Homeबातम्याऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम; राज्य महिला आयोगाच्या...

ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती

Newsworldmarathi sambhajinagar: महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच त्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी महिला आयोग कायम आपल्या सोबत आहे. ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘आरोग्य मित्र’ उपक्रम राबविण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज येथे केले. बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी असे आवाहनही त्यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशवी काढणे तसेच त्यांच्या आरोग्य समस्या, बालविवाह, महिला अत्याचार याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

चाकणकर म्हणाल्या की, महिला आयोगाच्या वतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्या आदींबाबत जनजागृती करण्यात येत आहे. बालविवाह रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामामध्ये गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका असून गावातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कोणाच्या दबाबाला बळी न पडता बालविवाह आदी कुप्रथा रोखण्यासाठी संकल्प करावा. समाजातील वाढती बालविवाहाची कुप्रथा रोखणे हे सर्वांचे कर्तव्य असून बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बीडसह मराठवाडयातील अनेक जिल्हयात ऊसतोड महिला कामगार स्थलांतर करतात, त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत, यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून यावर्षी ‘आरोग्य मित्र’ उपक्रम राबविण्यात येत आहे, या उपक्रमा अंतर्गत ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलेसाठी त्याच समुहातील एकाची आरोग्य मित्र म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे, आरोग्य मित्र ऊसतोड महिलेला येणाऱ्या आरोग्याच्या समस्याबाबात गावातील आशासेविका तसेच अंगणवाडी सेविकांच्या संपर्कात असेल. यातून ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांना आरोग्याच्या सेवा तत्परतेने देणे शक्य होणार आहे, ही अभिनव संकल्पना नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास श्रीमती चाकणकर यांनी व्यक्त केला.

ऊसतोड महिलांनी गर्भपिशवी काढण्याच्या प्रकाराबाबतही श्रीमती चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली. महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांना सहकार विभागाने आरोग्यासह त्यांना आवश्यक सोईसुविधा देण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी यंत्रणेला दिले.

आरोग्याच्या उपसचिव डॉ. बैनाडे म्हणाल्या, महिलांना आरोग्यासह सर्व सुविधा मिळतात की नाही, याबाबत महिनानिहाय आढावा घेण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्याची तपासणी नियमित होण्याची गरज असून बीड जिल्हयातील गर्भपिशवी काढण्याच्या प्रकाराबाबत त्यांनी सबंधित यंत्रणेकडून माहिती जाणून घेतली. स्वंयसेवी संस्थांना सोबत घेत चांगले काम करूया, असे त्या म्हणाल्या.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, जनजागृती, प्रशिक्षण व तपासणी या तीनही बाबीवर आपले काम सुरू आहे. सर्व विभागांनी महिलांच्या अडचणीवर समन्वयाने काम केले तर निश्चित महिलांच्या अडचणी मार्गी लागतात, असे ते म्हणाले.

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ऊसतोड महिलांसाठी नव्याने सुरू केलेल्या आरोग्य मित्र या उपक्रमाबाबत माहिती दिली. महिलांना ‘आरोग्य मित्र’ उपक्रमातून निश्चितपणे मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले.

विभागीय महिला व बालविकास उपायुक्त रेश्मा चिमंद्रे यांनी विभागातील महिला विषयक उपक्रमाबाबत माहिती दिली.

यावेळी सामाजिक चर्चेत सामजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत महिला, सामजिक संस्थांच्या प्रतिनिधी महिला तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments