भुगांव येथे बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Newsworldmarathi Pune : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या भुगांव परिसरात बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुगांव येथील खंडोबा मंदिर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास बिबट्या मुक्तपणे संचार करताना दिसला. या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला आहे. सदर प्रवासी रात्री त्या रस्त्यावरून वाहनातून प्रवास करत असताना अचानक त्याच्या गाडीसमोर बिबट्या आला. या प्रसंगी सजगतेने मोबाईल काढून त्या व्यक्तीने बिबट्याचा संपूर्ण व्हिडीओ शूट केला. व्हिडीओमध्ये बिबट्या वॉल कंपाउंडच्या भिंतीवरून फिरताना स्पष्टपणे दिसत आहे. अलीकडच्या काही दिवसांत भुगांव परिसरात बिबट्याचे अनेकदा दर्शन झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरी वस्तीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लहान मुले, शाळकरी विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. अनुचित घटना घडू नयेत यासाठी वनविभागाने तात्काळ पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

मंत्री राठोड यांच्या ताफ्यातील पोलिस गाडीचा अपघात

Newsworldmarathi Akola : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून आता राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात होताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याही ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून यात ४ पोलिस शिपाई जखमी झाले आहेत. हा अपघात अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजूजवळ झाला आहे. तर या अपघाताची भिषणता इतकी होती की वाहनाने तब्बल तीनवेळी पलटी खाली होती. सुदैवाने कोणतेही जीवितहानी झालेली नसून जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की मंत्री राठोड यांचा जळगाव जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा ठरला होता. त्याप्रमाणे आजचा पहिला दिवस होता. ते जळगाव येथील पोलिसांचा कार्यक्रम संपवून पुढच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील नागपूर पोलिसांच्या वाहनाचा समोरील डाव्या बाजूचा टायर फुटला. यामुळे वाहनाने तब्बत तीन वेळी पलटी खाली. ज्यात चार पोलिस शिपाई अनिल ओंकार मडपाडे, फहीम खान अस्लम खान, प्रफुल वाळके आणि अनिल मडपाडे हे जखमी झाले. या जखमी पोलिसांना तातडीने अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर येथे त्यांच्यावर उपचार केले जातायत. दरम्यान मंत्री राठोड यांनी जखमी पोलिसांची भेट रूग्णालयात येऊन घेतली असून त्यांनी त्यांची विचारपूस केली आहे. दरम्यान या अपघातात एका पोलिसाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत असून त्याच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. तर इतर पोलिसांना पाठीवर आणि इतर ठिकाणी मुक्कामार लागला आहे.

राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार? घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Newsworldmarathi Mumbai: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील जुन्या लोखंडी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, 32 जण जखमी झाले, तर 2-3 जण अजूनही बेपत्ता असण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये नुकसानभरपाई आणि जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे जाहीर केले आहे. कुंडमळा पूल दुर्घटना; नेमकं काय घडले? मावळ तालुक्यातील कुंडमळा हे इंद्रायणी नदीवरील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील धबधबा आणि नदीचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. रविवारी, सुट्टीचा दिवस असल्याने 100 हून अधिक पर्यटक या 30 वर्षांहून अधिक जुन्या लोखंडी पुलावर उपस्थित होते. हा पूल आधीच जीर्ण झाला असून, त्यावर “प्रवासासाठी अयोग्य” असा फलक लावण्यात आला होता. तरीही, पर्यटकांनी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गर्दी केली, आणि काहींनी दुचाकीही पुलावर चढवल्या. अचानक मोठा आवाज होऊन पूल कोसळला, आणि अनेकजण नदीच्या तीव्र प्रवाहात पडले. आतापर्यंत या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. 32 जण जखमी झाले असून, यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींवर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर तळेगाव दाभाडे येथील मायमर आणि अथर्व रुग्णालयात इतर जखमींवर उपचार झाले. काही किरकोळ जखमींना घरी सोडण्यात आले. NDRF, स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि गावकऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 51 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. रविवारी रात्री अंधारामुळे बचावकार्य थांबवण्यात आले, परंतु सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू झाली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, 2-3 जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले असण्याची शक्यता आहे. NDRF सध्या त्यांचा शोध घेत आहे. मावळ तालुक्यात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळीही मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे इंद्रायणी नदीचा प्रवाह तीव्र झाला आहे. यामुळे NDRF समोर बचावकार्याचे मोठे आव्हान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून खालील निर्देश दिले: बचावकार्याला वेग: NDRF च्या तुकड्या, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या. शिंदे यांनी बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश दिले. स्ट्रक्चरल ऑडिट: अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्याचे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिले. यामुळे जीर्ण आणि धोकादायक पूल ओळखून त्यांची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी केली जाणार आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज: पर्यटनस्थळांवर, विशेषतः सुट्टीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा तत्पर ठेवावी, असे शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांनी या दुर्घटनेसंदर्भात शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत की, यापुढे अशा घटना घडणार नाहीत,” असे त्यांनी नमूद केले. थोडक्यात बचावलेले योगेश भंडारे यांनी सांगितलं अनुभव या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेले योगेश भंडारे यांनी सांगितले, “पुलावर 100 हून अधिक लोक होते. लोकांना ‘घाई करू नका’ असा इशारा दिला गेला, पण कोणी ऐकले नाही. मी तिघांचा मृत्यू डोळ्यांनी पाहिला. पूल कोसळताच सगळे पाण्यात पडलो.” स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, पावसाळ्यात कुंडमळा परिसरात मोठी गर्दी होते, आणि पूल हा सेल्फी पॉइंट म्हणून लोकप्रिय आहे.

पुण्यात कॉँग्रेसला आणखी एक झटका; सोनाली मारणे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

0
Newsworldmarathi Pune : कॉँग्रेस पक्षामधून सुरू झालेले आऊट गोइंग थांबायला तयार नसल्याचे दिसते. सात वर्षे महिला पुणे शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या सोनाली मारणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठविल्याचे समजते. मारणे या सध्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर कार्यरत होत्या. हर्षवर्धन सपकाळ यांना लिहिलेल्या पत्रात सोनाली मारणे यांनी म्हंटले आहे की, 2011 पासून कॉंग्रेस पक्षाची कार्यकर्ती म्हणून मी काम करत आहे. ज्याप्रमाणे विरोधी पक्ष म्हणून काम पक्षाने करायला हवा त्याप्रमाणे पक्ष काम करताना दिसत नाही याची खंत वाटते. जे काम करू शकतात त्यांना योग्य न्याय दिला जात नाही. तसेच निवडणूक आकडेवारी पेक्षा कार्यकर्त्यांच्या भावनांकडे लक्ष देण्यात पक्षाला अपयश आल्याचे नमूद करत राष्ट्रीय कार्यकारणी कडून महाराष्ट्राला कायमच दुय्यम दर्जा दिला जात आहे, पक्षाकडे पुढील पंचवार्षिकसाठी कोणतीही योजना नाही असेही मारणे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

धक्कादायक खुलासा…! पुण्यातील 13 शाळा अनधिकृत, तर 24 शाळा चुकीच्या जागी; पालकांना सतर्कतेचा इशारा!

0
Newsworldmarathi Pune : शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात शालेय शिक्षणासंदर्भात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत 13 शाळा पूर्णपणे अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे, तर 24 शाळा मूळ जागेवर नसून दुसऱ्या ठिकाणी बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे आढळून आले आहे. नवीन शालेय वर्षाच्या पहिल्याच दिवशी (16 जून 2025) ही माहिती समोर येताच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुणे जिल्हा परिषदेने पालकांना सतर्क राहण्याचे आणि अधिकृत मान्यता असलेल्या शाळांमध्येच प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत शाळांचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून हा खुलासा झाला आहे. राइट टू एज्युकेशन (RTE) कायद्याचे उल्लंघन करत या 13 शाळा शासनाच्या परवानगीशिवाय आणि आवश्यक कागदपत्रांविना सुरू होत्या. याशिवाय, 24 शाळांनी शासनाची मान्यता घेतली असली, तरी त्या मंजूर केलेल्या जागेवर नसून दुसऱ्या ठिकाणी चालवल्या जात आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात असून, पालकांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय नाईकाडे यांनी सांगितले, “RTE कायद्याच्या तरतुदीनुसार, कोणतीही शाळा स्थानिक प्राधिकरणाची मान्यता आणि ना-हरकत प्रमाणपत्र (NoC) शिवाय सुरू करता येत नाही. या अनधिकृत शाळा कायद्याचे उल्लंघन करत असून, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पालकांनी आपल्या मुलांना अशा शाळांमध्ये प्रवेश देऊ नये.” अनधिकृत शाळांची यादी पुणे जिल्हा परिषदेने खालील 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे: एस.पी. इंग्लिश मिडियम स्कूल, वाघोली कलर स्कूल, ताथवडे न्यू विस्डम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे किंग्जवे पब्लिक स्कूल, लोणावळा माय स्कूल, ताथवडे न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडियम स्कूल, बिबवेवाडी आयडियल पब्लिक स्कूल, धायरी महात्मा गांधी प्रशाला टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब, कोंढवा सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा इमॅन्युअल पब्लिक स्कूल, हडपसर मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल, सोलापूर रोड आर्यन वर्ल्ड स्कूल, नऱ्हे या शाळांनी शासनाची परवानगी न घेता प्रवेश प्रक्रिया आणि जाहिराती सुरू केल्या होत्या, जे कायद्याचे उल्लंघन आहे. 24 शाळा चुकीच्या जागी तपासणीत असेही आढळले की, 24 शाळांना शासनाची मान्यता मिळाली असली, तरी त्या मंजूर केलेल्या ठिकाणी चालवल्या जात नाहीत. या शाळा मूळ जागेपासून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्या असून, याबाबत शासनाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे या शाळांचे अधिकृत दर्जाही संशयास्पद आहे. या शाळांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. प्रशासनाची कारवाई आणि पालकांना आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या अनधिकृत शाळांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. RTE कायद्यांतर्गत या शाळांवर 1 लाख रुपये दंड आणि बंद न झाल्यास रोज 10,000 रुपये दंड आकारला जाईल. याशिवाय, काही शाळांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संजय नाईकाडे यांनी पालकांना आवाहन केले आहे की, “पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश देण्यापूर्वी शाळेची अधिकृतता तपासावी. यासाठी Unified District Information System for Education (U-DISE) पोर्टलवर शाळेची नोंदणी तपासावी. अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि पालकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.” पुणे जिल्हा परिषदेने पालकांना खालील सूचना दिल्या आहेत: शाळेची मान्यता तपासण्यासाठी स्थानिक पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. U-DISE पोर्टलवर शाळेची नोंदणी आणि मान्यता तपासावी. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेणे टाळावे. शाळेच्या प्रवेशद्वारावर “अनधिकृत शाळा” असा फलक आहे का, हे तपासावे. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण नवीन शालेय वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा खुलासा झाल्याने पालकांमध्ये संभ्रम आणि चिंता पसरली आहे. एका पालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “आम्ही मुलाला इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश दिला, पण ती अनधिकृत आहे हे कळलं तेव्हा धक्काच बसला. आता मुलाला दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागेल.” पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक पालक इंग्लिश मिडियम शाळांमध्ये प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क भरतात. अशा परिस्थितीत अनधिकृत शाळांमुळे पालकांचा विश्वासघात होत असल्याची भावना आहे. जिल्हा परिषदेची अनधिकृत शाळांवर कारवाई पुणे जिल्हा परिषदेने यापूर्वीही अनधिकृत शाळांविरोधात कारवाई केली आहे. 2024 मध्ये, 49 अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती, त्यापैकी 13 शाळा बंद करण्यात आल्या आणि 10 शाळांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल झाले. याशिवाय, 5 शाळांना मान्यता मिळाली, तर 3 शाळांना सरकारकडून हेतुपत्र (Letter of Intent) प्राप्त झाले. 2023 मध्येही, पुणे जिल्ह्यात 12 अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती, आणि पालकांना आपल्या मुलांना या शाळांमधून काढून जवळच्या अधिकृत शाळांमध्ये प्रवेश देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पुण्यात डेमू ट्रेनच्या डब्यात लागली आग, प्रचंड धूर अन् प्रवाशांची पळापळ

0
Newsworldmarathi Pune : Pune News : दौंड-पुणे डेमू धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग; प्रवाशांच्या समयसूचकतेने टळला मोठा अनर्थ! दौंड : दौंडहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या दौंड-पुणे डेमू ट्रेनच्या तिसऱ्या बोगीतील शौचालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. ही घटना आज सोमवारी सकाळी 7:05 वाजता घडली आहे. धुराचे लोट आणि प्रवाशांच्या किंकाळ्यांनी ट्रेनमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. सुदैवाने, काही धाडसी प्रवाशांनी समयसूचकता दाखवत शौचालयात अडकलेल्या एका व्यक्तीची सुटका केली, आणि तातडीच्या उपाययोजनांमुळे मोठा अनर्थ टळला. रेल्वे प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून, आगीचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दौंड-पुणे डेमू ट्रेन दररोज सकाळी 7:05 वाजता दौंड रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे रवाना होते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ही ट्रेन पुण्याच्या दिशेने निघाली होती. मात्र, दौंड आणि पुणे दरम्यानच्या मार्गावर, इंजिनपासून तिसऱ्या बोगीतील शौचालयात अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किट हे आगीचे कारण असावे, असा अंदाज आहे. आग लागताच बोगीत धुराचे लोट पसरले, आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली. आग लागलेल्या शौचालयात एक व्यक्ती अडकली होती. दरवाजा लॉक झाल्याने तो उघडत नव्हता. या व्यक्तीने जोरजोरात आरडाओरड केल्याने इतर प्रवाशांच्या लक्षात आले. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत असताना, काही धाडसी प्रवाशांनी तातडीने पुढाकार घेत दरवाजा तोडून त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. रेल्वेत लागलेल्या आग आणि धुरामुळे प्रवासी घाबरले, आणि जीव वाचवण्यासाठी काहींनी किंकाळ्या फोडत इकडे-तिकडे धावण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी तात्काळ ट्रेनच्या आपत्कालीन साखळी खेचून ट्रेन थांबवली. ट्रेन थांबवताच रेल्वे कर्मचारी आणि स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, आणि काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. कोणतीही जीवितहानी नाही या घटनेत प्रवाशांनी दाखवलेले धैर्य आणि समयसूचकता कौतुकास्पद आहे. शौचालयात अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी काही प्रवाशांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दरवाजा तोडला. एका प्रवाशाने सांगितले, “धूर आणि आगीच्या ज्वाळांनी आम्ही घाबरलो होतो, पण शौचालयातून येणारी आरडाओरड ऐकून आम्ही तातडीने दरवाजा तोडला. त्या व्यक्तीला वाचवणे गरजेचे होते.” आणखी एका प्रवाशाने नमूद केले, “आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले, आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.” रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रिया रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी (DRM) सांगितले, “आगीचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचा अंदाज आहे. ट्रेनच्या सर्व बोग्यांचे तातडीने तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य आहे.” रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि तांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून, विद्युत यंत्रणेची तपासणी आणि शौचालयाच्या अवस्थेचा तपास सुरू आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. शॉर्ट सर्किटचा धोका रेल्वे तज्ज्ञांच्या मते, डेमू ट्रेनच्या जुन्या बोग्यांमधील विद्युत यंत्रणेची झीज आणि अपुरी देखभाल यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. दौंड-पुणे डेमू ट्रेन ही स्थानिक प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे, परंतु तिच्या बोग्यांची नियमित तपासणी आणि दुरुस्ती यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वीही अशा ट्रेनमध्ये शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या असून, रेल्वे प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसामुळे शहरात वाहतूक नियोजन कोलमडले; वाहतूक पोलीस व महापालिकेची निष्क्रियता; रोहन सुरवसे यांचा आरोप

0
Newsworldmarathi Pune : शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराचा ताळमेळच बिघडवला आहे. थोडा पाऊस पडला तरी रस्ते जलमय होणे, वाहतूक ठप्प होणे, पाणी तुंबणे आणि हाल होणे या गोष्टी आता पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. महापालिकेच्या पावसाळीपूर्व नियोजनातील अभाव आणि ढिसाळपणामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, खड्डेमुक्ती आणि रस्त्यांची देखभाल यासाठी नियोजन जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात शहराच्या विविध भागांमध्ये अजूनही नाले तुंबलेले आहेत, रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या वाढली आहे आणि अनेक ठिकाणी खोदकाम अपूर्ण अवस्थेत आहे. परिणामी, अगदी थोड्या पावसातही शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये गुडघाभर पाणी साचत आहे. चेंबरमधून पाण्याचे प्रवाह दिवसभर रस्त्यावर वाहत आहेत. पुण्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड कोंडी निर्माण होत आहे. मेट्रोचे काम, पाइपलाइन बदलण्याचे प्रकल्प, आणि रस्ते दुरुस्ती अशी अनेक कामे महापालिकेने एकाच वेळी सुरू ठेवली असून, यांचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. अपूर्ण कामांमुळे रस्त्यांवर चिखल, खड्डे आणि अडथळे निर्माण होत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस उपलब्ध नसतात त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे. पुणे महापालिकेने तातडीने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी अपूर्ण नालेसफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करणे, खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करणे, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे. नागरिकांकडून वेळोवेळी महापालिकेला सूचना, तक्रारी आणि मागण्या केली जात असल्या तरी त्याला प्रतिसाद अत्यंत कमी मिळत असल्याचे चित्र आहे.
पुणे महापालिकेकडून दरवर्षी सांगण्यात येते की, पावसाळ्याच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली आहे, मात्र प्रत्यक्षात ही हमी फसवी ठरत आहे. अपूर्ण नालेसफाई , रस्ते खोदकाम, विस्कळीत झालेले वाहतुकीचे नियोजन, प्रचंड वाहतूक कोंडी ही केवळ महापालिका प्रशासनाची निष्क्रियता नसून पुणेकरांच्या सुरक्षिततेशी आणि आरोग्याशी खेळ आहे.
-रोहन सुरवसे पाटील अध्यक्ष, स्वाभिमानी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य.

किल्ले सिंहगडावर वि.हिं.परिषदेतर्फे पालखी सोहळा थाटात

0
Newsworldmarathi Pune : जय भवानी, जय शिवराय… छत्रपती संभाजी महाराज की जय चा अखंड जयघोष… शंख, हलगी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर… भंडारा व फुलांची उधळण… आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी… अशा शिवमय वातावरणात सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित पालखी सोहळा थाटात साजरा झाला. तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्याकरिता भगवे झेंडे घेवून सिंहगडावर मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांचा जनसागर लोटला. विश्व हिंदू परिषद, पुणे व श्री शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने झाला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शिल्पाचे पूजन झाले. यावेळी सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष शरद जगताप, विभाग मंत्री केतन घोडके, धनंजय गायकवाड यांसह शिवभक्त उपस्थित होते. अभिवादन सोहळ्याचे यंदाचे हे आठवे वर्ष होते. छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅली विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा या मार्गाने सिंहगडावरील वाहनतळ येथे आली. त्यानंतर सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत हलगी पथक, केशव शंखनाद पथक, ढोल ताशा पथक आदी सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन आणि सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील झाले. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याकरिता सर्व शिवभक्तांना राजगडावर उपस्थित राहता येते असे नाही. त्यामुळे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक गड-किल्ल्यावर हा सोहळा साजरा व्हायला हवा. हिंदू साम्राज्य दिन म्हणून हा दिवस साजरा केला जात आहे. स्वराज्य हे आपल्या सगळ्यांचे राज्य आहे. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हा सोहळा साजरा होत असून ही कौस्तुकास्पद गोष्ट आहे. गडावर केवळ सोहळा साजरा न करता गड स्वच्छता आणि वृक्षारोपणासारखे सामाजिक उपक्रम होतात, ही चांगली बाब आहे. किशोर चव्हाण म्हणाले, भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शु. त्रयोदशी नृपशालिवाहन शके १५९६ या दिवशी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. या घटनेने हिंदूचे सार्वभौमत्व पुनप्रस्थापित झाले.,म्हणून हा दिन सर्वांनी हिंदू साम्राज्य दिन म्हणून गौरवीला पाहिजे. या प्रसंगाचे मूक साक्षीदार म्हणजे स्वराज्यातील गड किल्ले होय. त्यामुळे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन प्रत्येक गड किल्ल्यावर झाले पाहिजे. यासाठी किल्ले सिंहगडावर आम्ही हा सोहळा दरवर्षी आयोजित करतो. सर्व शिवभक्तांनी आपापल्या परिसरातील गड-किल्ल्यांवर हा सोहळा आयोजित करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचा समारोप सिंहगड पायथ्याजवळ महाप्रसादाने झाला.

राज्यात कोसळधार, मुंबई पुण्यात मुसळधार पाऊस, रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट, पुढील 48 तास महत्त्वाचे

0
Newsworldmarathi Pune: Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा आपला जोर दाखवला आहे. हवामान खात्याने (IMD) पुढील 48 तासांत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवर विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघरसह इतर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असून, काही ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात पावसाचा कहर कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. रायगडमधील माणगाव, महाड आणि रोहा शहरांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. माणगावमधील नागाव गावात घरांमध्ये पाणी शिरले, तर लोणेरे भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील पालशेत गावात नदीला पूर आल्याने आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी साचले आहे. परशुराम घाटात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली, तर आडिवरे गावात ढगफुटीसदृश पावसामुळे महाकाली मंदिर परिसरात पाण्याचा लोंढा आला. मुंबई-ठाण्यातही पावसाचा जोर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पुढील 48 तासांत गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रविवारी या भागात विजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, तर सोमवार आणि मंगळवारी (17-18 जून) पावसाचा जोर कायम राहील. मुंबईला येलो अलर्ट असला, तरी काही भागात अतिवृष्टीची शक्यता नाकारता येत नाही. कोकणातील इतर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून, पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. हवामान खात्याचा इशारा हवामान खात्याने 18 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवारी रत्नागिरी आणि सोमवारी सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीलाही येलो अलर्ट आहे. प्रशासनाचे आवाहन पावसामुळे कोकणात पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. शेतीसाठी हा पाऊस फायदेशीर असला, तरी अतिवृष्टीमुळे दैनंदिन जीवन आणि वाहतुकीवर परिणाम होत आहे. कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट? रेड अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस) ऑरेंज अलर्ट: मुंबई, ठाणे, कोकणातील इतर जिल्हे, पुणे (घाटमाथा), सातारा (घाटमाथा), कोल्हापूर (घाटमाथा) येलो अलर्ट: पालघर, नाशिक (घाटमाथा), नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली (गडगडाटासह पाऊस) नागरिकांना सावधगिरीचा सल्ला हवामान खात्याने आणि प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावरील रहिवाशांनी पूर आणि भूस्खलनाच्या धोक्यापासून सावध राहावे. पावसाचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी घ्या, असा संदेश प्रशासनाने दिला आहे.

वैविध्यपूर्ण, मनमोहक नृत्याविष्कारांनी सजला ‘रज महोत्सव’

0
Newsworldmarathi Pune: ‘बनस्ते डाकीला गजा, बरसके थरे आसीची रज’ यावरील ओडिशाचा पारंपरिक नृत्याविष्कार, ‘रंगबती’ लोकनृत्य, एकाच मंचावर सादर झालेल्या भरतनाट्यम, ओडिशी, गौडियो, कथकली, कथ्थक, कुचिपुडी, मोहिनीअट्टम, मणिपुरी, सात्रीया अशा वैविध्यपूर्ण, मनमोहक नृत्य नवरत्न कार्यक्रमातून रज महोत्सव सजला. नृत्यांतून उमटलेल्या ह्रदयस्पर्शी भावमुद्रा, नजाकत अन् अभिनयाने उपस्थितांची वाहवा मिळवली. मासिक पाळी आरोग्याबाबत जनजागृती आणि मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी कलिंगा कला केंद्र ट्रस्टतर्फे ओडिशाच्या पारंपरिक ‘रज महोत्सव २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महोत्सवात भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडले. नृत्यांगना व गायिका, कलिंगा कला केंद्र ट्रस्टच्या संस्थापक डॉ. ममता मिश्रा, ट्रस्टचे अध्यक्ष व आयपीएस संजीब पटजोशी, महासचिव संदीप राणा, सोंदिपा राणा, सुब्रकांता मोहंती, हिरकणी सोशल फाउंडेशनच्या सीईओ पूर्णिमा लुनावत, नृत्यांगना स्वागतिका मोहापात्र, अनुपमा सेन, मीनाक्षी पुलगावकर, प्रायोजक लीना मोदी, उद्योजक अतुल गुंजाळ, अरविंद बुधानी, ट्रस्टच्या सहसचिव पौलमी चॅटर्जी, खजिनदार लोकनाथ सारंगी, सदस्य निक्षिता सारंगी यांची विशेष उपस्थिती होती. वेगवेगळ्या राज्यांच्या पारंपरिक नृत्याचे मिश्रण असलेल्या नृत्य नवरत्न या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. ओडिशा सरकारच्या ओडिया लँग्वेज लिटरेचर अँड कल्चरल डिपार्टमेंटच्या सहकार्याने हा महोत्सव पार पडला. ‘बनस्ते डाकीला गजा, बरसके थरे आसीची रज’ या सामूहिक नृत्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. डॉ. ममता मिश्रा, स्वागतिका महापात्रा, रश्मीता प्रसाद, स्मिता दास, अरुणिमा मोहंती, ओडिशी नृत्यांगना मधुमिता मिश्रा यांच्या शिष्यांनी डोळ्याचे पारणे फेडणारे सादरीकरण केले. नृत्य नवरत्न या कार्यक्रमात पुजायिता भट्टाचार्य (ओडिशाचे ओडिशी), पौलोमी साखळकर (पश्चिम बंगालचे गौडीयो), सुजा दिनकर (केरळचे मोहिनीअट्टम), धनिया मेनन (आंध्रप्रदेशचे कुचिपुडी), मौसमी रॉय-देव (उत्तरप्रदेशचे कथक), पारोमिता मुखर्जी (केरळचे कथकली), सुमना चॅटर्जी (मणिपूरचे मणिपुरी), योषा रॉय (आसामचे सात्रीया), प्रिया भट्टाचार्य (तामिळनाडूचे भरतनाट्यम) नृत्यप्रकार सादर केले. ‘रंगबती’ गाण्यावरील लोकनृत्याने उपस्थितांना ताल धरायला लावला. सर्व महिला कलाकारांना ‘रज क्वीन’चा क्राऊन देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. ममता मिश्रा म्हणाल्या, “ट्रस्टतर्फे गेल्या १५ वर्षांपासून ‘एक विचार, अनेक राज्ये’ या कल्पनेवर आधारित भारतीय शास्त्रीय नृत्य, संगीत, कला व संस्कृतीचे शिक्षण देण्यासह त्याचा प्रचार करत आहे. ओडिशामध्ये रज महोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा रज महोत्सव मासिक पाळी स्वच्छता आणि जागरूकता यांना संस्कृतीशी जोडतो. रज हा मूळ शब्द ‘रजस्वला’ आहे. हा चार दिवसांचा उत्सव असून, ओडिशात प्राचीन काळापासून साजरा केला जातो. हा धरणीमातेच्या मातृत्वाच्या तयारीचे प्रतीक आहे. या चार दिवसांत मुलींना राणीसमान मान असतो. पारंपरिक पोशाख, झुला, गोडधोड पदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने यंदाचा रज महोत्सवी उत्साहाने साजरा झाला.”