अजित पवारांचा मिश्कील फटका! ‘बायको म्हणते, कुठून याची नजर इतकी बारीक…’
Newsworldmarathi Baramati: Ajit Pawar : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उल्लेख करत एक हसवणारे विधान केले, ज्याने उपस्थितांना हसण्याची संधी दिली. तसेच, साखर कारखान्यावरील कर्जाच्या आरोपांना खोडून लावत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. 24 जूनच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आपली कामगिरी आणि चेअरमनपदाची तयारीही मांडली.
काय म्हणाले अजित पवार?
“अर्ध पुतळ्याला हार घालण्यासाठी गेलो होतो. तिथे वठलेली झाडं पाहून लगेच सांगितलं की ती काढून टाका. माझी नजर एवढी बारीक आहे की माझी बायको म्हणते, कुठून याची नजर इतकी बारीक आहे. मला नीट लक्ष ठेवायला आवडतं, हे माझं पॅशन आहे,” असे म्हणत अजित पवारांनी मंचावर हशा पिकवला. त्यांनी पुढे सांगितले की, “विरोधक सांगतात साखर कारखान्यावर कर्ज आहे, पण 239 कोटींचा साखर साठा आणि वसंतराव शुगर इन्स्टिट्यूटचा पुरस्कार हे त्यांचे दावे खोटे ठरवतात.”
निवडणूक आणि चेअरमनपद
“मीच तुमचा प्रतिनिधी आहे, घाबरून जाण्याचं कारण नाही. 24 जूननंतर मी कुठे पळून जाणार नाही. मीच चेअरमन होणार आहे आणि सर्व नियमानुसार काम करेन. एफआरपीपेक्षा जास्त दर दिला आहे,” असे पवार म्हणाले. त्यांनी विरोधकांच्या “शेवटची निवडणूक” या टिकेवरही प्रत्युत्तर देत, “वय झालं की विस्मरण होते, पण माझ्या काळातील प्लॅनिंग आणि इमारती बघा. कामगार भरतीत संधी देणार आहे,” असे आश्वासन दिले.या मिश्कील आणि आत्मविश्वासपूर्ण भाषणाने माळेगावातील सभेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक विलंब! न्यायाधीश रजेवर, सुनावणी 24 जूनपर्यंत पुढे
Newsworldmarathi Beed: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष मकोका न्यायालयात पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायाधीश रजेवर असल्याने आज (16 जून 2025) होणारी सुनावणी आता 24 जून रोजी होणार आहे. या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडच्या आरोप निश्चितीबाबत महत्त्वाचा युक्तिवाद होणार होता, पण न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे कारवाई लांबणीवर पडली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतरांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. गेल्या सुनावणी (3 जून) मध्ये सरकारी वकील उज्वल निकम यांनी पुरेसे पुरावे असल्याचे सांगत आरोप निश्चितीची मागणी केली होती. मात्र, कराड यांच्या वकिलांनी डिजिटल पुरावे मिळाले नसल्याचा युक्तिवाद केला असून, त्यांच्या दोषमुक्तीचा अर्जही दाखल आहे. आज या मुद्द्यावर पुन्हा चर्चा होणार होती, पण ती आता पुढील तारखेला होईल. दरम्यान, आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
विराजच्या शिक्षणाची जबाबदारी
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतले होते. त्यांनी मुलगा विराज याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली असून, तो आता सांगलीतील रेठेधरण सैनिकी शाळेत शिकणार आहे. याबाबतचे पत्र धनंजय देशमुख (संतोष यांचे भाऊ) यांना वर्षा निवासस्थानी सुपूर्द करण्यात आले, ज्यावेळी आमदार अभिमन्यू पवार आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते.
पित्याचे छत्र हरपल्यानंतरही नीट परीक्षेत यश
सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने १२वी विज्ञानच्या यशानंतर नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे. आता ती वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. तिच्या शिक्षणाची जबाबदारी अनेक राजकीय नेत्यांनी घेतलेली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना आणि पित्याचे छत्र हरपल्यानंतरही वैभवीने खचून न जाता १२ वी विज्ञान परीक्षेत ८५.३३ टक्के मिळविले होते. या यशानंतर तिने नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे.
शेतीला AI क्रांती ! आणीबाणी कारावासीयांचं मानधन दुप्पट, मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय
Newsworldmarathi Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (17 जून 2025, दुपारी 3:30 IST) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय घेण्यात आले, ज्यांनी राज्याच्या विकासाला नवी दिशा दिली आहे. या बैठकीत शेतीसाठी ‘महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण 2025-2029’ मंजूर करत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर सुरू करण्यात आला, तर आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यासह धारावी पुनर्विकास आणि अनिवासी भारतीयांच्या मुलांच्या शिक्षणाला चालना देणारे निर्णयही मंजूर झाले.
शेती आणि तंत्रज्ञानाला बळ
‘महाॲग्री-एआय’ धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, रोबोटिक्स आणि डिजिटल शेतीशाळा यांचा वापर करून शेती क्षेत्रात क्रांती घडवण्याचा मानस आहे. हवामान आधारित सल्ले आणि ‘क्रॉपसॅप’सारख्या प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे (AWS) उभारण्यासाठी ‘WINDS’ प्रकल्पाला मुदतवाढ मिळाली.
आणीबाणीतील हुतात्म्यांना सन्मान
आणीबाणीच्या काळात (1975-77) कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे हयात जोडीदारालाही लाभ मिळेल, ज्यामुळे ‘गौरव योजना’ला नवा आयाम प्राप्त होईल.
इतर महत्त्वाचे निर्णय
नाशिकमध्ये ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर: जांबुटके येथील 29.52 हेक्टर जमीन आदिवासी उद्योजकांसाठी राखीव ठेवण्यात आली.
MMRDA प्रकल्प: रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी मुद्रांक शुल्कात सवलत, विदेशी गुंतवणुकीस चालना.
मुंबई मेट्रो: मार्ग 2A, 2B आणि 7 साठी कर्ज मिळण्यास मुदतवाढ.
धारावी पुनर्विकास: विशेष हेतू कंपनीसाठी मुद्रांक शुल्क माफ, पुनर्वसनाला गती.
विरार-अलिबाग मार्गिका: ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावर प्रकल्प मंजूर.
शैक्षणिक सुविधा: पहाडी गोरेगाव येथील जमिनीवर विधि विद्यापीठासाठी मुद्रांक शुल्क माफी.
NRI मुलांचा प्रवेश: व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन धोरण मंजूर.
या निर्णयांनी महाराष्ट्राच्या शेती, उद्योग आणि सामाजिक कल्याणाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बैठकीनंतर मंत्र्यांनी सविस्तर माहिती जाहीर केली असून, लवकरच अंमलबजावणीला सुरुवात होईल.
समाज सुधारण्यासाठी दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्ही महत्वाचे : जान्हवी धारीवाल बालन
Newsworldmarathi Pune : रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाऊंडेशन द्वारा आयोजीत शोभाताई आर धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त एच व्ही देसाई आय हॉस्पिटल येथे मोफत नेत्र तपासणी , ५०१ मोतीबिंदूं रुग्णांच्या तपासणी व शस्त्रक्रिया , वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप, रक्तदान शिबीर व आर एम डी इंग्रजी शाळा कोंढवा, लोणीधामणी गाव , कासारी गाव , नवलेवाडी पिंपरी पेंढार या गावांमध्ये वृक्षारोपण असे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शोभाताई आर धारीवाल उपाध्यक्षा,जान्हवी धारीवाल बालन अध्यक्षा आर एम डी फाऊंडेशन, नितीनभाई देसाई विश्वस्त एच व्ही देसाई आय हॉस्पिटल , इंद्राणी बालन फाऊंडेशन व बालन ग्रुप चे अध्यक्ष पुनीतदादा बालन , परवेझ बिलिमोरिया कार्यकारी संचालक तसेच रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग व शिकावू विध्यार्थी ,विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी, उपस्थित होते.
या प्रसंगी जान्हवी धारीवाल बालन यांनी श्री रसिकशेठ धारीवाल यांनी आर एम डी फाऊंडेशनची स्थापना करून समाजातील सर्वच घटकांसाठी विविध योजना यामध्ये मोफत गुजरात राज्यातील कॅन्सर हॉस्पिटल, ससून पुणे येथील सर्व सोयीयुक्त अपघात रुग्णालय , नाशिक येथील आर एम डी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर , पूना हॉस्पिटल येथे कार्डीयाक कक्ष , तसेच शिक्षण क्षेत्रात फार्मसी , व्यवस्थापन , अभियांत्रिकी महाविद्यालय सोबतच इंग्रजी शाळांची स्थापना , हुशार व गरजू विध्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती , पर्यावरण क्षेत्रात खडवासला धरणाचा गाळ काढून पाण्याचा स्तर वाढविणे , शेकऱ्यांसाठी बंधारे बांधणे इत्यादी समाजपयोगी कामं केलीत.
हे सर्व प्रकल्प आखतांना आई शोभाताई यांचा सिंहाचा वाटा असे अशी माहिती दिली . मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले . श्री पुनीत बालन यांनी समाजाचे ऋण फेडतांना कमाईतील वाटा समाजासाठी खर्च करणे हि सामाजिक जबाबदारी असून आज शोभाताईच्या जन्मदिनानिमित्त नक्कीच हॉस्पिटल च्या कार्यात आमचाही सहभाग असेल असे आश्वासन दिले.
त्यानंतर फाऊंडेशनद्वारा प्रायोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा धनादेश व शिष्यवृत्तीच्या विध्यार्थ्यांचे धनादेश वाटप करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले .
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती
Newsworldmarathi sambhajinagar: महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच त्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी महिला आयोग कायम आपल्या सोबत आहे. ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘आरोग्य मित्र’ उपक्रम राबविण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज येथे केले. बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी असे आवाहनही त्यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशवी काढणे तसेच त्यांच्या आरोग्य समस्या, बालविवाह, महिला अत्याचार याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
चाकणकर म्हणाल्या की, महिला आयोगाच्या वतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्या आदींबाबत जनजागृती करण्यात येत आहे. बालविवाह रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामामध्ये गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका असून गावातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कोणाच्या दबाबाला बळी न पडता बालविवाह आदी कुप्रथा रोखण्यासाठी संकल्प करावा. समाजातील वाढती बालविवाहाची कुप्रथा रोखणे हे सर्वांचे कर्तव्य असून बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बीडसह मराठवाडयातील अनेक जिल्हयात ऊसतोड महिला कामगार स्थलांतर करतात, त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत, यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून यावर्षी ‘आरोग्य मित्र’ उपक्रम राबविण्यात येत आहे, या उपक्रमा अंतर्गत ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलेसाठी त्याच समुहातील एकाची आरोग्य मित्र म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे, आरोग्य मित्र ऊसतोड महिलेला येणाऱ्या आरोग्याच्या समस्याबाबात गावातील आशासेविका तसेच अंगणवाडी सेविकांच्या संपर्कात असेल. यातून ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांना आरोग्याच्या सेवा तत्परतेने देणे शक्य होणार आहे, ही अभिनव संकल्पना नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास श्रीमती चाकणकर यांनी व्यक्त केला.
ऊसतोड महिलांनी गर्भपिशवी काढण्याच्या प्रकाराबाबतही श्रीमती चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली. महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांना सहकार विभागाने आरोग्यासह त्यांना आवश्यक सोईसुविधा देण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी यंत्रणेला दिले.
आरोग्याच्या उपसचिव डॉ. बैनाडे म्हणाल्या, महिलांना आरोग्यासह सर्व सुविधा मिळतात की नाही, याबाबत महिनानिहाय आढावा घेण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्याची तपासणी नियमित होण्याची गरज असून बीड जिल्हयातील गर्भपिशवी काढण्याच्या प्रकाराबाबत त्यांनी सबंधित यंत्रणेकडून माहिती जाणून घेतली. स्वंयसेवी संस्थांना सोबत घेत चांगले काम करूया, असे त्या म्हणाल्या.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, जनजागृती, प्रशिक्षण व तपासणी या तीनही बाबीवर आपले काम सुरू आहे. सर्व विभागांनी महिलांच्या अडचणीवर समन्वयाने काम केले तर निश्चित महिलांच्या अडचणी मार्गी लागतात, असे ते म्हणाले.
बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ऊसतोड महिलांसाठी नव्याने सुरू केलेल्या आरोग्य मित्र या उपक्रमाबाबत माहिती दिली. महिलांना ‘आरोग्य मित्र’ उपक्रमातून निश्चितपणे मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले.
विभागीय महिला व बालविकास उपायुक्त रेश्मा चिमंद्रे यांनी विभागातील महिला विषयक उपक्रमाबाबत माहिती दिली.
यावेळी सामाजिक चर्चेत सामजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत महिला, सामजिक संस्थांच्या प्रतिनिधी महिला तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालखी सोहळ्यासाठी ६१ फूट श्री विठ्ठल मूर्ती व १६ फूट तुळशीचा देखावा; वारकरी सेवा प्रतिष्ठानची भव्य तयारी
Newsworldmarathi Pune: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, पुण्यात वारकरी सेवा प्रतिष्ठानच्यावतीने एक भव्य आणि देखणा देखावा साकारण्यात येत आहे. या देखाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे तब्बल ६१ फूट उंचीची श्री विठ्ठलाची मूर्ती आणि १६ फूट उंचीची तुळस. प्रतिष्ठानचे शिवाजी गदादे पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, सध्या या देखाव्याच्या तयारीला वेग आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो वारकरी भक्त टाळ, मृदुंग आणि अभंगाच्या गजरात पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने, विठुरायाच्या प्रतिकात्मक रूपात उभारण्यात येणारी ६१ फूट उंच मूर्ती आणि १६ फूट उंच तुळस, भक्तांच्या श्रध्दास्थानाला भव्य रूप देणार आहेत.
या देखाव्याच्या माध्यमातून वारकरी परंपरेची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धी अधोरेखित करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. यासाठी खास रोषणाई, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि वारकरी भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्थानिक तरुण, स्वयंसेवक आणि प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा सहभाग या उपक्रमात मोठ्या प्रमाणात असून, सर्वजण एकत्र येऊन या सोहळ्याचे उत्सवात रूपांतर करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
या भव्य आयोजनामुळे पालखी मार्गावरील वातावरण आध्यात्मिकतेने भारले जाईल, असा विश्वास आयोजक व्यक्त करत आहेत. वारकरी परंपरेचा प्रचार आणि प्रसार साधण्याच्या दृष्टीने ही कलाकृती विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
शिक्षकेतर पदभरती प्रक्रियेतील दिरंगाईचा निषेध; पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
Newsworldmarathi Pune : राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांवर भरती प्रक्रियेबाबत शासनाने ४ एप्रिल २०२५ रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. अनेक वर्षांनंतर सुरू झालेली ही पदभरती प्रक्रिया शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी संधी ठरली होती.
मात्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी २८ मे २०२५ रोजी काढलेल्या पत्रकानुसार, पदभरतीसाठी २०२३–२४ ऐवजी २०२४–२५ या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतेनंतरच रिक्त पदांचा आढावा घेऊन समायोजन प्रक्रियेनंतर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. वास्तविक २०२४–२५ हे शैक्षणिक वर्ष संपत आले असतानाही अद्याप संच मान्यता प्रक्रियेत दिरंगाई सुरूच आहे.
यामुळे पदभरती प्रक्रियेला विलंब होत असून शाळांमधील शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थापनावर गंभीर परिणाम होत आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध शिक्षकेतर कर्मचारी संघटना, मुख्याध्यापक संघटना आणि संस्थाचालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केलं.
आंदोलनादरम्यान, शिक्षण संचालकांचे पत्रक फाडून त्याचा निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सेक्रेटरी शिवाजी खांडेकर, संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष विजय कोलते, मुख्याध्यापक महामंडळाचे सेक्रेटरी नंदकुमार सागर, तसेच अन्य पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते. यानंतर यासंदर्भातील निवेदन अपर्णा देशपांडे, नायब तहसीलदार यांना देण्यात आले.
अप्पर ओटा परिसरातील लाईट समस्येवर तातडीने उपाय; मा. नगरसेविका रुपाली धाडवे यांचा पुढाकार
Newsworldmarathi Pune : प्रभाग क्रमांक अ 37, अप्पर ओटा (276) भागातील नागरिकांना गेल्या काही काळापासून सातत्याने लाईटच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे नागरिकांचे हाल सुरू होते. ही बाब मा. नगरसेविका रुपाली दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने या समस्येकडे लक्ष दिले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी तत्काळ योग्य त्या उपाययोजना राबवण्याची मागणी केली. विशेष म्हणजे स्वखर्चातून बसबार बसविण्याची जबाबदारी स्वतः रुपाली धाडवे यांनी स्वीकारली आणि काम तात्काळ पूर्ण करून दिले.
या कामानंतर मा. नगरसेविका धाडवे स्वतः अप्पर ओटा भागात भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून इतर अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनीही यावेळी आपली मते मांडत समाधान व्यक्त केले.
हा उपक्रम म्हणजे समस्या ऐकून घेऊन तातडीने कृती करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा आदर्श उदाहरण ठरतो. नागरिकांनी या कामाबद्दल मा. नगरसेविका रुपाली धाडवे यांचे आभार मानले आहेत.
प्रेमाच्या छायेत दडलेलं अंधाराचं कटू सत्य… शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित
Newsworldmarathi Pune: ‘सजना’ हा एक खास आगळावेगळा मराठी चित्रपट २७ जून २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सूड! मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे ‘सजना’ चित्रपट, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून, तो एक खास प्रसंग ठरला आहे. या ट्रेलरचे थेट प्रक्षेपण मराठीतील मनोरंजनशी संबंधित विविध चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करण्यात आले.
या ट्रेलरच्या माध्यमातून सजना चित्रपटाची एक खास झलक समोर येते. सुंदर प्रेमाची सुरुवात, विचारसरणीतील अंतर, भावनिक संघर्ष, सुडाची भावना आणि प्रत्येक वळणावर धक्कादायक ट्विस्ट यात पाहायला मिळणार आहे. नायक आणि नायिकेच्या आयुष्यात येणारे संघर्ष, मैत्रीचं प्रेमात रूपांतर, प्रेमाचं तुटणं आणि त्यातून उगम पावणारा सूड हे सगळं अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. प्रत्येक वळणावर गोष्ट बदलते, पात्रांचे रंग बदलतात आणि कथा एका अनपेक्षित शेवटाकडे प्रवास करते. शेवट अकल्पनीय आहे.
जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की सारं काही संपलं आहे, तेव्हाच ही कथा एक अनपेक्षित वळण घेते जी प्रेक्षकांचे मन सुन्न केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव सिनेप्रेमींना या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.
‘सजना’ या चित्रपटाची निर्मिती शशिकांत धोत्रे यांनी केली असून कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनही धोत्रे यांचेच आहे. छायाचित्रण रणजित माने यांनी केलं आहे. संगीत ओंकारस्वरूप यांचं असून सिनेमातील रोमान्टिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली बनली आहेत.
https://youtu.be/67FR6YMbXOQ?si=yg1QCmHkbT5HkJzU
वन्यजीव संरक्षण कायद्यात सुधारणा करण्यासाठी तज्ञांची समिती नेमवी; राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Newsworldmarathi Pune: मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वन्यजीव कायद्यात सुधारणा तसेच पावसाळ्यात सह्याद्री रांगांच्या परिसरातील दरड कोसळू नये याबाबत उपाय योजना करण्यासाठी जागतिक पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमावी व त्यांच्या अहवालानुसार कार्यवाही करावी अशी विनंती राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबतचे पत्र त्यांनी ई-मेल द्वारे पाठवले आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जागतिक दर्जाचे ज्येष्ट पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्याशी मी नुकत्याच चर्चा केली. महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षण कायद्यात काळानुसार बदल करणे व सह्याद्री रांगांच्या परिसरातील दरडी कोसळणे यावर उपाय योजना करण्याबाबत या भेटीत मी त्यांच्याशी विशेष चर्चा केली.
या चर्चेत वेगाने होणारे शहरीकरण, जंगलांचा होणारा ऱ्हास, शेती पद्धतीत होणारे बदल, वन्यजीवांच्या संख्येतील प्रादेशिक चढउतार यामुळे मानव आणि जंगली प्राणी यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे ते म्हणाले. अनेकदा जंगली प्राणी मानवी वस्तीत येऊन मानव तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत. रानडुक्कर, हत्ती, माकड यांसारखे प्राणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. मात्र वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मुळे आपण जंगली प्राण्यांना इजा पोहचवू शकत नाही. केरळने या कायद्यात सुधारणा करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. महाराष्ट्रातही अशा जंगली प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
मात्र या प्राण्यांना मारण्याची किंवा त्यांना इजा पोहचवण्याची परवानगी या कायद्यानुसार कोणालाही नाही. किंबहुना आपत्कालीन स्थितीत नुकसान करणाऱ्या प्राण्यांना मारण्यासाठी अनेक जाचक अटी आहेत. मानव आणि जंगली प्राणी दोघेही त्यांच्या अधिवासात सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी या कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. डॉ. गाडगीळ यांनी या समस्या सोडवण्यासाठी तज्ञांची समिति नेमणे आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ, गाडगीळ यांच्या व्यापक अभ्यासानुसार येत्या काही दिवसांत सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची आणि त्यातून पर्यावरण व मनुष्य हानी होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी डॉ. गाडगीळ यांना संबंधित जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांनी भेटून उपाययोजना सुरू कराव्यात. सध्या हवामानातील बदल आणि पाऊस यामुळे याबाबत तातडीने आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

