प्रो कबड्डी स्पर्धेत गतविजेत्य पुणेरी पलटणचा पराभव

0
Newsworldmarathi Pune : पवन सेहरावत, विजय मलिकच्या खोलवर चढाया आणि त्यांना आशिष नरवालकडून मिळालेल्या अष्टपैलू साथीमुळे तेलुगु टायटन्सने प्रो कबड्डीच्य ११व्या पर्वात गतविजेत्या पुणेरी पलटण संघाचा ४८-३६ असा पराभव केला. या विजयामुळे पुणेरी पलटण संघाला घरच्या मैदानावर आणखी एक पराभव पत्करावा लागला आणि यंदाच्या हंगामातील आव्हानही गमवावे लागले. तेलुगुने वियजासह ६६ गुणांसह बाद फेरीतील आव्हान कायम राखले. पवन सेहरावतच्या खोलवर चढाया, विजय मलिकने निर्णायक चढाईत मिळविलेले बोनस गुण, आशिष नरवालच्या ताकदवान चढाया आणि बचावातील सतर्कता यामुळे तेलुटु टायटन्सने हंगामातील १२वा विजय मिळविला. एकही बरोबरी सामना न खेळणाऱ्या तेलुगुने १० पराभव पत्करले. गेल्या तीन हंगामात ११ विजय मिळविणाऱ्या तेलुगुने या एका हंगामात १२ विजय मिळविले. अखेरच्या दहाव्या हंगामात तर, त्यांना दोनच विजय मिळवता आले होते. पलटणसाठी आज मोहित गोयतही नव्हता. आकाश शिंदेला १२व्या मिनिटालाच बदलावे लागले, पंकजला केवळ दोनच गुण मिळवता आले. अशा वेळी आर्यवर्धन नवलेच्या ८ गुणांचा त्यांना दिलासा मिळाला. कोपरारक्षक अमनने ५ गुणांची कमाई केली. पण, हे सगळे प्रयत्न पलटणसाठी फोल ठरले. पुणेरी पलटणला या विजय आवश्यक असलेल्या सामन्यात पूर्वार्दात चमक दाखवता आली नाही. आकाश शिंदे, पंकज मोहिते हे प्रमुख चढाईपटू पुर्ण निष्प्रभ ठरले होते. बचावफळी देखिल फारसे यश मिळवू शकली नाही. आर्यवर्धन नवलेलाच पलटणकडून काय तो प्रतिकार केला. तुलनेत पुनरागमन केलेल्या पवन सेहरावतने आपला लौकिक दाखवून देत तेलुगु टायटन्स संघाचे आव्हान राखले होते. पूर्वार्धातच त्याने अव्वल दहा गुणांची कमाई केली. आशिष नरवालनेही त्याला सुरेख साथ केली. अंकित आणि क्रिशन यांनी बचावपटू म्हणून आपली भूमिका चोख बजावल्यामुळे तेलुगु टायटन्सने मध्यंतराला २५-१६ अशी ९ गुणांची आघाडी मिळवली होती. उत्तरार्धातही आर्यवर्धन नवलेच्या चढाईच्या जोरावर पलटणची झुंज कायम राहिली. उत्तारर्धाच्या सुरुवातीलाच चार मिनिटांत आर्यवर्धनच्या एका चढाईतील तीन गुणांमुळे पटलणला तेलुगुवर लोण चढवणे शक्य झाले. या लोणमुळे २३-२५ अशा भरुन काढलेल्या पिछाडीचा फायदा पलटणला उठवता आले नाहीत. यामध्ये बचावफळीचे अपयश कारणीभूत होते. आघाडी भरुन काढण्यासाटी नंतर विजय मलिकच्या बोनस गुणांचा फायदा तेलुगुला चांगला मिळाला. आघाडी वाढल्यावर आक्रमक होत तेलुगुने पलटणवर आणखी एक लोण चढवत आघाडी ३९-२८ अशी भक्कम केली. यानंतर दडपणाखाली पलटणची संघर्षाची मानसिकता देखिल संपुष्टात आली. तेलुगुने ही आघाडी कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.

अजित पवारांच्या गाडीतून धनंजय मुंडेचा प्रवास

0
Newsworldmarathi Nagpur : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाले आहेत. या प्रकरणानंतर धनंजय मुंडे मागील काही दिवसांपासून माध्यमांपासून दूर होते. मात्र, काल रात्री उशिरा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. धनंजय मुंडे यांनी काल माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणावर भाष्य केले, हे महत्त्वाचे ठरते. वाल्मिक कराड यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे, आणि धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया नेहमीच ठाम असते. त्यांनी “दूध का दूध आणि पाणी का पाणी” या विधानातून सूचित केले की या प्रकरणाचा सत्य न्यायालयीन आणि चौकशी प्रक्रियेतून समोर येईल. अशा वक्तव्यांनी ते आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा संदेश देत आहेत. या प्रकरणाशी संबंधित पुढील हालचालींवर आणि तपासाच्या दिशेवर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. धनंजय मुंडे यांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. वाल्मिक कराड प्रकरणामुळे त्यांच्यावर होणाऱ्या दबावाच्या चर्चांना आता वेगळी दिशा मिळाली आहे. आज सकाळी अजित पवारांच्या विजयगड निवासस्थानी भेट देणे आणि नंतर त्यांच्या गाडीतून थेट देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणे, हे स्पष्टपणे दाखवते की मुंडे पुन्हा सक्रिय झाले आहेत आणि महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होत आहेत. फडणवीस यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीचा केंद्रबिंदू खातेवाटप असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सरकारमधील पुढील हालचालींवर लक्ष केंद्रीत राहील. तसेच, धनंजय मुंडे यांची अजित पवार गटातील भूमिका अधिक भक्कम करण्याचा हा प्रयत्न मानला जाऊ शकतो. या बैठकीतून पुढील निर्णय कसे घेतले जातात, यावर त्यांचा राजकीय प्रवास आणि सध्याच्या चर्चांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपूर संघाचा विजय

0
Newsworldmarathi Pune : शेवटपर्यंत अतिशय रंगतदार झालेल्या लढतीत जयपूर पिंक पँथर्स संघाने दहा गुणांची पिछाडी भरून काढत बंगाल वॉरियर्सवर ३१-२८ असा रोमहर्षक विजय मिळविला आणि प्रो कबड्डी लीग मध्ये प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निश्चित केले. मध्यंतराला बंगाल संघाकडे दहा गुणांची आघाडी होती. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी जयपूर संघाला आजच्या लढतीत विजय मिळवणे किंवा बरोबरीत रोखणे अनिवार्य होते त्यामुळेच त्या दृष्टीनेच ते आज सर्वोत्तम कामगिरी करतील अशी अपेक्षा होती. जयपूर संघाने यापूर्वी झालेल्या वीस सामन्यांपैकी अकरा सामने जिंकले आहेत. बंगाल संघाने आतापर्यंत झालेल्या वीस सामन्यांमध्ये फक्त पाचच सामने जिंकले असून प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्याच्या त्यांच्या आशा यापूर्वी संपुष्टात आल्या आहेत. मात्र स्पर्धेची सांगता यशस्वीरित्या करण्यासाठी ते उत्सुक आहेत. आश्चर्यजनक विजय नोंदवण्याबाबत ख्यातनाम असलेल्या बंगाल संघाने आजच्या लढतीत दहाव्या मिनिटाला ८-६ अशी आघाडी घेतली होती. त्यांचा बचाव फळीतील हुकमी खेळाडू नितेश कुमार याने या स्पर्धेच्या इतिहासात पकडीमधील चारशे गुणांचा टप्पा ओलांडला. मध्यंतराला पाच मिनिटे बाकी असताना बंगालच्या खेळाडूंनी पहिला लोण नोंदवित जयपूर संघाच्या गोटात खळबळ उडवून दिली. त्यावेळी त्यांच्याकडे १४-७ अशी आघाडी होती. मध्यंतराला त्यांनी १९-९ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात जयपूरच्या खेळाडूंनी पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला.‌ विशेषतः त्यांच्या बचाव फळीतील खेळाडूंनी सुपर टॅकल तंत्राचा चांगला उपयोग केला. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना त्यांचा संघ १९-२२ असा पिछाडीवर होता. ३३ व्या मिनिटाला त्यांनी लोण चढवित २५-२४ अशी आघाडी घेतली. त्यामुळे सामन्यातील रंगत वाढत गेली. पाच मिनिटे बाकी असताना जयपूर संघाकडे दोन गुणांची आघाडी होती. मात्र पुढच्याच मिनिटाला २७-२७ अशी बरोबरी झाली. त्यानंतर जयपूर संघाच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करीत विजयश्री खेचून आणली. जयपूर संघाकडून अर्जुन देशवाल व अभिजीत मलिक यांना उत्तरार्धात चढाईमध्ये चांगले यश मिळाले. रेझा मीरबाघेरी याने पकडी मध्ये अव्वल कामगिरी करीत त्यांना सांगली साथ दिली. बंगाल संघाकडून अर्जुन राठी व प्रणय राणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

अपयश हे आयुष्यातील वास्तव: शिव खेरा

0
Newsworldmarathi Pune : आजच्या काळात मुलांना यश आणि जिंकणे एवढेच सांगितले जाते. त्यांना अपयश पचवण्याबाबत शिकवले जात नाही. त्यामुळे आजच्या मुलांमध्ये नैराश्यात ४०० टक्के वाढ झाली आहे. अपयश हे आयुष्यातील वास्तव आहे, असे मत ज्येष्ठ लेखक आणि प्रेरक वक्ते शिव खेरा यांनी मांडले. पुणे पुस्तक महोत्सवातील पुणे साहित्य महोत्सवाचे उद्घाटन यांच्या खेरा यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयातील अॅम्फी थिएटरमध्ये झाले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते. स्वतःच्या आयुष्यातील उदाहरणे देत खेरा यांनी प्रेक्षकांना आयुष्याविषयी वेगळा दृष्टिकोन दिला. ते म्हणाले, माणसाची उंची नेहमी मानेच्या वर मोजली जाते. ज्या गोष्टी बदलता येणार नाही त्या बदलण्यात वेळ घालवला जातो. त्यातून केवळ तणाव निर्माण होतो. आयुष्य हा एक निर्णय आहे आणि तडजोडही आहे. अनेकदा आपण घेतलेले निर्णयच आपल्याला नियंत्रित करतात आणि त्यामुळे आपले स्वातंत्र्यही संपुष्टात येते. चुकांच्या पुनरावृत्तीने अपयश आणि चांगल्या कामांच्या पुनरावृत्तीने यश मिळते. आपणच स्वतःची समस्या असतो. काहीवेळ चांगल्या गोष्टी होण्यासाठी कठोर व्हावे लागते. पैसा करणे हे चोरी आणि पैसा कमावणे ही चांगली बाब आहे. आज लोकांना पैसा करायचा आहे. काही मूलभूत गोष्टी नीट होतील, तेव्हाच देश पुढे जाईल. आयुष्यातील पहिले खोटे बोलणे अवघड असते. त्यानंतर त्याची सवय होते. चांगल्या सवयी लावून घेणे कठीण असते, पण चांगल्या सवयींसह जगणे सोपे असते. शाळेत शिकवल्या जाणारा ९० टक्के अभ्यासक्रम निरुपयोगी आहे. देशप्रेम दाखवणे पुरेसे नसते, ते कृतीतून दाखवणे महत्त्वाचे असते. अंधश्रद्धेने आपले खूप नुकसान केले आहे. आज सुशिक्षितही अंधश्रद्धांना बळी पडत आहेत हे दुर्दैवी आहे, असेही त्यांनी सांगितले. समाजाचे हित सांगते ते साहित्य असते. शिव खेरा यांनी त्यांच्या साहित्यातून काही पिढ्यांना प्रेरणा दिली आहे, असे मिलिंद मराठे यांनी सांगितले. पुणेकरांनी पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी केला आहे. यंदापासून पुणे साहित्य महोत्सव सुरू होत आहे. हा महोत्सव देशातील मोठा महोत्सव म्हणून नावारुपाला येईल हा विश्वास आहे, असे पांडे यांनी नमूद केले.

ताम्हिणी घाटात बस अपघातात पाच जणांचा मृत्यू

ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर शुक्रवारी सकाळी एका बसचा भीषण अपघात झाला, ज्यात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आणि १२ ते १३ जण गंभीर जखमी झाले. चाकण येथून महाडला लग्नासाठी जात असताना हा अपघात घडला. बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, ताम्हिणी घाटातील अवघड वळणांमुळे वाहनचालकांना नेहमीच आव्हानांचा सामना करावा लागतो. ताम्हिणी घाटातील रस्ते आणि वळणांवरील अपघातांची वारंवारता लक्षात घेता, प्रशासनाने या भागातील रस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहे.

‘ती’ पत्रकार गिरवतेय सेंद्रिय शेतीचे धडे

0
Newsworldmarathi Team : तरुणी अनेकदा ग्रामीण भागातून शहराकडे आकर्षित होतात, उत्तम नोकऱ्या मिळवतात आणि शहरी जीवनशैलीत स्थायिक होतात. मात्र, हे सगळं ऐश्वर्य सोडून पुन्हा गावाकडे जाऊन नव्या सुरुवातीचा निर्णय घेणे खूप धाडसी ठरते. अशा निर्णयाला साहस, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असते, आणि हे सगळं सुषमा नेहरकर-शिंदे यांनी दाखवून दिलं आहे. सुषमा ही एक अपवाद ठरली आहे, कारण तिने शहरी ऐशआरामाचे जीवन सोडून आपल्या गावाकडे परत जाऊन सेंद्रिय शेतीची सुरुवात केली. आज तिच्या मेहनतीमुळे ती केवळ शेतकरी नाही तर सेंद्रिय उत्पादनांचा एक विश्वासार्ह ब्रँड बनली आहे.
Oplus_131072
न्यूजवर्ल्ड मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेऊया सुषमा नेहरकर हिच्या या प्रवासाविषयी, ज्या प्रवासाने अनेक तरुण-तरुणींना प्रेरणा दिली आहे. ग्रामीण आणि शहरी जीवन यांच्यातील दरी कमी करत सुषमाने एक नवीन अध्याय सुरू केला आहे. सुषमा नेहरकर-शिंदे यांची प्रेरणादायी कथा समाजासाठी नवा दिशादर्शक ठरत आहे. त्यांनी पत्रकारितेमध्ये मोठी कारकीर्द गाजवून, उत्तम पगाराची नोकरी सोडून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामागे फक्त स्वतःची आवड नव्हे तर समाजाला आरोग्यपूर्ण जीवनशैलीकडे वळवण्याचा उद्देश होता. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी शुद्ध, पौष्टिक आणि नैसर्गिक उत्पादनांचा पुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मोहाच्या फुलांचे लाडू, रानातील लोणची यांसारख्या उत्पादनांमध्ये त्यांनी सेंद्रिय घटकांचा वापर करून लोकांना आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
Oplus_131072
सामाजिक, राजकीय आणि शासकीय विषयांवर लेखन करत असताना, शेतीची आवड जोपासण्याचा विचार त्यांनी कायम ठेवला. पत्रकारितेत अनेक पुरस्कार प्राप्त करूनही त्यांनी केवळ आपल्या आवडीतून प्रेरित होऊन शेतीमध्ये कार्य करण्याचा मार्ग निवडला.उत्तम पगाराची नोकरी सोडून शेतीत राबणे आणि त्यातून स्वतःचा ब्रँड निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही, परंतु सुषमा यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांच्या मेहनतीमुळे सेंद्रिय शेतीत यश मिळवून त्यांनी एक प्रेरणादायी उदाहरण प्रस्थापित केले आहे. आज गलेलठ्ठ पगार असलेले शासकीय अधिकारी आणि आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित इंजिनिअर्सदेखील सेंद्रिय पदार्थांना अधिक पसंती देत आहेत. सुषमाने हीच गरज आणि बाजारातील संधी ओळखत आपल्या सेंद्रिय उत्पादनांना एक वेगळा ब्रँड म्हणून उभे केले आहे. या मध्ये ती भात, डाळ, अनेक गावरान भाज्यांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेत आहे. सेंद्रिय आणि शुद्ध उत्पादनांसाठी लोकांकडून मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर, तिने करवंदाचे व रानातील कैऱ्याचे लोणचे तयार केले. ही लोणची भीमाशंकर आणि आंबोली परिसरातील शुद्ध, नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार करण्यात आली आहेत. या लोणच्यांमध्ये तीळ तेल वापरले असून नागरिकांच्या आरोग्याचा खास विचार केला आहे. शिवाय यात जंगलातील व शेतातील नैसर्गिक व पौष्टिक घटकांचा समावेश आहे. उत्पादनांमध्ये कोणत्याही भेसळ करण्यात आलेली नाही यांची शुद्धता जपण्याचा सुषमाने पूर्ण प्रयत्न केला आहे. सुषमा सांगते…. माझा उद्देश लोकांना ताज्या, नैसर्गिक, व पौष्टिक पदार्थांची चव अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देणे आहे. या छोट्याशा प्रयत्नाद्वारे, नागरिकांना आरोग्यदायी आणि विशिष्ट चव देण्याचा प्रयत्न करत आहे. मोहाच्या फुलांचे लाडू हे एक वेगळे उत्पादन काढून नागरिकांच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सुषमा सांगते. या मोहाच्या फुलाच्या लाडू मध्ये नाचणी सत्व, गुळ, तूप, काजू व बदाम, डिंक इ साहित्य वापरून तयार करण्यात आले आहेत. हे लाडू आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आणि नैसर्गिक घटकांनी भरलेले एक आयुर्वेदिक औषधीय अन्न आहे. हे लाडू फक्त चविष्टच नाहीत, तर विविध आरोग्य समस्यांवर उपायकारक ठरतात. प्रेग्नंट महिलांसाठी: हिमोग्लोबिन नियंत्रित ठेवते. शरीराला आवश्यक पोषण देऊन गरोदरपणातील आरोग्य सुधारते. डिलीव्हरीनंतरच्या काळात कॅल्शियमची पातळी वाढवते.कंबरदुखी कमी करण्यात मदत करते. बाळाच्या आईला दूध वाढण्यासाठी रामबाण उपाय आहे. सर्वसामान्य आरोग्यासाठी रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे. अर्थराइटिस आणि डायबिटीससाठी फायदेशीर आहे. पचन सुधारते आणि भूक वाढवते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. आमचा उद्देश फक्त लाडू विकणे नाही, तर लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी चांगल्या आणि शुद्ध उत्पादनांचा अनुभव देणे आहे. मोहाच्या फुलांच्या लाडूंमध्ये आपणाला केवळ चवच नाही, तर आरोग्यासाठी उपयुक्त पोषणमूल्येही मिळतात. आरोग्यदायी आणि शुद्ध पदार्थांचा हा प्रयत्न अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, हा आमचा ध्यास आहे. सुषमा नेरकर- शिंदे सध्या निसर्गातील विविध घटकांचा सखोल अभ्यास करत असून, माणसाच्या आरोग्यासाठी त्यांचा कसा उपयोग करता येईल, यावर काम करत आहे. सेंद्रिय शेती व नैसर्गिक उत्पादनांमध्ये यशस्वी ठरलेल्या सुषमा, आता आपल्या दैनंदिन आहार व जीवनशैलीत उपयोगी ठरतील अशा अधिक नैसर्गिक व आरोग्यदायी गोष्टी घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा उद्देश फक्त व्यवसाय करणे नसून, समाजाला निसर्गाच्या जवळ नेणे आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रसार करणे हा आहे. लवकरच त्या आणखी नैसर्गिक उत्पादनांसह लोकांसाठी एक नवा आदर्श उभा करतील, अशी खात्री आहे. सुषमा नेरकर यांची कथा ही धाडस, इच्छाशक्ती आणि आवड जोपासण्याचा उत्तम उदाहरण आहे. शहरी भागातील ऐशआरामाचे जीवन सोडून ग्रामीण भागातील सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय खूपच प्रेरणादायी आहे.

कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करा : छगन भुजबळ

Newsworldmarathi Nashik : लाल कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. तर महाराष्ट्रातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशातील एकूण उत्पादनाच्या ६० टक्के कांदा एकट्या महाराष्ट्रात पिकतो तर राज्याच्या एकूण कांदा उत्पादनाच्या तुलनेत ६० टक्के कांदयाचे उत्पादन नाशिक जिल्हयात होते. राज्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे एकमेव नगदी व जिव्हाळयाचे पिक आहे. कांदयाच्या भावाचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत असल्याने नेहमीच त्याचे राजकीय पडसाद दिसून येतात. वेळोवेळी कांदयाच्या किमान निर्यात दरातील वाढीचा किंवा निर्यातबंदीचा जिल्हयातील कांदा निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे. वास्तविक जागतिक बाजारपेठांमध्ये कांदयाची निर्यात वाढवण्यासाठी शासनाने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. माझ्या येवला विधानसभा मतदारसंघातील लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात इतर देशांमध्ये कांदा निर्यात केली जाते. सद्याच्या स्थितीत उन्हाळ कांद्याचे उत्पादन संपले आहे आणि लाल कांदा बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे. मात्र कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत नसल्याने अत्यंत कमी दराने त्यांचे उत्पादन विकणे अशा दुहेरी संकटात सापडले आहे. बाजारपेठेत कांद्याची आवक अधिक वाढल्याने सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटल या दराने कांद्याची विक्री होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिगर मोसमी पाऊस आणि बदलते वातावरण यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आधीच मोठा फटका बसला आहे. तसेच उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो आणि त्यातून अडचणींना सामोरे जावे लागते. नाशिकच्या कांद्याला परदेशात मोठी मागणी आहे. परंतु भारत सरकारने कांद्याच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. त्यामुळे त्याचा थेट परिमाण हा कांदा निर्यातीवर होत असून कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. लाल कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावे लागत आहे, हे सुद्धा नुकसानीचे महत्वाचे कारण आहे. हे नुकसान टाळण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने २० टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. तसेच श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने माफ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

पुणे विमानतळाला ‘संत तुकाराम महाराजां’चे नाव

0
Newsworldmarathi Pune : पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव बदलून’जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ,पुणे’असे करण्याचा शासकीय ठराव आज महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा नियम 110 अंतर्गत हा ठराव सादर केला,याला तातडीने मंजुरी मिळाली. या ठरावाद्वारे केंद्र शासनाला विमानतळाच्या नाव बदलण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. संत तुकाराम महाराज यांचे समाजासाठी असलेले योगदान आणि त्यांच्या विचारांचा वारसा लक्षात घेऊन हे नामकरण करण्यात आले आहे. यामुळे विमानतळाचा स्थानिक, सांस्कृतिक, आणि ऐतिहासिक संदर्भ अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निवडणूक खर्च सादर करा : संतोष पाटील

0
Newsworldmarathi Pune : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ तपासण्यावर विशेष भर देण्यात आला. बैठकीत विविध स्तरांवरील अधिकारी उपस्थित होते, ज्यांनी निवडणूक खर्च व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नमूद केले की ३०३ उमेदवारांपैकी ३०१ उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च सादर केला आहे, तर उर्वरित उमेदवारांना तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, निवडणूक आयोगाकडे निवडणूक खर्च न सादर करणाऱ्या उमेदवारांची माहिती पाठवली जाईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींना खर्च नोंदीसंदर्भात आवश्यक मार्गदर्शन केले. या बैठकीमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी एक सकारात्मक पाऊल उचलले गेले. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार, प्रेमप्रकाश मीना, उमेश कुमार, अमित कुमार, डॉ. ए. वेंकादेश बाबू, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक खर्च सोनाप्पा यमगर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह निवडणूक खर्च विषयक कामकाज पाहणारे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

परदेशी मालमत्ता व उत्पन्न स्वयंघोषित करावे : सतीश शर्मा

0
Newsworldmarathi Pune : “केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना जागरूक करण्यासाठी, तसेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुधारीत प्राप्तिकर विवरण परतावा (आयटीआर) भरून परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता स्वयंघोषित करण्यासाठी जागरूकता कार्यक्रम हाती घेतला आहे. काळा पैसा कायदा (ब्लॅकमनी ऍक्ट) परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न भारतात परत आणण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे काळा पैसा कायद्यातील कठोर तरतुदी समजून घ्यायला हव्यात. जागरूकतेच्या अभावामुळे अनेक करदात्यांना परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न न घोषित केल्यामुळे दंड आणि कारवाईला सामोरे जावे लागते,” असे प्रतिपादन प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त व महासंचालक (अन्वेषण) सतीश शर्मा यांनी केले. आर्थिक पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि काळा पैसा कायद्याच्या पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण संचालनालय व दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने ‘परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाची घोषणा’ यावर आयोजित आउटरीच प्रोग्रॅमच्या उद्घाटनावेळी सतीश शर्मा बोलत होते. ही मोहिम सरकारच्या पारदर्शक आणि जबाबदार कर प्रणालीच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, करदात्यांनी स्वेच्छेने आपल्या मालमत्तेची घोषणा करून दंडात्मक कारवाई टाळावी व आपल्या देशाच्या आर्थिक अखंडतेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही सतीश शर्मा यांनी केले. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी प्राप्तिकर (अन्वेषण) विभागाचे प्रधान संचालक मोहित जैन, ‘आयसीएआय’च्या विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए ऋषिकेश बडवे, कार्यकारिणी सदस्य सीए प्रितेश मुनोत, सीए प्रणव आपटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला २५० पेक्षा अधिक सनदी लेखापाल, प्रमुख व्यापारी, करतज्ञ, करदाते उपस्थित होते. प्राप्तिकर (अन्वेषण) विभागाचे अतिरिक्त संचालक सुधांशु शेखर, प्राप्तिकर (अन्वेषण) विभाग-१चे उपसंचालक महादेव धारूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काळा पैसा कायद्यासंबंधी सखोल माहिती दिली. दोन्ही वक्त्यांनी कायद्यातील तरतुदी, त्याची व्याप्ती आणि लागू होणारे नियम यावर सुस्पष्ट माहिती दिली. परदेशी मालमत्तेतून पैसा निर्माण करण्याची, तसेच तो भारतात आणण्याची प्रक्रिया, बँकांची कार्यप्रणाली, कोणत्या बँकेत खाते असावे, याविषयी महादेव धारूरकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. सीए ऋता चितळे यांनी या कार्यक्रमातून आपल्याला परदेशी मालमत्ता कशी तयार केली जाते व त्याचा आपल्या देशाला कसा फायदा होतो याबद्दल जाणून घेता आल्याचे नमूद केले. कार्यक्रमात उपस्थितांना परदेशी मालमत्तेतील विविध घटकांची माहिती देण्यात आली. ज्यात परदेशी बँक खाते, समभाग व कर्ज, व्याज, इतर व्यवसाय/संस्था मध्ये वित्तीय व्याज, चल-अचल मालमत्ता आणि परदेशी मालमत्तेत लाभकारक हक्क यांचा समावेश आहे. तसेच, परदेशी उत्पन्नामध्ये व्याज, लाभांश, एकूण प्राप्ती, आणि विमोचन यांचा समावेश केला आहे. या सर्व गोष्टींच्या घोषित न करण्याचे गंभीर परिणाम, जसे की काळा पैसा कायदा २०१५ अंतर्गत मूल्यांकन, दंड, व्याज आणि कारवाई यावर चर्चा करण्यात आली. कायदेशीर कामांबद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्यासह त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही एक उत्तम संधी असल्याचे सीए सचिन मिणियार यांनी स्वागत-प्रास्ताविकात सांगितले. सीए प्रितेश मुनोत यांनी सूत्रसंचालन केले. सीए ऋषिकेश बडवे यांनी आभार मानले.