Newsworldmarathi Pune : ‘सम्बन्ध आएँ, आ-आ के बह जाएँ, छोड जाएँ आँखों में एकाध आँसू’, ‘मेरे आसपास खिची एक..’, ‘मनुष्य की टोली हो या मेला’, ‘जगत् जननी’, ‘उत्सव’, ‘कारगिल’, ‘जिंदा दिल’, ‘भावमुद्रा बोले बसंत’, ‘अचानक’, ‘विस्मयकी सुबह’, ‘एकाध आँसू’ अशा विविध काव्यरचनांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कविमनाची ओळख आज पुणेकर रसिकांना झाली.
निमित्त होते संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आँख ये धन्य है’ आणि ‘साक्षी भाव’ या पुस्तकांमधील कवितांवर ‘मन का गीत’ या विशेष कार्यक्रमाचे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 14) बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून सादर झालेला कार्यक्रम पुणेकरांना विशेष भावला.
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मंत्री, आमदार चंद्रकांत पाटील, मोनिका मुरलीधर मोहोळ, सुनील महाजन, निकिता मोघे, योगेश सोमण, डॉ. सलील कुलकर्णी, माधुरी सहस्रबुद्धे, हरिदास चरवड, आदित्य माळवे, प्रकाशक सु. वा. जोशी मंचावर होते.
या कार्यक्रमादरम्यान मा. नरेंद्र मोदी यांच्या जयश्री जोशी यांनी अनुवादित केलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मराठी कवितांच्या ‘नयन हे धन्य हे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
‘मन का गीत’ या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती सुनील महाजन यांची होती तर संहिता लेखन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांचे होते. दिग्दर्शनाची बाजू प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण यांनी सांभाळली. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रभावी अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनिस आणि अक्षय वाटवे यांनी केले. विविध गीते, कवितांवर शिल्पा दातार, शर्वरी ओतरी, श्रुतिका अत्रे, अदिती देवधर, ईश्वरी बापट, प्राजक्ता सांभू, अंतरा बोरगावकर यांनी नृत्यविष्कार सादर केला. महेश लिमये (दृकश्राव्य), अक्षर वडके (प्रकाश योजना), अमन वरखेडकर (की बोर्ड) यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी तर संयोजन केतकी महाजन-बोरकर यांनी केले.
मोदीजी यांच्या शब्दांना संगीतबद्ध करण्याचा योग आला हे मी माझे भाग्य समजतो. मोदीजींच्या कविता ध्यासातून, देशात केलेल्या भ्रमंतीतून प्रकट झालेल्या आहेत, हे प्रकर्षाने जाणवते, अशा भावना डॉ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.