Newsworldmarathi Pune : कात्रज-कोंढवा रोड या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा व स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्मारकाचे काम लोकवर्गणीतून होत आहे. रविवारी (दि. २८) आमदार योगेश टिळेकर यांच्या वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ, हार-तुरे, भेटवस्तू, मिठाई न आणता लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आमदारांच्या या आवाहनास शाळकरी विद्यार्थी, नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने आमदार टिळकेर यांच्या वाढदिनी सुमारे १४ लाखरुपयांचा निधी स्मारकासाठी लोकवर्गणीतून जमा झाला.
श्री छत्रपतींचा आशीर्वाद व प्रेरणेतून समाजासाठी काहीतरी भव्य घडविण्याच्या उद्देशाने आमदार योगेश टिळेकर यांच्या संकल्पनेतून कोंढवा भागात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मारक उभारण्यात येत आहे. शिवजयंती म्हणजेच दि. १९ फेब्रुवारी पूर्वी या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस आहे. मी काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे आवाहन केले होते त्याला नागरिकांनी दिलेला भरभरू प्रतिसाद हा खूपच मोठे समाधान देणारा असल्याचे आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले.