Newsworldmarathi Pune : लेखनाच्या माध्यमातून लेखकाला आत्मिक समाधान मिळते. प्रशासकीय अधिकारी म्हणून कामकाज करताना जे अनुभव येतात ते साहित्यकृतीच्या मांडण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे चांगले अधिकारी हे चांगले साहित्यिक असतात तसेच चांगले सहित्यिक सक्षम अधिकारीही असतात, असे प्रतिपादन पुणे महापालिका उपायुक्त राजीव नंदकर केले.
मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात आज (दि. 23) ‘चांगला साहित्यिक कार्यक्षम अधिकारी नसतो का?’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त (जीएसटी) वैशाली पतंगे यांनी चर्चासत्राचे संचालन केले.
नंदकर पुढे म्हणाले की, आजच्या काळात या विषयावर टीका टिप्पणी केली जाते. पण साहित्यिक अधिकारी कधीच काम टाळत नाही. तर त्याच्या मनातल्या साहित्यकृती समाजासमोर याव्यात असा त्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक अधिकाऱ्यांनी तीन वर्षातील कामकाजाचा आढावा शासनास सादर करावा. ज्यायोगे अधिकाऱ्यातील साहित्यिकाची लेखनाची आवड वाढण्यास मदत होऊ शकते.
मराठी भाषा संवर्धन समितीच्या उपसंचालक अंजली ढमाळ म्हणाल्या, चांगला अधिकारी साहित्यिक असणे हा मानाचा तुरा आहे; कारण आपण आधी माणूस नंतर अधिकारी असतो. त्यातून सेवेची भावना गतिमान होते. समाजातील बारिक-सारिक बदल, अनुभव अधिकाऱ्याच्या मनात दडलेल्या साहित्यिकाला टिप कागदप्रमाणे टिपता आले पाहिजेत. समोरच्या व्यक्तीच्या मनातील वेदना समजल्यास प्रश्नातून मार्ग काढता येणे शक्य होते.
मानवी मनाचे विविध कंगोरे समजावून घेऊन लेखनाच्या माध्यमातून मांडता आले पाहिजेत. म्हणजे मानवी अवस्थेला शब्दातून व्यक्त करता आले पाहिजे, असे मत आयकर विभागाचे उपायुक्त महेश लोंढे यांनी व्यक्त केले.
विद्या पोळ-जगताप म्हणाल्या, अधिकारी आणि साहित्यिक या दोन स्वतंत्र भूमिका आहेत. असे असले तरीही शासकीय काम आणि साहित्य निर्मित यामध्ये फारकत करता येत नाही; कारण चांगला अधिकारी आणि साहित्यिक परस्परांना पूरक असतात. यासाठीच विविध साहित्यिक उपक्रम ठिकठिकाणी घेण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
समाजातील प्रत्येक घटकाने साहित्य निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा जेणे करून समाजातील विविध प्रश्नांची मांडणी समजापुढे येऊ शकेल, असे विचार वैशाली पतंगे यांनी व्यक्त केले.
उल्का नाईक-निंबाळकर म्हणाल्या, संवेदनशील, साहित्यिक हळवे मन कठोर निर्णय घेणार का असा प्रश्न अनेकदा निर्माण होत असतो; पण दोनही विषय वेगवेगळे असतात.