भाजपकडून नितेश राणे, पंकज भोईर, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रीपदावर वर्णी

भाजपकडून अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी आमदारांना फोन जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपच्या ईच्छूक आमदारांमध्ये असलेल्या प्रतिक्षेला पूर्णविरामbमिळत आहे, आणि संभाव्य मंत्र्यांची नावे हळूहळू स्पष्ट होऊ लागली आहेत. भाजपकडून नितेश राणे, पंकज भोईर, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपकडून विविध प्रादेशिक, सामाजिक, आणि जातीय गटांचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न आहे. ओबीसी, मराठा, आणि शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी योग्य प्रतिनिधींची निवड केली जात असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात विदर्भ, मराठवाडा, कोकण, आणि पश्चिम महाराष्ट्राचा समतोल राखण्यावर भर दिसून येत आहे. पाच वाजता होणाऱ्या या सोहळ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात? महाराष्ट्राचे लक्ष नागपूरकडे!

Newsworldmarathi Nagapur : राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी तयारी पूर्ण झाली आहे, आणि हा सोहळा रविवारी राजभवन, नागपूर येथे संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांनी त्यांच्या पक्षातील संभाव्य मंत्र्यांची यादी अंतिम केली असून, आता यावर मुख्यमंत्री फडणवीस शिक्कामोर्तब करतील. आज होणारा हा सोहळा भव्य स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. राज्यपाल रमेश बैस नव्या मंत्र्यांना शपथ देतील. तिन्ही गटांतून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गट, भाजप, आणि अजित पवार गटात संतुलन राखण्याचा प्रयत्न होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणातील नेतृत्वाला प्राधान्य दिले जाऊ शकते. महायुतीच्या दणदणीत विजयानंतर राज्यात सत्ता स्थापन झाली असून, सत्तेचे गणित पूर्णतः महायुतीच्या बाजूने झुकले आहे. 288 पैकी 232 जागांवर विजय मिळवल्याने महायुतीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे, तर महाविकास आघाडी अवघ्या 46 जागांवर आक्रसली आहे. 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हे सरकार महायुतीच्या घवघवीत यशाचे प्रतीक मानले जात आहे. सरकार स्थापनेनंतर मंत्रीपदांच्या वाटपावरून सातत्याने चर्चा सुरू होती. खातेवाटपाचा पेच सोडवण्यासाठी 12 डिसेंबर रोजी दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत कोणते मंत्री होणार आणि कोणते खाते दिले जाणार यावर अंतिम निर्णय झाला. आज होणाऱ्या सोहळ्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

डान्सचा महा-मुकाबला: निर्णय देताना रेमो डिसूझाची पंचाईत

Newsworldmarathi Mumbai : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” या त्यांनीच डिझाईन केलेल्या नवीन फॉरमॅटमध्ये दर आठवड्याला डान्सचा थरारक सामना बघायला मिळतो. या शोमध्ये हर्ष लिंबाचियाच्या सूत्रसंचालनात रेमो डिसूझा परीक्षकांच्या पॅनलवर सर्वोच्च पदी आहे. तर, मलाइका अरोरा टीम IBD ला समर्थन देते आणि गीता कपूर टीम SD ला समर्थन देते. उत्कृष्ट कोरिओग्राफर्सच्या मार्गदर्शनाखाली 12 अद्भुत डान्सर्स दोन टीममधून एकमेकांशी आमनासामना करताना दिसतात. या आठवड्यात, ऊर्फी जावेद आणि मनीषा रानी अनुक्रमे सुपर डान्सर आणि इंडियाज बेस्ट डान्सर या टीम्सचे मनोबल वाढवण्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. अंतिम सामन्यासाठी मंच सज्ज झाला. दोन्ही प्रतिस्पर्धी संघांनी आपला श्रेष्ठ डान्सर पाठवला, ज्यांच्यात अंतिम द्वन्द्व रंगले. 50 गुण मिळवून अंतिम फेरीतला पाचवा स्पर्धक निवडण्याची पात्रता मिळवण्यासाठी टीम्सची ही झुंज होती. IBD चे प्रतिनिधित्व करण्यासाठी मलाइका अरोराने अनिकेतला पाठवले, तर गीता कपूरने गोड, छोट्याश्या फ्लोरिनाला सुपर डान्सर टीमच्या वतीने पाठवले. फ्लोरिनाची जबरदस्त एनर्जी आणि अनिकेतच्या अद्भुत मूव्ह्ज यांनी सगळ्यांना थक्क करून सोडले. लॉर्ड रेमोने दोघांच्या परफॉर्मन्सचे कौतुक केले. त्याची खास ‘सर्वगुण संपन्न’ची दादही दिली. फ्लोरिनाच्या धमाकेदार ऊर्जेने तो विशेष प्रभावित झाला होता. गीता आणि मलाइका यांनीही त्या चिमुरडीचे खूप खूप कौतुक केले. विजेता जाहीर करण्यापूर्वी लॉर्ड रेमोने आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, “या लढतीत वय हा मोठा घटक होता. पण ही दोन टीम्समधली स्पर्धा असल्यामुळे आपण वयावर फोकस करू शकत नाही, आपण डान्सकडेच लक्ष दिले पाहिजे. जर त्यांच्या डान्सचे विश्लेषण केले, तर असे म्हणावे लागेल की, कुणी एक कमी अजिबात नव्हते, पण स्पर्धेतला दुसरा स्पर्धक अधिक उजवा होता, ज्याने पहिल्यावर कुरघोडी केली. माझ्यासाठी तुम्ही दोघेही विजेता आहात पण ही फेरी ड्रॉ होऊ शकत नाही, त्यामुळे मला कुणा एकाची निवड करावीच लागणार.” आणि आता प्रत्येकाच्या डोक्यात असलेला प्रश्न हा आहे की, अनिकेत IBD साठी विजयश्री घेऊन येऊ शकेल की फ्लोरिना सुपर डान्सर्सना विजयाची भेट देणार? 50 गुण कोण जिंकणार आणि अंतिम फेरीतला पाचवा स्पर्धक निवडण्याची संधी कोण मिळवणार? असे अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी आणि सर्वोच्च किताब कोण जिंकणार हे जाणून घेण्यासाठी बघत रहा ही लढत, दर वीकएंडला रात्री 7.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’तून ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चा जागर

0
Newsworldmarathi Pune : भारत मातेसह छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, ढोल-ताशाचा गजर व टाळ-मृदुंगाच्या तालावर ‘वाचाल तर वाचाल’सारखे संदेश देणारे फलक व लोकप्रिय पुस्तकांची मुखपृष्ठे हाती घेत अन् मायमराठीची विपुल ग्रंथसंपदा विराजमान असलेली पालखी खांद्यावर मिरवित पारंपरिक वेषभूषा केलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी शनिवारी दुपारी पुण्यात ‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’ काढली. ‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या शुभारंभाच्या निमित्ताने टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानापर्यंत ‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’ काढण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने काढलेल्या या ग्रंथ दिंडीमध्ये पुणे परिसरातील शंभरहून अधिक महाविद्यालयातील पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पुस्तक वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य अशा ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी काढलेल्या या ग्रंथदिंडीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले, तसेच विविध साहित्यिक, समाजसुधारकांची माहिती देण्यात आली. विविध अभंग, कविता, साहित्यिकांची माहिती देणारे फलक, ‘श्यामची आई’, ‘कऱ्हेचे पाणी’ अशा लोकप्रिय पुस्तकांची मुखपृष्ठे विद्यार्थ्यांनी हाती धरली होती. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, अभिनेते प्रवीण तरडे, डॉ. नितीन घोरपडे, संयोजन समिती सदस्य डॉ. संजय चाकणे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजित फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर या ग्रंथ दिंडीत सहभागी झाले होते. या प्रसंगी प्रवीण तरडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

0
Newsworldmarathi Pune : मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठीला राज्यमान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आता मराठी बोलणाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. आपली वाचनसंस्कृती जपण्याचे काम करायचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम राज्यभर राबवता येईल, महोत्सवाला शासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक कर्नल युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे आचार्य पवन त्रिपाठी, ज्येष्ठ लेखिका डॉ. अरूणा ढेरे, लोकमान्य मल्टिपर्पज कॉ ऑप सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, डॉ. सोमनाथ पाटील, विशाल चोरडिया, कृष्णकमार गोयल, संयोजन समिती सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, डॉ. संजय चाकणे, डॉ. आनंद काटीकर या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात एकाच लेखकाच्या सर्वाधिक पुस्तकांच्या प्रदर्शन याचा गिनेस विश्वविक्रम परमपूज्य जैन आचार्य विजयरत्न सुंदर सुरिश्वर महाराज यांच्या नावे नोंदवला गेला. या विक्रमाचे प्रमाणपत्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. एनबीटीला पुढील तीस वर्षांसाठी पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे पत्र पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, की पुणे पुस्तक महोत्सव इतका चांगला आहे म्हणूनच मी पुन्हा येईन, दरवर्षी येईन असे वाटते. पुस्तक महोत्सवासाठी पुण्यापेक्षा उपयुक्त दुसरे शहर नाही. पुणेकरांचा ज्ञानासाठी उत्साह आहे. शांतता पुणेकर वाचत आहे हा उपक्रम येत्या काळात महाराष्ट्रात करता येईल. असा महोत्सव महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत आयोजित केला जाईल. इतिहासात ग्रंथांचे महत्त्व मोठे आहे. आपले ज्ञान किती खोल होते याचे उदाहरण नालंदा विद्यापीठ आहे. कलेपासून शल्यचिकित्सेपर्यंतचे ज्ञान तिथे दिले जायचे. या विद्यापीठातील ग्रंथसंपदा जाळल्यावर ती तीन महिने जळत होती. भारतीय सभ्यता सर्वांत प्राचीन आहे आणि ती चिरंतन सुरू राहिली आहे. चहुदिशांनी येणारे ज्ञान घेतले पाहिजे हे आपली संस्कृती सांगते. या देशाने नेहमी ज्ञानाची, ग्रंथांची पूजा केली. डिजिटल काळात ग्रंथ, पुस्तकांचे काय होईल याचे उत्तर तरुण पिढी देईल. एआय संकलन करू शकते, सृजन करू शकत नाही. तंत्रज्ञान ज्ञानाचे नवे दालन उघडून देते. तंत्रज्ञानामुळे कोणत्याही भाषांतील पुस्तके सहजपणे अनुवाद होऊन वाचता येतात. समाजातील मूल्ये टिकण्यासाठी वाचन संस्कृती टिकणे महत्त्वाचे आहे. येत्या काळात सर्वाधिक विश्वविक्रम करणारे शहर असा एक विक्रम नोंदवला जाईल. या महोत्सवासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून केली जाईल. डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, पुणे जिल्ह्यातून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महोत्सव इतका मोठा झाला आहे. पुणे पुस्तक महोत्सवाला जावे, असे राज्यभरातील साहित्यप्रेमींना वाटावे असा हा महोत्सव होत जाईल. महाराष्ट्राची वाङ्मयीन परंपरा पुढे जाणारा, सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करणारा हा महोत्सव आहे. मिलिंद मराठे म्हणाले, की लेखकांबरोबर काम करणे हे राष्ट्रीय पुस्तक न्यासचे उद्दिष्ट आहे. संपन्न साहित्य निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्रातील लेखक, प्रकाशक, अनुवादकांबरोबर एनबीटी काम करणार आहे. त्यासाठी समन्वय बैठक आयोजित केली जाणार आहे. गणेशोत्सव, सवाई गंधर्व महोत्सवाप्रमाणे आता पुणे पुस्तक महोत्सव ही ओळख निर्माण होत आहे. एनबीटीकडून दिल्लीत चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन अभ्यासक्रमाची पुण्यात सुरुवात करण्याचे नियोजन आहे. शांतता पुणेकर वाचत आहेत या धर्तीवर शांतता महाराष्ट्र वाचत आहेत असा उपक्रम राबवून वाचन संस्कृतीला देता येईल. राजेश पांडे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तकांवर प्रेम आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. पुस्तकांवर मराठी माणसांचे प्रेम आहे. शांतता… पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात साडेचार लोक सहभागी झाले. चळवळीला जनतेचा आशीर्वाद मिळाला की सकारात्मक परिणाम कसा होतो याचे हा उपक्रम उदाहरण ठरला. १०१ महाविद्यालयांच्या सहभागातून ग्रंथदिंडी झाली. गेल्यावर्षीपेक्षा तिप्पट मोठे प्रदर्शन होणार आहेत. यंदा २५ लाख पुस्तके विकली जातील. हा महोत्सव पुण्याची गरज होती. संविधान शब्दाचा विश्वविक्रम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे दालन, लिट फेस्टमध्ये मान्यवर ४५ व्यक्ती सहभागी होणार आहेत. मुलांसाठी चित्रपट महोत्सव, सांस्कृतिक महोत्सवासह खाद्य महोत्सवाची मेजवानी मिळणार आहे.

उत्कट भावकाव्यातून पुणेकर रसिकांना उमगले संवेदनशील कवी नरेंद्र मोदी

0
Newsworldmarathi Pune : ‘सम्बन्ध आएँ, आ-आ के बह जाएँ, छोड जाएँ आँखों में एकाध आँसू‌’, ‌‘मेरे आसपास खिची एक..‌’, ‌‘मनुष्य की टोली हो या मेला‌’, ‌‘जगत्‌‍ जननी‌’, ‌‘उत्सव‌’, ‌‘कारगिल‌’, ‌‘जिंदा दिल‌’, ‌‘भावमुद्रा बोले बसंत‌’, ‌‘अचानक‌’, ‌‘विस्मयकी सुबह‌’, ‌‘एकाध आँसू‌’ अशा विविध काव्यरचनांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कविमनाची ओळख आज पुणेकर रसिकांना झाली. निमित्त होते संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‌‘आँख ये धन्य है‌’ आणि ‌‘साक्षी भाव‌’ या पुस्तकांमधील कवितांवर ‌‘मन का गीत‌’ या विशेष कार्यक्रमाचे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 14) बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून सादर झालेला कार्यक्रम पुणेकरांना विशेष भावला. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मंत्री, आमदार चंद्रकांत पाटील, मोनिका मुरलीधर मोहोळ, सुनील महाजन, निकिता मोघे, योगेश सोमण, डॉ. सलील कुलकर्णी, माधुरी सहस्रबुद्धे, हरिदास चरवड, आदित्य माळवे, प्रकाशक सु. वा. जोशी मंचावर होते. या कार्यक्रमादरम्यान मा. नरेंद्र मोदी यांच्या जयश्री जोशी यांनी अनुवादित केलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मराठी कवितांच्या ‌‘नयन हे धन्य हे‌’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ‌‘मन का गीत‌’ या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती सुनील महाजन यांची होती तर संहिता लेखन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांचे होते. दिग्दर्शनाची बाजू प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण यांनी सांभाळली. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रभावी अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनिस आणि अक्षय वाटवे यांनी केले. विविध गीते, कवितांवर शिल्पा दातार, शर्वरी ओतरी, श्रुतिका अत्रे, अदिती देवधर, ईश्वरी बापट, प्राजक्ता सांभू, अंतरा बोरगावकर यांनी नृत्यविष्कार सादर केला. महेश लिमये (दृकश्राव्य), अक्षर वडके (प्रकाश योजना), अमन वरखेडकर (की बोर्ड) यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी तर संयोजन केतकी महाजन-बोरकर यांनी केले. मोदीजी यांच्या शब्दांना संगीतबद्ध करण्याचा योग आला हे मी माझे भाग्य समजतो. मोदीजींच्या कविता ध्यासातून, देशात केलेल्या भ्रमंतीतून प्रकट झालेल्या आहेत, हे प्रकर्षाने जाणवते, अशा भावना डॉ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.

एकता सेवा प्रतिष्ठानचा वतीने निराधारांना ब्लॅंकेट वाटप

0
Newsworldmarathi Pune : श्री दत्त जयंतीच्या अवचित साधत गोरगरिबांना कडाक्याच्या थंडीत संरक्षण म्हणून उबदार रग (ब्लॅंकेट) वाटप करण्यात आले. गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे गणेश शेरला यांच्या माध्यमातून निराधारांसाठी मायेची ऊब उपक्रम राबविण्यात आला. एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री दत्त जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन व होम हवन करत श्री दत्त महाराज पुजन करण्यात आले. समाजातील निराधार बांधवांना माणुसकी धर्म जोपासण्याच्या हेतूने थंडीपासून बचाव व्हावा म्हणून हा उपक्रम करत असल्याचे एकता सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शेलार यांनी सांगितले. यावेळी आयोजक गणेश शेरला, रविंद्र मोरे, संजय गावडे,अनिल पवार, नाना क्षिरसागर,सलिम सय्यद, बाळासाहेब शेलार, तानाजी चव्हाण,दिपक शिपकुले, गणेश थिटे, मारूती कांबळे, मनोज कांबळे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

देसाई कनिष्ठ महाविद्यालयात ‘जलसा’ सांस्कृतिक सप्ताह

0
Newsworldmarathi Pune : द पूना गुजराती केळवणी मंडळ संचलित हरिभाई व्ही. देसाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘जलसा’ या सांस्कृतिक सप्ताहाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. द पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेशभाई शहा यांच्या शुभहस्ते या सांस्कृतिक सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या सांस्कृतिक सप्ताहांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांचे अनावरण याप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी आपल्या मनोगतात कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना या सांस्कृतिक सप्ताहात जास्तीत जास्त सहभाग घेण्यास प्रेरित केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजेशभाई शहा यांनी आपल्या संबोधनात अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करीत उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या डॉ. राजश्री पटवर्धन, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख श्वेता परदेशी, पर्यवेक्षिका स्मिता तेंडुलकर, पर्यवेक्षिका डॉ. मंजू राकेश तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यलयातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. अपर्णा नरके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर जया शिंगोरे यांनी आभारप्रदर्शन केले.

प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटणचा दणदणीत विजय

0
Newsworldmarathi Pune : प्रो कबड्डी लीगमध्ये यापूर्वीच आव्हान गमावलेल्या बंगळुरु बुल्स संघाला आणखी निस्तेज करताना एकामागून एक चार लोण देत पुणेरी पलटणने शुक्रवारी झालेल्या सामन्यात ५६-१७ असा दणदणीत विजय मिळविला. पंकज मोहिते, आकाश शिंदे, मोहित गोयत यांच्या चढायांना गौरव खत्री आणि अमन यांच्या बचावातील हाय फाईव्हची सुरेख साथ मिळाली. प्रतिस्पर्धी संघाच्या गुणांपेक्षा तिप्पट गुणांनी विजय मिळवून पुणेरी पलटण संघाने क्रमवारीत सातवे स्थान गाठत बाद फेरी गाठण्याचे आपले आव्हान कायम राखले. बंगळुरु संघासाठी लीगमध्ये काहीच आव्हान उरलेले नाही. पण, त्यानंतरही त्यांच्या खेळाडूंनी सामन्यात खेळण्याची साधी मानसिकताही दाखवली नाही. तुलनेत पलटणच्या प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका चोख बजावली. पंकजने चढाईत ५, मोहित आणि आकाश शिंदेने ८ गुणांची कमाई केली. या तिघांच्या चढाया कमी पडल्या म्हणून की काय आर्यवर्धन नवलेने एक मिनिट शिल्लक असताना एका चढाईत पाच गुणांची कमाई केली. गौरवने ६ आणि अमनने ५ गुणांची कमाई करुन बचावाची बाजू समर्थपणे सांभाळली. सर्वोत्तम सांघिक खेळ हे पलटणच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले असले, तरी संपूर्ण सामन्यात बचाव भक्कम असूनही त्यांनी परदीप नरवालला शांत ठेवण्यात मिळविलेले यश महत्वाचे ठरले. बंगळुरु कडून परदीपने सात गुणांची कमाई केली. पूर्वार्धात ढासळलेल्या बंगुळुर संघावरील आपली पकड अधिक घट्ट करताना पलटणने उत्तरार्धाच्या पहिल्याच मिनिटाला बंगळुरु संघावर तिसरा लोण चढवला. यानंतर पलटणचा प्रत्येक चढाईला गुण, बचावात गुण हा वेग उत्तरार्धाच्या पहिल्या सत्रात कायम राहिला. बंगळुरु बुल्स संघ अक्षरशः निष्प्रभ झाला होता. पहिले सत्र संपताना बंगळुरुला आणखी एक लोण स्विकारावा लागला. तेव्हा पलटणने ४३-१२ अशी ३१ गुणांची मोठी आघाडी घेत उत्तरार्धाचे अखेरचे सत्र औपचारिक राहणार हे स्पष्ट केले. अखेरच्या पाच मिनिटांत पलटण संघाने राखीव खेळाडूंनाही खेळण्याची संधी देत चार खेळाडू बदलले. याचा फायदा घेताना परदीप नरवालने अव्वल चढाई करत तीन गुणांची कमाई केली आणि हाच काय तो बंगळुरु संघासाठीचा सामन्यातील सर्वोत्तम क्षण ठरला. गुणांची कमाई कायम राखत पलटण संघाने दोन मिनिट शिल्लक असताना गुणांचे अर्धशतक साजरे केले. आर्यवर्धन नवलेने शानदार उडी घेत एकाच चढाईत पाच गुणांची कमाई करुन आधीच खचलेल्या बंगळुरुच्या जखमेवर मीठ चोळले. आव्हान संपुष्टात आलेल्या बंगळुरु बुल्सविरुद्ध खेळताना पुणेरी पलटणच्या खेळाडूंना वर्चस्व राखण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागले नाही. बंगुळुरुच्या एकाही खेळाडूची देहबोली आपण सामना खेळतोय अशी नव्हती. घरच्या मैदानावर अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या पलटण संघाने या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. पंकज मोहिते, आकाश शिंदे, मोहित गोयत यांनी आपल्या चढाया चोख केल्या आणि अमन, गैरव खत्रीने बचावाची बाजू तेवढ्याच ताकदीने सांभाळली. पूर्वार्धातच दोन लोण चढवत पुणेरी पलटणने आपले वर्चस्व राखले. मध्यंतराचा २६-७ असा गुणफलक पुणेरी पलटणचे वर्चस्व आणि विजय निश्चित करणारा होता. पूर्वार्धाच्या दुसऱ्या टप्प्यात बंगळुरु संघाला केवळ एका गुणाची कमाई करता आली. एकाही आघाडीवर बंगळुरुचे खेळाडू प्रयत्न करताना दिसून आले नाहीत

माजी सैनिकांचे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

0
Newsworldmarathi Pune : सेवानिवृत्त फौजी 355 लोकांची 30 कोटी पेक्षा जास्त पैशांची फसवणूक एस. जी. ट्रेडिंग कंपनीने केली आहे. त्याबाबत कायदेशीर फिर्याद 3 ऑगस्ट 2024 रोजी मुंडवा पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे.परंतु अजूनही न्याय मिळाला नसल्याने माजी सैनिक कुटुंबियासह आंदोलनास बसले आहेत.पुणे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसून त्या विरोधात सर्व सेवानिवृत्त माजी सैनिक लोक आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालय समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करीत न्याय मिळण्याची मागणी करीत आहेत. सदर केस बाबत आम्ही सर्व फिर्यादी यांनी वारंवार आर्थिक गुन्हे शाखा पुणे अधिकाऱ्यांना भेटून आमची सर्व हकीकत त्यांच्यासमोर मांडली आहे. एकूण 353 लोक या केस मध्ये फिर्यादी असून सर्वांच्या जाब जवाब झालेले आहे. सदर केस मध्ये असलेले आरोपी शुभांगी मोहिते, निकिता शितोळे, सौरभ गजरे, गंगाधर मुळे, मुख्य आरोपी सुरेश गाडीवडार, सौ. किरण दलाल अमर शेलार, संकल्प चव्हाण, संजय सिंग, सुभाष गाडीवडर व इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखा यांनी आज रोजी पर्यंत कोणतीही विचारपूस किंवा तपास केले नाही व यापैकी कोणत्याही आरोपींना आज रोजी पर्यंत ताब्यात सुद्धा घेतले नाही अशी खात्रीलायक माहिती आमच्यापर्यंत आहे. सदर केस मध्ये असलेले आरोपी यांना आज रोजी पर्यंत का ताब्यात घेतले गेले नाही व वरील सर्व संघटित गुन्हेगारांना का मोकळा सोडले गेले आरोपींना अटक करून न्यायालय पुढे सादर करण्यासाठी का विलंब लावला जात आहे. याबाबत खुलासा होणे गरजेचे आहे सदर केसचे इन्वेस्टीगेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आम्हाला समाधानकारक उत्तर दिले जात नाही. आम्ही सर्व देशाची सेवा करून फौज मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रायव्हेट फंडाच्या मिळालेल्या पैशाची पूर्णपणे एस. जी. ट्रेडिंग कंपनी कडे गुंतवणूक केली होती. सदर कंपनीने आमची मोठी फसवणूक केल्यामुळे आम्ही सर्व गुंतवणूकदार यामुळे आर्थिक अडचणीमध्ये आलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आम्ही सर्वांनी पुणे पोलिसांकडून केली होती मात्र ते पूर्ण होत नसल्याचे आज रोजी आम्हाला दिसून येत आहे. दिलेल्या फिर्यादनुसार सर्व आरोपींना अटक न केल्यामुळे पुणे पोलिसावर आमचा संशय वाढत आहे. एस.जी. ट्रेडिंग कंपनीचे मालक व सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांन त्वरित अटक करून न्यायालय पुढे सादर करावा संबंधित सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदार यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. यावेळी पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार, माजी सैनिक देवेंदू कुमार माईति, सौ अलका शिंदे माजी सैनिक यांची पत्नी, लालसिंग बिजनोई, निकम कमलाकर, सौ मुक्ता चव्हाण, महेश बागडे, रजनीकांत मोरे, इत्यादी माजी सैनिक पत्रकार परिषदेत उपस्थित होते.