Homeपुणेपुण्याला पुस्तकांची जागतिक राजधानी करणार : राजेश पांडे

पुण्याला पुस्तकांची जागतिक राजधानी करणार : राजेश पांडे

Newsworldmarathi Pune :पुस्तक महोत्सवाला दुसऱ्या वर्षीही वाढता प्रतिसाद मिळाला. हा महोत्सव म्हणजे सामुहिक प्रयत्नांचा आविष्कार आहे. हा महोत्सव म्हणजे एका अर्थाने लोक चळवळ आहे. नजीकच्या काळात ट्रस्टचे मोठे दालन पुण्यात सुरू करण्यात येणार असून पुणे शहराला पुस्तकांची जागतिक राजधानी करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे यांनी केले.

नॅशनल बुक ट्रस्ट आणि पुणे पुस्तक महोत्सव यांच्या वतीने पुण्यात भव्य-दिव्य ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वीरित्या आयोजन केल्याचे निमित्त साधून नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे यांच्या सत्कार सोहळ्याचे शनिवारी (दि. 25) अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे, संवाद, पुणे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजन करण्यात आले होते. पांडे यांचा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना पांडे बोलत होते. हा अभिनंदन सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाला.

प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, संवाद, पुणेचे सुनील महाजन, ‌‘भावार्थ‌’च्या कीर्ती जोशी मंचावर होत्या.

पांडे पुढे म्हणाले, प्रकाशक, वितरक यांच्या सहकार्यामुळे हा महोत्सव यशस्वी झाला असून वाचकांनीही या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला याचा आनंद आहे. पुस्तक स्टॉल्सला वाचकांनी मोठ्या संख्येने भेट दिल्याने पुढील वर्षी किमान एक हजार स्टॉल्सस उभारण्याचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम हाती घेण्यात आले त्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पांडे यांनी आवर्जून सांगितले.

श्रवण मनन, चिंतन, लेखन, वाचन यामुळे समाज सुसंस्कृत होण्यास हातभार लागत आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तक महोत्सवासारखे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. कारण वाचन हे मानवी मन श्रीमंत करीत असते, असे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

प्रा. जोशी म्हणाले की, पुस्तक महोत्सव म्हणजे एका अर्थाने वाचन संस्कृतीमध्ये क्रांतिकारी पाऊल आहे. पुस्तक महोत्सवातील पुस्तकांच्या खरेदीकडे वाढलेला कल पाहता मराठी मनाची गरीबीची मानसिकता दूर झाली आहे, असे जाणवते. पुस्तक महोत्सवामुळे वाचन संस्कृतीत वाढ झाली आहे. उत्तम नियोजन, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सर्व वयोगटातील वाचकवर्गाचा मिळालेला उदंड प्रतिसाद हे महोत्सवाच्या यशस्वीतेचे प्रमाण आहे. पुणे शहर हे वाचकांची राजधानी व्हावी यासाठी साहित्य परिषद आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रकाशक संघाचे अध्यक्ष बर्वे म्हणाले की, पांडे यांचे पुस्तक महोत्सवाचे कार्य नक्कीच स्वागतार्ह आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी पुणेकरांना मोठ्या संख्येने वाचनाकडे वळविले आहे. अशा स्वरूपाचे महोत्सव गावोगावी झाले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास प्रकाशक संघ सर्वतोपरी सहकार्य करेल.सूत्रसंचालन पराग लोणकर यांनी केले तर सुनील महाजन यांनी आभार मानले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments