माऊलींच्या मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीपाहूनी समाधीचा सोहळा । दाटला इंद्रायणीचा गळा॥बाळ सिद्ध पाहता चिमुकला। कुणी गहिवरे कुणी हळहळे ।भाळी लावून चरण रजाला चरणावरी लोळला॥ चोखा गोरा आणि सावता ।निवृत्ती हा उभा एकटा । सोपानासह उभी मुक्ता अश्रूपुर लोटला॥माऊली माऊली नामाच्या गजरात,पुष्पवृष्टी,घंटानाद करत आज गुरुवार (दि.२८) रोजी तीर्थक्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात पार पडला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात पहाटे तीन वाजता प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या हस्ते माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक झाला. सकाळी सात ते नऊ वाजता हैबतबाबा पायरीपुढे हैबतबाबा आरफळकर यांच्यातर्फे कीर्तन झाले. नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन झाले. कीर्तनात केशव नामदास महाराज यांनी आळंदी तीर्थक्षेत्राचा महिमा, माऊलींचे चरित्र, समाधीचा प्रसंग आदी विषय सांगितले. समाधी सोहळ्याचा प्रसंग सांगताना नामदास महाराज यांच्यासह श्रोत्यांचे डोळे पाणावले. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, खासदार संजय जाधव, प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, डॉ.भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, चैतन्य महाराज कबीरबुवा, मानकरी साहिल कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, मंगेश आरु, डि.डि.भोसले पाटील, राम गावडे, रोहीदास तापकीर, संजय घुंडरे, अजित वडगावकर, राहुल चव्हाण, वैजयंता कांबळे, पुष्पा कुऱ्हाडे, सागर रानवडे, महेश कुऱ्हाडे, अमोल घुंडरे, अमोल वीरकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे, संतोष भोसले, विष्णू वाघमारे तसेच वारकरी भाविक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. समाधी सोहळ्यानिमित्त माऊली मंदिरात आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. कार्तिकी वारीत काळात अभिषेक, आरती, नैवेद्य असे नित्योपचार वगळता २४ तास दर्शन खुले ठेवण्यात आले होते. तसेच लाखो भाविकांनी महाद्वारातून मुख दर्शन घेतले. समाधी सोहळ्यानिमित्त मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.