Newsworldmarathi Pune : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान आणि उष्णतेच्या लाटांचा अनुभव येण्याची शक्यता आहे. विशेषतः, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील पाच ते सात दिवसांत (२ एप्रिलपासून) काही भागांत अवकाळी पावसाच्या सरी आणि गडगडाटी वादळांची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी हवामानातील बदलांबाबत सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागांत पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. मुंबईत सध्याचे हवामान ढगाळ असून, आर्द्रता वाढली आहे. तसेच, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेती आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे
हवामानशास्त्रज्ञांच्या मते, मध्य महाराष्ट्रात सध्या चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणातील खालच्या आणि वरच्या थरांमध्ये विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ढगांच्या वाढीस मदत होत आहे. परिणामी, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि काही भागांत गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे.
डॉ. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्थिती मागील दोन दिवसांपासून दिसून येत आहे आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा प्रभाव जाणवत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.


Recent Comments