Newsworldmarathi Pune : लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पिडीत बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मंत्रालयात आयोजित संवादभेटी दरम्यान केले.
पुणे येथील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयाच्या पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी, प्राचार्या सिद्धकला भावसार, सहयोगी प्राध्यापक भानुदास गर्जे आदींसह आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती सभागृहात झालेल्या संवादावेळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, विधी आदी अनेक मुद्यांवर विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विद्यार्थी हा जीवनभर विद्यार्थी राहिला पाहिजे. वयाच्या पन्नाशीनंतरही शिकत राहण्याची वृत्ती कायम राहिली पाहिजे. शिकत असताना त्यात्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींसोबत काम केले पाहिजे. त्यांच्याकडून व्यवसायातील बारकावे समजून घेतले पाहिजेत. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. आज विधी शाखेचे विद्यार्थी असलेले तुम्ही सर्वजण उद्या यशस्वी वकील बनाल, परंतु वकिल बनण्याआधी आजचे आदर्श विद्यार्थी, उद्याचे आदर्श नागरिक बना, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना केलं.
राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा, साहित्य अगदी वकिलीच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी स्वत:ला सातत्याने सिद्ध करत रहावे लागते. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रचंड अभ्यास, अथक परिश्रम आणि चिकाटी आवश्यक असते. त्याची तयारी ठेवा. देशाचं संविधान तसेच कायद्यांनी सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे, निर्भयपणे, निष्पक्षपणे, निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करा, असे मार्गदर्शनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध विषयांवरच्या प्रश्नांना उपमुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच्या संवादातून राज्याचा लोकनेता, कुटुंबातील ज्येष्ठ मार्गदर्शक, एका दिलखुलास मित्राचे दर्शन घडले, अशी भावना संवादात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सागर खुरवड, महादेव पाटील, अनुज बसाळे, अमित काकडे, शंतनु दाते, हरिष मिनेकर आदी विद्यार्थी, प्रतिनिधींसोबत पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी या संवादात सहभाग घेतला.