वाहतूक कोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन त्रिसूत्रीवर काम करा : चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश
Newsworldmarathi Pune: वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करा, असे निर्देश ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. तसेच, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक्तेनुसार सीसीटीव्ही आणि एआय चलानची संख्या वाढवा, अशी सूचना ही त्यांनी आजच्या बैठकीत केली.
कोथरुडमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार असल्याचे ना. पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार आज ना. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे संदीप खलाटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, अजय मारणे, डॉ. संदीप बुटाला, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्तानुसार झालेल्या कारावाईचा आढवा ना. पाटील यांनी घेतला. त्यामध्ये ५० वॅार्डन नियुक्तीबाबत काय कारवाई केली असा, सवाल ना. पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक शाखेकडून आश्वास्त करण्यात आले. यासोबतच वाहतूक कोंडी होणाऱ्या भागात काय उपाययोजना केल्या याचीही विचारणा ना. पाटील यांनी केली. त्यावर वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांची पाहाणी करून, आवश्यकतेनुसार वाहतूक पोलीसांची नियुक्ती केली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
या बैठकीत सीसीटीव्हीचा मुद्दा ही चर्चेत आला. त्यावर ना. पाटील यांनी वाहतूक विभागाने कोथरुडमध्ये कुठे कुठे सीसीटीव्ही लावण्याची आवश्यकता आहे, याची पाहणी करावी, लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित करु असे आश्वस्त केले. त्यासोबतच आवश्यकतेनुसार एआय बेस चलान प्रणालीचाही अवलंब करावा, असेही सूचित केले. वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करावे, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांना दिली.
दरम्यान, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी याच आठवड्यात बैठक घेणार असून, विभागाने मागील बैठकीच्या इतिवृत्तावर कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मोहोळ यांच्या निर्देशामुळे राज्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना दिलासा
Newsworldmarathi Pune: राज्यातील ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी काही बॅंका अडचणीत आहेत किंवा बंद आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना जिल्हा बँकेकडून होणार वित्त पुरवठा बंद झाला आहे. कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येत असून यात लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करण्याची सूचना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला केली होती. त्यानुसार राज्य सहकारी बँकेने थेट विविध कार्यकारी सोसायट्यांना वित्त पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि कार्यवाहीलाही सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील हजारो सेवा सोसायट्यांना आधार मिळणार आहे.
आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या किंवा बंद पडलेल्या काही जिल्हा बँकामधून विविध कार्यकारी सोसायट्यांना वित्त पुरवठा होत नव्हता. त्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांना हंगामासाठी कर्ज मिळू शकत नाही. त्यामुळे हंगामासाठी पैसे हवे असतील तर इतर पर्यायांचा अवलंब करावा लागत असल्याची बाब शेतकऱ्यांनी आणि संस्थांनी निदर्शनास आणून दिली होती.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सहकारी बँकने या विषयात लक्ष घालावे अशी सूचना बँकचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांना केली होती. आता या नियमांतील बदलामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांनाही काही निकष पाळून वित्त पुरवठ्याबाबत राज्य सहकरी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ज्या विविध कार्यकारी सोसायट्या गेली तीन वर्षे नफ्यात आहेत, ज्यांचा एनपीए १० टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, अशा सोसायट्यांना थेट वित्त पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. राज्यात एकूण २१ हजार विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमार्फत खरीप आणि रब्बी हंगामासाठी वित्त पुरवठा करण्यात येतो.
सोसायटी सक्षम तर गावही सक्षम : केंद्रीय मंत्री मोहोळ
गावचे अर्थकारण मजबूत ठेवण्यात गावातील सेवा सहकारी संस्था अर्थात सोसायट्यांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच या सोसायट्यांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकारच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय ज्या जिल्हा बँका अडचणीत आहेत, त्या बॅंकांच्या कार्यक्षेत्रातील सेवा सहकारी सोसायट्यांना शिखर बॅंकेतून थेट कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गावची सोसायटी सक्षम असेल तर गावचे अर्थकारणही सक्षम असते, म्हणूनच सोसायट्यांना कर्जपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
‘बँड कला विकास प्रतिष्ठान’च्या वतीने पुनीत बालन यांचा सत्कार; डीजे मुक्त गणेशोत्सवाच्या भूमिकेचे स्वागत
Newsworldmarathi Pune: गणेशोत्सवात डीजे लावणाऱ्या मंडळांना मदत न करण्याचा निर्णय घेऊन विधायक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचा ‘बँड कला विकास प्रतिष्ठान’ पुणे यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन दरवर्षी गणेशोत्सवात गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करत असतात. याशिवाय ढोल ताशा पथकांनाही त्यांचे मोठे सहकार्य असते. गणेशोत्सवात प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यात असल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच डिजे मुळे अनेकांना शारीरिक इजा झाल्याचेही प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर बालन यांनी यावर्षीचा गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याचा संकल्प केला असून डीजे लावणाऱ्या गणेश मंडळाना जाहिरात प्रायोजकत्वाच्या माध्यमातून मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. बालन यांनी घेतलेल्या या विधायक भूमिकेचे ‘बँड कला विकास प्रतिष्ठान’ यांनीही स्वागत केले असून याबाबत त्यांनी पुनीत बालन यांचा सत्कार केला. यावेळी प्रतिष्ठानचे ओंकार आढाव, औदुंबर शिंदे, हेमंत माने, सुवन गवळी, बाळासाहेब आढाव हे पदाधिकारी उपस्थित होते.
‘‘पुण्याच्या गणेशोत्सवाला एक वैभवशाली परंपरा आहे. या परंपरेला कुठंही गालबोट लागू नये उलट ती पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांवरच आहे. त्याचाच भाग म्हणून डीजेचा वापर करणाऱ्या मंडळांना सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं सर्वच स्तरांतून स्वागत झालं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे मंडळांकडूनही सहकार्य मिळत असल्याने हा गणेशोत्सव अधिक उंचीवर घेऊन जाण्यास मोठी मदत होणार आहे.’’पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप
नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडेंना यांच्या कार्यालयात स्वाभिमानी ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन
Newsworldmarathi Pune: राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांच्या उद्धट वर्तनाविरुद्ध स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने बिनवडेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांना नोंदणीप्रक्रियेत येणाऱ्या सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे होणारा नाहक त्रास व इतर मागण्यांकरिता स्वाभिमानी ब्रिगेडचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील व शिष्टमंडळ हे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांना भेटण्यासाठी गेले असता बिनवडे यांनी उद्धटपणे व अपमानास्पद वागणूक स्वाभिमानी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दिली. “ऑफिसच्या बाहेर निघा, मला शिकवू नका, काय करायचं ते मला समजतं” अशी अरेरावीची आणि उर्मटपणाची भाषा बिनवडेंनी वापरल्याचा आरोप सुरवसे पाटील यांनी केला आहे.
नोंदणीप्रक्रियेत सातत्याने येणाऱ्या अडचणी, सर्व्हर डाऊन, नोंदणी महानिरीक्षकांची भेटीची वेळ मिळवण्यात होणाऱ्या त्रासाबाबत चौकशीसाठी गेलेल्या नागरिकांना एका प्रशासकीय अधिकाऱ्याने अक्षरशः अपमानित करून हाकलल्याचे घटनेने खळबळ उडाली आहे.
बिनवडेंच्या या कार्यपद्धतीविरोधात स्वाभिमानी ब्रिगेडकडून जोरदार घोषणाबाजीसह ठिय्या आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी ॲड.कृष्णा साठे, ॲड.सुधीर शिंदे, सचिन मोरे, तेजस गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, देवेंद्र खाटेर, सोनू आंधळे, आदित्य शेटे, आकाश नवले, सागर घाडगे, यश मोरे, बाबा मिसाळ हे उपस्थित होते.
रोहन सुरवसे पाटील म्हणाले, नोंदणी महानिरीक्षकांचे कार्यालय हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे की विशेष लोकांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जर अशा प्रकारची वागणूक बिनवडे यांच्यासारखा अधिकारी देत असेल तर सामान्य माणूस आपले प्रश्न घेऊन गेल्यास काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा. आम्ही सामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन भेटण्यासाठी गेलो असता, बिनवडे यांनी आम्हाला अक्षरशः हाकलून लावले. आवाज चढवत ऑफिसमधून बाहेर व्हा असे उद्धटपणे बोलले. म्हणून आज आम्ही ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदवला आहे. लोकांची कामे करता येत नसतील तर अशा अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला हवा.
लवकरच आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन रविंद्र बिनवडे यांच्या निलंबनाची मागणी करणार आहोत; असेही सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे.
न्यू अंबिका कला केंद्र गोळीबार प्रकरणातील बाळासाहेब मांडेकरसह तिघांना यवत पोलिसांकडून अटक
Newsworldmarathi Pune: दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्र येथे झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात मुख्य आरोपी बाळासाहेब मांडेकरसह इतर तीन आरोपींना यवत पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पुण्यातून ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.
ही धक्कादायक घटना २१ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली होती. या गोळीबारामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. बाळासाहेब मांडेकर हा एका आमदाराचा भाऊ असल्याने, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊन ते दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात होते. मात्र ही घटना प्रसारमाध्यमांमधून समोर आल्यानंतर यवत पोलीस सतर्क झाले आणि कारवाईस गती दिली.
या प्रकरणी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि शेवटी मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात यश मिळवले.
सध्या अटक केलेल्या आरोपींना अधिक तपासासाठी यवत पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील चौकशी सुरू असून, उर्वरित आरोपी आणि गोळीबारामागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी पुढील कारवाई अधिक तपशीलवारपणे करण्यात येत आहे.
पुण्यात अमानुष घटनेनं खळबळ; गर्भवती पत्नीला मारहाण केल्याने गर्भपात
Newsworldmarathi Pune: पुण्यातील एरंडवणे परिसरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रवी (वय 35 वर्षे) या व्यक्तीने आपल्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला इतकी अमानुष मारहाण केली की तिचा गर्भपात झाला. या प्रकरणामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेने अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गंभीर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवी हा पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे. तो तिला मानसिक आणि शारीरिक छळ देत होता. सततच्या त्रासामुळे पीडित महिला आधीच धास्तावलेली होती.
ही अमानुष घटना 20 जुलै रोजी रात्री सुमारे साडेअकरा वाजता घडली. रवीने त्या रात्री पुन्हा एकदा पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने तिच्या पोटावर जोरात लाथ मारली. त्यानंतर तिचे केस धरून फरफटत नेले आणि जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीमुळे पीडितेचा गर्भपात झाला, असे डॉक्टरांच्या तपासणीत निष्पन्न झाले.
या अमानवी कृत्यामुळे आरोपीवर महिला अत्याचार, मारहाण, गर्भपात घडवून आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक; राज्यभर चक्काजाम आंदोलनाची सुरुवात
Newsworldmarathi Amravati: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाकडून वेळोवेळी केल्या गेलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी प्रहार संघटनेने आजपासून राज्यभरात चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा” या मुख्य मागणीसाठी बच्चू कडूंनी अलीकडेच विदर्भात व्यापक पदयात्रा काढली होती. या पदयात्रेदरम्यानच आंदोलनाच्या पुढील टप्प्यांची दिशा ठरवण्यात आली होती. त्यानुसार, शासनाला दडपणात आणण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. रस्त्यावर ठिय्या देत आंदोलकांनी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
बच्चू कडूंनी स्पष्ट केले आहे की, केवळ आश्वासनांवर वेळ काढणाऱ्या शासनाला आता प्रत्यक्ष निर्णय घ्यायला भाग पाडले जाईल. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्य सरकारने त्वरीत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मा. नगरसेविका अर्चना पाटील यांच्या वतीने हेल्थ कार्ड वाटप
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात मा. नगरसेविका अर्चना तुषार पाटील व भाजप उपाध्यक्ष तुषार पाटील यांच्या वतीने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत) अंतर्गत मोफत हेल्थ कार्ड वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचा आज दुसरा दिवस यशस्वीपणे पार पडला असून, प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा मिळविण्याचा मार्ग मोकळा होत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वर्षभरात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात, हे लक्षात घेता हे हेल्थ कार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे असून, या शिबिरामुळे अनेक कुटुंबांना आरोग्य संरक्षणाचा हक्क मिळणार आहे. अशा प्रकारचे उपक्रम हे केवळ सामाजिक बांधिलकी नव्हे तर सार्वजनिक हिताचे उत्तम उदाहरण आहे.
हे हेल्थ कार्ड वाटप शिबीर पुढील तीन दिवस सुरु राहणार असून, प्रभागातील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका अर्चना पाटील यांनी केले आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन नागरिकांनी ठरविलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे, असेही आवाहन अर्चना पाटील व तुषार पाटील यांनी केले.
“पुणेची मेट्रो निवडणुकीसाठी बिहारला?; युवक काँग्रेस आक्रमक”
Newsworldmarathi Pune: बिहारची निवडणूक तोंडावर असल्याने मतदारांना खुश करण्यासाठी पुण्याची मेट्रो बिहारला पळवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणुकीपूर्वी पाटणा मेट्रो सेवा सुरु करण्यासाठी महामेट्रो रेल कॉर्पोरेशनने राजकीय दबावाला बळी पडत पुण्यासाठी राखीव असलेली मेट्रो गाडी तीन वर्षांच्या भाडेकरारावर बिहारला दिल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केला आहे. ही मेट्रो गाडी तात्काळ पुण्यात परत आणली नाही, तर महामेट्रो कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आबनावे यांनी दिला.
प्रथमेश आबनावे म्हणाले, “शहराच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पुणे मेट्रो अधिक सक्षम व विस्तारित करण्याची गरज आहे. आजघडीला दररोज सरासरी १.८० लाख प्रवासी मेट्रोचा वापर करीत आहेत. गाड्यांची वारंवारिता वाढवण्यासह प्लॅटफॉर्मवरील गर्दी आणि नव्याने सुरु होणाऱ्या मेट्रो मार्गिका यांसाठी राखीव गाड्यांची उपलब्धता असणे गरजेचे आहे. मात्र, पाटणा मेट्रोला ट्रायलसाठी सध्या स्वतःची मेट्रो ट्रेन नसल्याने पुण्याची ट्रेन तिकडे पाठवण्यात आली. हा निर्णय घेताना पुण्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री किंवा नागरी प्रतिनिधीना विश्वासात घेतले का? हा प्रश्न आहे. तसेच भाडेकराराच्या अटी नेमक्या काय आहेत?, पुण्यासाठी नवीन ट्रेन संच कधी येणार आहे आणि बिहारला दिलेली मेट्रो ट्रेन परत येणार आहे का? याबाबत आम्हाला शंका आहे.”
“पुणे मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या ३४ मेट्रो ट्रेन संचांपैकी एक राखीव संच (तीन डब्यांची मेट्रो ट्रेन) महामेट्रो रेल कॉर्पोरेशनने पाटणा मेट्रो प्रकल्पासाठी भाडेतत्वावर पाठवला आहे. सदर ट्रेन आता बिहारमधील गीतागड येथील डेपोत आहे. त्यामुळे आता फक्त ३३ संच पुणे महामेट्रोकडे उपलब्ध आहेत. इथे मेट्रो ट्रेनची गरज असताना बिहारला मेट्रो ट्रेन पाठवणे अयोग्य आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुण्याच्या विकासावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. ही मेट्रो बिहार निवडणुकीपूर्वी सुरू होणाऱ्या मेट्रोसेवेचे श्रेय घेण्यासाठी पळवण्यात आली आहे,” असा आरोप त्यांनी केला.
पुण्याची मेट्रो सेवा अजून अपूर्ण आहे. प्रवासीसंख्या वाढत आहे. नवीन मार्ग सुरू होणार आहेत. अशावेळी ही मेट्रो बिहारला पाठवणे म्हणजे पुण्याच्या विकासाला मागे टाकणे आणि बिहारसारख्या राज्याच्या राजकीय अजेंड्यासाठी महाराष्ट्राच्या लोकसेवेला दुय्यम स्थान देण्यासारखे आहे.प्रथमेश आबनावे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
“दीपक टिळक यांच्या जाण्याने टिळक घराण्याच्या तेजस्वी परंपरेचे विचारवंत प्रतिनिधित्व हरपले; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”
Newsworldmarathi Pune: लोकमान्य टिळकांचे पणतू, ‘केसरी’ वृत्तपत्राचे विश्वस्त व संपादक तथा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक जयंतराव टिळक यांच्या दुःखद निधनाबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आज त्यांनी टिळक कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व या कठीण प्रसंगी कुटुंबियांना धैर्याने उभे राहण्यासाठी प्रोत्साहित केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “टिळक घराण्याच्या तेजस्वी परंपरेचे ते प्रभावी आणि विचारवंत प्रतिनिधी होते. शिक्षण, पत्रकारिता व समाजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान अनुकरणीय आहे. ‘केसरी’ चे संपादक म्हणून त्यांनी लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रहितवादी विचारधारेला आधुनिक समाजात अर्थपूर्ण पद्धतीने पेरले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण, मूल्य आणि संस्कारांची दिशा दिली.”
त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक प्रतिभाशाली विचारवंत, कुशल प्रशासक आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व गमावले असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
या दुःखद प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी टिळक कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या व ईश्वराने या कठीण काळात कुटुंबियांना धैर्य द्यावे, अशी प्रार्थना केली.

