Newsworldmarathi Pune : देशाच्या नागरी विमान वाहतूक खात्याचा कारभार दिल्लीपासून सांभाळणारे आणि पुण्यातील गल्लीबोळातील कार्यकर्त्यांमध्ये सहज मिसळणारे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज स्वतः पायलट होऊन थेट विमानच चालवून उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

मोहोळ यांनी प्रशिक्षणार्थी पायलटकडून विमानाच्या यंत्रणेची सविस्तर माहिती घेतली आणि काही वेळातच “तयार है हम!” या आत्मविश्वासात भरून थेट विमान चालवले. आकाशात झेपावताना त्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता आणि आत्मविश्वास याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मंत्री मोहोळ यांनी विमान आकाशात टेक ऑफ करताच विमानातील उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

हा प्रसंग पाहणाऱ्यांसाठी प्रेरणादायी होता — कारण एखादा मंत्री केवळ फाईलांपुरता मर्यादित न राहता, क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास उत्सुक असल्याचे दर्शन त्यातून घडले. दिल्लीतील कारभार सांभाळत असताना मोहोळ यांनी पुण्यावरील लक्ष थोडे ही कमी केलेले नाही. उलट पुणेकरांसाठी काय करता येईल याचा विचार ते नेहमी करताना दिसतात.
बाणेर येथील ‘यो स्काईज एव्हीएशन’ प्रशिक्षण इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या ‘एअरबस A320’ फ्लाइट सिम्युलेटरचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विमान चालविण्याचा अनुभव घेतला. हे इन्स्टिट्यूट हवाई क्षेत्रात ज्यांना करिअर करायचे आहे, अशांसाठी ही संस्था प्रशिक्षण देणार आहे.

या प्रसंगी ‘यो स्काईज’चे संस्थापक संचालक स्क्वॉड्रन लीडर (नि.) अजय परांजपे आणि संचालिका कॅप्टन तृप्ती कर्नावट यांनी सिम्युलेटरविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी कृष्णकुमार गोयल, विजय भंडारी, प्रवीण बढेकर, राजेंद्र जैन, राजेंद्र मुथा, मोतीलाल सांकला, .सनी सांकला, श्री. सुनील नहार, उमेश जोशी, डॉ. रवी चिटणीस, डॉ. मनोज तरांबळे, यो स्काईजचे संस्थापक संचालक स्क्वॉड्रन लीडर (नि.) अजय परांजपे आणि संचालिका कॅप्टन तृप्ती कर्नावट आदींसह मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments