कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का ! 35 पदाधिकारी करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Newsworldmarathi kolhapur: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेत राजकीय घडामोडींनी जोर धरला आहे. काँग्रेसला मोठा झटका देत तब्बल 35 पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या रविवारी (22 जून 2025) मुंबईत होणाऱ्या या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी तयारी सुरू असून, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह 12 प्रमुख नेते पहिल्या टप्प्यात दाखल होणार आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला मजबूत कोल्हापूर हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असून, शिंदे गट निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी जोमाने कामाला लागला आहे. शिंदे यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांना काँग्रेस नेत्यांना गळाला लावण्याची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये दोन माजी महापौर, उपमहापौर आणि माजी नगरसेवकांचा समावेश असलेली 35 जणांची यादी तयार झाली असून, टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहे. देशमुखांचा मोठा निर्णय काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी नुकतीच शिंदे यांची भेट घेतली असून, त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. रविवारी होणाऱ्या सोहळ्यात देशमुख यांच्यासह 12 नेते शिवसेनेत दाखल होतील, तर पुढील टप्प्यात इतर पदाधिकारीही प्रवेश करणार आहेत. या हालचालींनी कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ माजली असून, काँग्रेसला मोठं भगदाड पत्करावं लागणार आहे. पुण्यातील फायरब्रँड महिला नेत्याची शिंदे गटात एन्ट्री महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश सचिव सोनाली मारणे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज दुपारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. पक्षातील अंतर्गत कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

कोची-दिल्ली विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग, 157 प्रवाशांचा जीव धोक्यात?

Newsworldmarathi Nagapur: Emergency Landing : कोचीहून दिल्लीकडे रवाना झालेल्या इंडिगो विमानाला (फ्लाइट नं. 6E 2706) मंगळवारी (17 जून ) दुपारी बॉम्ब धमकीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. विमानात 157 प्रवासी आणि क्रू मेंबर्स असताना ही धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. विमान सुखरूप उतरल्यानंतर सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, आता विमानाची कसून तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे विमानतळावर एकच गोंधळ निर्माण झाला आहे. धमकीनंतर तातडीची कारवाई विमान सकाळी 9.20 वाजता कोचीहून उड्डाण करून दुपारी 12.35 वाजता दिल्लीत पोहोचणार होते. मात्र, मध्यंतरी बॉम्ब असल्याचा इशारा मिळताच पायलटने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क साधला आणि नागपुरात आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. लँडिंगनंतर पोलीस, बॉम्बशोधक पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, प्रवाशांचीही चौकशी सुरू आहे. आतापर्यंत तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. सुरक्षा व्यवस्था कडक याआधी विमानांमध्ये बॉम्ब धमक्या मिळाल्या असल्या तरी त्यातून ठोस पुरावा मिळाला नव्हता. तरीही या प्रकरणात कोणतीही जोखीम न घेता प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. नागपूर विमानतळावर सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली असून, इतर विमानांच्या उड्डाण-लँडिंगवरही लक्ष ठेवले जात आहे. धमकीचा हेतू आणि सत्यता याबाबत तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्टता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या सर्वांचे लक्ष पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाच्या तपासाकडे लागले आहे.

काम एकाच रस्त्याचं, पण भूमिपूजन दोन; भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाचा संघर्ष

0
Newsworldmarathi Pune: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी एकाच रस्त्याचं दोन वेळा भूमिपूजन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांकडून करण्यात आलं आहे. ७ जून रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी या रस्त्याचे भूमिपूजन केलं होतं. या रस्त्याच्या कामासाठी त्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुप्रिया सुळे यांनी ९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केलं होतं. त्यानंतर पीएमआरडीएकडून २ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, काल अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते त्याच रस्त्याचं पुन्हा भूमिपूजन करण्यात आलं. त्यामुळे आता या रस्त्याच्या कामावरून दोन्ही गटांमध्ये श्रेयवाद चांगलाच रंगलेला पाहायला मिळतो आहे. एका रस्त्याचं दोन वेळा भूमिपूजन केल्याने स्थानिकांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. काम लवकर व्हावं ही स्थानिकांची अपेक्षा असली तरी राजकीय गटांमधील श्रेय घेण्याची स्पर्धा सध्या केंद्रस्थानी आली आहे.

वरंधा घाट मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

0
** पुणे – पुण्याहून भोरमार्गे कोकणात, विशेषतः महाडकडे जाणाऱ्या वरंधा घाट मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीसाठी वरंध घाट मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या रेड आणि ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर, मुसळधार पावसाच्या दिवसांत हलक्या वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूकही बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पावसाळ्यात वरंधा घाटात दरवर्षी दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, रस्ते खचणे आणि माती वाहून जाणे अशा घटना घडतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि अपघातांची शक्यता वाढते. यंदा घाट रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला असून, वाहनधारकांसाठी धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले असून, नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पंढरीच्या वारीची लगबग ! संत ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज पालख्यांचे 18-19 जूनला प्रस्थान, वाचा संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लीकवर…

0
Newsworldmarathi Pune: पावसाळ्याच्या आगमनासोबतच विठ्ठल भक्तांच्या मनात पंढरीच्या वारीची ओढ जागी होते. “माऊली… माऊली…”चा गजर करत हजारो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत येतात. यंदा 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी असून, मानाच्या 10 पालख्यांसह लाखो भक्त पंढरीच्या वाटेवर भक्तीत लीन होत आहेत. यामध्ये आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूतील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अनुक्रमे 18 आणि 19 जून रोजी या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वेळापत्रक 2025 19 जून: आळंदीहून प्रस्थान (गुरुवारमुळे संध्याकाळी 8 वाजता) 20 जून: आळंदी ते पुणे 21 जून: पुणे मुक्काम 22 जून: पुणे ते सासवड (दिवेघाटात वारकरी खेळ) 23 जून: सासवड मुक्काम 24 जून: सासवड ते जेजुरी (भंडारा उधळण) 25 जून: जेजुरी ते वाल्हे (खंडोबा दर्शन) 26 जून: वाल्हे ते लोणंद (सातारा जिल्हा प्रवेश) 27 जून: लोणंद ते तरडगाव 28 जून: तरडगाव ते फलटण 29 जून: फलटण ते बरड 30 जून: बरड ते नातेपुते (सोलापूर जिल्हा प्रवेश, बरड येथे गोल रिंगण) 1 जुलै: नातेपुते ते माळशिरस (सदाशिवनगर येथे गोल रिंगण) 2 जुलै: माळशिरस ते वेळापूर (खुडूस येथे गोल रिंगण) 3 जुलै: वेळापूर ते भंडी शेगाव (ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण, टप्पा येथे बंधू भेट) 4 जुलै: भंडी शेगाव ते वाखरी (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण) 5 जुलै: वाखरी ते पंढरपूर, पौर्णिमेपर्यंत मुक्काम (वाखरी येथे गोल रिंगण) 6 जुलै: आषाढी एकादशी, नगरप्रदक्षिणा 10 जुलै: पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास संत तुकाराम महाराज पालखी वेळापत्रक 2025 18 जून: देहू येथे प्रस्थान, इनामदार वाड्यात मुक्काम 19 जून: देहू ते निगडी-आकुर्डी, आकुर्डी मुक्काम 20 जून: आकुर्डी ते पुणे (नाना पेठ मुक्काम) 21 जून: पुणे (निवडुंगा विठ्ठल मंदिर मुक्काम) 22 जून: पुणे ते हडपसर-लोणी काळभोर, मुक्काम 23 जून: लोणी काळभोर ते यवत, मुक्काम 24 जून: यवत ते वरवंड चौफुला, मुक्काम 25 जून: वरवंड ते उंडवडी गवळ्याची, मुक्काम 26 जून: उंडवडी गवळ्याची ते बारामती, मुक्काम 27 जून: बारामती ते सणसर (काटेवाडी येथे मेंढी-बकऱ्यांचे रिंगण) 28 जून: सणसर ते बेलवाडी-निमगाव केतकी, मुक्काम (बेलवाडी येथे गोल रिंगण) 29 जून: निमगाव केतकी ते इंदापूर, मुक्काम (इंदापूर येथे गोल रिंगण) 30 जून: इंदापूर ते सराटी, मुक्काम 1 जुलै: सराटी ते अकलूज, मुक्काम (सोलापूर जिल्हा प्रवेश, अकलूज येथे गोल रिंगण) 2 जुलै: अकलूज ते बोरगाव, मुक्काम (माळीनगर येथे उभे रिंगण) 3 जुलै: बोरगाव ते पिराची कुरोली, मुक्काम 4 जुलै: पिराची कुरोली ते वाखरी, मुक्काम (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण) 5 जुलै: वाखरी ते पंढरपूर, मुक्काम (वाखरी येथे उभे रिंगण) 6 जुलै: आषाढी एकादशी, नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नान 10 जुलै: पंढरपुरातून देहूकडे परतीचा प्रवास वारीची तयारी जोमात ऊन-पावसाची पर्वा न करता विठुरायाच्या भक्तीने भारलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर चालतात. यंदाच्या वारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या सहभागी होत असून, प्रशासनानेही तयारी पूर्ण केली आहे. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे हे वेळापत्रक वारकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

नाशिक ते मुंबई….! सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशावर सस्पेन्स; बावनकुळेंना अंधारात ठेवत पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील, नेमकं काय घडलं?

BJP Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मधून हकालपट्टी झालेले नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला मंगळवारी (17 जून) दुपारी 1 वाजता मुहूर्त ठरला आहे. मात्र, या प्रवेशापूर्वी रात्री उशिरा पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला असला, तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना याची माहितीच नव्हती, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बडगुजर हजारो समर्थकांसह मुंबईला रवाना झाले असताना, बावनकुळेंच्या अनभिज्ञतेच्या वक्तव्याने पक्षप्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली होती. बावनकुळे काय म्हणाले? चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, “बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत मला काहीच माहिती नाही. स्थानिक पदाधिकारी, खासदार आणि आमदारांशी सल्लामसलत न झाल्यास पक्षप्रवेश होत नाही. नाशिकमधील स्थानिक नेत्यांचा बडगुजरांच्या प्रवेशाला विरोध आहे, कारण निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात लढलो आहोत.” स्थानिक पातळीवरील नाराजी आणि गेल्या निवडणुकीतील वैरामुळे बडगुजरांचा प्रवेश रोखला जाऊ शकतो, असे त्यांनी सूचित केले. बडगुजरांचा आत्मविश्वास बावनकुळेंच्या वक्तव्याने संभ्रम निर्माण झाला असताना, बडगुजरांनी मात्र आत्मविश्वास दाखवला. “मी मुंबईत गेल्यावर सर्व काही स्पष्ट होईल. सर्व ठरलं आहे, त्याशिवाय मी जातोय का?” असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. पक्षश्रेष्ठींच्या रात्रीच्या बैठकीत प्रवेशाला मंजुरी मिळाल्याने बडगुजरांचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिकच्या राजकारणात खळबळ शिवसेना (UBT) मधून शिस्तभंगाच्या कारणास्तव हकालपट्टी झालेल्या बडगुजरांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले. मात्र, नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आणि बावनकुळेंना माहिती नसल्याने हा प्रवेश सावळा गोंधळात सापडला होता. आता पक्षश्रेष्ठींच्या मंजुरीनंतर बडगुजरांचा प्रवेश निश्चित मानला जात असून, यामुळे नाशिकच्या राजकारणात नवे वादळ येण्याची शक्यता आहे.

“मुंबईत आलो तर परतणार नाही!” मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा ‘आरपार’चा इशारा

Newsworldmarathi Mumbai: मराठा आरक्षणासाठी आंतरावली सराटी येथे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विधानसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी केली आणि जात पडताळणी प्रमाणपत्रांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्याची सूचना केली. जरांगे यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम राहत, “मी मुंबईला आलो, तर परत जाणार नाही,” असा थेट इशारा दिला. जात पडताळणीवरून अधिकाऱ्यांवर टीका जरांगे यांनी शिरसाट यांच्यासमोर अधिकाऱ्यांच्या चालढकलीवर नाराजी व्यक्त केली. “सरकार काम करते, पण काही अधिकारी सामाजिक न्याय विभाग आणि सरकारला बदनाम करतात. नोंदी असूनही जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विलंब केला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते,” असे ते म्हणाले. यावर शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभाग आणि मुख्य सचिवांना तातडीने प्रमाणपत्रांचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. “कोण आपलं, कोण परकं?” जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आंतरावली सराटी येथे बोलावण्याची घोषणा केली. “जे येतील ते आपले, जे येणार नाहीत ते परके,” अशी स्पष्ट भूमिका मांडत त्यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. आंदोलनावर ठाम मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला नियोजित आंदोलनावर जरांगे ठाम असून, यावेळी ते मुंबईत दाखल झाल्यास “आरपार”ची लढाई लढण्याची तयारी दर्शवली आहे. या चर्चेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

राज्यात पावसाचा कहर ! 7 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका, हवामान विभागाचा 24 तासांचा गंभीर इशारा

0
Newsworldmarathi Pune: Maharashtra Whether Alert : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले, रस्ते खचले, तर काही महामार्ग दरड कोसळल्याने तात्पुरते बंद झाले. हवामान विभागाने आज, 17 जून 2025 रोजी, 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह सात जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकणात पावसाचा धडाका कोकणात मान्सूनने जोर पकडला असून, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 17 ते 20 जूनदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईत आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर 18 जूनला मुसळधार पावसाची शक्यता आहे. 19 आणि 20 जूनला पावसाचा जोर कमी होईल, पण नागरिकांनी रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवावी. मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर 17 ते 20 जूनदरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. दरड कोसळणे आणि पूर येण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क आहे. पुणे शहर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या मैदानी भागांत आज मध्यम पाऊस, तर 18 ते 20 जूनला हलका ते मध्यम पाऊस पडेल. नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये 17 जूनला मध्यम पाऊस, त्यानंतर तुरळक सरींची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूरला हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील स्थिती धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये 17 ते 20 जूनदरम्यान हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका पाऊस पडेल. परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये 20 जूनला वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा आहे. विदर्भात जोरदार पावसाची शक्यता विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत आज जोरदार पाऊस पडेल. 18 ते 20 जूनदरम्यान पावसाचा जोर कमी होईल, पण मेघगर्जना आणि 30 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे कायम राहतील. अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. नागरिकांना सावधगिरीचे आवाहन राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने नागरिकांना स्थानिक हवामानाची माहिती घेऊनच घराबाहेर पडण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. पूर आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

0
Newsworldmarathi Pune: एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा आणि विचारधारेने चालणारी माणसे एकत्र येतात तेव्हा त्या संस्थेच्या माध्यमातून उत्तम समाजकार्य घडते. अशा संस्थांकडे मदतीचे हात येतात, लोकांचे पाय वळतात. अशी लोकांना एकत्र घेऊन जाणारी संस्था म्हणजे वसुंधरा फाऊंडेशन होय. वसुंधरा फाऊंडेशनच्या माध्यमातून पंचतत्त्वातील पृथ्वी म्हणजेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्य केले जात आहे ते गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन बाल संगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधूताई सपकाळ यांनी केले. वसुंधरा फाऊंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वसुंधरा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे सोमवारी (दि. 16) आयोजन करण्यात आले होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ममता सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ वक्ते श्याम भुर्के अध्यक्षस्थानी होते. वसुंधरा फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय भोसले, ॲड. मनिषा भोसले यांच्यासह राजेश दातार, आनंद सराफ, मोहन ठोंबरे, पियूष शहा, शिरीष मोहिते, उदय जगताप मंचावर होते. प्रिया सावंत, शैलजा लोखंडे, स्नेहल जाधव, अजित माने, सुनील रोट्टी, मेधा जेरे, प्रसाद शिवरकर, विठ्ठल सूर्यवंशी, डॉ. दत्तात्रय शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते वसुंधरा पुरस्काराने गौरव करण्यात आला. समाजभान जपणाऱ्या व्यक्तींचा वसुंधरा फाऊंडेशनतर्फे पुरस्कार देऊन सन्मान केला जात आहे ही गोष्ट स्पृहणीय आहे, असे नमूद करून ममता सिंधूताई सपकाळ म्हणाल्या, पुरस्कार मिळाल्याने पुरस्कारप्राप्त व्यक्ती अधिक जोमाने कार्यरत होतील. समाजाला त्यांच्याकडून अधिक विस्तृत स्तरावर कामाची अपेक्षा आहे. अध्यक्षपदावरून बोलताना श्याम भुर्के म्हणाले, वसुंधरा फाऊंडेशनच्या माध्यमातून कार्य करणारी माणसे ही देवमाणसे आहेत. त्याग करून घर टिकवून ठेवणे हे भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य आच, प्रेम, ममता वसुंधरा फाऊंडेशनच्या कार्यातून जाणवते. पुरस्काराच्या निमित्ताने वसुंधरा फाऊंडेशनने माणसातील चांगुलपणाची स्तुती, गौरव केला आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अभंग, लोकसंगीत व स्फूर्तीदायी भक्ती-शक्ती शिवगीतांचा संगम असलेला कार्यक्रम अवधूत गांधी आणि सहकाऱ्यांनी सादर केला. मान्यवरांचे स्वागत धनंजय भोसले, ॲड. मनिषा भोसले, उदय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज देशपांडे, शिल्पा देशपांडे यांनी केले. सुरुवात ॲड. मनिषा भोसले यांनी ‌‘असेच एक झाड होऊया‌’ ही स्वरचित कविता सादर केली. मोनिका गोखले यांनी नृत्याद्वारे गणेशवंदना सादर केली.

कै. श्रीकांत भडके विद्यालयात मा. नगरसेवक श्रीकांत भीमाले यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत…

0
Newsworldmarathi Pune: संदेश नगर येथील कै. श्रीकांत भडके प्राथमिक विद्यालय, शाळा क्र. 105 मध्ये आज शाळा प्रवेशोत्सव आणि पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न झाला. माजी नगरसेवक श्रीकांत भीमाले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी भीमाले यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस म्हणजेच नव्या ज्ञानयात्रेचा शुभारंभ असतो. नवीन पुस्तकांचा सुवास, टवटवीत दप्तर, वॉटरबॅग आणि शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह पाहून, “माझे शाळेचे दिवस आठवले,” अशा भावना श्रीकांत भीमाले यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नव्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वाटण्यात आली. यावेळी पालक, शिक्षक आणि शाळेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली आहे.