Newsworldmarathi Pune : ‘भारतीय ज्ञान परंपरा हा विज्ञान, तत्वज्ञान आणि अध्यात्मज्ञानाचा संगम असून, ब्रिटिश सत्तेने भारतीयांना या ज्ञान परंपरेपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. आता नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश करण्यात आला असून, त्यातून भावी पिढी विचार प्रवर्तक होऊन भारत महाशक्ती होण्यास मदत मिळेल,’ असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी गुरुवारी व्यक्त केला.
निमित्त होते, भूषण पटवर्धन व इंदू रामचंदानी लिखित ‘जिनोम टू ओम’ या पुस्तकावरील परिसंवादाचे. ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त ‘लिटररी कॉर्नर’ येथे आयोजित या परिसंवादात ज्येष्ठ तत्वज्ञ शरद देशपांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, लेखक भूषण पटवर्धन यांनी सहभाग घेत आपली भूमिका मांडली.
‘युरोपात प्रबोधनयुगात विज्ञान-अध्यात्म हा भेद निर्माण झाला. ब्रिटिशांची सत्ता आल्यावर भारतीय विज्ञानाकडे झुकले आणि अध्यात्माची परंपरा विसरले. आधुनिक काळात या दोन्हीचे महत्त्व अधोरेखित झाल्याने हा भेद मिटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ‘जिनोम टू ओम’ हे पुस्तक म्हणजे ‘मल्टिव्हिटॅमिन’ची गोळी असून, विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही बाजूंकडे पाहायला शिकविते,’ असे शरद देशपांडे म्हणाले.
‘या पुस्तकामध्ये विज्ञान, तत्वज्ञान, मनोविज्ञान, अध्यात्म यांची चांगली सांगड घालण्यात आली असून, स्वत:च्या समस्यांकडे वैज्ञानिक व अध्यात्मिक दृष्टीने कसे पाहायचे, याची माहिती दिली आहे, तसेच शारीरिक, मानसिक, सामाजिक व अध्यात्मिक आरोग्याचा उहापोह करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे,’ असे डॉ. सुरेश गोसावी म्हणाले.
‘वेद-उपनिषदांमध्ये व्यष्टी, सृष्टी, समष्टी आणि परमेष्टी या सूत्रांचा उल्लेख असून, त्याचा संबंध मानवी उत्क्रांतीशी आहे. या भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश आता नवीन शैक्षणिक धोरणात करण्यात आला असून, त्याला राजाश्रय लाभलेला आहे. भारतीय ज्ञान परंपरेत विज्ञान व जीवनपद्धतीची सांगड घालण्यात आली असून, त्याचे सार या पुस्तकात मांडण्यात आले आहे, असे डॉ. करमळकर म्हणाले.
‘विज्ञानातून तत्वज्ञानाकडे प्रवास मांडणारे हे पुस्तक सर्व वयोगटातील वाचकांनी वाचले पाहिजे. त्यातून विचारप्रवर्तक व्यक्ती घडून, भारत महाशक्ती होण्यास मदत मिळेल,’ असा विश्वास डॉ. विद्या येरवडेकर यांनी व्यक्त केला. भूषण पटवर्धन यांनी लेखनामागची प्रेरणा उलगडली. ‘विज्ञान हे विशेष ज्ञान असून, त्याहून व्यापक असलेल्या प्रज्ञानाकडे जाण्याची गरज आहे. आतापर्यंत मानवाने स्वत:चा फायदा, लालसेपोटी विज्ञानाचा उपयोग केला. त्याचा चराचरासाठी व्यापक उपयोग करण्यास प्रज्ञान शिकवते. या संदर्भातील उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे,’ असे पटवर्धन यांनी सांगितले.