Newaworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २२ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून त्यांनी आतापर्यंत प्रभागात अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे मार्गी लावली आहेत, असे गौरवोद्गार भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढले. सातत्य, सामर्थ्य आणि जनतेशी असलेली बांधिलकी या गुणांच्या बळावर अर्चना पाटील यांनी प्रभागात विकासाची नवी दिशा निर्माण केली असून पुढील काळातही नागरिकांना विकासाची नवी वाट मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे येत्या निवडणुकीत अर्चना पाटील यांना भरभरून मतांनी विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज अर्चना तुषार पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी पाटील कुटुंबीयांकडून परंपरेनुसार औक्षण करून त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली तसेच प्रभागातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेटस्वरूपात प्रदेशाध्यक्षांना देण्यात आली.
यावेळी बोलताना अर्चना तुषार पाटील म्हणाल्या की, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी चालू निवडणुकीचा सविस्तर आढावा घेतला, संघटनात्मक बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले तसेच आगामी लढतीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नव्या ऊर्जेसह आणि आत्मविश्वासाने जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments