Newsworldmarathi Pune : ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक भारताच्या दौन्यावर आहेत. ऋषी सुनक यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या पुस्तकानिमित्त त्यांना भेटण्याचा योग आला. यादरम्यान त्यांचा साधेपणा आणि मनमिळाऊपणा अनुभवण्यास मिळाल्याचे ‘ऋषी सुनक’ या पुस्तकाचे लेखक व वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे यांनी सांगितले.
मुंबईत रविवारी (दि.२) सायंकाळी सहा वाजता ऋषी सुनक अन् दिगंबर दराडे यांची भेट झाली. यादरम्यान दराडे यांनी लंडन येथे जाऊन लिहिलेल्या सुनक यांच्या जीवनावरील पुस्तकाची प्रत त्यांना भेट दिली. आपल्यावर लिहिलेले पुस्तक पाहून सुनक भारावून गेले. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील त्यांचा फोटो पाहताच त्यांनी मनमुरादपणे दाद दिली.
पुस्तक लिहिल्याबद्दल दराडे यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. पुस्तक वाचून मी माझा अभिप्राय आपणास नक्की पाठवेन, असे त्यांनी सांगितले. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी राहिलेल्या सुनक यांचा साधेपणा या ठिकाणी वेळोवेळी जाणवत होता. सहजरीत्या सर्वांशी वागण्याची त्यांची लकब त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अधिक प्रभाव पाडत होती.
त्यांनी स्वतः दराडे यांच्याबरोबर मोबाईलमध्ये सेल्फी काढला, हसतमुख चेहऱ्याने या ठिकाणी आलेल्या सर्वांनाच ते भेटत होते. भारतीय वंशाचे असलेले ऋषी सुनक यांचा भारताशी नेहमीच स्नेहबंध राहिलेला आहे, सामाजिक कार्यकर्त्या व इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका खासदार सुधा मूर्ती आणि उद्योजक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केले, त्या देशाचा पंतप्रधान होण्याचा त्यांना पहिला मान मिळाला.
प्रत्येक भारतीय माणसाला त्यांच्याविषयी अभिमान आहे. एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे आणि मंदिरात जाऊन पूजा करणारे, गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणाऱ्या पंतप्रधानांचा या ठिकाणी सर्वांना अभिमान वाटत होता.


Recent Comments