या नाटकामधून त्या काळातील समाजव्यवस्था, एकोपा, वर्णव्यवस्था, शिक्षण, कौटुंबिक रचना तसेच सावकारी पाशानी पिचलेला समाज या वास्तवतेचे अनुरूप दर्शन घडते. या नाट्यविषयाला समर्पक असलेली ‌‘मनात माझ्या बहुरुनी आले शिवार हिरवे शब्दांचे‌’ ही नांदी प्रभावीपणे सादर करून निनाद जाधव यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. सूत्रधाराच्या भूमिकेत असलेल्या वर्षा जोगळेकर यांनी नाटकाचे कथानक गोष्टी रूपाने उलगडत नेले. ‌‘खेळीमेळीने करू न्याहरी‌’, ‌‘परतल्या घरट्याला पक्षीणी‌’, ‌‘त्या ओढ्याच्या पैलथडी एक असावी झोपडी‌’, ‌‘सुटला गं सांजवारा‌’, ‌‘परतेल शिपाई माझा‌’, ‌‘हरि तुझे नाम गायीन अखंड‌’, ‌‘उजळले भाग्य आता‌’ ही पदे भाग्यश्री काजरेकर आणि निनाद जाधव यांनी सुमधूर आवाजात सादर केली. सुदीप सबनीस, भाग्यश्री काजरेकर, वर्षा जोगळेकर, सयाजी शेंडकर, डॉ. ऋतुपर्ण पिंगळे, आदित्य जोशी, विद्यानंद देशपांडे, संजय गोगटे आणि निनाद जाधव अभिवाचन यांनी अभिवाचन केले तर संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, स्वाती मेहेंदळे यांची संगीत साथ लाभली. नाटकातील पदांच्या मूळ चाली उपलब्ध न झाल्याने निनाद जाधव यांनी पदांना नव्याने समर्पक चाली लावल्या आहेत. या अनोख्या सांगीतिक नाट्य अभिवाचनाच्या प्रयोगाला पुणेकर रसिकांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी भरभरून दाद दिली.

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतात कल्पकतेला वाव : केन झुकरमन

0
Newsworldmarathi Pune : संगीत क्षेत्र अमर्याद असून गायन हा संगीताचा आत्मा आहे. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे हे संगीत केवळ नोटेशन पाहून सादर केले जात नाही तर एकाग्र चित्ताने ऐकून त्यात स्वत:च्या कल्पकतेची भर घालत आत्मसात केले जाते. हा विचार माझ्यातील कलाकाराला भावला. गुरूंच्या सान्निध्यात राहून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतात मी रममाण झालो, अशा भावना स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरोद वादक, ग्रॅमी नामांकनप्राप्त केन झुकरमन यांनी व्यक्त केल्या. वाद्यसंगीत शिकताना स्वत:ला एकाच वाद्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. मुख्यत: गायन शिका, कारण कुठलेही वाद्य वाजविताना तुम्ही खरे तर मनातून गात असता. संगीत शिकणे व शिकविणे यासाठी वयाचे बंधन नाही. शेवटच्या श्वासापर्यंत संगीत शिकता आणि शिकविताही येऊ शकते. मला वारशातून मिळालेले भारतीय शास्त्रीय संगीत मी शिकवत राहणार आहे, असेही त्यांनी आवजूर्न सांगितले. ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आणि डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍, मॉर्डन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘केन झुकरमन : लाईव्ह इन कॉन्सर्ट‌’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील भारतरत्न लता मंगेशकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुणेकरांना केन झुकरमन यांचे सरोद वादन आणि त्यांच्या सांगीतिक क्षेत्राविषयीचे अनुभव ऐकावयास मिळाले. केन झुकरमन यांच्याशी पुण्यातील प्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी यांनी संवाद साधला. भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया गायन शिकल्याने पक्का होतो, असे आपल्या गुरूंचे मत होते असे सांगून झुकरमन म्हणाले, एकाग्र चित्ताने गुरूंकडून ज्ञान ग्रहण करणे गरजेचे आहे, कारण शिष्याने नेहमी एकाग्रचित्त राहून उत्तम श्रोता होणे आवश्यक असते. परंतु आजच्या काळात ही एकाग्रचित्त वृत्ती स्मार्ट फोनच्या अतिवापराने कमी होत चालली आहे. शिष्य कोण आहे, कुठला आहे याला महत्त्व नसून सुजाण पालक व उत्तम गुरू लाभल्यास पुढच्या पिढीतील गायक-वादक निर्माण करणे शक्य आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. मला लहानपणापासूनच संगीत क्षेत्राची आवड होती. लहानपणी मी गिटारवादन शिकलो. त्यातही गुरूंनी सांगितलेले साचेबद्ध वादन न करता नाविन्य शोधण्यासाठी सतत प्रयत्नशील होतो. अशातच भारतातील प्रसिद्ध सरोद वादनगुरू उस्ताद अली अकबर खान यांचे वादन ऐकले. त्यातून प्रभावित होऊन मी सुरुवातीस सतार वादनाकडे वळलो. परंतु सरोद हे वाद्य मनाला अधिक भावल्याने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सरोद वादनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. उस्ताद अली अकबर खान यांच्यातील सांगीतिक दृष्टीकोन आणि कौशल्य मला आवडल्याने मी नेटाने सरोद वादन शिकण्यास सुरुवात केली. नवनिर्मितीच्या ध्यासातून मी सतत सरोद वादनात काही ना काही प्रयोग करीत राहिलो. त्यातूनच पहिल्या वादन मैफलीत जनसंमोहिनी रागाबरोरबच माझी स्वत:ची रचना वाजविण्याचे धाडस केले. गुरूंनी मला योग्य दिशा दाखवत नवनवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहितच केले, हे मी माझे भाग्य समजतो. भारतीय शास्त्रीय संगीताचा आत्मा जाणून घेताना राग विस्ताराचे स्वातंत्र्य असल्याचे जाणवल्याने भारतीय अभिजात संगीताला मी वाहून घेतले आहे. मैहर घराण्याच्या सरोद वादनाची वैशिष्ट्यपूर्ण शैली, त्यातील बारकावे सांगताना केन झुकरमन यांनी झमझमा, सिधा झाला, उलटा झाला आदी प्रकार वादनातून ऐकविले. तंत्राची नक्कल करता येते परंतु वादनातील अभिव्यक्ती प्रकट करण्यासाठी कलाकारामध्ये कल्पकता असण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. वादन मैफलती केन झुकरमन यांनी गुरू उस्ताद अली अकबर खान यांचा आवडता बागेश्री कानडा हा पारंपरिक राग अतिशय प्रभावीपणे सादर केला. गुरूंची निर्मिती असलेल्या चंद्रनंदन या सुरेल, सुमधूर रागाच्या निर्मितीमागील कथा उलगडत त्यांनी हा राग ऐकवून रसिकांना अचंबित केले. त्यांना पुण्यातील युवा तबला वादक महेशराज साळुंके यांनी समर्पक साथ केली. कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे संस्थापक प्रविण कडले, चेतना कडले आणि मॉडर्न महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे विभाग प्रमुख पुष्कर लेले यांनी केले. सूत्रसंचालन रश्मी वाठारे यांनी केले तर आभार श्रुती पोरवाल यांनी मानले.

अजित पवार आज अधिवेशनात सक्रिय होणार

0
Newsworldmarathi Nagapur : मागील दोन दिवसांपासून विधिमंडळ कामकाजात सहभागी न होणारे अजित पवार बुधवारी विधिमंडळ कामजात सहभागी होणार आहेत. अजित पवार यांना थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे ते अधिवेशनामध्ये सहभागी झाले नव्हते. अजितदादा दिल्लीला गेल्या असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं. अजितदादांना घशाचा संसर्ग झाल्यामुळे ते दोन दिवस अधिवेशनात सहभागी झाले नव्हते. या काळात ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी आराम करत होते अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवार हे दिल्लीला गेले असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात अजित पवार यांनी मात्र भाग घेतला नव्हता. या काळात अजितदादा दिल्लीला गेल्या असल्याची चर्चा सुरू होती. महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी अजितदादांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्याच्या बातम्या या काळात येत होत्या. त्यावर आता सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं ाहे. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे पहिलंच अधिवेशन आहे. यामध्ये मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते.