Newsworldmarathi Pune : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्त जन्म व दत्तजयंती निमित्त मिरवणूक सोहळा साजरा होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील जड- अवजड वाहतूक १३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून १५ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजेपर्यंत पर्यायी रस्त्यावरुन वळविण्याचे आदेश जारी केले आहे.
सासवड ते बंगळुरू महामार्गाकडे जाणारी जड- अवजड वाहने परींचे गाव- वीर मार्गे सारोळा अशी जातील. तसेच सासवड- दिवेघाट मार्गे कात्रज चौक अशी जातील. कापूरहोळ ते सासवड या मार्गावरील अवजड वाहने कापूरहोळ- शिंदेवाडी- कात्रज चौक मार्गे सासवडकडे जातील. कार, जीप आदी हलक्या वाहनांची वाहतूक पुर्वीप्रमाणेच सासवड ते कापूरहोळ मार्गावर सुरू राहील.
श्रीक्षेत्र नारायणपूर येथे १३ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान श्री दत्त सेवेकरी मंडळ यांचेवतीने दत्त जयंती सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तामिळनाडू, कनार्टक, राजस्थान या राज्यातूनदेखील भाविक दर्शनासाठी येत असतात. जवळच असलेल्या केतकावळे गावी असणारे बालाजी मंदीर या ठिकाणी देखील भाविक जात असतात. दोन्ही देवस्थानची ठिकाणे ही सासवड- कापूरहोळ या मार्गावर असून, यात्रा कालावधीत वाहतुकीचे नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यावरील अवजड वाहनांची वाहतुक वळविण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.