Newsworldmarathi Pune : आळंदी येथे अनधिकृतपणे चालवल्या जाणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असल्याच्या तक्रारींनंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धर्मादाय आयुक्त आणि महिला व बालविकास विभागाला दोन दिवसांत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामस्थांनीही या संस्थांवर कारवाईची मागणी केली आहे.
आळंदीत सुमारे १५० हून अधिक वारकरी शिक्षण संस्था कार्यरत आहेत, ज्यापैकी काहीच धर्मादाय कार्यालयात नोंदणीकृत आहेत. नोंदणी नसलेल्या संस्थांवर प्रशासकीय नियंत्रणाचा अभाव असल्याने, अशा घटनांना वाव मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर, स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन अशा अनधिकृत संस्थांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच, पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित विभागांना त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, यामध्ये खरी पार्श्वभूमी म्हणजे धर्मदाय आयुक्त आणि महिला व बालविकास विभाग यांच्याकडून कोणतीही परवानगी न घेता, बाहेर गावातून आलेल्या लोकांनी अनेक संस्था सुरू केल्या. याच संस्थांमध्ये शिकणारे मुलं आणि मुली यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. म्हणून मी स्वतः आळंदी येथे संस्थांची पाहणी केली आहे.
संबंधित पोलीस अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी तसेच जिल्हा बाल विकास विभाग यांच्यासमवेत बैठक घेऊन कोणतीही परवानगी न घेता सुरू झालेल्या या संस्थांवर दोन दिवसांत कारवाई करण्यात यावी अशा सूचना दिल्या असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.


Recent Comments