Newsworldmarathi Team : Birthday special माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे या लोकनेत्यांच्या मैत्रीची चर्चा त्या दोघांच्या पश्चात आजही होत असते. दोघांचे पक्ष वेगळे असले तरी त्यांची मैत्री निखळ होती, निस्पृह, घट्ट होती. मैत्रीच्या आड त्यांनी त्यांच्या पक्षांना येऊ दिले नाही. अशी मैत्री महाराष्ट्राच्या राजकारणात विरळाच. दोघे एकत्र आले की, प्रेक्षकांच्या कानांना खमंग, दर्जेदार मेजवानी मिळायची.
१९८० साली निवडून आल्यानंतर जेव्हा मुंबईच्या विधानभवनात आमदार म्हणून पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा गोपीनाथ मुंडे पांढरा लेंगा आणि झब्बा घालून आले होते. तर विलासरावही तसाच पांढरा लेंगा आणि झब्बा घालून आले होते. फरक इतकाच होता तो म्हणजे विलासरावांनी त्यावर काळे बंद गळयाचे जॅकेट घातले होते.
दोघे समोरासमोर आले आणि एकमेकांना मिठी मारली. दोघेही देखणे होते. या तरुण आमदारांची मुलाखत घेण्यासाठी काही पत्रकार पुढे आले. तेव्हा पत्रकार म्हणाले, ‘‘दोघे सारखेच दिसता. फरक एकच. विलासराव तुम्ही जॅकेट घातल्यामुळे जरा वेगळे दिसत आहात.’’
दुस-या दिवशी सभागृह सुरू होण्यापूर्वी पुन्हा दोघे जण भेटले. आजूबाजूला इतर आमदारांचे कोंडाळे होते. इतक्यात विलासरावांनी आपल्या सहायकाला हाक मारली. तो जवळ आला तशी विलासरावांनी त्याच्या हातातील बॅग घेतली. ती उघडली आणि आपण जसे जॅकेट घातले होते, तसेच जॅकेट त्यांनी बॅगेतून काढले आणि मुंडे यांच्याकडे सोपवले.
तिथेच ते मुंडेंना घालायला लावले आणि पुन्हा कडकडून मिठी मारली आणि उपस्थित आमदारांना विचारले, ‘आता दिसतो का आम्ही सारखे?’
सर्वच जण खळखळून हसले. तेव्हापासून गोपीनाथ मुंडेही जॅकेट घालू लागले. विलासरावांचे निधन झाले तेव्हा मुंडे यांनी ही आठवण सांगितली व भावुक होऊन म्हणाले, “मी ज्या ज्या वेळेला जॅकेट घालतो तेव्हा विलासरावांची आठवण येते”
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय आदरपूर्वक घेतलं जातं. आज 12 डिसेंबर रोजी त्यांची जयंती (Birth Anniversary) साजरी केली जात आहे. त्यांचं पूर्ण नाव गोपीनाथ पांडुरंग मुंडे (Gopinath Pandurang Munde) होतं. 12 डिसेंबर 1949 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 3 जून 2014 रोजी दिल्लीमध्ये एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
गोपीनाथ मुंडेंनी लोकनेते (Lokaneta) म्हणून भरतीय राजकारणात आपला ठसा उमटवला. त्यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपदही (Deputy Chief Minister) भूषवले होते. 2014 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) म्हणून शपथ घेतली होती. परंतु, दुर्दैवाने काही दिवसांनी दिल्लीत एका रस्ते अपघातात त्यांचं निधन झालं.
गोपीनाथ मुंडे महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले आणि तेथून त्यांचा राजकारणाशी संबंध आला.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात ते सरकारविरोधातील आंदोलनाचा भाग होते. मुंडे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. नंतर त्यांना भारतीय जनता युवा मोर्चा, भाजपची युवा शाखा महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष बनवण्यात आले.