Newsworldmarathi Pune : महात्मा फुलें, ज्ञानज्योती सावित्रीबाई व फातिमाबी शेख यांच्या वेशभूषेतील कवी-कवयित्रीनी सादर केलेल्या काव्यरचना, फुले दाम्पत्याचा गौरवपूर्ण उल्लेख, विचारांचा जागर, सावित्री-ज्योति यांच्यासह आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे उद्घाटन गुरुवारी झाले.
अंगावर हिरवे इरकल, कपाळी आडवा गंध, हाती पुस्तक, ओठी सावित्री-ज्योतिचा जागर अशा स्वरूपात शेकडो महिला सावित्रीबाईंच्या पेहरावात अवतरल्या! डोक्यावर फुले फेटा, अंगात कोट घालून आयोजक महात्मा फुलेंच्या पेहरावात आल्याने सभागृहात जणू सावित्रीबाई, ज्योतिराव आल्याची भावना उपस्थितांच्या मनात होती.
भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २ ते ५ जानेवारी या कालावधीत होत आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात महाराष्ट्रासह देशविदेशातून ६०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत.
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरु केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन केले आहे. देश-विदेशातील सहाशे कवींचा काव्य महोत्सव, भिडेवाडा या विषयावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम फेस्टिव्हलमध्ये होणार आहेत. लंडन, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी आदी देशांतून, तसेच केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, उत्तरप्रदेश आदी राज्यातून कवी-कवयित्री सहभागी झाले आहेत.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा त्याग, समर्पण आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान अमूल्य आहे. फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळायला हवा. ही एक चळवळ असून, फुले विचार पुढच्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर फुले दाम्पत्याचा कार्यजागर करणारे कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. ज्यांनी कर्मठ व्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, लोकांचा शिव्याशाप, चिखलफेक, शेणाचे गोळे अंगावर झेलले, त्याग व समर्पण भावनेने कार्य केले, त्या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी अभियान राबवणार आहोत, असे वडवेराव म्हणाले.