Newsworldmarathi Beed: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष मकोका न्यायालयात पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायाधीश रजेवर असल्याने आज (16 जून 2025) होणारी सुनावणी आता 24 जून रोजी होणार आहे. या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडच्या आरोप निश्चितीबाबत महत्त्वाचा युक्तिवाद होणार होता, पण न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे कारवाई लांबणीवर पडली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतरांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. गेल्या सुनावणी (3 जून) मध्ये सरकारी वकील उज्वल निकम यांनी पुरेसे पुरावे असल्याचे सांगत आरोप निश्चितीची मागणी केली होती. मात्र, कराड यांच्या वकिलांनी डिजिटल पुरावे मिळाले नसल्याचा युक्तिवाद केला असून, त्यांच्या दोषमुक्तीचा अर्जही दाखल आहे. आज या मुद्द्यावर पुन्हा चर्चा होणार होती, पण ती आता पुढील तारखेला होईल. दरम्यान, आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
विराजच्या शिक्षणाची जबाबदारी
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतले होते. त्यांनी मुलगा विराज याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली असून, तो आता सांगलीतील रेठेधरण सैनिकी शाळेत शिकणार आहे. याबाबतचे पत्र धनंजय देशमुख (संतोष यांचे भाऊ) यांना वर्षा निवासस्थानी सुपूर्द करण्यात आले, ज्यावेळी आमदार अभिमन्यू पवार आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते.
पित्याचे छत्र हरपल्यानंतरही नीट परीक्षेत यश
सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने १२वी विज्ञानच्या यशानंतर नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे. आता ती वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. तिच्या शिक्षणाची जबाबदारी अनेक राजकीय नेत्यांनी घेतलेली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना आणि पित्याचे छत्र हरपल्यानंतरही वैभवीने खचून न जाता १२ वी विज्ञान परीक्षेत ८५.३३ टक्के मिळविले होते. या यशानंतर तिने नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे.


Recent Comments