Homeपुणेटेकड्यांवर वनराई नष्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

टेकड्यांवर वनराई नष्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

Newsworldmarathi pune : कोथरूड मधील टेकड्यांवर वनराईला आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले.  कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर शनिवारी आग लागून अनेक झाडे नष्ट झाली. याची गंभीर दखल घेत नामदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Advertisements

पुणेकर आणि पुण्यातील टेकड्या यांचे नाते खूप जवळचे आहे. शहरातील टेकड्या फुफ्फुसे असल्याने टेकड्या संवर्धनासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील सातत्याने प्रयत्नशील असतात. हरित कोथरूडसाठी ६५ व्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीचा संकल्प करुन, महात्मा, म्हातोबा, पाषाण आदी भागातील टेकड्यांवर वृक्ष लागवड केली. त्यापैकी म्हातोबा टेकडीवर ६५०० औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्ष लावले असून, त्याच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था देखील केली आहे. यामध्ये टेकडीवरील झाडांना पाण्याचे पाईप, टाक्या, खते, वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक बाबी वैयक्तिक व्यवस्थेतून करण्यात आल्या आहेत. तसेच, याच्या देखरेखीसाठी सात माणसांची नेमणूक केली आहे.

मात्र, काही टवाळखोर या पर्यावरण संवर्धनाच्या कामात खोडा घालण्याचे काम करत असून; म्हातोबा टेकडीवर शनिवारी तिसऱ्यांदा आगीची घटना घडल्याने येथील वनराईला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले.

नामदार पाटील म्हणाले की, टेकडी हा पुण्याचा श्वास आहे. टेकड्यांवर चांगले वातावरण असल्याने नियमित व्यायाम करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र, कोथरूड मधील टेकड्यांवर काही टवाळखोर वनसंपदेचं नुकसान करत आहेत. त्यामुळे वन विभागाने याची गंभीर दखल घेऊन; कठोर कारवाई करावी असे निर्देश दिले.

दरम्यान, या घटनेचं गांभीर्य ओळखून नामदार चंद्रकांतदादा पाटील सोमवारी सकाळी ७ वा. म्हातोबा टेकडीची पाहणी करणार आहेत. तसेच, अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी वन विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यासोबत आढावा घेणार आहेत. तसेच, वृक्ष संवर्धनासाठी पर्यावरण प्रेमींशी संवाद साधणार आहेत.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments