Newsworldmarathi Pune : शेवटपर्यंत अतिशय रंगतदार झालेल्या लढतीत जयपूर पिंक पँथर्स संघाने दहा गुणांची पिछाडी भरून काढत बंगाल वॉरियर्सवर ३१-२८ असा रोमहर्षक विजय मिळविला आणि प्रो कबड्डी लीग मध्ये प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निश्चित केले. मध्यंतराला बंगाल संघाकडे दहा गुणांची आघाडी होती.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी जयपूर संघाला आजच्या लढतीत विजय मिळवणे किंवा बरोबरीत रोखणे अनिवार्य होते त्यामुळेच त्या दृष्टीनेच ते आज सर्वोत्तम कामगिरी करतील अशी अपेक्षा होती. जयपूर संघाने यापूर्वी झालेल्या वीस सामन्यांपैकी अकरा सामने जिंकले आहेत.
बंगाल संघाने आतापर्यंत झालेल्या वीस सामन्यांमध्ये फक्त पाचच सामने जिंकले असून प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्याच्या त्यांच्या आशा यापूर्वी संपुष्टात आल्या आहेत. मात्र स्पर्धेची सांगता यशस्वीरित्या करण्यासाठी ते उत्सुक आहेत.
आश्चर्यजनक विजय नोंदवण्याबाबत ख्यातनाम असलेल्या बंगाल संघाने आजच्या लढतीत दहाव्या मिनिटाला ८-६ अशी आघाडी घेतली होती. त्यांचा बचाव फळीतील हुकमी खेळाडू नितेश कुमार याने या स्पर्धेच्या इतिहासात पकडीमधील चारशे गुणांचा टप्पा ओलांडला. मध्यंतराला पाच मिनिटे बाकी असताना बंगालच्या खेळाडूंनी पहिला लोण नोंदवित जयपूर संघाच्या गोटात खळबळ उडवून दिली. त्यावेळी त्यांच्याकडे १४-७ अशी आघाडी होती. मध्यंतराला त्यांनी १९-९ अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात जयपूरच्या खेळाडूंनी पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. विशेषतः त्यांच्या बचाव फळीतील खेळाडूंनी सुपर टॅकल तंत्राचा चांगला उपयोग केला. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना त्यांचा संघ १९-२२ असा पिछाडीवर होता. ३३ व्या मिनिटाला त्यांनी लोण चढवित २५-२४ अशी आघाडी घेतली. त्यामुळे सामन्यातील रंगत वाढत गेली. पाच मिनिटे बाकी असताना जयपूर संघाकडे दोन गुणांची आघाडी होती. मात्र पुढच्याच मिनिटाला २७-२७ अशी बरोबरी झाली. त्यानंतर जयपूर संघाच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करीत विजयश्री खेचून आणली.
जयपूर संघाकडून अर्जुन देशवाल व अभिजीत मलिक यांना उत्तरार्धात चढाईमध्ये चांगले यश मिळाले. रेझा मीरबाघेरी याने पकडी मध्ये अव्वल कामगिरी करीत त्यांना सांगली साथ दिली. बंगाल संघाकडून अर्जुन राठी व प्रणय राणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.