केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले कोथरूड मधील विद्यार्थ्यांचे स्वागत…
Newsworldmarathi Pune: आज लहानग्यांचा शाळेतला पहिलाच दिवस ! याच औचित्याने लहानग्यांच्या स्वागतासाठी कोथरूड येथील पुणे महापालिकेच्या पंडित दीनदयाल उपाध्याय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पुणे महापालिकेच्या शाळेत हजारो मुलं-मुली शिक्षण घेतात. माझंही या शाळांशी वर्षानुवर्षे भावनिक नातं कायम आहे. आयुष्याची वाट काहीशी खडतर असताना ज्ञानगंगेच्या लाटेवर स्वार होणारे हे विद्यार्थी नव्या उमेदीने शैक्षणिक वाटचाल सुरु करतात, हे निश्चितच समाधान देणारे असते, असे केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.
यावेळी ना. नगरसेवक दीपक पोटे, मंजुश्री खर्डेकर, जयंत भावे, पुनीत जोशी, बापू मानकर, कुलदीप सावळेकर, नीलेश कोंढाळकर, प्रशांत हरसुले, मंदार बलकवडे, प्राची बगाटे, अपर्णा लोणारे यांच्यासह शाळेचे शिक्षक आणि पालकांनी उपस्थित होते.
आमदार-खासदार विकत घेण्यासाठी पैसे, पण पूल दुरुस्तीसाठी नाही?’ संजय राऊतांचा अजित सरकारवर हल्लाबोल
Newsworldmarathi Mumbai: Pune Maval bridge collapse : पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ही दुर्घटना रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली, ज्यामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी झाले आहेत.
यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. सध्या 2 ते 3 जण बेपत्ता असण्याची शक्यता असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) सोमवारी सकाळी पुन्हा बचावकार्यासाठी नदीपात्रात उतरले आहे. मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह तीव्र झाल्याने बचावकार्याला मोठे आव्हान आहे. या दुर्घटनेवरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधत पालकमंत्री अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र डागलं. अजित पवार या दुर्घटनेची जबाबदारी घेणार आहेत का? असं संजय राऊत म्हणाले.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात आणि देशात नवीन सरकार आल्यापासून सातत्याने अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले सुरु आहेत. काल दोन दुर्घटना घडल्या. मावळमधल्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. या अपघातात नक्की किती लोक मृत्यू पावले आहेत याचा खरा आकडा समोर आलेला नाही. कित्येक लोक वाहून गेले, असं संजय राऊत म्हणाले.
अजित पवारांना गर्व आणि अहंकार
पुढे बोलताना म्हणाले, आपण विकासाच्या गोष्टी करता. त्या जिल्ह्याचे अजित पवार हे पालकमंत्री आहेत. त्याबद्दल त्यांना गर्व आणि अहंकार आहे. मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी घेणार आहात का? एक दोन कोटींचा पूल पालकमंत्री उभा करु शकले नाहीत. पालकमंत्री अशा लहान कामात झोपलेले असतात. मोठ्या बिल्डरांची ठेकेदारांची कामे यात ते जागे असतात. काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला.
तसेच या पुलासाठी कागदावर पैसे मंजूर झाल्याचे म्हटलं जातंय. मग पूल का नाही झाला? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? मते विकत घ्यायला, आमदार खासदार विकत घ्यायला, लाडक्या बहिणींची पैसे विकत घ्यायला पैसे मिळतात. पण लोकांचे बळी गेलेला पूल दुरुस्त करायला पैसे नाहीत, असा संतप्त सवल राऊत यांनी केला.
दि ऑर्डन्नस फॅक्टरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी पद्मश्री मिलिंद कांबळे यांची निवड
Newsworldmarathi Pune: दि ऑर्डन्नस फॅक्टरी एम्प्लॉइज एज्युकेशन सोसायटीच्या (रेंजहिल्स सेकंडरी स्कूल ग्रुप) च्या अध्यक्षपदी आय आय जम्मू चे अध्यक्ष व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांची निवड झाली .आज त्यांनी शालेय विद्यार्थ्यांचे पुष्प व खाऊ देऊन स्वागत करीत अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
रेंजहिल्स स्कूल चा येत्या वर्षभरात कायापालट करणार असे आश्वासन पद्मश्री मिलिंद कांबळे त्यांनी यावेळी दिले.नवीन शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी कोरा कॅनव्हांस आहे .त्यावर कुंचल्याने आयुष्याची स्वप्ने ,आवड आणि निर्धार रंगवण्यासाठी आपल्या संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक व आम्ही सज्ज आहोत असा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी दिला.
संस्थेच्या रेंजहिल्स इंग्लिश स्कूलचा च्या मुख्याध्यापिका अमृता ग्रोवर व रेंजहिल्स सेकंडरी स्कूल च्या प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी भुजबळ यांनी पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे स्वागत केले.
खडकी एम्युनेशन फॅक्टरी च्या कर्मचारी व परिसरातील वंचित घटकातील मुलांना शिक्षण देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे .या संस्थेची स्थापना 1966 साली करण्यात आली.
आपल्या या संस्थेला लवकरच विविध उपक्रम राबवून अतिशय अद्ययावत सर्व सुविधा युक्त शाळा पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनातून करणार असून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आता आपली संस्था अतिशय गतीने काम करणार असल्याचे संस्थेचे सहसचिव राजेंद्र साळवे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले .
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शैलेंद्र जगताप,सहसचिव राजेंद्र साळवे ,संचालक गौतम भोसले ,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अमृता ग्रोव्हर व मराठी माध्यमाच्या प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी भुजबळ ,प्री प्रायमरी च्या मुख्याध्यापिका सोनम जाधव ,मुख्याध्यापक सोमनाथ बोभाटे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते .
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत…
Newsworldmarathi Pune : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागतकरण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या आरंभी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी
प्रवेशद्वार रांगोळ्या व फुलमाळांनी सजवले होते.
इयत्ता पाचवीच्या नवप्रविष्ट विद्यार्थ्यांना शासनाच्या डायटच्या अधिकारी श्रीमती वसुधा शिंदे यांच्या हस्ते नवीन पाठ्यपुस्तकांचे संच देण्यात आले.शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविकातून शाळेत विविध विषयांचे अध्ययन कशासाठी करायचे याची माहिती स्वरचित गीत गायनातून विद्यार्थ्यांना दिली व ते गीत विद्यार्थ्यांकडून गाऊन घेतले.
मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांनी लिहिलेल्या ‘चंदर आणि इतर कथा ‘ या गोष्टीच्या पुस्तकाचे प्रकाशन या निमित्ताने करण्यात आले. शालासमिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर व प्रमुख अतिथी प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री.विजय देवळणकर यांच्या हस्ते बाल विद्यार्थ्यांच्या समावेत हे पुस्तक प्रकाशन करण्यात आले.या पुस्तकातील चंदर या गोष्टीचे कथन रवींद्र सातपुते यांनी केले.पाचवीतील विद्यार्थी अबीर पाटणकर याने या पुस्तकाचे परीक्षण सादर केले.विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमास पर्यवेक्षक मंजुषा शेलूकर व अंजली गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.उपमुख्याध्यापक जयंत टोले यांनी उपस्थितांचे आभार मानले तर रवींद्र सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.
डी ई एस शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत…
Newsworldmarathi Pune: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेमध्ये शाळा सुशोभीत करून तसेच खाऊ देऊन नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या गणेश सभागृहामध्ये या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुवर्णा बोरकर यांनी ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक विकास पढेर यांनी केले. योगेश पाटील यांनी शाळेबद्दलची चित्रफीत दाखवून विद्यार्थ्यांना शाळेची माहिती करून दिली. शालेय पदाधिकाऱ्यांचा आणि शिक्षकांचा परिचय मनीषा जाधव यांनी करून दिला. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपामध्ये शालेय क्रमिक पुस्तकांचे वाटप मुख्याध्यापिका सुनीता राव यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करून आदर्श मनुष्य घडवण्यासाठी शाळा कशा प्रकारे प्रयत्न करते याबद्दल विचार सुनीता राव यांनी मनोगतामध्ये मांडले. या कार्यक्रमामध्ये इयत्ता सहावी मधील निखिल भुजबळ याने याच शाळेमध्ये प्रवेश घेण्याची पूर्वीपासूनची इच्छा होती, अशी भावना व्यक्त केली. पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील उपक्रमांमध्ये तसेच खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकांनी विद्यार्थ्यांना केले.
क्रमिक पुस्तकांच्या वाटपाची व्यवस्था काशीनाथ घोडे यांनी पाहिली. सर्वांचे आभार गीतांजली जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी देविदास झोडगे यांनी केले. स्टेज सजावट डॉ. रूपाली माळी यांनी केली. या कार्यक्रमाची छायाचित्रण व्यवस्था डाॅ. अरुण डेंगळे यांनी पाहिली. कार्यक्रमास पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार उपस्थित होते*
शाळेचा पहिल्या दिवशी छोटा व मोठ्या गटाचे स्वागत केले. मुलांचे स्वागत फुलांच्या माळा, तोरणे, फुगे, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या इत्यादीने केले. तसेच प्ले ग्रुप व मिनी केजी मुलांसाठी शाळेतील पालक व शिक्षणविवेक मार्फत पपेट शो सादरीकरण केले.जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ होतो.
मुलांना शाळेची गोडी लागावी. त्यांचा शाळेचा पहिला दिवस कायम आठवणीत रहावा म्हणून टिळक रोडवरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत नाविन्यपूर्ण मुलांचे स्वागत केले.
शिक्षिकांनी ढोल, लेझीमचा गजर केला. शाळेतील काही मुले डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, आपटे आणि शाहू महाराज यांच्या वेशभुषेत आली होती. शाळेच्या आवारात सौ.निशा जोशी यांनी मंत्रोच्चारात अग्निहोत्र केले. शाळा पुर्ण सजविण्यात आली होती. प्रत्येक वर्गात मुलांना अष्टगंध लावून त्यांचे औक्षण करण्यात आले. बालगीते लावून त्यांचे स्वागत केले. मुलांनी आपल्या पालकांसोबत अग्निहोत्र आणि सरस्वतीचा आशिर्वाद घेतला. शाळेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री ठकार आवर्जून उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी मुलांचे, पालकांचे स्वागत केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा पहिला दिवस उत्साहात, आनंदात पार पडला.
तब्बल दीड महिन्याच्या सुट्टीनंतर आज पासून सकाळ व दुपार सत्रातील विद्यार्थ्यांनी शाळेचा श्री गणेशा केला. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहुर होती. आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी याकरिता विद्यार्थ्यांचे औक्षण करून सनईच्या मंजुळ नादातून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीला वंदन करून सरस्वतीचा आणि सर्व शिक्षकांचा आशीर्वाद घेऊन नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ केला.bयावेळी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख उपस्थित होत्या.
पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दोन हजार पोलिसांचा ताफा
Newsworldmarathi Pune : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज होत असून, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत आळंदी पोलिस ठाण्याने यंदाच्या वारीत अधिकारी, कर्मचारी व विविध पोलिस पथके असे जवळपास २ हजार मनुष्यबळ सोहळ्यासाठी मागविले आहे. आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी ही माहिती दिली.
सोमवारी हा बंदोबस्त दाखल होणार असून, शहरात ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, नागरिकांनी तत्काळ पोलिस मदतीसाठी ११२ नंबर डायल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रस्थान सोहळा कालावधीत दि. १७ ते २० यादरम्यान आळंदी शहरात रस्त्यावर भाविकांची तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे.
यामुळे मंगळवार (दि. १७) पासून शहरात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. स्थानिक तसेच भाविकांना आपली वाहने शहरात स्वत:च्या घरी नेता यावीत, यासाठी आळंदी देवस्थान व आळंदी पोलिस प्रशासनाने संयुक्त बैठक घेत स्थानिक नागरिकांना पास उपलब्ध करून दिले आहेत. पालखीचे प्रस्थान गुरुवारी (दि.१९) होणार असून, या दिवशी गुरुवार असल्याने माउली पालखीची सूर्यास्तानंतर नित्य गुरुवारची पालखी प्रदक्षिणा होत असते.
कडक पोलिस बंदोबस्त
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून ७ सहायक पोलिस आयुक्त, ४२ पोलिस निरीक्षक, १६४ पोलिस उपनिरीक्षक, १ हजार ३४० पोलिस अंमलदार,६०० होमगार्ड, असा बंदोबस्त नेमण्यात येणार असून, एसआरपीएफच्या २ कंपन्या, एनडीआरएफची एक तुकडी आणि बीडीडीएसची २ पथके मदतीला पाचारण करण्यात आली आहेत.
आनंददायी शिक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध; नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची ग्वाही
Newsworldmarathi Pune: विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची वाटावी यासाठी कृतीयुक्त आनंददायी शिक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक कलानुसार करिअरसाठी आवडीचे कौशल्य विकास शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
बिबवेवाडीतील पुणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात ‘शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमा’च्या निमित्ताने, विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करताना मिसाळ बोलत होत्या. सहाय्यक शिक्षणप्रमुख सुभाष रावत, जयेश शेंडकर, पर्यवेक्षिका शोभा घोडे आणि मुख्याध्यापिका आरती पोळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, “आजपासूनच राज्यातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणात क्रांतिकारी बदल होत आहेत. केवळ पाठांतरावर भर न देता, अनुभवावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. खेळ, गाणी, गोष्टी, कोडी, नाटक, चित्रकला, प्रकल्प यांचा शिक्षणात समावेश असेल. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील आणि शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल.”
मुलांनो खूप मोठे व्हा आम्ही तुमचा पाठीशी आहोत; सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा
Newsworldmarathi Pune: मुलांनो, तुमच्यावर आलेले संकट हे दुर्दैवी आहे तरीपण तुम्ही त्याच्यातून उभे राहा, खूप खूप शिका तुम्हाला शिक्षणासाठी जी काय मदत लागेल ती करायला मी स्वतः आणि सर्व पुणेकर सदैव तयार राहतील असे प्रतिपादन पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी व्यक्त केले.
पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने पुण्य जागर या प्रकल्पांतर्गत गेली दहा वर्षे अर्धापूर, जि. नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. या मुलांचा शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ मा. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर ,माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उद्योगपती कृष्णकुमार गोयल, ललित जैन, शिक्षण तज्ञ डॉ. फुलचंद चाटे,श्रीमती प्रमिला गायकवाड, अजय पाटील , विचारवंत श्रीकांत शिरोळे, ज्येष्ठ विधीज्ञ एड. प्रताप परदेशी, एड. शिवराज कदम, प्रशांत गोरे, सुपर माईंड च्या अर्चिता मडके आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पाचे समन्वयक आणि भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.मिलिंद भोई यांनी या प्रकल्पाची माहिती देताना, नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले पुण्यातील अस्तित्व गुरुकुल या निवासी शाळेत शिक्षण घेत असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावला आहे. ही आपल्या सर्वांसाठी समाधानाची बाब आहे असे सांगून अजूनही नांदेड मधील अर्धापूर बरोबरच इतर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची साडेतीनशे विद्यार्थी या प्रकल्पातून शिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहेत असे सांगितले.
पुण्यातील शिक्षण तज्ञ डॉ. फुलचंद चाटे, प्रा. सुधाकर जाधवर, कृष्णकुमार गोयल, ललित जैन, श्रीमती प्रमिला गायकवाड, अजय पाटील या संवेदनशील पुणेकरांनी त्वरित या साडेतीनशे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पालकत्व घेण्याची तयारी दर्शवली आणि या मुलांना चांगले नागरिक घडवण्यासाठी जे काही लागेल ते मदत करण्याचे आश्वासन दिले.
आता लवकरच नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या साडेतीनशे मुलांचा या प्रकल्पात प्रवेश निश्चित झाला असून त्यांच्या प्रगतीसाठी पुणेकर सदैव कार्यरत राहणार आहेत.
या प्रकल्पातील विद्यार्थिनी दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले यांनी मनोगत व्यक्त करताना , आमचे वडील गेल्यानंतर आम्ही शेती कामात आईला मदत करत होतो त्यामुळे आमचे शिक्षण थांबले होते पण या प्रकल्पामुळे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये आम्हाला शिक्षण घेण्याचे संधी मिळाली हे आमचे भाग्य असून या संधीचे आम्ही नक्की सोने करू करून दाखवू असे प्रतिपादन करताच उपस्थित त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी बोलताना केवळ वडिलांनी आत्महत्या केली म्हणून तुम्ही शिक्षण अर्धवट सोडू नका, तुम्ही फक्त जिद्द धरा आम्ही भोई फाउंडेशनच्या माध्यमातून सदैव तुमच्या पाठीशी राऊ असा विश्वास या विद्यार्थ्यांना दिला. या निमित्ताने इयत्ता दहावी आणि बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला .
मराठवाडा आणि विदर्भातील विविध तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिले. आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले.उदय जगताप यांनी आभार प्रदर्शन केले.
मोठी बातमी…! देशात दोन टप्प्यात जनगणना होणार; केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी, जाणून घ्या सर्वेक्षणाच्या 10 महत्त्वाच्या बाबी!
Newsworldmarathi Delhi : केंद्र सरकारने 2027 मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेसाठी अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा करताना सांगितले की, ही जनगणना दोन टप्प्यांत होईल आणि डिजिटल पद्धतीने पार पडेल. यासाठी 34 लाख सर्वेक्षक आणि 1.3 लाख जनगणना अधिकारी देशभरात घरोघरी आणि शेतात जाऊन माहिती गोळा करतील.
ही जनगणना मोबाईल ॲप्लिकेशन आणि स्वगणना सुविधा यांच्या माध्यमातून पूर्ण होईल. देशाच्या स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि एकूण सोळावी जनगणना असणाऱ्या या सर्वेक्षणाबाबत 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
2027 जनगणनेच्या 10 महत्त्वाच्या बाबी
दोन टप्प्यांत सर्वेक्षण: जनगणना दोन टप्प्यांत होईल. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि मोजणी (HLO) केली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक माहिती गोळा केली जाईल.
जातनिहाय माहिती: यावेळी प्रथमच जातनिहाय जनगणना होणार असून, प्रत्येक व्यक्तीच्या जातीबाबत प्रश्न विचारले जातील.
डिजिटल पद्धत: संपूर्ण जनगणना मोबाईल ॲप्लिकेशन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे होईल, ज्यामुळे प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल.
घरांची मोजणी: पहिल्या टप्प्यात प्रत्येक कुटुंबाची निवासी स्थिती, मालमत्ता, आणि सुविधा यांची माहिती गोळा केली जाईल.
विशाल मनुष्यबळ: 34 लाख सर्वेक्षक आणि 1.3 लाख जनगणना अधिकारी देशभरात घरोघरी आणि शेतात जाऊन माहिती गोळा करतील. यामुळे संपूर्ण डेटाचा डिजिटल रेकॉर्ड तयार होईल.
स्वगणना सुविधा: नागरिकांना स्वगणना (सेल्फ-एन्युमरेशन) ची सुविधा उपलब्ध असेल, ज्यामुळे ते स्वतः ऑनलाइन माहिती भरू शकतील.
डेटा गोपनीयता: डेटा गोळा करणे, हस्तांतरित करणे आणि साठवणे यासाठी कठोर गोपनीयता आणि सुरक्षितता व्यवस्था लागू केली जाईल, जेणेकरून डेटा गळती होणार नाही.
संदर्भ तारीख: देशातील बहुतांश भागांसाठी जनगणनेची संदर्भ तारीख 1 मार्च 2027 असेल, तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील बर्फाच्छादित भागांसाठी 1 ऑक्टोबर 2026 असेल.
ऐतिहासिक संदर्भ: ही जनगणना स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि एकूण सोळावी जनगणना आहे, जी भारताच्या सामाजिक-आर्थिक संरचनेचा सर्वसमावेशक आढावा घेईल.
2019 अधिसूचनेची रद्दबातल: 2019 मधील जनगणना अधिसूचना रद्द करण्यात आली आहे, परंतु त्याअंतर्गत केलेली कार्यवाही वैध राहील.
अधिसूचनेचा तपशील
जारी तारीख: 16 जून 2025 रोजी भारत सरकारने अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी केली.
जनगणना वर्ष: 2027 मध्ये जनगणना सुरू होईल.
क्षेत्रीय व्याप्ती: संपूर्ण भारतात, विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागात सर्वेक्षण होईल.
डेटा संरक्षण: डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील.
प्रकाशन: अधिसूचना भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने जनगणनेसाठी व्यापक तयारी केली आहे. 34 लाख सर्वेक्षक आणि 1.3 लाख जनगणना अधिकारी यांचे प्रशिक्षण आणि तैनाती युद्धपातळीवर सुरू आहे. मोबाईल ॲप्लिकेशन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मची चाचणी पूर्ण झाली असून, डेटा सुरक्षिततेसाठी सायबर सुरक्षा उपाय लागू केले जाणार आहेत. गृहमंत्रालयाने सांगितले की, “ही जनगणना भारताच्या सामाजिक-आर्थिक संरचनेचा सर्वसमावेशक आढावा घेईल आणि विकासाच्या नव्या दिशा ठरवेल.”
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…! आता रांगेत ताटकळण्याची गरज नाही; एसटी पास थेट तुमच्या शाळेत
Newsworldmarathi Mumbai: महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एक दिलासादायक पाऊल उचलत, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (MSRTC) ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबवणार आहे. या योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना मासिक पास मिळवण्यासाठी आगारात किंवा पास केंद्रावर रांगेत ताटकळावे लागणार नाही.
आता एसटीचे पास थेट शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री आणि MSRTC चे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राला 16 जूनपासून सुरुवात होत असताना, ही मोहीम विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचवणार आहे.
‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’
नवीन शैक्षणिक वर्ष 16 जून 2025 पासून सुरू होत आहे. यानिमित्ताने, MSRTC ने विद्यार्थ्यांसाठी प्रवास सुलभ आणि त्रासमुक्त करण्यासाठी ही अभिनव मोहीम हाती घेतली आहे. शासनाच्या धोरणानुसार, विद्यार्थ्यांना 66.66 टक्के सवलत देऊन केवळ 33.33 टक्के भाडे भरून मासिक पास मिळतो. यामुळे विद्यार्थ्यांना घरापासून शाळा-महाविद्यालयापर्यंतचा प्रवास परवडणारा होतो.
मोफत पास योजना
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत, बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पास उपलब्ध करून दिले जातात. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळत आहे.
यापूर्वी विद्यार्थ्यांना पास मिळवण्यासाठी एसटी आगारात किंवा पास केंद्रावर लांबचलांब रांगेत थांबावे लागत होते. आता शाळा आणि महाविद्यालयांनी पुरवलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीच्या आधारे, MSRTC चे कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास वितरित करतील. यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.
MSRTC ने सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना पत्र पाठवून, पासची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. ही यादी आगार व्यवस्थापकांना सादर केल्यानंतर, पास वितरणाची प्रक्रिया त्वरित सुरू होईल.
मोहिमेचा उद्देश आणि फायदे
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले, “विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात येत आहे. ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ योजनेद्वारे विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचतील, आणि त्यांना प्रवासासाठी सवलतीचे किंवा मोफत पास सहज उपलब्ध होतील.”
या योजनेचे प्रमुख फायदे:
वेळेची बचत: विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळण्याची गरज नाही, आणि त्यांचा शैक्षणिक वेळ वाचेल.
सुलभ प्रवास: सवलतीच्या आणि मोफत पासमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक बोजा न पडता नियमित प्रवास करता येईल.
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन: ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत मुलींना मोफत पास मिळतील, ज्यामुळे त्यांचे शिक्षण सुलभ होईल.
प्रशासकीय कार्यक्षमता: शाळा आणि MSRTC यांच्यातील समन्वयामुळे पास वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होईल.
प्रशासनाची तयारी
MSRTC ने या मोहिमेची तयारी पूर्ण केली आहे. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना पत्र पाठवून, विद्यार्थ्यांच्या यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. MSRTC चे आगार व्यवस्थापक यादीच्या आधारे पास तयार करतील आणि शाळांमध्ये वितरणासाठी पाठवतील. ही मोहीम 16 जूनपासून सुरू होत असून, येत्या काही आठवड्यांत राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
ही मोहीम विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार आहे. अनेक विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांसाठी लांबचा प्रवास करतात, आणि सवलतीचे पास त्यांच्यासाठी मोठा आधार आहे. एका विद्यार्थ्याने सांगितले, “आम्हाला पाससाठी आगारात जावे लागायचे, आणि तिथे खूप वेळ लागायचा. आता पास शाळेतच मिळणार असल्याने खूप सोपे होईल.”

