Newsworldmarathi Pune : शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराचा ताळमेळच बिघडवला आहे. थोडा पाऊस पडला तरी रस्ते जलमय होणे, वाहतूक ठप्प होणे, पाणी तुंबणे आणि हाल होणे या गोष्टी आता पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. महापालिकेच्या पावसाळीपूर्व नियोजनातील अभाव आणि ढिसाळपणामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, खड्डेमुक्ती आणि रस्त्यांची देखभाल यासाठी नियोजन जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात शहराच्या विविध भागांमध्ये अजूनही नाले तुंबलेले आहेत, रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या वाढली आहे आणि अनेक ठिकाणी खोदकाम अपूर्ण अवस्थेत आहे. परिणामी, अगदी थोड्या पावसातही शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये गुडघाभर पाणी साचत आहे. चेंबरमधून पाण्याचे प्रवाह दिवसभर रस्त्यावर वाहत आहेत.
पुण्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड कोंडी निर्माण होत आहे. मेट्रोचे काम, पाइपलाइन बदलण्याचे प्रकल्प, आणि रस्ते दुरुस्ती अशी अनेक कामे महापालिकेने एकाच वेळी सुरू ठेवली असून, यांचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. अपूर्ण कामांमुळे रस्त्यांवर चिखल, खड्डे आणि अडथळे निर्माण होत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस उपलब्ध नसतात त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे.
पुणे महापालिकेने तातडीने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी अपूर्ण नालेसफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करणे, खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करणे, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे. नागरिकांकडून वेळोवेळी महापालिकेला सूचना, तक्रारी आणि मागण्या केली जात असल्या तरी त्याला प्रतिसाद अत्यंत कमी मिळत असल्याचे चित्र आहे.
पुणे महापालिकेकडून दरवर्षी सांगण्यात येते की, पावसाळ्याच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली आहे, मात्र प्रत्यक्षात ही हमी फसवी ठरत आहे. अपूर्ण नालेसफाई , रस्ते खोदकाम, विस्कळीत झालेले वाहतुकीचे नियोजन, प्रचंड वाहतूक कोंडी ही केवळ महापालिका प्रशासनाची निष्क्रियता नसून पुणेकरांच्या सुरक्षिततेशी आणि आरोग्याशी खेळ आहे.
-रोहन सुरवसे पाटील
अध्यक्ष, स्वाभिमानी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य.


Recent Comments