Newsworldmrarathi pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उद्या अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे. पुण्यात भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात युती होण्याची चर्चा सुरू असली तरी, भाजपकडून निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत लांबल्याने शिंदे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार शिवसेना (शिंदे गट) कडून अनेक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले असून, पुण्यात ही शिवसेना स्वतंत्र ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत अनेक अनुभवी व वजनदार नेत्यांनी प्रवेश केला. त्यामध्ये माजी उपमहापौर आणि सहा वेळा नगरसेवक राहिलेले उल्हास उर्फ आबा बागुल यांचा समावेश आहे. गेल्या तीन ते चार दशकांपासून प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावती परिसरात विकासाचा सातत्यपूर्ण चेहरा म्हणून आबा बागुल शहरभर परिचित आहेत.
सुमारे ३० ते ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आबा बागुल यांनी पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, उद्याने, सामाजिक सभागृहे, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा तसेच इतर मूलभूत नागरी सोयी-सुविधांवर भरीव काम केले आहे. ‘काम बोलते’ या भूमिकेतून त्यांनी कायम राजकारण केल्यामुळे नागरिकांचा विश्वास त्यांनी मिळवला असून, आजही तो कायम आहे.
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावतीमध्ये आता आबा बागुल यांची थेट लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांशी होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष विकासकामांचा अनुभव, जाती-धर्मापलीकडे सर्व समाजघटकांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि सहजस्वभावी व्यक्तिमत्त्व यामुळे ही लढत चांगलीच रंगणार असून, प्रभाग ३६ ची निवडणूक ‘हाय व्होल्टेज’ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.


Recent Comments