पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार; ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह गायब झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

0
Newsworldmarathi Pune: पुण्यातील नामांकित रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला असून ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह गायब झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून हॉस्पिटल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अकलूज येथील रहिवासी स्मिता भगत (वय ५५) यांना उपचारासाठी १८ तारखेला पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच १९ तारखेला सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना कळवले. मृत्यूनंतर नेहमीच्या प्रक्रियेनुसार मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, मृतदेह देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांचा दावा आहे की बराच वेळ प्रतीक्षा करूनही मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला नाही. त्यानंतर अचानकपणे स्मिता भगत यांचा मृतदेह एका वेगळ्याच रुग्णवाहिकेतून त्यांच्या समोर बाहेरून आणण्यात आला. हा प्रकार पाहून नातेवाईक चांगलेच संतप्त झाले. मृतदेह नेमका कुठे होता, तो दुसऱ्या रुग्णवाहिकेतून का आणण्यात आला, याबाबत प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेनंतर नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेसह मृत्यूनंतरच्या प्रक्रियेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.

पुण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेत अस्वस्थता; पराभवानंतर मुंबईतील बैठकीत पदाधिकाऱ्यांचा संताप

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जोरदार धक्के बसले असून पक्षातील अनेक बड्या नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला. या निकालानंतर पुण्यात खरोखर शिवसेना आहे का, ती कधी होती आणि आज नेत्यांनी ती टिकवून ठेवली आहे का, असे प्रश्न पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित होत आहेत. ही अस्वस्थता नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उघडपणे समोर आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पक्षाच्या कामगिरीवरून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शिंदेसाहेबांनी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती ते नेते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला. विशेषतः एका महिला पदाधिकाऱ्यांनी अत्यंत धारदार शब्दांत काही वरिष्ठ नेत्यांवर टीका केल्याची चर्चा आहे. संबंधित महिला नेत्या केवळ आपला चमू सांभाळण्यातच व्यस्त असून संघटनात्मक बांधणी, प्रचार आणि कार्यकर्त्यांशी संवाद या बाबींमध्ये त्या अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, काही नेत्यांनी पक्षाकडे वैयक्तिक फायद्यासाठी पाहिले असून शिवसेना म्हणजे स्वतःचे उखळ पांढरे करण्याचे साधन बनवले असल्याची संतप्त भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. या स्पष्ट आणि थेट वक्तव्यांमुळे बैठकीतील वातावरण चांगलेच तापल्याचे सांगितले जाते. दरम्यान, पक्षाच्या राज्य नेतृत्वाला बैठकीतील काही मुद्दे पटल्याने नेमके कोण काय बोलले आणि त्यानंतर काय निर्णय झाले, हे बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, उघडपणे संताप व्यक्त करणाऱ्या या महिला पदाधिकाऱ्यांच्या निशाण्यावर नेमके कोणते नेते आहेत, हा प्रश्न आता पक्षात चर्चेचा विषय ठरला आहे.

गणेशजन्मानिमित्त ‘दगडूशेठ’ ला स्वराभिषेक आणि जन्म सोहळा गुरुवारी

0
Newaworldmarathi Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच गुरुवार, दिनांक २२ जानेवारी रोजी बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. विनायक अवतार असलेला हा गणेशजन्म सोहळा यंदा देखील सुवर्णपाळण्यामध्ये दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर, नगरप्रदक्षिणा असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली. गणेश जन्म सोहळ्यानिमित्त बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी पहाटे ४ ते ६ यावेळेत मंदिरात भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी हे श्रीं चरणी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण करणार आहेत. स्वराभिषेकातून विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी भक्तांना यानिमित्ताने मिळणार आहे. गणेश जन्माच्या दिवशी गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी संपूर्ण मंदिराला आकर्षक पुष्पसजावट व विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक होणार आहे. याशिवाय गणेशसुक्त अभिषेक देखील मंदिरात सुरु असणार आहेत. तसेच सकाळी ६ ते १० आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ५ यावेळेत गणेश याग होईल. मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी गणेशाची मंगल आरती होईल. नगरप्रदक्षिणा मिरवणूक सायंकाळी ६ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता श्रीगणेशाची मंगलआरती होईल. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. गणेशजन्माच्या दिवशी पहाटे ३ वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. तरी भाविकांनी विविध कार्यक्रमांत सहभागी होत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.

दिलेला शब्द २४ तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली

Newsworldmarathi Pune: हिराबाग हाउसिंग सोसायटी येथील एसआरए प्रकल्पातील अस्वच्छतेचा प्रश्न अवघ्या २४ तासांत, नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी मार्गी लावला आहे. या इमारतीतील डक्टमध्ये साठणाऱ्या कचऱ्याला अटकाव करण्यासाठी संपूर्ण इमारतीत जाळ्या लावण्याच्या कामाला, आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान या इमारतीतील रहिवाशांनी कचऱ्याची गंभीर समस्या बाप्पु मानकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. ही समस्या निवडणुकीनंतर प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले होते. त्या अनुषंगाने काल त्यांनी प्रत्यक्ष सोसायटीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून संपूर्ण इमारतीत कचरा टाकण्याची जागा बंद करण्यासाठी जाळ्या लावण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, निर्णय झाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील करण्यात आली आहे. या कामाची पाहणी करून, समस्या पूर्णपणे सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याचाशब्द बाप्पु मानकर यांनी नागरिकांना दिला आहे. या सोसायटीतील डक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साठत असल्याने दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला होता, ज्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. वारंवार स्वच्छता करूनही पुन्हा कचरा साठत असल्याने, प्रत्येक मजल्यावर जाळ्या लावण्याची उपाययोजना करण्यात आली आहे. सर्वप्रथम डक्टच्या संपूर्ण भागाची स्वच्छता करून घेण्यात आली असून, इमारतीतील ९ मजल्यांवर ६०० हून अधिक जाळ्या बसवल्या जाणार आहेत. याचसोबत नागरिकांना डस्टबिनचे वाटप करून, ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. दिलेल्या शब्दाची त्वरित पूर्तता केल्याबद्दल रहिवाशांनी राघवेंद्र बाप्पु मानकर यांचे आभार मानले. यावेळी हिराबाग सोसायटीमधील शंकर तावरे, सचिन मुजुमले, संदीप गायकवाड, संतोष वाटमकर, पांडुरंग जावळकर, दत्ता इंगळे यांसह सोसायटीतील सदस्य व रहिवासी उपस्थित होते.

राघवेंद्र बाप्पू मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी तब्बल २६ हजार ४९७ मतांचे विक्रमी मताधिक्य

0
Newaworldmarathi Pune: पुण्यासह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी शुक्रवारी जाहीर झाली. यामध्ये राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवत पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक २५-ब येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर हे तब्बल २६ हजार ४९७ मतांच्या फरकाने विजयी ठरले आहेत. भाजपाच्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक लढवली होती. राज्यातील महापालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले. पुणे महानगरपालिकेत १२० हून अधिक जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक २५ मधील चारही जागांवर भाजपाचे राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याची कामगिरी राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी आपल्या पहिल्याच विजयात साध्य केली आहे. प्रभाग क्रमांक २५ मध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी ३१ हजार ९८१ इतकी मते त्यांना मिळाली. तब्बल ७९.३४ टक्के मते राघवेंद्र बाप्पू मानकर यांना मिळाली आहेत. त्यांच्या सोबतच पुणे महापालिकेत प्रभाग ३२-ब मधून भारतभूषण बराटे यांना २५ हजारांचे, तर प्रभाग ४-ब मधून रत्नमाला सातव यांना २३ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. मुंबई महापालिकेत निल सोमय्या यांनी १५ हजार मतांचे मताधिक्य मिळवत प्रथम क्रमांक मिळवला असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नितीन निकाळजे हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना राघवेंद्र बाप्पू मानकर म्हणाले, “माझ्या प्रभागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उभे केलेले भाजपाचे संघटन, पदाधिकाऱ्यांचे अथक परिश्रम, मित्र परिवाराने प्रचारात केलेले काम, आणि नागरिकांसाठी कामांमध्ये ठेवलेले सातत्य यामुळे मला हा मतरुपी भरभरून आशीर्वाद मिळाला. या विश्वासाबद्दल आणि प्रेमाबद्दल प्रभागातील सर्व नागरिकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. राज्यात सर्वाधिक मताधिक्य हा केवळ निवडणुकीचा निकाल आहे, प्रभागाला पुण्यासह राज्यात सर्वाधिक विकसित करण्यावर माझा भर असेल.”

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; बारामतीत स्पष्ट संकेत

0
Newsworldmarathi Pune: कृषी २०२६ प्रदर्शनाच्या निमित्ताने शनिवारी बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. या वेळी संयुक्तपणे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अभिनेता-खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दत्तात्रय भरणे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीत अलीकडील निवडणूक निकालांचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीतीवर चर्चा झाली. कृषी प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकत्रितपणे लढण्याची भूमिका जाहीर केल्याचे संकेत दिले. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची ताकद एकत्र करून संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर बारामतीत लवकरच शरद पवार आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकांबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, त्याचे पडसाद राज्याच्या आणि विशेषतः बारामती परिसराच्या राजकारणात उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.

अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर, प्रभाग 9 मध्ये मध्यरात्रीपर्यंत हायव्होल्टेज ड्रामा, कोणी उधळला गुलाल? वाचा सविस्तर..

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ (सूस–बाणेर–बालेवाडी–पाषाण) ही लढत शहरातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली होती. या प्रभागात भाजपचे उमेदवार लहू बालवडकर आणि भाजपमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अमोल बालवडकर यांच्यात थेट सामना रंगला होता. एकाच आडनावामुळे आणि राजकीय पार्श्वभूमीमुळे ही लढत अधिकच लक्षवेधी ठरली. या निवडणुकीदरम्यान राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर हे राज्यात सर्वाधिक मते घेऊन विजयी ठरतील, असे भाकीत केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रभाग क्रमांक ९ च्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांमध्येही या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ चा निकाल काल (१६ जानेवारी) रात्री उशिरा जाहीर झाला. या अटीतटीच्या आणि अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी विजय मिळवला आहे. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी मतमोजणीदरम्यान अनेक वेळा आक्षेप नोंदवले. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली होती. आक्षेप, चर्चासत्रे आणि पडताळणी यामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. अखेर रात्री उशिरा मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अमोल बालवडकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. या निकालामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपसाठी हा निकाल धक्कादायक ठरल्याचे बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक ९ चा हा निकाल आगामी शहर राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

प्रभाग 41 मध्ये राष्ट्रवादीच्या निवृत्ती आण्णा बांदल यांचा विजय; शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांना पराभवाचा धक्का

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४१ मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा पराभव झाला आहे. या प्रभागातील निवडणूक निकालामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. प्रभाग ४१ मध्ये समाविष्ट गावातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती बांदल आणि श्वेता घुले यांनी विजय मिळवला आहे. तर महंमदवाडी भागातून भारतीय जनता पक्षाचे अतुल तरवडे आणि प्राची आल्हाट हे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी दोन जागांवर यश मिळवले असून शिवसेनेला मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. महंमदवाडी-उंड्री भागातील मतमोजणीला रात्री उशिरा सुरुवात झाली होती. सकाळपासूनच कार्यकर्ते एसआरपीएफ येथील मतदान केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. निकालाबाबत प्रचंड उत्सुकता होती. मतमोजणीला विलंब होत असल्याने कार्यकर्त्यांची चुळबुळ वाढली होती. मात्र हळूहळू निकाल स्पष्ट होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. आपल्या उमेदवारांचा विजय झाल्याची बातमी कानावर पडताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. काही कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही दिसून आले. दीर्घ काळ चाललेल्या प्रचार, मेहनत आणि संघर्षाचे चीज झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा पराभव हा या निवडणुकीतील महत्त्वाचा राजकीय संदेश मानला जात असून आगामी काळात त्याचे पडसाद शहराच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कामं हरली,पैसा जिंकला: आबा बागुल

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीतील निकाल हे अनपेक्षित असून आजवर केलेली विकासकामे हरली आणि पैसा जिंकला असेच म्हणावे लागेल अशा शब्दात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी खंत व्यक्त केली. प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर – पद्मावतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी धक्कादायक पराभवानंतर बोलताना म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून काल मतदान होईपर्यंत सर्वत्र गोंधळ, तणाव,पैशाचा खेळ आणि सत्तेचा गैरवापर पाहायला मिळाला. सुज्ञ मतदार कुठेतरी या प्रकारांना आळा घालतील असा विश्वास होता.पण शेवटी पैसाच मोठा झाला. मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. वॉर्ड असो प्रभाग रचनाही बदलून मी निवडून आलो ते केवळ विकासकामांच्या जोरावर ;पण यंदा सातव्यांदा निवडणुकीला सामोरे गेलो मात्र जो पराभव पत्करावा लागला तोच मुळात अनपेक्षित तर आहे. शिवाय सत्ताधारी कोणतेही षडयंत्र रचू शकतात यावरच शिक्कामोर्तब झाले आहे. सत्तेचा गैरवापर, यंत्रणांना हाताशी धरून मोठ्याप्रमाणावर पैशाचा पाऊस पाडून विकासाला बगल देण्याची खेळी यशस्वी झाली हे लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे.वास्तविक मी ज्यावेळी अपक्ष म्हणून पहिली निवडणूक जिंकली,त्यानंतर मी सातत्याने विकासकामांवर भर दिला. मात्र यंदा जो पराभव झाला आहे,तो अनपेक्षित असल्याचे नमूद करताना आबा बागुल यांनी विकासकामांवर विश्वास ठेवून मला ज्या सुज्ञ मतदारांनी मतदान केले त्यांचे आभारही त्यांनी मानले आहेत.

पुण्यात काँग्रेसचा दणदणीत विजय; प्रशांत जगताप यांनी भाजपचे अभिजीत शिवरकर यांचा केला पराभव

0
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला दिलासा देणारा निकाल समोर आला असून, प्रभाग क्रमांक १८ ‘ड’ मधून काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला आहे. या विजयासह पुण्यात काँग्रेसने आपले खाते अधिकृतपणे खोलले असून, प्रशांत जगताप यांनी पक्षासाठी महत्त्वाचा विजय खेचून आणला आहे. या प्रभागात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. विशेष म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले उमेदवार अभिजीत शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला. अभिजीत शिवरकर हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र असून, त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र मतदारांनी हा निर्णय नाकारत काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांना कौल दिला. प्रभाग १८ ‘ड’ मध्ये ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. शेवटच्या फेरीपर्यंत चढ-उतार सुरू असताना अखेर प्रशांत जगताप यांनी निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. त्यांच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान, या निवडणुकीत प्रशांत जगताप यांची आई रत्नप्रभा जगताप या पराभवाच्या दिशेने असल्याचे चित्र दिसत आहे. तरीही प्रशांत जगताप यांच्या विजयाने प्रभाग १८ ‘ड’ मध्ये काँग्रेसने भाजपविरोधात ताकद दाखवून दिली आहे. या निकालामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून, आगामी काळात काँग्रेसला याचा राजकीय फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.