परकीय घुसखोरी रोखण्यासाठी सिटीझन कार्ड महत्वाचे : आबा बागुल
Newsworldmarathi पुण्यात म्यानमारमधील दोन रोहिंग्या नागरिकांचा प्रकार उघडकीस आल्याने देशाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परकीय शक्तींच्या घुसखोरीमुळे केवळ पुणेच नव्हे तर देशातील इतर शहरेही धोक्यात येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर ‘सिटीझन कार्ड’ या संकल्पनेची गरज निर्माण झाली आहे, जी नागरिकांच्या नोंदणी व ओळखीचे प्रभावी साधन ठरू शकते असे माजी उपमाहापौर आबा बागुल यांनी सांगितले.
माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रस्तावित केलेल्या या कार्डाचे उद्दिष्ट नागरिकांची ओळख व स्थलांतरावर नियंत्रण ठेवणे आहे. परकीय शक्तींवर नजर ठेवणे. नागरिकसंख्येची घनता मोजणे व त्यानुसार योजनांची आखणी करणे. पायाभूत सुविधांवरील ताण नियंत्रित करणे. कायदा व सुव्यवस्थेचे व्यवस्थापन सोपे होणार असल्याचे बागुल यांनी सांगितले.
देशाच्या सुरक्षिततेसाठी परकीय नागरिकांचा मागोवा घेण्यासाठी आणि घुसखोरी रोखण्यासाठी सिटीझन कार्ड उपयुक्त ठरेल. लोकसंख्या आणि स्थलांतराचा अचूक डेटा स्थानिक प्रशासनाला मिळेल, ज्यामुळे विकासाच्या योजनांची आखणी सुकर होईल. महाराष्ट्रात हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास, तो देशभरात लागू केला जाऊ शकतो.
आबा बागुल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि सर्व पक्षनेत्यांना पत्राद्वारे या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली आहे. सिटीझन कार्डच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर सादरीकरणाला वेळ देणे आणि निर्णय घेणे महत्वाचे आहे.
‘पीएमपी’चे खाजगीकरण थांबवा : नाना भानगिरे
Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकक्षेत्रात येणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या काही डेपोचे संपूर्णतः खासगीकरण करण्याच्या संदर्भातील प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला असून, ‘पीएमपीएमएल’चे होणारे खासगीकरण तात्काळ थांबवण्यासंदर्भातील पत्र ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तसेच पुणे पालिका व पिंपरी पालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहे.
तसेच येत्या आठ दिवसांत प्रस्ताव रद्द न केल्यास शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिला आहे.
या संदर्भात पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना मानगिरे म्हणाले की, “पीएमपीएमएल’ कर्मचारी हे संपूर्ण प्रशासनाच्या वेतनश्रेणीनुसार कार्यरत असून, नियमानुसार ‘पीएमपीएमएल’चे स्वतः च्या मालकीच्या ६० टक्के बसेस संख्या असून ४० टक्के खासगी ठेकेदारांना निविदा पद्धतीने बसेस संख्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, खासगी ठेकेदारांच्या दबावामुळे काही डेपोच्या संपूर्ण बसेसची संख्या ही खासगी ठेकेदारांच्या अखत्यारित देण्यासंदर्भातील प्रस्ताव ‘पीएमपीएमएल’ विचाराधीन आहे.”
पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या खासगीकरणाच्या संदर्भात कोणताही प्रस्ताव असल्यास तो तातडीने रद्द करण्यात यावा, यासंदर्भात येत्या आठ दिवसांत तातडीने महानगरपालिका प्रशासन तसेच ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने निर्णय घ्यावा.
– प्रमोद भानगिरे, शहर अध्यक्ष शिवसेना
मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला
Newsworldmarathi Mumbai : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा प्रस्तावित फॉर्म्युला २२-१२-९ या समीकरणावर आधारित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील सामंजस्य दिसून येते.
भाजप (22 पदे), 18 कॅबिनेट मंत्री, 4-5 राज्यमंत्रीपद भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने सर्वाधिक मंत्रीपदे भाजपाकडेच राहतील.
शिवसेना (शिंदे गट) (12 पदे), 9 कॅबिनेट मंत्री, 2-3 राज्यमंत्रीपद शिंदे गटाचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी त्यांच्या पदांचा योग्य समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (9 पदे), 8 कॅबिनेट मंत्री, 2 राज्यमंत्रीपद अजित पवार गटाला सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांना समाधानकारक वाटप करण्यात आले आहे.
मागील सरकारच्या मंत्र्यांनी स्वतःची खाती आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे खातेवाटपामध्ये फारसे बदल होण्याची शक्यता नाही, काही अपवाद वगळता बहुतेक खाती जैसे थे राहतील.
भाजपाने सर्वाधिक मंत्रीपदे घेत आपले वर्चस्व दाखवले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिलेले मंत्रीपद वाटप त्यांना शांत ठेवण्यासाठी रणनीतीचा भाग वाटतो. खातेवाटपामध्ये बदल टाळल्याने सहकार्य आणि स्थिरता यावर भर दिला जात आहे.
हा फॉर्म्युला मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिस्तबद्ध वाटत असला तरी, खातेवाटपावरून अंतर्गत नाराजी निर्माण होण्याची शक्यता अद्याप नाकारता येत नाही.
बँकांनी कर्ज वाटप करून उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी
Newsworldmarathi Pune : जिल्ह्याचा एकूण पतपुरवठा ३ लाख १ हजार ६०० कोटीचा असून त्यानुसार सर्व बँकांनी कर्ज वाटप करून जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पतपुरवठा आढावा समिती बैठकीत ते बोलत होते. या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक डॉ जावेद मोहनवी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक भुषण लगाटे, प्रकल्प संचालक शालीनी कडू, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहप्रबांधक बचेंद्रा मलिक, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाप्रबंधक वृषाली सोने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्याचा वार्षिक पत पुरवठा मध्ये मागील वर्षापेक्षा ७४ हजार २८५ कोटींनी वाढवण्यात आला. कृषी पत पुरवठ्यामध्ये मागील वर्षापेक्षा ८७० कोटींची वाढ करण्यात आली तसेच सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी २० हजार कोटींची भरघोस वाढ करण्यात आलेली आहे.
पीक कर्जाचे (किसान क्रेडिट कार्ड) खरीप हंगामाची उद्दिष्ट ४ हजार ४५४ कोटी एवढे असून,किसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) अंतर्गत सप्टेंबर २०२४ अखेर ५ हजार १९० कोटी रुपयांचे कर्जवाटप जिल्ह्यातील विविध बँकांनी करून ११६ टक्के लक्ष गाठले आहे.वार्षिक पिक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड)उद्दिष्टच्या अनुषंगाने बँकांनी आज तह ५ हजार ७४५ कोटी कर्जाचे वाटप करून ९० टक्के लक्ष पुर्ण आहे त्यासाठी सर्वांचे अभिनंदन ही केले.
राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या रोजगार योजनेचा आढावा घेत असताना बँकांनी विविध योजनांमध्ये कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही करावी. बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्ह्यातील विभाग प्रमुखांनी बँक स्तरावर आढावा घेवून नामंजूर झालेल्या प्रकरणांचा अहवाल डिसेंबरअखेर सादर करावा, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.
लघाटे म्हणाले, सरकारी योजने अंतर्गत कर्ज वाटप वेळेवर करावे. आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात बँकांनी मेळावे घ्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.मोहनवी आणि योगेश पाटील यांनी कर्ज मंजुरीबाबत माहिती दिली.
दत्त जयंतीनिमित्त सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील वाहतूकीत बदल
Newsworldmarathi Pune : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्त जन्म व दत्तजयंती निमित्त मिरवणूक सोहळा साजरा होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील जड- अवजड वाहतूक १३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून १५ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजेपर्यंत पर्यायी रस्त्यावरुन वळविण्याचे आदेश जारी केले आहे.
सासवड ते बंगळुरू महामार्गाकडे जाणारी जड- अवजड वाहने परींचे गाव- वीर मार्गे सारोळा अशी जातील. तसेच सासवड- दिवेघाट मार्गे कात्रज चौक अशी जातील. कापूरहोळ ते सासवड या मार्गावरील अवजड वाहने कापूरहोळ- शिंदेवाडी- कात्रज चौक मार्गे सासवडकडे जातील. कार, जीप आदी हलक्या वाहनांची वाहतूक पुर्वीप्रमाणेच सासवड ते कापूरहोळ मार्गावर सुरू राहील.
श्रीक्षेत्र नारायणपूर येथे १३ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान श्री दत्त सेवेकरी मंडळ यांचेवतीने दत्त जयंती सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तामिळनाडू, कनार्टक, राजस्थान या राज्यातूनदेखील भाविक दर्शनासाठी येत असतात. जवळच असलेल्या केतकावळे गावी असणारे बालाजी मंदीर या ठिकाणी देखील भाविक जात असतात. दोन्ही देवस्थानची ठिकाणे ही सासवड- कापूरहोळ या मार्गावर असून, यात्रा कालावधीत वाहतुकीचे नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यावरील अवजड वाहनांची वाहतुक वळविण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण
Newsworldmarathi Pune : पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची उपस्थिती लाभावी, अशी भेट घेऊन सदिच्छा व्यक्त केली आणि यासाठी आग्रह केला. यावेळी ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत!’ या अभिनव उपक्रमाची माहिती देत त्यात सहभागी होण्याची विनंती देखील केली.
गेल्या वर्षी देवेंद्रजींनी महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच अधिवेशन सुरू असतानाही वेळात वेळ काढून ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत!’ या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. यावर्षीही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाठिंबा दर्शवला आहे.
परभणी बंदला हिंसक वळण
Newsworldmarathi Parbhani : परभणी, महाराष्ट्रामध्ये एका अज्ञात व्यक्तीने रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या बी आर आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्यानंतर हिंसक निदर्शने झाली. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली, आंदोलकांनी दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
शहरातील अनेक भागात जाळपोळ, दगडफेक आणि तोडफोडीच्या घटनांसह निदर्शने हिंसक झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रत्युत्तर दिले. या घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, चौकशी सुरू आहे. अधिका-यांनी पुढील मेळावे टाळण्यासाठी आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार
Newsworldmarathi Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे नेते अमित शहा यांना भेटून महायुतीतील खातेवाटप आणि संभाव्य मंत्र्यांची यादी निश्चित करण्याचा फडणवीस यांचा या भेटीत प्रयत्न आहे. मंत्र्यांच्या यादीवर शिक्कमोर्तब झाल्यानंतर तातडीने मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या १६ डिसेंबरपासून नागपूरला सुरुवात होत आहे. त्यामुळे १४ किंवा १५ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
खातेवाटपावर दिल्लीवारीत शिक्कामोर्तब होणार आहे. आता जरी प्रत्येक पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदे मिळणार हे निश्चित झाले असले, तरी ही सर्व मंत्रिपदे भरली जाणार नसून पक्षाच्या आवश्यकतेनुसार हे ठरवले जाणार असल्याचेही कळते. शिवाय ठरलेल्या संख्येनुसारही एखाद दुसरे मंत्रिपद कमी केले जाणार असल्याचेही समजते.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्लीत दाखल झाले. राज्यात महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार याबाबतचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून सर्वाधिक अर्थात १३२ आमदारांची संख्या असलेल्या भाजपला मंत्रिमंडळातील निम्मी अर्थात २२ मंत्रिपदे मिळणार असल्याचे खात्रीलायक समजते. गेल्या अडीच वर्षांत १०५ आमदार असतानाही भाजपला केवळ नऊ मंत्रिपदे मिळाली होती, मात्र आता ही सर्व कसर भरून निघणार असून पक्षातील अनेकांना मंत्रिपदे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते.
त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे मिळणार असल्याचेही समजते. मागच्या महायुती सरकारच्या काळात या तिन्ही पक्षाच्या वाट्याला समान मंत्रिपदे देण्यात आली होती
शिंदे यांच्या शिवसेनेला १२ मंत्रिपदे देण्यात आली असून त्यातील जवळपास निम्मी कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे असतील. याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्रिपदे मिळणार असून त्यातील पाच कॅबिनेट दर्जाची असतील असे समजते.
पुणे शहरातील ‘शिक्षण पुरक व पर्यावरण पोषक’ वातावरण जोपासण्याची गरज : तिवारी
Newsworldmarathi Pune : देशाची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, क्रीडा नगरी व पेन्शनरांचे ‘शांत – संयमी शहर’ अशी ओळख अंगीकारलेले ‘पुणे’ हे शैक्षणीक केंद्र (एज्युकेशनल हब) बनले आहे. शहरात बाहेरील विद्यार्थ्यांची संख्या दिवसें दिवस वाढत असल्याने, विविध प्रकारे रोजगारात देखील वाढ होत असुन, ‘विद्यार्थी सेवा ही देशाच्या भवितव्याची सेवा’ म्हणून पाहिले पाहिजे. पुणे शहराची मुळ शैक्षणिक व ऐतिहासिक ओळख जोपासत, शहराचा बकालपणा न वाढता शिक्षण पुरक व पर्यावरण पोषक वातावरणात शहराचा विकास होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
नारायण पेठेतील ‘प्रवास यशाचा अभ्यासिके’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी अभ्यासिका केंद्र संचालक श्री देवा आवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी धनंजय भिलारे, ॲड. स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, राजेश सुतार, ऊदय लेले आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना तिवारी म्हणाले, शहरातील अभ्यासिकांची संख्या वाढणे हे पुणे ‘विद्येचे माहेर घर’ असल्याचे द्योतक आहे, मात्र ‘शैक्षणिक वातावरणास पोषक, संतुलित व पर्यावरणपूरक विकास पुणे शहरा करीता अत्यावश्यक आहे.
तेव्हापासून मुंडे साहेब जॅकेट घालायला लागले…
Newsworldmarathi Team : Birthday special माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे या लोकनेत्यांच्या मैत्रीची चर्चा त्या दोघांच्या पश्चात आजही होत असते. दोघांचे पक्ष वेगळे असले तरी त्यांची मैत्री निखळ होती, निस्पृह, घट्ट होती. मैत्रीच्या आड त्यांनी त्यांच्या पक्षांना येऊ दिले नाही. अशी मैत्री महाराष्ट्राच्या राजकारणात विरळाच. दोघे एकत्र आले की, प्रेक्षकांच्या कानांना खमंग, दर्जेदार मेजवानी मिळायची.
१९८० साली निवडून आल्यानंतर जेव्हा मुंबईच्या विधानभवनात आमदार म्हणून पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा गोपीनाथ मुंडे पांढरा लेंगा आणि झब्बा घालून आले होते. तर विलासरावही तसाच पांढरा लेंगा आणि झब्बा घालून आले होते. फरक इतकाच होता तो म्हणजे विलासरावांनी त्यावर काळे बंद गळयाचे जॅकेट घातले होते.
दोघे समोरासमोर आले आणि एकमेकांना मिठी मारली. दोघेही देखणे होते. या तरुण आमदारांची मुलाखत घेण्यासाठी काही पत्रकार पुढे आले. तेव्हा पत्रकार म्हणाले, ‘‘दोघे सारखेच दिसता. फरक एकच. विलासराव तुम्ही जॅकेट घातल्यामुळे जरा वेगळे दिसत आहात.’’
दुस-या दिवशी सभागृह सुरू होण्यापूर्वी पुन्हा दोघे जण भेटले. आजूबाजूला इतर आमदारांचे कोंडाळे होते. इतक्यात विलासरावांनी आपल्या सहायकाला हाक मारली. तो जवळ आला तशी विलासरावांनी त्याच्या हातातील बॅग घेतली. ती उघडली आणि आपण जसे जॅकेट घातले होते, तसेच जॅकेट त्यांनी बॅगेतून काढले आणि मुंडे यांच्याकडे सोपवले.
तिथेच ते मुंडेंना घालायला लावले आणि पुन्हा कडकडून मिठी मारली आणि उपस्थित आमदारांना विचारले, ‘आता दिसतो का आम्ही सारखे?’
सर्वच जण खळखळून हसले. तेव्हापासून गोपीनाथ मुंडेही जॅकेट घालू लागले. विलासरावांचे निधन झाले तेव्हा मुंडे यांनी ही आठवण सांगितली व भावुक होऊन म्हणाले, “मी ज्या ज्या वेळेला जॅकेट घालतो तेव्हा विलासरावांची आठवण येते”
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय आदरपूर्वक घेतलं जातं. आज 12 डिसेंबर रोजी त्यांची जयंती (Birth Anniversary) साजरी केली जात आहे. त्यांचं पूर्ण नाव गोपीनाथ पांडुरंग मुंडे (Gopinath Pandurang Munde) होतं. 12 डिसेंबर 1949 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 3 जून 2014 रोजी दिल्लीमध्ये एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
गोपीनाथ मुंडेंनी लोकनेते (Lokaneta) म्हणून भरतीय राजकारणात आपला ठसा उमटवला. त्यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपदही (Deputy Chief Minister) भूषवले होते. 2014 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) म्हणून शपथ घेतली होती. परंतु, दुर्दैवाने काही दिवसांनी दिल्लीत एका रस्ते अपघातात त्यांचं निधन झालं.
गोपीनाथ मुंडे महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले आणि तेथून त्यांचा राजकारणाशी संबंध आला.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात ते सरकारविरोधातील आंदोलनाचा भाग होते. मुंडे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. नंतर त्यांना भारतीय जनता युवा मोर्चा, भाजपची युवा शाखा महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष बनवण्यात आले.

