थंडीचे शहरात पुन्हा आगमन
Newsworld Pune : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे गायब झालेल्या थंडीचे शहरात पुन्हा आगमन झाले आहे. रविवारी सकाळी 19 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा नऊ अंशांपर्यंत घसरला असून, पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरमध्ये शहरात किमान तापमान १०.८ अंशांपर्यंत घसरले होते. त्यानंतर झालेल्या पावसामुळे विचित्र वातावरण तयार होऊन थंडी गायब झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना थंडीची प्रतीक्षा होती. गेल्या काही दिवसांत किमान तापमानात घट सुरू होती. रविवारी तापमान 19 अंशांपर्यंत कमी झाले. रात्री उशिरा आणि पहाटेच्या गारठ्यात वाढ झाली आहे
शरद पवार आणि राहुल गांधी देणार मारकटवाडीला भेट
Newsworld Mumbai : सोलापूर जिल्ह्यातील मारकटवाडी या गावाने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) विरोधात उभारलेला आवाज आणि मतपत्रिकेवर मतदानाची मागणी आता राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या गावाला भेट देणार आहेत. ते ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देतील, अशी अपेक्षा आहे. शरद पवार यांच्या भेटीमुळे या आंदोलनाला अधिक राजकीय वजन मिळू शकते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची देखील गावाला भेट ही महत्त्वाची ठरणार आहे. ते लाँगमार्चची सुरुवात येथूनच करणार आहेत.
मारकटवाडीतील ग्रामस्थांचा आरोप आहे की, ईव्हीएममुळे मतदान प्रक्रियेबाबत शंका निर्माण होत आहेत, त्यामुळे पारदर्शकतेसाठी मतपत्रिकेवर मतदानाची मागणी केली जात आहे. पोलिस प्रशासनाने यापूर्वी त्यांना असे करण्यापासून रोखले होते, पण त्यांच्या आंदोलनाने आता राष्ट्रीय पातळीवर ईव्हीएमविरोधातील चर्चेला धार दिली आहे.
रामटेकडीत भंगार मालाच्या गोदामाला आग
प्रयेजा पुरम सोसायटीचे रहिवासी बिल्डर विरोधात रस्त्यावर
Newsworld Pune : सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा पुरम सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रमोटर्स आणि डेव्हलपर्स यांनी सोसायटी स्थापन होऊनही प्रत्येक फ्लॅट धारकाकडून देखभालीसाठी घेतलेली रक्कम सोसायटीला अनेक वेळा पाठपुरावा करूनही दिली नाही तसेच सहकारी संस्थेच्या हस्तांतरण केले नाही, सदनिकांची पूर्ण रकमा घेऊन देखील प्रकल्पातील कामे पूर्ण न करून विश्वासघात केला याच्या निषेधार्थ प्रयेजा पुरम येथील रहिवाशांनी शनिवारी सिंहगड रोड वरील प्रयेजा सिटी येथील बिल्डरच्या सेल्स ऑफिस समोर दिवसभर धरणे आंदोलन केले. तसेच सर्व रहिवाशांनी बिल्डरच्या सेल्स ऑफिसमध्ये रात्रभर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून सर्व रहिवासी या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत.
या संदर्भात सोसायटीच्या वतीने पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे.मेसर्स भंडारी गेलडा असोसिएट यांच्यावतीने विजय बंडुलाल भंडारी व प्रयेजा डेव्हलपर्स तर्फे संदीप नारायण जानी यांनी हा प्रकल्प बांधलेला आहे. या प्रकल्पामध्ये 108 सदनिका व चार दुकाने आहेत.बिल्डरने प्रकल्पाच्या देखभालीसाठी काही सदनिका धारकांकडून दोन वर्षाचा तर काही सदनिका धारकांकडून तीन वर्षांच्या रकमा घेतलेल्या आहेत.
सोसायटीची स्थापना होऊनही बिल्डर सहकारी संस्थेचे हस्तांतरण आणि महत्त्वाचे म्हणजे बिल्डरकडे देखभाल शुल्कापोटी सुमारे 28 लाखांची रक्कम अनेक वेळा पाठपुरावा करूनही सोसायटीला हस्तांतरित करत नाही याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे. बिल्डर कडून ही रक्कम न मिळाल्यामुळे अनेक वेळा सोसायटीतील रहिवाशांना विजेचे बिल भरता न आल्याने मीटर काढून नेण्यात आले आहे तर लिफ्ट बंद पडल्यामुळे जेष्ठ नागरिकांना त्रास झाला आहे. त्यामुळे काही झाले तरी बिल्डर त्यांच्याकडे असलेली सोसायटीची रक्कम देत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका प्रयेजा पुरम येथील रहिवाशांनी घेतली आहे.
रमणबाग शाळेत ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमातून शिवसंस्कार
Newsworld Pune : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत ‘गोष्ट इथे संपत नाही ‘या लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशालेचे नामवंत माजी विद्यार्थी श्री.सारंग मांडके आणि श्री.सारंग भोईरकर यांनी अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत छत्रपती शिवरायांनी केलेल्या अफजलखान वधाची शौर्यकथा विद्यार्थ्यांसमोर सादर केली.
इतिहासाच्या पुस्तकातील घटनेचे गोष्टीरूप कथन ऐकण्यात विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई यांनी शिवसंस्कार करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ठेवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा केदारी यांनी केले तर अतिथींचा परिचय कवडे मॅडम यांनी करून दिला.उपप्रमुख जयंत टोले,पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर व अंजली गोरे सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
इंटरॅक्ट क्लब अपटाऊनची मॉडर्न हायस्कूल मध्ये स्थापना.
Newsworld Pune : रोटरी क्लब अपटाऊनच्या वतीने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर येथील इयत्ता आठवी अ च्या वर्गात रोटरी इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी डायरेक्टर युथ राजेंद्रकुमार सराफ, रोटरी क्लब अपटाऊनचे अध्यक्ष अरविंद मिठसागर, सचिव डॉ.राजेंद्र भारद्वाज, मुख्याध्यापक प्रकाश पाबळे, पर्यवेक्षक निवृत्ती गोपाळे, वर्गशिक्षिका ईशानी ढेरे आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष म्हणून कु.आदित्य धुळधुळे याची निवड करण्यात आली. सचिवपदी कु.वेदांत बारगजे याची निवड करण्यात आली. या प्रसंगी बोलतांना राजेंद्रकुमार सराफ यांनी मुलांमध्ये समाजकार्य करण्याची प्रेरणा व सामुहीक नेतृत्वविकास यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. अरविंद मिठसागर यांनी या इंटरॅक्ट क्लबमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत मिळेल असे सांगितले.
विधानपरिषदेत महायुतीच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदे?
Newsworld Mumbai : विधानसभेमध्ये महायुतीचे सभागृह नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. आता विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदावरही महायुतीतर्फे मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या विधानपरिषदेचे महायुतीतील सभागृह नेतेपद कोणाकडे जाईल, यावर चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना या पदासाठी महायुतीतून प्राधान्य देण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्रीपद सांभाळत असतानाही विधानपरिषदेत प्रभावी नेतृत्व करण्याची क्षमता शिंदे यांच्यात असल्याने त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. त्यांचा अनुभव आणि कार्यशैली महायुतीला विधानपरिषदेत फायदा करून देईल, असे मानले जाते.
महायुतीच्या निर्णय प्रक्रियेत एकजूट दाखवणे ही या नेमणुकीमागील महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.
– विधानसभेत फडणवीस, तर विधानपरिषदेत शिंदे यांची जोडी महायुतीच्या प्रभावी नेतृत्वाची ओळख ठरेल. यासंबंधी अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाईल, ज्याची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.
विद्येच्या माहेरघरात सापडला गांजा
Newsworld Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांनीच केलेल्या तक्रारीनंतर सुरक्षा विभागाने कारवाई करत दोन विद्यार्थ्यांना गांजासह ताब्यात घेतले. काल पोलिसांनी वसतिगृहात छापा टाकत ही कारवाई केली. विद्यार्थ्यांच्या अशा वागण्यामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा डागाळली असून परिसरात खळबळ माजली आहे.
पुण्यासारख्या शैक्षणिक शहरात या प्रकारांमुळे शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. पुण्यात विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सुरक्षा विभागाने गांजा ओढत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना आणि तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यालाही पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विशेष म्हणजे, वसतिगृहात गांजा सापडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्या, मात्र त्या वेळी पकडलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात न देता विषय थांबवला गेला होता. या घटनेमुळे विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
बुधवारी विद्यापीठाच्या पाचव्या वसतिगृहातील एका खोलीत काही विद्यार्थी गांजा ओढत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा विभागाने त्वरित कारवाई केली. पाहणीत दोन विद्यार्थी गांजा ओढताना सापडले. विशेष म्हणजे, तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यालाही या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शिरूर येथे बिबट्या जेरबंद
Newsworld Pune : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथे रणपिसे वस्ती येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. आज सकाळी या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आणि तालुक्यातील वडगाव रासाई नंतर याही ठिकाणी दुसराही बिबट्या जेरबंद झाला.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचा वावर वाढला आहे. मांडवगण फराटा परिसरात गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याने दोन लहान मुलांवर हल्ले केल्याने दोन मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभागाने सर्व लक्ष ऊस पट्ट्यात केंद्रित करत या भागात बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने मांडवगण फराटा परिसरात सुमारे 20 हून अधिक पिंजरे लावण्यात आले होते. तसेच न्हावरे व मांडवगण फराटा या ठिकाणी बेस कॅम्प उभारण्यात आले आहेत. दरम्यान रांजणगाव सांडस येथे गेल्या पाच दिवसांपूर्वी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर तातडीने या ठिकाणी वनविभागाने पाहणी करत पिंजरा लावला होता.
दरम्यान या लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट्या भक्ष्य खाण्यासाठी आला असताना अलगद अडकला. यानंतर तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पिंजऱ्यासह बिबट्या ताब्यात घेतला. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून वनविभाग या परिसरात सातत्याने बिबट्या जेरबंद करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करीत आहे. शुक्रवारी पहाटे एक बिबट्या जेरबंद झाला, तर गेल्या आठवड्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले होते. आतापर्यंत वनविभागाने एकूण तीन बिबटे जेरबंद केले आहेत.
महानगर पालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Newsworld Pune : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांमुळे देशभरातील, विशेषतः महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका बराच काळ प्रलंबित होत्या.
विविध कारणांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या, पण आता या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत, त्या कारणांचं वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू शकते.
येत्या काही दिवसात महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे निवडणुका लवकरच पार पडतील. या निवडणुकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नवीन प्रशासन मिळेल, ज्यामुळे स्थानिक पातळीवरील विकास योजनांना गती मिळेल.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात
Newsworld Mumbai : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आज सुरुवात झाली असून 288 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली हा शपथविधी सोहळा होईल. देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता फडणवीस सरकारच्या कामकाजाला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.
विधिमंडळाच्या 9 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ विस्तारामुळे राज्यातील प्रशासन अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण यामुळे राजकीय समीकरणांवरही परिणाम होऊ शकतो.
अजित पवार यांना कोर्टाचा मोठा दिलासा
Newsworld Delhi : दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाच्या निर्णयाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्स विभागाने जप्त केलेली मालमत्ता मोकळी करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. या निर्णयाचा लाभ अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनाही झाला असून, त्यांच्या मालमत्तेसुद्धा मुक्त करण्यात आली आहे.
हा निर्णय पवार कुटुंबासाठी मोठा न्यायालयीन दिलासा मानला जात आहे, कारण या प्रकरणामुळे गेल्या काही काळापासून त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या निर्णयामुळे पवार कुटुंबाची मालमत्ता वापरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राजकीय व सामाजिक वर्तुळात याची चर्चा होत आहे.
राज्यात पुढचे तीन दिवस ‘यलो अलर्ट’
Newsworld Mumbai : फेंगल चक्रीवादळाच्या परिणामस्वरूप, महाराष्ट्रातील हवामानात बदल होत असून, काही भागांत पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस पावसाचे सावट राहील, आणि काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
याशिवाय, राज्यात थंडीचा जोर कमी झाला आहे. विशेषतः पुणे, नाशिक, नगर या भागांत तापमानात वाढ झाली असून, थंडीची तीव्रता घटली आहे.
सध्याच्या हवामान स्थितीनुसार, पुढील काही दिवसांत राज्यात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी.
डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाऊ : आ. अमित गोरखे
Newsworld Pune : महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील स्मारकावर मान्यवरांचा उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित केला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात दिलेल्या महान योगदानाची आठवण ठेवत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, प्रसिद्ध व्याख्याते नामदेवराव जाधव, ज्येष्ठ साहित्यिक सोपानराव खुडे, तसेच सुनील भिसे, सोपानराव चव्हाण, भीमराव पवार, विनायक मोहिते, धरम वाघमारे, संभाजी नाईकनवरे, निलेश कांबळे, विशाल कदम, शरद कोतकर, ज्ञानेश पाटील, सागर बहिरवाडे, अभिजीत देढे आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली.
या प्रसंगी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचा आग्रह व्यक्त करण्यात आला. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या तत्त्वज्ञानाचे अनुसरण करावे, असा संदेश देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
Newaworld Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार चंद्रकांत दादा पाटील, संदीपजी खर्डीकर, महेश सकट, अतुल साळवे, रवींद्र खैरे, छगन बुलाखे, संदीप शेळके, दुर्गेश हातागळे, संदीप शेंडगे, अनिल भिसे, विकास घोलप, बाबू येरगुंटे, माधव साळुंखे आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मा. नगरसेविका वर्षाताई भिमराव साठे, भाजपा अनु.जा मोर्चा अध्यक्ष भिमराव बबन साठे यांनी केले होते.
मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता : शरद पवार
Newsworld Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पवार यांनी पिचड यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्यांच्या कार्याचे आणि समर्पणाचे कौतुक केले.
यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फोन बद्दल विचारले असता ते म्हणाले “मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता,” परंतु संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे ते शपथविधीसाठी उपस्थित राहू शकलो नाही.विरोधी पक्ष नेत्याबद्दल विचारले असता, त्यांनी स्पष्ट केले की, “राज्यातील विधानसभा त्याबाबत निर्णय घेईल, आम्ही काही सांगण्याची गरज नाही.”
डॉ. श्रीकांत परदेशी यांची मुख्यमंत्री सचिवपदी निवड
Newsworld Mumbai : IAS अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. परदेशी हे त्यांच्या पारदर्शक आणि प्रगतीशील कामकाजासाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी विविध पदांवर कार्य करताना लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने उल्लेखनीय योगदान दिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदावर त्यांची नियुक्ती प्रशासनातील सुधारणा आणि निर्णय प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडून लोकहिताचे निर्णय अधिक जलदगतीने आणि प्रभावीपणे घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.
ईव्हीएम विरोधातील लढाईची दिशा मारकडवाडीने देशाला दिली : अतुल लोंढे
Newsworld Mumbai : लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरु आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मारकडवाडीने देशाला दाखवून दिला आहे.ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या आंदोलनाची देशाने दखल घेतली असून आता हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जाईल व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीने बॅलेटपेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन सुरु केले, त्या गावाला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार रामहरी रुपनवर, प्रा. यशवंत भिंगे, सुर्यवंशी, पवार आदींचा समावेश होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरही उपस्थित होते. माकरडवाडीच्या ग्रामस्थांची भेट घेल्यानंतर अतुल लोंढे म्हणाले की, मारकडवाडीची माती ही फक्त माती नाही तर भारतमाता असून गावकऱ्यांनी भारतमातेची सेवा केली आहे. महात्मा गांधींच्या चंपारण्य आंदोलनापेक्षा मारकडवाडीच्या आंदोलनाचे महत्व जराही कमी नाही. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी मारकडवाडीने खरा मार्ग दाखवला आहे. ईव्हीएम व सर्व सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून मते चोरून लोकशाही संपवण्याचा प्रकार सुरु आहे त्याविरोधात मारकडवाडीने आंदोलन छेडले आहे. आता बॅलेटपेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असेही अतुल लोंढे यांनी आश्वस्त केले.
भाजपकडून धार्मिक द्वेष पसरवण्यासह मतांचे ध्रुवीकरणाचे काम : केतकर
Newsworld Pune : “राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत लाडकी बहिण योजनेसह हिंदू विरुद्ध मुस्लिम असा अपप्रचार भाजपकडून केला गेला. धार्मिक द्वेष करत मतांचे ध्रुवीकरण झाल्याने निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार वाढून जातीय व धार्मिक विद्वेष वाढला आहे. अशावेळी देशाचे राजकीय आणि सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आव्हान आहे. आगामी काळात समाजातील सर्व घटक एकत्रित आणण्याची जबाबदारी ही काँग्रेसची असून, भारतीयत्वाची भावना जपण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. कुमार केतकर यांनी केले.
अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकारातून आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहामध्ये ‘माझे जीवन, माझे संविधान’ या कार्यक्रमावेळी डॉ. कुमार केतकर बोलत होते. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात मानवाधिकार कार्यकर्त्या ऍड. रमा सरोदे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड, उद्योजक व आंबेडकरी कार्यकर्ते मिलिंद अहिरे व पुरोगामी विचारांना पुढे नेणारा कार्यकर्ता प्रशांत धुमाळ यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ गांधी-आंबेडकर अभ्यासक अरुण खोरे प्रमुख पाहुणे म्हणून, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन जोशी होते. संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, कार्यक्रमाचे संयोजक व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, माजी नगरसेविका लताताई राजगुरू, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ आमराळे यांच्यासह चंद्रशेखर कपोते, अनिल सोंडकर, ऍड. शाबीर खान, सुरेश कांबळे, अयुब पठाण आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
डॉ. कुमार केतकर म्हणाले, “संविधान निर्मितीसाठी घटना समिती नेमली गेली, त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. स्वातंत्र्य मिळताना धर्माच्या आधारे देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे समितीवर दबाव होता की, देश केवळ हिंदुस्थान का होऊ शकत नाही. कारण, मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार होऊन अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. तेव्हाच घटनेने हिंदुस्तान असे जाहीर केले असते, तर आजचा देश निर्माण झाला नसता. संविधानमुळे आज देश टिकलेला आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्य, काश्मीर, गोवा, पंजाब, पाँडिचेरी हे देशापासून तेव्हाच धर्माआधारे तुटले असते. ब्रिटिशांनी एकसंध भारत जिंकला नव्हता, तर आपल्या अनेक संस्थानिकांनी त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. मात्र, तत्कालीन नेत्यांच्या धोरणात्मक कार्यामुळे भारत एकसंध झाला.
“फाळणीनंतर हिंसा होऊनही देश टिकला. पण आज मोठ्या प्रमाणात धार्मिक द्वेष वाढला आहे. सेक्युलर लोकांना भाजपने लक्ष्य केले. पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करून काँग्रेसवर टीका केली जाते. फाळणी, स्वातंत्र्य आणि महात्मा गांधी हत्या घटना घडल्यावर घटना समिती बैठक झाली त्यास पंडित नेहरू यांचे मार्गदर्शन होते. महात्मा गांधी यांनीच देशाचे पंतप्रधान पदासाठी नेहरू यांचे नाव सुचवले. भारताचे न झालेले पाहिले पंतप्रधान म्हणून गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा नरेंद्र मोदी यांनी उभारला आहे. हिंदू राष्ट्र निर्मिती स्वप्नासाठी भाजपने सेक्युलर आणि सोशलिस्ट शब्द यांना विरोध केला. पण सर्वोच्च न्यायलयाने त्यांना फटकारले आहे. इंदिरा गांधी यांनी देशातील अशांततेची परिस्थिती खंबीरपणे सांभाळली,” असेही केतकर यांनी नमूद केले.
जेष्ठ पत्रकार अरुण खोरे म्हणाले, “देशाच्या घटनात्मक संस्था खिळखिळ्या होत आहे. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. आंबेडकर यांनी संविधान सादर करत देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यात समानता आणण्याचा प्रयत्न केला. संविधान हा लोकशाहीचा आत्मा असून, त्याचे अनुकरण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. संविधानाच्या निर्मितीसाठी डॉ. आंबेडकर यांनी खूप तपश्चर्या केली. संविधानाप्रमाणे सरकार किंवा सत्तारूढ पक्ष आज वागत नाही, ही चिंताजनक बाब आहे. गांधी, नेहरू आणि आंबेडकर या त्रिमुर्तीमुळे देशाला संविधान मिळाले. पण त्यांच्यात भांडणे लावण्याचे काम काहीजण करत आहेत.”
प्रास्ताविक करताना मोहन जोशी म्हणाले, “सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे २० वे वर्ष आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सन २००४ मध्ये देशाचे सर्वोच्च असे पंतप्रधान पद नाकारून त्यांनी त्याग करत पक्ष आणि देशसेवा केली. त्यांच्या त्यागाची प्रेरणा पुढील पिढीस मिळावी, यासाठी हा सप्ताह दरवर्षी आयोजित करण्यात येत आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात काँग्रेस पक्षाने संविधान जागृत ठेवण्याचे काम केले आहे. राहुल गांधी यांनी यासाठी भारत जोडो यात्रा देशात काढली.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश आबनावे यांनी केले. प्रवीण करपे यांनी आभार मानले.
माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे निधन
Newsworld Pune : ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
पिचड यांना दोन महिन्यांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावत गेल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड हे महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागाचे मंत्री राहिले असून त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि राज्याच्या राजकारणात त्यांना एक अभ्यासू, समर्पित, आणि दूरदर्शी नेता म्हणून ओळखले जायचे. पिचड यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय जीवनात अकोले विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा यशस्वी नेतृत्व केले.
मधुकर पिचड हे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आदिवासी विकास, शिक्षण, आणि ग्रामीण प्रगतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यामुळे ते राज्यातील जनतेच्या हृदयात आपले स्थान निर्माण करू शकले.
मधुकर पिचड यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक समर्पित नेता गमावला आहे. त्यांच्या कार्याची आठवण जनतेच्या मनात कायम राहील. राजकीय, सामाजिक, आणि आदिवासी क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य राहील.