Newsworldmarathi Pune: गट शेतीला राज्य शासनाच्या वतीने 100 एकर जमीन असेल तर एक कोटी रुपये अनुदान देण्यात येत होते. आता गट शेतीचे नावे धोरण आणणार असून अनुदान ही वाढवून देणार असल्याची महत्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सत्यमेव जयते शेतकरी चषक २०२४’च्या भव्य पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. पाणी फाउंडेशन च्या वतीने बालेवाडी येथील शिवछत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
2016 पासून दुष्काळमुक्त आणि समृद्ध महाराष्ट्र बनविण्यासाठी अभिनेता अमीर खान आणि किरण राव यांनी ही संस्था स्थापन केली.
यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा आणि पद्मश्री पोपटराव पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच मनोरंजन व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांतील ४,३०० पेक्षा अधिक शेतकरी गटांनी (सुमारे २००० महिला गट) यंदाच्या शेतकरी चषक स्पर्धेत भाग घेतला. यात सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तेरती या गावातील ‘भाग्योदय शेतकरी गट’ संघाने राज्य पातळीवरील प्रथम पारितोषिक पटकवले. २५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक, तसेच प्रतिष्ठेची शेतकरी चषक ट्रॉफी जिंकली. सातारा जिल्ह्यातील भोसरे (ता. खटाव) येथील सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोबलगाव (ता. खुलताबाद) या दोन संघांना संयुक्तरीत्या १५ लाख रुपयांचे राज् पातळीवरील द्वितीय पारितोषिक देण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील कवडा (ता. कळमनुरी) येथील जय बिरसा मुंडा शेतकरी गट आणि वाशिम जिल्ह्यातील नागी (ता. मंगरूळ पीर) येथील माऊली शेतकरी गटाने संयुक्तरीत्या १० लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक जिंकले.सर्व महिला गटांना दोन राज्यस्तरीय पारितोषिके आणि तालुकास्तरीय प्रत्येकी ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाणी फाऊंडेशनच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि अखिल महाराष्ट्र स्पर्धेचे अधिकृतरीत्या उद्घाटन केले. शाश्वत पाणी व शेती पद्धतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्यासाठी फाऊंडेशनसोबत सकारात्मक सहकार्य सुरू ठेवण्याची कटिबद्धताही त्यांनी व्यक्त केली.
आमीर खान आणि किरण राव यांनीही आपल्या भाषणात शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सर्व तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.


Recent Comments