Newsworldmarathi Pune : खेळाडूंच्या पोषाख निर्मितीमधील एक लोकप्रिय ब्रॅण्ड असलेल्या आणि प्रो कबड्डी लीगचे एक सहयोगी प्रायोजक असलेल्या परिमॅच स्पोर्ट्सच्या वतीने लीगमधील स्टार खेळाडूंना प्रत्यक्ष भेटण्याची संधी आणि खेळाडूंना शुभेच्छा सत्राचे खास आयोजन करण्यात आले होते.
या विशेष कार्यक्रमात तमिळ थलैवाजचा सचिन तंवर, गुजरात जाएंटसचा राज साळुंके आणि दिल्ली दबंगच्या योगेश दहियाचा समावेश होता.
या ६० मिनिटांच्या कार्यक्रमात चाहत्यांना लीगमध्ये खेळणाऱ्या कबड्डीपटूंचे वैयक्तिक जीवन, कौशल्य आणि उत्कटता याविषयी जाणून घेता आले. कार्यक्रमाची सुरुवात छोट्याशा स्वागताने झाली. त्यानंतर चाहत्यांच्या कबड्डी ज्ञानाची चाचणी घेणारी एक स्पर्धा घेण्यात आली.
त्यानंतर प्रश्नेत्तराच्या सत्रात खेळाडूंनी त्यांचा प्रेरणादायी प्रवास, दैनंदिन दिनचर्या, सर्वोच्च स्तरावर कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेली उर्जा या विषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. व्यावसायिक कबड्डीच्या दुनियेतील एक वेगळीच झलक दिसून आल्याने चाहते मोहित झाले होते. त्याचबरोबर कबड्डी पर्वाविषयीचे ट्रुथ आणि डेयर, रोमांचक तंदुरुस्ती आवहाने आणि कबड्डीची थीम असलेल्या ट्रिव्हिया अशा विविख कार्यक्रमात चाहते खेळाडूंसोबत सामील झाले होते. दडपणाखाली झालेल्या सामन्यात शारीरिक तंदुरुस्ती, मानिसक लवचिकता कशी राखली या विषयी खेळाडूंनी चाहत्यांना माहिती देत मार्गदर्शन केले. या सगळ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांना खेळाडूंशी संवाद साधण्याची मान्यता देण्यात आली.
उपस्थित चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूसोबत अविस्मरणीय क्षण टिपण्याची संधी देत आणि त्यांची सही मिळवून देत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सहभागी खेळाडूंना परिमॅच स्पोर्ट्सच्या वतीने स्मृतिचिन्ह देण्यात आले.
पीकेएलचे सहयोगी प्रायोजक आणि खेळाडूंचा ब्रॅण्ड म्हणून कबड्डी चाहत्यांचा अनुभव वाढवणे आणि त्यांना आवडणाऱ्या खेळाच्या जवळ आणणे हे आमचे ध्येय आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केवळ खेळाडूंचाच गौरव केला नाही, तर कबड्डीला देशभरातील एक प्रिय खेळ बनवणाऱ्या चाहत्यांचाही सन्मान केला, अशी परिमॅच स्पोर्ट्सच्या कार्यालयाच्या वतीने टिप्पणी करण्यात आली.