आबा बागुल यांची पक्षश्रेष्ठींकडे निलंबन मागे घेण्याची मागणी

0
Newsworldmarathi Pune पर्वती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी आता काँग्रेस पक्षाच्या श्रेष्टीकडे आपले निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. बागुल यांनी अपक्ष लढत दिली असली तरी त्यांचा पक्षाशी असलेला प्रदीर्घ संबंध आणि काँग्रेसच्या विचारांप्रती असलेली निष्ठा लक्षात घेता त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्याचा आग्रह त्यांनी केला आहे. आबा बागुल हे पुण्यातील एक अनुभवी आणि प्रभावी नेते आहेत. त्यांनी पर्वती मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, ज्यामुळे काँग्रेसला स्थानिक पातळीवर मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला होता. त्यांच्या या पावलामुळे पक्षाने कठोर भूमिका घेत त्यांना निलंबित केले होते. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये एकता टिकवून ठेवण्यासाठी बागुल यांच्या मागणीला पक्ष कसा प्रतिसाद देतो, याकडे लक्ष आहे

रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा खून : नाना पटोले

0
Newsworldmarathi Mumbai : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकशाहीचा खून’ या शब्दांत गंभीर आरोप करत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, एका रात्रीत मतपेट्या (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन – EVM) कशा बदलल्या, हा मोठा प्रश्न आहे. नाना पटोले यांनी सांगितले की, निवडणूक निकालांच्या आधीच EVM बदलल्या गेल्या, ज्यामुळे लोकांच्या मतदानाचा अपमान झाला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित करत प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा दावा केला. लोकांच्या मतदानावर विश्वास ठेवून निवडणुका होतात, मात्र EVM आणि त्याच्याशी संबंधित प्रकरणांमुळे लोकशाहीची विश्वासार्हता धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर लोकशाहीचे मुलभूत तत्त्व मोडीत काढल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अपप्रकार आणि यंत्रणा वापरण्यात आल्या. EVM संदर्भातील या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची योग्य चौकशी करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावीने कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण

0
Newsworldmarathi Pune : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाच्यावतीने विश्वेश्वरय्या हॉल येथे आयोजित रस्ते सुरक्षा अभियान व जागृती कार्यक्रमाच्यावेळी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते विभागातील १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात हेल्मेटचे वितरण करण्यात आले. यावेळी पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, सातारा मंडळाचे एस. बी. रोकडे, कोल्हापूर मंडळाचे टी.ए. बुरुड, सोलापूर मंडळाचे एस.एस. माळी आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेल्मेट वापरण्याबाबत जागृती करण्यासोबतच प्रत्यक्षात हेल्मेट घालण्यास प्रवृत्त करण्याचा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्याकरीता हेल्मेट वितरणाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंडळामार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकूण ५०० हेल्मेटचे वितरण करण्यात येणार आहे. रस्ते सुरक्षा अभियान व जागृतीबाबतची संकल्पना पुणे प्रादेशिक विभागातील सातारा, कोल्हापूर व सोलापूर मंडळानेही याप्रमाणे कार्यवाही करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याबाबत चव्हाण यांनी आवाहन केले.

‘शांतता… पुणेकर वाचत आहेत..’उपक्रमाला प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune : पुणे-राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत शहरात ठिकठिकाणी ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजकारण, सामाजिक, साहित्य, कला, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला. केवळ पुण्यातच नाही, तर राज्य, देशभरातून आणि परदेशातूनही या उपक्रमात सहभाग नोंदवण्यात आला. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कोथरूडचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार सिद्धार्थ शिरोळे,उद्योजक पुनीत बालन, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, आमदार हेमंत रासने,अभिनेत्री विभावरी देशपांडे, लेखक किरण यज्ञोपवीत, ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक अशा अनेकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच समता भूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले मंडई, अंधशाळा, मेट्रो स्थानक, पुणे महापालिका अशा ठिकाणी पुस्तक वाचन करण्यात आले.

पुणे महानगरपालिकेची वतीने लक्ष्मी रोडवर पादचारी दिन साजरा

0
Oplus_131072
Newsworldmarathi pune : आज पुणे महानगरपालिकेच्या वतीने लक्ष्मी रोड येथे पादचारी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश पादचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आणि त्यांना वाहतूक व्यवस्थेत अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हा होता. कार्यक्रमात महापालिकेच्या अधिकारी, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच विविध संस्था आणि संघटनांनी सहभाग घेतला. यावेळी लक्ष्मी रोडवरील काही ठिकाणी विशेष पादचारी मार्गांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, रस्त्यांवर वाहतुकीचे नियोजन आणि सिग्नल व्यवस्थेची माहिती देण्यासाठी स्टॉल्स लावण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी, पादचाऱ्यांच्या अधिकारांविषयी जनजागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले, ज्याला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

चंद्रकांत दादांनी वाचले ‘दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर’

0
Newsworld marathi : Pune पुण्यात नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तक महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित ‘शांतता! पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील लोकांनी आपापल्या ठिकाणी थांबून आवडीची पुस्तके वाचण्याचा आनंद घेतला. विशेषतः गजबजलेल्या अप्पा बळवंत चौकातील तांबडी जोगेश्वरी परिसरात या उपक्रमाची रंगत अधिक वाढली. आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी या उपक्रमात सहभागी होत आपला वेळ पुस्तक वाचनासाठी दिला. त्यांनी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे लिखित ‘दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर’ हा चरित्रग्रंथ वाचायला सुरुवात केली. त्यांनी काही पाने वाचून झाल्यावर प्रेरणादायी मानून संपूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी तो सोबत घेतला. शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाचे चंद्रकांत दादांनी कौतुक केले.

नारायण मूर्ती यांच्या हस्ते होणार अलोक काळे यांचा सन्मान

0
Newsworld Marathi Pune : जे. पी. श्रॉफ फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कार यावर्षी पुण्यातील मॅग्नस व्हेंचर्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक असलेले उद्योजक आलोक काळे यांना जाहीर झाला आहे.’सस्टेनेबिलिटी स्टार्ट-अप’ या विभागामध्ये काळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून येत्या २० डिसेंबर रोजी हॉटेल शेरेटन ग्रँड येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात पद्मविभूषण नारायण मूर्ती यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात येईल. जे. पी. श्रॉफ फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या या सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कार समितीचे अध्यक्ष व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) माजी महासंचालक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, एमसीसीआयएच्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, हनीवेलचे व्यवस्थापकीय संचालक आशिष गायकवाड, फाईव्ह एफचे अध्यक्ष गणेश नटराजन व जे पी श्रॉफ आदी मान्यवर यावेळी उपस्थित असतील. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असताना या क्षेत्राचा विकास अधिक शाश्वत करण्याबरोबरच शाश्वततेकडे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यासाठी आलोक काळे हे गेली दहा वर्ष संशोधन विकासात काम करीत आहेत, त्यांच्या याच प्रयत्नांचा सन्मान म्हणून त्यांना यावर्षीच्या सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. काळे यांनी जगातील सर्वात कमी कार्बन फूटप्रिंट असलेल्या आयजीबीसी ग्रीनप्रो आणि जीआरआयएचएने प्रमाणित केलेल्या पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी अथक परिश्रम केले असून लँडफिलमधून औद्योगिक कचरा वळविणे आणि बांधकाम उद्योगाचे नैसर्गिक संसाधनांवरील अवलंबित्व कमी करण्यावर त्यांचा विशेष भर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नस व्हेंचर्सने मागील तीन वर्षांत आपल्या उद्योगात अनेक पटींनी वाढ केली असून कंपनीच्या वतीने शाश्वत अशी टाईल्स, स्टोन अडेझिव्ह, प्लास्टर, ब्लॉक ज्योंटिंग मोर्टर, ग्राऊट्स व स्क्रिड्स यांसारखी टिकाऊ उत्पादने देखील बाजारात आणण्यात आली आहेत. सध्या या उत्पादनांना पुण्यातील अग्रगण्य बांधकाम कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे हे महत्त्वाचे. सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्काराबद्दल – २०२३ सालापासून जे. पी. श्रॉफ फाऊंडेशनच्या वतीने औद्योगिक विकास व पर्यावरण संवर्धन अशा दोन्हीचा समतोल साधत शाश्वत व नाविन्यपूर्ण प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. याशिवाय पर्यावरण-जागरूक अशा व्यावसायिक मॉडेलची गरज देखील अधोरेखित केली जाते.

लोकशाही वाचविण्यासाठी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या : शिंदे

0
Newsworld Pune : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल फक्त काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीसाठीच नाही तर राज्यातील जनतेसाठी धक्कादायक, अविश्वसनीय व अकल्पनीय आहेत. कोणतीही लाट नसताना पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या एकदम उलट निकाल कस काय लागू शकतात असा प्रश्न पडला आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार राज्यामध्ये ‘सर्व निवडणुकी बॅलेट पेपरवरती घ्याव्यात’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज नवी पेठ येथील महाराष्ट्र बँकेशेजारी सह्यांची मोहिम राबविण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, “या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकारे आहे. निवडणुक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२% मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वा., ते ६५.०२% तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ % झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३% वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे ईव्हीएम संदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत म्हणूनच सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात ही मोहिम राबवित आहोत.” यावेळी असंख्य नागरिकांनी या मोहिमेस पंसती दर्शवली आणि या मोहिमेत सहभाग घेवून सह्या केल्या. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, सचिव रफिक शेख, नगरसेवक अजित दरेकर, लता राजगुरु, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, हनुमंत पवार, सुनिल शिंदे, राज अंबिके, सुनिल घाडगे, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, सुजित यादव, आसिफ शेख, रमेश सोनकांबळे, राजू ठोंबरे, सतिश पवार, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, डॉ. रमाकांत साठे, अविनाश अडसुळ, राज घेलोत, प्रकाश पवार, प्राची दुधाने, अर्चना शहा, राजश्री अडसुळ, सुंदरा ओव्हाळ, पपिता सोनवणे, प्रिंयका मदाळे, अनिता धिमधिमे, विजया थोरात, जान्हवी दुधाने, प्राजक्ता गायकवाड, विमल खांडेकर, कल्पना शंभरकर, लता घडसिंग, मुन्ना खंडेलवाल, रोहित घोडके, नितीन वायदंडे, अभिजीत महामुनी, सुरेश चौधरी आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यस्तरीय आंतरशालेय, महाविदयालयीन ६ वा जाधवर विज्ञान महोत्सव

0
Newsworld pune : प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग, विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने ‘सहाव्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी नºहे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल – १ येथे महोत्सव होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवामधील स्पर्धा शालेय (इयत्ता ८ वी ते १० वी), कनिष्ठ (इयत्ता ११ वी व १२ वी), वरिष्ठ महाविद्यालय (पदविका शिक्षण) आणि पदव्युत्तर व खुल्या अशा चार गटात होणार आहे. सायन्स सोसायटी आणि टेक्नॉलॉजी या मुख्य संकल्पनेंंतर्गत नॅशनल एनर्जी कर्न्झव्हेशन, प्युरिफिकेशन मेथड फॉर वॉटर एअर सॉईल, बॅटरी फ्रॉम वेस्ट, बायो फ्युएल फ्रॉम अ‍ॅग्रीकल्चर वेस्ट, स्मार्ट एआय बेस रोबोट, बायो मेडिकल वेस्ट प्युरिफिकेशन, स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी इन व्हेईकल इंडस्ट्री अशा विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत. विजेत्यांना एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार आहेत. अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, ‘जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी हा एक अभिनव व आदर्श उपक्रम असणार आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळणार आहे. विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख २४ डिसेंबर असून गटाप्रमाणे अनुक्रमे ७७९८१०११२२, ९७६४७०७३७९, ७९७२४८३५७५, ९०६७९०९०७५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती भारताबाहेरील इतर देशांमध्ये संशोधन करुन पेटंट मिळविण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतामध्ये संशोधन व पेटंटचे प्रमाण कमी असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटने अभिनव योजना सुरु केली आहे. इन्स्टिटयूटमधील संशोधन करणा-या विद्यार्थ्याला विनातारण १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची गोडी निर्माण होत अधिकाधिक संशोधनास युवावर्ग प्रवृत्त होईल, असे अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी सांगितले.

सिक्युरिटी गार्ड ते मुख्यमंत्र्यांचा ओएसडीपर्यंतचा मुंडेचा प्रवास

0
Newsworld Team : Success Story दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस अवघड गोष्टीही सहज साध्य करतो आणि अशा व्यक्तीला अनेकांचे साह्य प्रोत्साहनही मिळते, याचे हे एक सुंदर उदाहरण आहे. रामदास स्वामी म्हणलेच आहेत – केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे। यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे|| वाशीम पासून पंचवीस किलोमीटर लांब एका खेड्यातील, ग्रामीण भागातील एका युवकाची ही एक प्रचंड प्रेरणादायी सक्सेस-स्टोरी आहे. हातावर पोट असलेल्या शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेल्या युवकाच्या संघर्षाची ही कहाणी आहे. वेद कुमार सांगतात की, वारकरी संप्रदायातील आध्यात्मिक विचारांची बैठक असलेल्या गरीब कुटुंबातील युवकाची ही कहाणी आहे. ग्रामीण भागातून मुंबई-पुणे गाठताना अनेक चॅलेंजेस भेडसावत असतात, तिकडे ‘दिल्ली दूर है’ म्हणजे नेमकी किती दूर असेल, याचा विचारही मनाला शिवला नसेल अशा युवकाची ही कहाणी आहे. शालेय जीवनात जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यावर राहण्याची व्यवस्था नसल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात रात्रीचा मुक्काम करणाऱ्या युवकाची ही कहाणी आहे! पण, घरच्या माऊलीने अशा परिस्थितीतही एक हट्ट मात्र कायमच धरला होता आपल्या लेकराकडे, तो म्हणजे आम्ही इकडे कसेही सांभाळू स्वतःला पण तू शिक्षण घे.. भरपूर शीक आणि स्वतःच्या पायावर उभा रहा. एवढीच काय ती एकमेव अपेक्षा! असा हा युवक बारावी पूर्ण करून पुण्यात आला आणि पॉलिटिकल सायन्स मध्ये आपले शिक्षण घेऊ लागला. घरची परिस्थिती पाहता, खेडेगावातून पुण्यासारख्या ठिकाणी येणे हेच मोठे दिव्य! ते कसेबसे जुळले तर त्यात गावाकडून आलेल्या युवकांचा पाय सहजच घसरेल असा फर्ग्युसन कॉलेज सारखा माहौल – प्रचंड distractions!! पण या आपल्या कहाणीतील युवकाचा मात्र एकच फोकस, शिक्षण एके शिक्षण!! अशात, गावाकडून पैसे मागविणे शक्य नसल्याने या युवकाने आपल्या कॉलेजच्याच सेक्युरिटी एजन्सीतील गोविंदअण्णा यांच्याकडे एकच तगादा लावला, आणि रात्रपाळीत त्याच कॉलेजच्या सेक्युरिटी गार्डची नोकरी मिळवली. ‘कमवा आणि शिका’ ही काही कोणती सरकारी योजना नव्हे, तर मजबुरी आणि जिद्द होती या युवकाची! डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विकास काकतकर यांनी आपल्या ऑफिसमध्ये बोलावून या युवकाची अतिशय आपुलकीने चौकशी केली आणि परिस्थिती समजून घेतली. Mr.&Mrs.काकतकर यांनी मग या युवकाला केवळ अभ्यासावर फोकस करायचा प्रेमळ सल्ला आणि तेवढ्याच प्रेमाने एकप्रकारे दमच दिला! फी, हॉस्टेल सगळी व्यवस्था आपल्या पदरचे पैसे देऊन काकतकर दाम्पत्याने केली. मन लावून अभ्यास करत मग त्या युवकानेही आपली फर्ग्युसनमधील इनिंग्स तर पूर्ण केलीच, पण त्यानंतर दिल्लीत जाऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन मधून जर्नलीजम पण पूर्ण केले!! त्याच सुमारास, देवेन्द्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना आपली दिल्ली येथील कामे पाहण्यासाठी एक योग्य व्यक्तीची आवश्यकता निर्माण झाली. त्यांनी ही आपली गरज बोलून दाखवली, तेंव्हा त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीने या युवकाचे नाव सुचवले आणि जात, ग्रामीण पार्श्वभूमी, आडनाव असल्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता देवेन्द्र फडणवीस यांनी या युवकाला संधी देण्यास क्षणार्धात होकार दिला!! देवेन्द्र फडणवीस यांचे दिल्ली-स्थित पीए म्हणून पुढच्या काळात या युवकाने प्रामाणिकपणे काम करत जीवापाड परिश्रम घेतले आणि त्यांच्या ‘पर्सनल टीम’चा एक अविभाज्य भाग बनले. आजच्या घडीचे राज्यातील निर्विवादपणे सगळ्यात पावरफुल नेते देवेन्द्रजी फडणवीस यांच्या जवळच्या या माणसाला कधी कोणी विचारलं, की आजवर कोणत्या कामाचे सर्वाधिक समाधान लाभले.. तर तुम्हाला त्यांच्या घरच्या, त्या माऊलीच्या विचारांमधील धार्मिक, अध्यात्मिक बैठकीची प्रचिती आल्याशिवाय राहवणार नाही. देवेन्द्रजी यांच्या सुचनेनुसार त्यांनी केलेल्या अनेक कामांपैकी स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला 23 वर्षांनंतर मिळवून दिलेली पेन्शन, अनेक गरजू रुग्णांना मदत व्हावी यासाठी केलेला पाठपुरावा, परदेशात अडकलेल्या अनेक मराठी विद्यार्थी, पर्यटकांना युद्धकाळात, कोविडकाळात भारतात परत आणण्यासाठी साऊथ ब्लॉक मध्ये ठाण मांडून बसणे यांसारख्या अनेक गोष्टी सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरून समाधान ओसांडून वाहत असते. त्याहून महत्वाचं म्हणजे, यांना कधी ‘आय मी मायसेल्फ’ करताना कोणी पाहिलं नाहीये, उलट यांच्या सहवासात लोकांना कमालीची विनम्रताच अनुभवायला मिळते. या कहाणीत मी ज्या युवकाबद्दल सांगत आहे, ते युवक आहेत मनोजजी मुंडे. देवेन्द्रजी फडणवीस यांचा 5 तारखेला मुख्यमंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर देवेन्द्रजी यांनी मनोजजी यांची ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी, अर्थात ओएसडी (सिएमओ) म्हणून नेमणूक केली आहे. सिक्युरिटी पासून सुरु झालेला हा मनोज यांचा प्रवास अतिशय संघर्षमय राहिला आहे. पण जिद्ध आणि ध्येय असेल तर माणूस काहीही साध्य करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी एक तास पुस्तकाचे वाचन उपक्रम

0
Newsworld Pune : पुणे पुस्तक महोत्सवाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सदर उपक्रमास जय गणेश व्यासपीठ च्या माध्यमातून पुण्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननच्या मंदिरात गजाननाची आरती करून पुस्तकाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पुस्तकांचे वाचन केले नवीन पिढीला वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने केलेल्या या उपक्रमात सुनील रासने, महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते, नितीन पंडित, पियुष शहा, विश्वास भोर, ॲड.मंदार जोशी, किरण सोनीवाल, सुधीर ढमाले, निलेश पवार, हर्षल पवार, स्वप्नील दळवी, दीपक बढे, जयेश ढमाले, अक्षय पानसरे उपस्थित होते..

खडकी शिक्षण संस्थेचा ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमात सहभाग

0
Newsworld Pune : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने दिनांक 14 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित *पुस्तक महोत्सवा*त खडकी शिक्षण संस्थेने उत्साहाने सहभाग घेतला आहे. यावेळी संस्थाध्यक्ष श्री. कृष्ण कुमार गोयल यांनी उपस्थित विद्यार्थ्यां, शिक्षकां, व पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी “पुस्तकाचा ध्यास म्हणजे जीवनाचा विकास आहे,” असे सांगत वाचनाची महती विशद केली. प्रत्येकाने वाचनाचा छंद जोपासत आपल्या जीवनाला नवा आयाम द्यावा, असे ते म्हणाले. प्राचार्य सहसचिव डॉ. संजय चाकणे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात होणाऱ्या पुस्तक महोत्सवाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना या महोत्सवात सहभागी होऊन वाचन संस्कृतीचा आनंद लुटण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात खडकी शिक्षण संस्थेच्या प्राचार्य, मुख्याध्यापक, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपला उत्साह व्यक्त केला. पुस्तक महोत्सवामुळे वाचन संस्कृतीस चालना मिळणार असून, विद्यार्थी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

सारथीच्या विद्यार्थ्यांना अजूनही परदेशी शिष्यवृत्तीची प्रतीक्षा

0
Newsworld Pune : जवळपास सहा महिने झालेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरले, निवडीची प्रक्रिया पार पडली. ज्यांच्याकडे थोडीफार आर्थिक स्थिरता होती, ते परदेशात शिक्षणासाठी गेले. तिथेही त्यांच्या अभ्यासक्रमाचे एक सत्र पूर्ण झाले. दरम्यान, राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि त्यामुळे अंतिम यादी रखडली. निवडणुकांचे निकाल लागले, राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळाले, तरीही सारथीच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम यादीला मात्र अद्याप मुहूर्त सापडत नाही. यावर सारथीचे कोणीही अधिकारी किंवा महासंचालक ठामपणे काही सांगत नाहीत. मंत्रालयातील वरिष्ठांनाही यासंदर्भात निश्चित माहिती नाही. हा विभाग नियोजन विभागाच्या अंतर्गत येतो, म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अखत्यारित आहे. या परदेशी शिष्यवृत्तीच्या संदर्भात सहा महिने उलटूनही विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पोहोचलेले नाही. त्यामुळे त्या शिष्यवृत्तीचा उपयोग काय, असा प्रश्न निर्माण होतो. तिकडे परदेशात गेलेले विद्यार्थी उसने पैसे, उपासमार करून किंवा मोठ्या कष्टाने रूम भाडे भरत आहेत. बहुतेकांनी कर्ज काढून शिक्षणाला सुरुवात केली आहे आणि शिष्यवृत्ती कधी मिळेल, या आशेवर आहेत. मात्र, या निष्ठुर प्रशासन आणि शासन व्यवस्थेला त्याची काहीच फिकीर नाही.अजून किती काळ विद्यार्थ्यांनी वाट पाहायची? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो, असे स्टुडंट हेल्पिंग हँडसचे अध्यक्ष अँड.कुलदीप आंबेकर यांनी सांगितले.

जय जिनेन्द्र गृह रचना संस्थेत अभिनव उपक्रम

0
Newsworld Pune : एका चांगल्या कामाची सुरुवात अनेक चांगल्या कामांची प्रेरणा ठरते अशाच एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात वाकड येथे विजू शेठ जगताप व विराज रेणुसे यांनी उभारलेल्या जय जिनेन्द्र गृह रचना संस्थेमध्ये झाली. जय जिनेन्द्र गृह रचना संस्थेमध्ये आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राची सुरुवात संस्थेने केली. या संस्थेमध्ये प्रथित यश जैन समाज बांधव एकत्र येऊन आदर्शवत असे काम करत आहेत स्वतः देशी गायींचे संगोपन करून त्याचे दूध सर्व रहिवाशांना देतात इथे राहणारे उच्चशिक्षित जैन बांधव पावसाचे पाणी साठवून ते फक्त पिण्यासाठी वापरतात रोज लागणारे दूध व भाजीपाला स्वतः पिकवतात आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी नव्याने आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचा शुभारंभ हे सुद्धा त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे चातुर्मासामध्ये विविध धार्मिक उपक्रम येथे चालू असतात व आपली संस्कृती जपण्याचे काम या संस्थेमध्ये पदाधिकारी करत असतात सोसायटीमध्ये मकराना दगडामध्ये भव्य दिव्य मंदिराचे काम सुद्धा सुरू आहे. सगळ्यांना आदर्शवत वाटणारे काम या सोसायटीत एकोप्याने सुरू आहे अशाच प्रकारचे आदर्श गृह प्रकल्प भविष्यात उभे रहावेत ही काळाची गरज आहे .असे यावेळी डॉ.भाषा प्रभू पंकज महाराज गावडे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी माझ्यासह विजय शेठ जगताप, चंदूकाका सराफ चे प्रोप्रायटर अतुल शहा, शितल दोशी, विलासराव भंणगे, नेमीचंद सोळंकी, आयुर्वेदाचार्य मुके सर , डॉ. अभय जमदग्नी, चौगुले काका व सर्व पदाधिकारी व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मामाच्या इटलीत जावून चौकशी करावी : गोपीचंद पडळकर

0
Newsworld solapur : बारामतीत माझे डिपॉझिट जप्त झाले होते, त्याच ईव्हीएममध्ये हे झाले होते. अमेरिकेतील अनेक राज्यात आणि अनेक देशात देखील ईव्हीएमवर मतदान होते. हवं तर राहुल गांधी यांनी मामाच्या इटलीत जावून चौकशी करावी, असा टोलाही गोपीचंद पडळकरांनी लागवला. मारकडवाडीत ईव्हीएमविरोधी सभेला प्रत्युत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर आज सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मारकडवाडीत जाहीर सभा घेत तुफान फटकेबाजी केली. काँग्रेसच्या राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनीही राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. अन्यथा EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, असे म्हणत पडळकरांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. तुम्ही केवळ बळीचे बकरे आम्हालाच करत आहात. म्हणून राज्यातील प्रस्थापितांना  आपल्याला उधळून लावावे लागेल. ईव्हीएमला विरोधी करून बॅलेट पेपेरवर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या आणि त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शरद पवारांना आमचे आवाहन आहे की. शरद पवारांनी सर्वप्रथम आपल्या लेकीचा, आपल्या नातवाचा तसेच जयंत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या तिघांचा पहिल्यांदा राजीनामा घेऊन त्यानंतर हे आंदोलन पुढे नेले पाहिजे.

प्राजक्ताने हातावर गोंदवले ‘या’ खास व्यक्तीचं नाव

Newsworld Mumbai : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिचं सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे.प्राजक्ता माळीने आपल्या हातावर एका खास व्यक्तीचं नाव गोंदवून घेतलंय. हे व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु ओशो. राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्तानं आपला टॅटू दाखवत तो गोंदवण्यामागचं कारण देखील सांगितलं होतं. प्राजक्ताला आपल्या हातावर नेहमीपेक्षा काहीतरी हटके टॅटू हवा होता.

पुण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू रक्षा मोर्चा

0
Newsworld Pune : बांगलादेशातील हिंदू बांधवांवरील होणार्‍या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू रक्षा मोर्चा काढण्यात आला. राज्यभरात विविध ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला. गंज पेठेतील लहुजी वस्ताद साळवे तालीमपासून हा मोर्चा निघाला. सुमारे ५०० ते ५५० हिंदू बंधू भगिनी या मोर्चात सहभागी झाले होते. बांगलादेश निर्माण झाल्यानंतर ठरलेल्या कराराप्रमाणे त्या देशातील धार्मिक स्थळे सुरक्षित राहून अल्पसंख्यांक नागरिक सुरक्षित राहतील, या अपेक्षेने हजारो हिंदू कुटुंबीय बांगलादेशमध्ये स्थिरावले. मात्र, या अपेक्षांचा भंग झाल्याचे सध्या दिसून येत आहे. अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहेत. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली पुरातन मंदिरांची, मूर्तीची तोडफोड केली जाते. हिंदू महिलांवर बलात्कार केले जात आहेत. तसेच त्यांच्यावर अमानुष अत्याचार करून ठार मारण्यात येत आहे. हिंदूंच्या तसेच दलित बांधवांच्या मालमत्ता जमिनी अवैद्य मार्गाने बळकावून तसेच त्यांना बेघर केले जात आहे. त्याचप्रमाणे शत्रू संपत्ती अधिनियम बांगलादेशमध्ये कायदा आणला गेला असून तेथील मूळनिवासी हिंदूंना, हिंदू हे मुसलमान राष्ट्राचे शत्रू असल्याचे जाणीव करून कायद्याचा धाक दाखवून त्यांची जमिनी, घरे हडप केली जात आहे. तसेच या कायद्यामुळे तेथील मुसलमान समाजाच्या मनात हिंदू बद्दल द्वेष भावना प्रबळ केली जात आहे. या कायद्यामुळे हिंदू नागरिकांचे नागरिकत्वाचे अधिकार देखील, शत्रू राष्ट्राचे लोक म्हणून जबरदस्तीने काढले जात आहे. मूलभूत सरकारी सुविधा योजना त्या ठिकाणच्या हिंदूंना नाकारण्यात येत आहे. बहुसंख्य मुसलमान समाजाने अत्याचार केल्यास कायद्याने त्या मुसलमान नागरिकांना शिक्षा दिली जात नसल्याने हिंदूंचे जगणे अवघड बनले आहे. हिंदूंच्या धार्मिक प्रथा, रितीरिवाज, सण,कार्य यांचे पालन करून दिले जात नाही. तसे केल्यास त्यांचा सरकारी यंत्रणा त्याचप्रमाणे तेथील बहुसंख्य नागरिकांकडून अमानुष छळ होत आहे. त्यामुळे आता हिंदूंना त्याठिकाणी धर्मांतरण करणे अथवा पलायन करणे इतकेच मार्ग शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे या हिंदू बांधवांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ सर्व जगातील हिंदूंनी यापुढील काळात एकत्रित येण्याची गरज आहे आणि बांगलादेश मधील हिंदू बांधवांना वाचवणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

पुण्यात नात्याला काळीमा; नवजात बालकाला रस्त्यावर फेकले

Newsworld Pune : पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीत नवजात बालकाला रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बालकाचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती. काल रात्री बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ सिंहगड पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नवजात बालकाला त्वरित ससून रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे. सिंहगड पोलीस अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून बालकाच्या पालकांचा शोध घेत आहेत. या अमानवीय प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

‘अत्तर’ची आरोग्य चित्रपट महोत्सवात निवड

Newsworld Pune : द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स प्रस्तुत व रुहानी म्युझिक निर्मित आणि रामकुमार शेडगे दिग्दर्शित असलेल्या अत्तर लघुपटाला जगभरातील व देशभरातील गाजलेल्या लघुपट महोत्सवात आता पर्यंत अनेक नामंकने आणि पुरस्कार मिळाले असून पुण्यातील १३ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवात “अत्तर” लघुपटाची निवड झाली आहे. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ‘अत्तर’ खूप महत्वाची भूमिका बजावत असते. ‘अत्तर’ जणू माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.  याच  सुगंधी ‘अत्तराची अस्वस्थ करणारी गोष्ट दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी मांडली आहे. शनिवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ४.०० वा. लॉ, कॉलेज रोड येथील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथे अत्तर लघुपट दाखवला जाणार असून या लघुपटातील कलाकार मीरा शेडगे, पुरुषोत्तम बाबर, रेवा बर्गे, विनय सोनवणे, रमेश साठे, सिराज कसबे तसेच निर्माते राजू लुल्ला, दिग्दर्शक रामकुमार शेडगे हे उपस्थित राहणार आहेत. तरी चित्रपट रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

‘अर्धा वाटा’तून प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे एकत्र

Newsworld Pune : रोजच्या दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या संदर्भात थेट दिल्ली पासून गल्ली पर्यंत सहज आणि सर्रासपणे वापरात येणारा शब्द म्हणजे ‘अर्धा वाटा’, आता याच शिर्षकावर लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम मराठी सिनेमा करत आहेत. सिनेमाच्या अनुषंगाने येणारा हा शब्द नेमका कशाबद्दल आहे, राजकारणाबद्दल, शिक्षणाबद्दल, समाजकारणाबद्द्ल की खेळाबद्दल आहे? की भावनेच्या संदर्भात आहे? याबद्दल अद्याप उलगडा झालेला नाही. हर्षद पाटील यांच्या ‘सी व्हेवज’ निर्मितीसंस्थे अंतर्गत राजू मेश्राम लिखित, दिग्दर्शित “अर्धा वाटा” या सिनेमातून मराठी सुपरस्टार प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. मुंबईत आणि आसपासच्या परिसरात या सिनेमाचे वेगात चित्रीकरण सुरु आहे. ‘पावर’, ‘झरी’, ‘लव्ह बेटिंग’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ सारख्या आशयघन चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले लेखक, दिग्दर्शक राजू मेश्राम “अर्धा वाटा” सिनेमाबद्दल सांगतात कि, हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे, या सिनेमातून आम्ही काही वेगळं सांगू पाहतोय, जसे की सिनेमाचे शीर्षक आहे, अर्धा वाटा, हा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नोंद घेणारा शब्द आहे, कुणाच्या सुखात तर कुणाच्या दुखात, कुणाच्या यशात तर कुणाच्या अपयशात कुणाचा तरी अर्धा वाटा असतोच असतो, मात्र या सिनेमात ‘अर्धा वाटा’ नेमका कोणत्या अर्थाने आहे हे जरा आम्ही गुलदस्त्यात ठेवलं आहे. नेमका कुणाचा आणि कशात अर्धा वाटा हे प्रत्यक्ष सिनेमात बघून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ‘धर्मवीर’ सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर मराठी सुपरस्टार प्रसाद ओक, यांना वेगळ्या भूमिकेत बघण्याची संधी या सिनेमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रसाद सिनेमाबद्दल सांगतात कि, सर्वप्रथम लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी जेव्हा मला या सिनेमाची गोष्ट ऐकवली त्याच क्षणी मी सिनेमात काम करण्यास होकार दिला. मला त्यांच्या सिनेमाचा विषय खूप आवडला, सिनेमाचा विषय आम्ही मुद्दाम गुपित ठेवला आहे, भावबंधाचे विश्व उलगडणारा हा सिनेमा एक वेगळा अनुभव देऊन जाईल यात शंका नाही. या सिनेमातली माझी भूमिका कदाचित तुम्हाला चकित करू शकणारी ठरू शकेल, पण हे सर्व प्रेक्षकांनी सिनेमात बघावं अशी माझी इच्छा आहे. मृण्मयी देशपांडे सांगते कि, एवढ्या वर्षात एकाच क्षेत्रात असूनही मी आणि प्रसाद एकत्र पडद्यावर काम केलेले नाही, त्यामुळे मी खूप खुश आहे कि, आम्ही दोघे एकत्र काम करतोय. माझ्यासाठी सुरवातीला ही थोडी आव्हानात्मक वाटत होती, पण सीनेमाची संपूर्ण कथा ऐकल्यावर माझा आत्मविश्वास वाढला, आजवर प्रेक्षकांनी मला अशा रुपात बघितले नाहीये. अशाप्रकारच्या आशयाचे सिनेमे मराठीत अवश्य यायला हवे, आणि आपण त्याचा अर्धा वाटा घेऊया या हेतूने मी ‘अर्धा वाटा’ सिनेमात काम करण्यास होकार दिला. मराठीमध्ये भावनिक, संवेदनशील सिनेमांना प्रेक्षक नेहमीच प्राधान्य देतात, “अर्धा वाटा” सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवेल यात शंका नाही.